अचानक ध्यानीमनी नसताना आय सी यू बाहेरच्या प्रतिक्षाकक्षामध्ये तळ ठोकायची वेळ आली, आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं.

जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स वगैरे वर्गभेद इथे नसतात.
“तुमचं कोण?” एवढा एकच प्रश्न या परिवाराचा एक भाग होण्यासाठी पुरेसा असतो.
“आमच्या पेशंटने आज म्हणे एक डोळा उघडला!” एवढी बातमी इथल्या लोकांना आनंदित करायला पुरेशी असते.
तुमचा पेशंट एकदा त्या काचेच्या दाराआड गेला, की तुम्ही फक्त बाहेर वाट बघायची.
आत ठेवलेल्या आपल्या माणसाला भेटता येत नाहीये, म्हणून तळमळणार्‍या काकूंना कुणी गावाकडची ताई “तुमच्या पेशंटला पाजायला घेऊन जा” म्हणून शहाळ्याचं पाणी देते, तेंव्हा काकूंबरोबरच अजून कुणाकुणाच्या नातेवाईकांचेही डोळे भरून येतात.

“आपल्याच नशीबात अमूक तमूक का” असा प्रश्न पडत असेल तर जरा वेळ इथे बसा. आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होतो.
कारण इथे तुम्हाला जबरी अपघातानंतर गेले दहा दिवस मृत्यूशी झगडणार्‍या पंचवीस वर्षांच्या मुलाची आई भेटते.
पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेल्या बाईचा नवरा भेटतो.
चार दिवसांपासून मुलांना आजोळी धाडून, कपड्यांची बॅग भरून सासूबरोबर पुण्याला आलेली, इथल्याच बाकड्यावर रात्री झोपणारी सून दिसते.
पोराच्या इलाजासाठी आज लगेच पंचवीस हजार कुठून आणू म्हणून काळजीत पडलेले गावाकडचे आजोबा दिसतात.
ज्यांचे नातेवाईक आयसीयू पर्यंत पोहोचूच शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा हे सगळे नशीबवान असतात.
आणि तुम्ही?