सद्ध्या थोरोचं ‘वॉल्डन ऍन्ड अदर रायटिंग्ज’ वाचते आहे. नेहेमी पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे ते हातावेगळं होईपर्यंत त्याच्याविषयी बोलायला मला वेळ नसतो. हे मात्र चवीचवीने, रोज थोडं वाचावंसं वाटतंय. पुस्तकाचा अजून जेमतेम पाचवा हिस्सा संपलाय, पण मी थोरोच्या प्रेमात पडले आहे. सद्ध्या मला चावत असणारे गैरसोयीचे प्रश्नच हा बाबा विचारतोय.
    कुठल्या तरी आर्किटेक्टने त्याच्या विचाराने बांधलेलं घर माझं घर कसं असू शकेल? माझं घर माझ्या गरजांप्रमाणे, माझ्या प्रकृतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे बनलं पाहिजे. मी ते बांधलं, तरंच ते खरं माझं घर होईल असं थोरो म्हणतो. एकदम पट्या. घर घ्यायचं ठरवल्यापासून हा प्रश्न मला छळतोय.

    थोरोने काही इंटरेस्टिंग दगड गोळा केले होते. हे दगड घरात ठेवल्यावर त्याच्या लक्षात आलं – त्यावर धूळ बसते, आणि ही धूळ नियमित झटकण्याचा नवा व्याप आपण निष्कारण मागे लावून घेतलाय. त्याने शांतपणे ते दगड पुन्हा बाहेर टाकून दिले. मी गोळा केलेले, दुसर्‍या कुणी प्रेमाने दिलेले किती धोंडे मी उगाचच वाहत असते. ही सगळी अडगळ मी कधी घरातून काढून टाकणार?

    कुठल्याही जागी जाण्याचा सर्वोत्तम मार्ग पायी जाणं हा आहे. नाही पटत? विचार करा. मी विमानाने गेले, तर प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ चालण्यापेक्षा खूपच कमी असेल. पण त्या विमानाच्या तिकिटाचे पैसे कमावण्यासाठी मी घालवलेला वेळ हा प्रवासावर खर्च केलेला वेळंच आहे. म्हणजे मी एवढा वेळ केवळ प्रवासाच्या पूर्वतयारीत खर्च केला, आणि पायी जाताना ज्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, त्या बघण्याची संधीही घालवली. डोक्याला फार त्रास देतोय हा थोरो.

    माझे दिवसाचे नऊ किंवा त्याहून जास्त तास कमवण्यावर खर्च होतात. खेरीज ऑफिसला जाण्यायेण्यातला वेळ, ऑफिसचा विचार करण्यात घालवलेला ऑफिसबाहेरचा वेळ वेगळा. वर्षाकाठच्या दहा सुट्ट्या आणि मला घेता येणारी बावीस दिवसांची रजा हा माझा ‘फावला वेळ’. वॉल्डनच्या प्रयोगानंतर थोरो म्हणतो, की वर्षाचे सहा आठवडे काम त्याच्या अन्न-वस्त्र-निवारा या प्रथमिक गरजा भागवायला पुरेसं होतं. उरलेला वेळ त्याला वाटेल तसा वापरायला मोकळा होता. म्हणजे थोरोच्या हिशोबाच्या नेमकं उलटं माझं गणित आहे. वर्षाचे शेहेचाळीस आठवडे काम आणि सहा आठवडे मोकळीक. याचा अर्थ एक तर मला माझ्या नोकरीमधून अन्न-वस्त्र-निवार्‍यापलिकडचं बरंच काही मिळतंय, किंवा मी वेळेचा अतिशय इनएफिशिअंट वापर करते आहे. सोचनेकी बात है.

    साधारणपणे पुस्तक हातात आलं, म्हणजे मला थेट विषयाला भिडायची घाई असते, की प्रस्तावना, लेखक परिचय, अर्पणपत्रिका असल्या गोष्टींच काय- कित्येक वेळा पुस्तकाचं नावसुद्धा मी धड वाचत नाही. (आत्ता सुद्धा पुस्तकाचं नाव हे लिहिताना प्रथम नीट वाचलं 😉 ) पण या घिसडघाईला वॉल्डन अपवाद ठरलं. राफ वॉल्डो इमरसनची प्रस्तावना मी चक्क मुख्य पुस्तक वाचण्यापूर्वी, मनापासून वाचली. एका समकालीनाला थोरो किती समजला होता हे या प्रस्तावनेत प्रतिबिंबित होतं.

    मराठीतून थोरोला भेटायचं असेल, तर दुर्गाबाईंनी ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ नावाने थोरोच्या लिखाणाचा गाभा असणारं ‘वॉल्डन’ मराठीत आणलंय.  इंग्रजी पुस्तक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.

Walden & other writings
Henry David Thoreau
2002 Modern Library Paperback Edition

वॉल्डनकाठी विचार विहार
अनुवाद: दुर्गा भागवत
१९६५

इ-प्रत: http://books.google.com/books?id=yiQ3AAAAIAAJ&printsec=frontcover&dq=walden