नवऱ्याची भेट होईपर्यंत मी कर्नाटकात फारशी कधी गेले नव्हते. बहुसंख्य द्रविडेतरांप्रमाणे मलाही दक्षिणेतल्या सगळ्या जिलब्या सारख्याच अनाकलनीय होत्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला राहणारे सगळे ‘मद्राशी’ असा एक सोप्पा समज होता.कानडीशी आलेला संबंध म्हणजे एकदाच गाणगापूरहून सोलापूरला येताना चुकून गुलबर्ग्याऐवजी गाणगापूर रोडला गेल्यावर सोलापूरला परतण्यासाठी झालेले हाल, आणि एकदा विजापूर बघायला जाताना वाटेत गाडीचा अपघात झाल्यावर गाडीबाहेर ऐकलेली कडकड एवढाच. त्यातून हे काही गुजराती किंवा पंजाबी सारखं सहज समजणारं प्रकरण नाही याची मात्र खात्री झाली होती. तर कोथरूडमध्ये भेटलेला, चारचौघांइतपत बरं मराठी बोलणारा नवरोबा मुळचा असं काही वेडवाकडं बोलणारा निघेल याची मला कशी कल्पना असणार?
    लग्न ठरलं तेंव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकात गेले. आणि नवऱ्याच्या आजी आजोबांसकट निम्म्यापेक्षा जास्त नातेवाईकांना माझ्याशी मराठीत बोलताना ऐकून गार झाले. उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच लोकांना कोकणी येतं आणि त्यामुळे मराठी समजतं, तोडकंमोडकं का होईना, पण बोलता येतं हा शोध लागला. त्यात भाषावार प्रांतरचनेपूर्वी धारवाड – हुबळी मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे जुन्या मंडळींना बंगळूरपेक्षा मुंबई-पुणे जवळची हे ज्ञान प्राप्त झालं.
    नवऱ्याच्या काकूंनी कानडी अंकलीपी भेट दिली, आणि मग रस्त्याने चालताना प्रत्येक दुकानाची पाटी कोड्यासारखी ‘सोडवण्याचा’ नवा खेळ सुरू झाला. (अजूनही जोडाक्षरं आणि आकडे घात करतात, पण एव्हाना हुबळीतल्या नेहेमीच्या रस्त्यावरच्या बहुसंख्य पाट्या माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत:) ) देशपांडेनगर? हे देशपांडे इथे कर्नाटकात काय करताहेत? तर आजवर अस्सल मराठी समजत असलेली निम्मीअधिक नावं अस्सल कानडीसुद्धा आहेत हे समजलं. या नावांसारखेच हळुहळू अस्सल मराठी शब्दसुद्धा कानडी वेषात भेटायला लागले – अडनिडा, गडबड, किरणा, अडाकित्ता, रजा … परवा तर मामेसासुबाईंनी सुनेचं कौतुक करताना ‘अरभाट’ म्हटलं, आणि मला एकदम जीएंची अरभाट आणि चिल्लर माणसं आठवली.
    नुकतंच लग्न झालं होतं, तेंव्हा एकदा नवऱ्याच्या दोस्तांनी बाहेर जमायचा बेत केला एक दिवस. आणि नवऱ्याने घरी येऊन घोषणा केली,
    “आम्ही आज वैशालीला जाऊ.”
    “म्हणजे ? मला न विचारता ठरवताच कसं तुम्ही सगळे असं?”
    “अगं आम्ही वैशालीला जातोय. .. तुला आवडतं न तिथे जायला?”
    अस्सं. म्हणजे मला तिथे जायला आवडतं, म्हणून मुद्दाम मला वगळून वैशालीमध्ये भेटताय काय? बघून घेईन … हळुहळू तापमान वाढायला लागलं, आणि आमचं लग्नानंतरचं पहिलं कडाक्याचं भांडण झालं. या प्राण्याचा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ मध्ये हमखास गोंधळ होतो हे माझ्या हळुहळू लक्षात आलं. बेळगावच्या पलिकडून मराठीकडे बघणाऱ्यांची गोची लक्षात यायला लागली. ज्या भाषेत ‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते, ती भाषा शिकणं किती अवघड आहे तुम्हीच बघा!