Archives for category: ओरिसा

ही माझी ओरिसाच्या भटकंतीवरची शेवटची पोस्ट. सगळं लिहून संपवण्याच्या घाईत बर्‍याच इंटरेस्टिंग गोष्टी सुटून गेल्यात. त्या आठवतील तश्या मांडल्यात इथे.
 नक्षलवादाविषयीच्या ‘रेड सन’ पुस्तकाविषयी ऐकलं होतं. या पुस्तकाचा अतिशय सुंदर
सविस्तर परिचय श्रावण मोडक यांनी इथे करून दिला आहे. पुस्तकाविषयी अजून काही सांगत नाही – परिचय आणि पुस्तक दोन्ही आवश्य वाचा इतकंच म्हणेन.
 कोरापूट आणि पोचमपल्लीजवळचा आन्ध्र हे दोन्ही भाग नक्षलांच्यारेड कॉरिडॉरमध्ये येतात.



नक्षल स्मृतीस्तंभ



संस्थान नारायणपूर, पुट्टुपक्कम भागातून जातांना पोलीस कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलांचे स्मृतीस्तंभ जागोजागी दिसतात.

  आन्ध्र प्रदेशने नक्षलांविरुद्ध ठोस कारवाई केल्यानंतर इथले नक्षल ओरिसा, छत्तिसगड, महाराष्ट्रात अधिक सक्रिय झाले. आता इथे सगळं शांत शांत आहे असं समजलं. पण आजही गावातल्या घराघरावर नक्षल ग्राफिटी दिसते.

घरांवरची ग्राफिटी

सहज पुण्यातून बाहेर पडल्यावर सिंहगडावर किंवा ताम्हिणीला जातांना घराघरावर नक्षल घोषणा  लिहिलेल्या दिसल्या तर कसं वाटेल? हा विचार डोक्यात आल्याखेरीज राह्त नाही.

हे सगळं हैद्राबादपासून केवळ एक दीड तासाच्या रस्त्यावर. हा भाग दुर्गम नाही, कोरापूटशी तुलना करता मागास तर नाहीच नाही. ताडाची आणि कपाशीची शेती आहे. पारंपारिक विणकामाचा व्यवसाय आहे. शाळा, कॉलेजं आहेत, दवाखाने आहेत. कित्येक जण कामाला हैद्राबादला जातात. दोन्ही भागातल्या प्रश्नांचं स्वरूप नक्कीच वेगवेगळं असणार. पण तिथेही नक्षल आहेत, इथेही आहेत. नेपाळपासून तामिळानाडूपर्यंत सगळीकडेच हे कसे पसरले? तेंव्हा आम्ही काय करत होतो? मानेसरच्या कामगारांच्या हिंसाचारामागेही त्यांचा हात असतो, आणि दांतेवाडामधल्या पोलिसांच्या हत्यांमध्येही. मोठया शहरांमध्ये त्यांचे स्लीपर सेल आहेतकाय हवंय नेमकं या नक्षलांना? त्यांच्या मते आदिवासींवर अन्याय होतोय. ते फसवले जाताहेत. अगदी खरं आहे हे. इतकी वर्षं त्यांची वंचना झाली आहेच. काय उपाय आहे यावर? नक्षलांच्या आजवरच्या कारवाया बघितल्या, तर हे लोक कुठल्या विचारसरणीसाठी किंवा विकासासाठी लढताहेत असं म्हणवत नाही. मग उरतो फक्त एकच उद्देश – तुम्ही आज जी सत्ता भोगता आहात, ती आम्हाला द्या. त्यासाठी अराजक माजवण्याचीही आमची तयारी आहे. जिथे जिथे सरकारविरोधी असंतोष आहे, तिथे नक्षल आहेत. आणि दुर्दैवाने आपल्याला अतिरेकी कारवायांचा धोका जितका जाणवतो, तितका नक्षलांचा जाणवत नाही. कारण मुंबईच्या ताजवर अतिरेकी हल्याचं लाईव्ह चित्रीकरण आपण बघू शकतो. छत्तीसगढच्या जंगलात नक्षलांच्या कारवाया आपल्या डोळ्यासमोर घडत नाहीत. ते ‘दूर कुठल्यातरी जंगलात’ घडत असतं. पुण्यामुंबईतही त्यांचे स्लीपर सेल आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो.

    सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या विचारवंतांच्या वर्तुळांमध्ये अजूनही नक्षलांविषयी रोमॅंटिक कल्पना आहेत. दिल्लीला जेएनयूमध्ये असतांना आयसा (AISA) सारख्या विद्यार्थी संघटनेच्या पत्रकांमध्ये यांचं कौतुक मी स्वतः वाचलंय. ती पत्रकं वाचून तर कधी जाऊन या क्रांतीकारकांना आपण सामील होतो असं वाटेल.

    पोचमपल्ली नावाची दोन गावं आहेत. एक आन्ध्रातलं साड्यांचं पोचमपल्ली, दुसरं तमिळनाडूमधलं. आन्ध्र पोचमपल्लीलाभूदान पोचमपल्लीम्हणतात. विनोबांची भूदान चळवळ इथून सुरू झाली होती म्हणून. भूदान यशस्वी झालं असतं, तर इथे नक्षल इतके प्रभावी होऊ शकले असते का?

*************************************
    ओरिसाच्या भटकंतीच्या कहाणीचा समारोप करायचं मी इतके दिवस पुढे ढकलते आहे. कारण लिहितांना खूप गोष्टी सुटून गेल्यात, बर्‍याच गोष्टी अजून डोक्यात अर्ध्या कच्च्या आहेत, आणि आपल्याला जे वाटतंय, ते लिहिता येणार नाही अशी जवळपास खात्री आहे.
केचला मधली शाळा बघणं हे निमित्त होतं. मला कोरापूटला जायचं होतं, ते सरकारचं काम नेमकं कसं चालतं ते बघायला. यूपीएससीचं स्वप्न मीही कधीतरी बघितलं होतं. त्यामागे अशी समजूत होती, की प्रशासनात जाऊन तुम्ही खरंच देश समजून घेऊ शकता, काही बदल घडवून आणू शकता. काठावर बसून टीका करणं सोपं असतं. त्यात तुम्हाला करावं काहीच लागत नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे खरे. ते स्वप्न मागे राहिलं, आणि त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काही बदल घडवण्याची मोठी संधीही. आता त्याविषयी हळहळ करण्यात अर्थ नाही. पण ही भेट या हुकलेल्या संधीच्या शक्यता बघण्यासाठी होती.


कोरापूटच्या जगन्नाथाचा रथ



महाराष्ट्राच्या, पुण्याच्या जनजीवनातलं प्रशासनाचं स्थान आणि कोरापूटमधलं कलेक्टरांचं स्थान यांची तुलनाही करणं अवघड आहे. तिथली जनता अजूनही मायबाप सरकारवर पूर्ण अवलंबून आहे. अजूनही तिथला कलेक्टर जिल्ह्याचा राजा आहे. सगळे अधिकारही त्याचेच, आणि जबाबदारीही. अश्या पदावर जेंव्हा शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासनाचा आदर्श ठेवणारा अधिकारी असतो, तेंव्हा त्याला काम करतांना बघणं हे फार मोठं सुख असतं. माझ्या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकर्‍याचं अर्थशास्त्र मला समजून घ्यायचंय म्हणून तो रस्त्यात भेटलेल्या शेतकर्‍याशी गप्पा मारतो. कुठल्या गॅझेटमध्ये न लिहिलेल्या गोष्टी या गप्पांमधून उलगडतात. प्रत्येक फील्ड व्हिजिटमध्ये तो किमान एका शाळेला भेट देतो, तिथल्या मुलांशी गप्पा मारतो. यंदा तुमच्या शाळेचा निकाल १००% लागलाच पाहिजे हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पुढे ठेवतो. कलेक्टर सर आपल्याशी वेळ काढून बोलले, याचा केवढा आनंद आणि अभिमान वाटत असेल त्या शाळेच्या मुलांना!


