खूप खूप दिवसांपूर्वी इथे एका बागुलबुवाची गंमत सांगितली होती. तेंव्हा सुरवंटराव उडून गेल्यावर नुसता रिकामा कोष मागे ठेवून गेले होते. आज त्यांना मुद्देमालासह पकडलं:
इतके सुंदर रंग! आणि हे सोनचाफ्यावर असं लपून बसलं होतं, की मला दिसलंच नव्हतं. वाळकं पान म्हणून काढायला मी हात घातला, आणि जवळजवळ त्याला हात लागल्यावर माझ्या लक्षात आलं … हे ताजं ताजं फूलपाखरू आहे ! हिरवा रंग थेट सोनचाफ्याच्या कोवळ्या पानाचा, तर राखाडी रंग वाळक्या पानासारखा. झाडाचाच एक भाग होऊन पानाच्या खालच्या बाजूने बसलंय ते. अजून पंख चिकटलेले आहेत त्यामुळे उडता येत नाहीये त्याला.

सकाळी अजून जरा लवकर हा शोध लागला असता तर कदाचित कोषातून बाहेर पडण्याचं नाट्य बघायला मिळालं असतं! अजून तासाभराने इथे फक्त मागच्या वेळसारखाच रिकामा कोष होता 🙂

फूलपाखरू बघितल्यावर लक्षात आलं … याचे सुरवंट भारी खादाड असतात. त्यांना कसला स्पर्श झाला म्हणजे ते एक दुर्गंध सोडतात, त्यामुळे बहुतेक पक्षी यांच्या वाटेला जात नसावेत. त्यांना मी कित्येक वेळा सोनचाफ्यावरून हुसकून लावलं आहे. हे फूलपाखरू मात्र कधीच बघितलं नव्हतं बागेत. कुठे बरं जात असतील ही फुलपाखरं?
***
फुलपाखरू सापडल्यावर मी खूश होते, लगेच ही पोस्ट टाकली. त्याचा रंग जरा वेगळा वाटत होता नेहेमी पाहिलेल्या फुलपाखरांपेक्षा … पण नाव गाव शोधायचा काही प्रयत्न नव्हता केलेला. मधे जरा सवड मिळाली आणि उगाचच हे फूलपाखरू आठवलं. जरा शोधून बघू या याचा कुलवृत्तांत म्हणून गूगलबाबाला विचारलं, आणि मोठ्ठा खजिना हाती लागला! याचं नाव आहे tailed Jay (Graphium agamemnon agamemnon). आणि याच्या जीवनक्रमावर ही अप्रतिम ब्लॉगपोस्ट आहे!