ओरिसाची भटकंती: कॉफी प्लांटेशन 
ओरिसाची भटकंती: कोटपाड
 
तीन वेळा परतीचं तिकीट बदलूनही कोरापूट पोटभर बघून झालंय असं वाटत नाही. दर वर्षी इथे ‘परब’ नावाचा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असतो. परब बघायला परत यायचं असा बेत करतच कोरापूट सोडलं. येतांना विशाखापट्टण – कोरापूट रस्त्याच्या सृष्टीसौंदर्याला न्याय देता आला नव्हता. त्यामुळे परत जातांना रस्त्याचे मनसोक्त फोटो काढले.

या डोंगराळ  भागात आदिवासी वस्ती विखुरलेली आहे. जेमतेम आठ – दहा घरांचा एक पाडा – आजूबाजूला फक्त डोंगर. अश्या एकेका वस्तीपर्यंत रस्ते – वीज – पाणी – आरोग्यकेंद्र – आंगणवाडी – शाळा पोहोचवायची, म्हणजे जितका खर्च येईल, तितकाच खर्च अन्यत्र एखाद्या पाचशे – हजार लोकवस्तीच्या खेड्यासाठी येईल. नुसत्या रिपोर्टमध्ये वाचून कदाचित ही मागणी अवास्तव वाटेल,पण  प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र इथे विकासासाठी जास्त पैसा का घालायला हवा हे अगदी पटतं.

आदिवासी पाडा

 कोरापूट जिल्हा संपतो, आपण आंध्रात प्रवेश करतो. या सीमेवर एक सुंदर वडाचं झाड आपलं स्वागत करतं.

आंध्र – ओडिशा सीमा

 स्वप्नातले डोंगर अजून थोडा वेळ सोबत करतात.

पंधरा दिवस दिवस रात्र संधी मिळेल तेंव्हा गप्पा मारूनही गप्पा संपलेल्या नसतात. त्यामुळे आमचा प्रवास एकाच गाडीतून चाललेला असतो – कलेक्टरांची लाल दिव्याची गाडी मागून रिकामी येत असते. 🙂 

आमच्या मागून येणारी लाल दिव्याची एस्कॉर्ट कार 🙂

  हा प्रवास एखाद्या टाईम मशीनमध्ये बसून केल्यासारखा वाटतो. शतकानुशतकं गोठल्यासारखे एकाच स्थितीत राहिलेलं कोरापूटचं आदिवासी जनजीवन, घनदाट जंगलं, डोंगरदर्‍या संपून अचानक आपण एकविसाव्या शतकात पोहोचतो.  जणू काही हा  बदल ठळक करण्यासाठीच आंध्र किनारपट्टीलगतच्या या भागात नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट शेतं आणि बांधावर ताडाची झाडं नजरेला पडतात.

डोंगर संपले, ताडाची झाडं आली, आंध्रात पोहोचलो.

परततांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला उतरून पोचमपल्ली बघून परत येण्याचा बेत असतो. कोरापूट आणि पोचमपल्ली दोन्ही नक्षलग्रस्त भाग. कलेक्टरांकडून घेतलेलं ‘रेड सन’ वाचता वाचता दोन्ही भागांची तुलना करायची संधी असते.