आणि दर्शनासाठी जमलेले भाविक



कोरापूट हा नक्षलग्रस्त जिल्हा. जिल्ह्याचे कित्येक ब्लॉक नक्षलांच्याच प्रभावाखाली आहेत. चार वर्षांपूर्वी थेट जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला झाला, इतके इथे नक्षल प्रबळ आहेत. आधीच दुर्गम आणि मागास भाग, त्यात नक्षलांचा उपद्रव. त्यामुळे इथे काम करायला सरकारी कर्मचारी तयार नसतात. कित्येक जण इथली बदली संपेपर्यंत कार्यभार स्वीकारतच नाहीत. आज जिल्ह्यातल्या तहसीलदार, बीडीओच्या(कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात फील्डवर) एकूण पदांपैकी जवळापास निम्मी पदं रीक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी इथल्या आमदारांचं नक्षलांनी अपहरण केलं होतं. त्यावरची कलेक्टरांची प्रतिक्रिया म्हणजे “या भागाच्या विकासाच्या मागणीसाठी अपहरण केलं असा नक्षलांचा दावा आहे. माझीसुद्धा तीच मागणी आहे. आता इथल्या तहसीलदार आणि बीडीओच्या पोस्ट भराव्यात म्हणून मी सुद्धा आमदारांचं अपहरण करावं म्हणतो!”

आदिवासी संग्रहालयाचं प्रवेशद्वार
ओरिसाच्या एका कोपर्‍यात इतकं मनापासून काम करत असतांना एकीकडे देशात लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येत असतात. मानवी अधिकारांच्या नावाखाली नक्षलांची पाठराखण करत सरकारी कर्मचार्‍यांना धारेवर धरणारी एक मोठी लॉबी तुमच्या विरोधात असते. कुणाच्यातरी भ्रष्टाचाराच्या आड आल्यामुळे कोर्टाचे खेटे घालायची वेळ येते. तुमच्या कामाची विशेष दखलही घ्यायला कुणाला वेळ नसतो. कोरापूटच्या पोस्टिंगमध्ये कलेक्टरांबरोबरच घरातल्या सगळ्यांनाही सक्तीची सुरक्षा व्यवस्था असते. अंधार पडल्यावर बाहेर फिरायचं नाही, गाडीशिवाय घराबाहेर पडायचं नाही. एकट्याने फिरायचं नाही. कारण अजून एक नक्षल अपहरण परवडणार नाही. पण जिल्ह्याच्या ठिकाणी नक्षलांचा सामना करणार्‍या या अधिकार्‍याला या प्रश्नाची जी समज आलेली आहे, ती वरून येणार्‍या सरकारी धोरणांमध्ये प्रतिबिंबित होत नाही. या सगळ्या परिस्थेतीत तुला फ्रस्टेशन नाही येत का? गळकी बादली भरण्यासाठी आपण थेंबथेंब टाकतोय याचं वैफल्य नाही वाटत? पुण्याहून निघायच्या वेळेपासून मनात असलेले प्रश्न. “परिस्थिती खरंच भयंकर आहे. आणि आपण प्रश्न जास्त अवघड करून ठेवतोय. हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. पण आश्चर्य म्हणजे माझा कामाचा उत्साह कायम आहे.” हे त्यावर कलेक्टरांकडून मिळालेलं उत्तर.
जर मी झालेच असते आयएएस, तर याहून वेगळं काय करणार होते? आपलं धूसर स्वप्न कुणीतरी जगतंय याचा आभाळाएवढा मोठा आनंद परत येतांना मनात असतो आणि या होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणसाला असंच काम करत रहायला बळ मिळू दे अशी प्रार्थना.

 
तीन वेळा परतीचं तिकीट बदलूनही कोरापूट पोटभर बघून झालंय असं वाटत नाही. दर वर्षी इथे ‘परब’ नावाचा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असतो. परब बघायला परत यायचं असा बेत करतच कोरापूट सोडलं. येतांना विशाखापट्टण – कोरापूट रस्त्याच्या सृष्टीसौंदर्याला न्याय देता आला नव्हता. त्यामुळे परत जातांना रस्त्याचे मनसोक्त फोटो काढले.

या डोंगराळ  भागात आदिवासी वस्ती विखुरलेली आहे. जेमतेम आठ – दहा घरांचा एक पाडा – आजूबाजूला फक्त डोंगर. अश्या एकेका वस्तीपर्यंत रस्ते – वीज – पाणी – आरोग्यकेंद्र – आंगणवाडी – शाळा पोहोचवायची, म्हणजे जितका खर्च येईल, तितकाच खर्च अन्यत्र एखाद्या पाचशे – हजार लोकवस्तीच्या खेड्यासाठी येईल. नुसत्या रिपोर्टमध्ये वाचून कदाचित ही मागणी अवास्तव वाटेल,पण  प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र इथे विकासासाठी जास्त पैसा का घालायला हवा हे अगदी पटतं.

आदिवासी पाडा

 कोरापूट जिल्हा संपतो, आपण आंध्रात प्रवेश करतो. या सीमेवर एक सुंदर वडाचं झाड आपलं स्वागत करतं.

आंध्र – ओडिशा सीमा

 स्वप्नातले डोंगर अजून थोडा वेळ सोबत करतात.

पंधरा दिवस दिवस रात्र संधी मिळेल तेंव्हा गप्पा मारूनही गप्पा संपलेल्या नसतात. त्यामुळे आमचा प्रवास एकाच गाडीतून चाललेला असतो – कलेक्टरांची लाल दिव्याची गाडी मागून रिकामी येत असते. 🙂 

आमच्या मागून येणारी लाल दिव्याची एस्कॉर्ट कार 🙂

  हा प्रवास एखाद्या टाईम मशीनमध्ये बसून केल्यासारखा वाटतो. शतकानुशतकं गोठल्यासारखे एकाच स्थितीत राहिलेलं कोरापूटचं आदिवासी जनजीवन, घनदाट जंगलं, डोंगरदर्‍या संपून अचानक आपण एकविसाव्या शतकात पोहोचतो.  जणू काही हा  बदल ठळक करण्यासाठीच आंध्र किनारपट्टीलगतच्या या भागात नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट शेतं आणि बांधावर ताडाची झाडं नजरेला पडतात.

डोंगर संपले, ताडाची झाडं आली, आंध्रात पोहोचलो.

परततांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला उतरून पोचमपल्ली बघून परत येण्याचा बेत असतो. कोरापूट आणि पोचमपल्ली दोन्ही नक्षलग्रस्त भाग. कलेक्टरांकडून घेतलेलं ‘रेड सन’ वाचता वाचता दोन्ही भागांची तुलना करायची संधी असते.

कॉफी प्लांटेशन? आणि ओरिसामध्ये? आश्चर्यच वाटलं मला. मग समजलं, की कोरापूटच्या कलेक्टरांच्या बंगल्याच्या आवारातच दोन किलो कॉफी होते! इथली हवा आणि जमीन कॉफीला अगदी योग्य आहे. तिथलं एक कॉफी प्लांटेशन बघायची संधी मिळाली.

प्लांटेशनचं गूढरम्य वातावरण

 खाली हिरवीगार कॉफीची झाडं, त्यांच्यावर सावली धरणारे सिल्व्हर ओक, त्यावर चढवलेले मिरीचे वेल, धुकं आणि हलका पाऊस. इथल्या वातावरणात एकदम अचानक ब्रेव्हहार्टमधला मेल गिब्सन घोड्यावरून जातांना दिसेल  असं वाटतं. 🙂

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा …

ओरिसात स्थायिक झालेल्या एका तेलुगु कुटुंबाचा आहे हा मळा. नवरा बायको आणि त्यांचा कुत्रा असं तिघांचं कुटुंबं इथे राहतं. मुलं कधीतरी सुट्टीला येतात. नवरा बाहेरची सगळी कामं बघतो, आणि ही बाई एकटी प्लांटेशनचं काम बघते. कामाला येणारे मजूर वस्तीला नसतात. एवढ्या मोठ्या प्लांटेशनमध्ये सोबत फक्त कुत्र्याची. (केतकर वहिनांची आठवण झाली ऐकताना.) प्लांटेशनमध्ये त्यांनी हौसेने भरपूर वेगवेगळी झाडं लावली आहेत. पावसात भिजत, चिखलात ती सगळी झाडं बघायला आम्ही सगळ्या प्लांटेशनमध्ये हिंडलो. त्यांना फक्त तेलुगू आणि ओडिया भाषा  येते, मला दोन्ही समजत नाहीत. पण थोड्या वेळाने दोघींचा झाडांच्या भाषेत संवाद सुरू झाला. 🙂

आम्ही गेलो तेंव्हा कॉफीची फुलं गळून हिरवी फळं धरलेली होती. इथे पारंपारिक भारतीय कॉफीमळ्याबरोबरच त्यांनी ऑस्ट्रेलियन पद्धतीने (सावली न करता) कॉफी लावण्याचाही प्रयोग केलाय. सावलीला झाडं ठेवली नाहीत, तर कॉफीला बारा महिने पाणी घालावं लागतं. 

प्लांटेशनवर चंदनाची बरीच झाडं आहेत.

चंदन

 रक्तचंदनाचं झाड मी प्रथमच बघितलं.

रक्तचंदन

महोगनीचं झाड

मोहोगनी

तमालपत्राची कोवळी गुलाबी पानं

तमालपत्र

आणि हा शिसव / रोझवुड

शिसव

व्हॅनिलाचा वेल

व्हॅनिलाचा वेल

 खास ऑस्ट्रेलियाहून आणलेला ऑक्टोपस ट्री

ऑक्टोपस ट्री

झाडाखालची मश्रूम्स

भूछत्र

त्यांच्या मळ्यातलं, त्यांना ओळखू न आलेलं एक झाड आम्ही ओळखलं 🙂

नागकेसर

तंदूरी चिकनचा लाल रंग कृत्रीम असतो असा माझा समज होता. जाफ्रा नावाच्या झाडाच्या बिया पाण्यात टाकून हा रंग बनतो ही नवीनच माहिती मिळाली. या झाडाला आपल्याकडे कोकणात रंगराज म्हणतात हेही नव्यानेच समजलं. हे जाफ्राचं झाड:

जाफ्रा किंवा ’रंगराज’

आणि ही त्याची वाळलेली फळं:

जाफ्राची वाळलेली फळं

कापूर झाडापासून मिळतो याचाही मला गंध नव्हता. हे त्यांच्याकडचं कापराचं झाड:

कापूर

इथे कॉफी इतकी चांगली होऊनही कॉफीचे मळे फारसे नाहीत असं का? इथली जमीन प्रामुख्याने आदिवासींच्या मालकीची आहे. त्यांच्याकडच्या जमिनीचे तुकडे आकाराने इतके लहान आहेत, की कॉफी प्लांटेशन परवडणार नाही. (इकॉनॉमिकली व्हायेबल नाही.) कॉफीला खूप लक्ष द्यावं लागतं, आणि कुशल मनुष्यबळ लागतं. ते उपलब्ध नाही. आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना  विकता येत नाहीत. सरकारने सहकारी कॉफी मळ्यांची एक योजना आणली, पण ती यशस्वी झाली नाही.

ओरिसाची भटकंती: मिशन शक्ती 
ओरिसाची भटकंती: केचला 
ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे …
कोरापूट जिल्ह्यात साठपेक्षा जास्त आदिवासी जमाती आहेत, त्यांच्या पन्नासाहून जास्त बोलीभाषा आहेत. कोटपाड हा जिल्ह्याचा छत्तीसगडच्या बस्तरलगतचा भाग. याची ओळख म्हणजे सोनिया गांधी इथल्या आदिवासींनी व्हेजिटेबल डाय वापरून बनवलेल्या हातमागावर विणलेल्या सुती साड्या वापरतात. यांचा निळा रंग निळीपासून बनवलेला, तर तपकिरी रंग एका आल नावाच्या झाडापासून. त्या रंगातच शेण मिसळून काळा रंग बनवतात – आणि कापडावर चढलेले हे रंग अजिबात जात नाहीत. पाच सहा घरं आहेत कोटपाडमध्ये अश्या पद्धतीचं कापड विणणारी. इथे कोटपाडच्या विणकरांविषयी अधिक माहिती आहे. याखेरीज या भागात बांबूकाम, टेराकोटा, रॉट आयर्नमधल्या कलाकृतीही बनतात.

कोरापूटहून कोटपाड दोन – अडीच तासांचा रस्ता. गावात शिरल्या शिरल्या जाणवतात ते स्वच्छ रस्ते, सारवलेल्या नेटक्या भिंती, गवताने शाकारलेली छपरं. प्रत्येक घराभोवती दीड -दोन फूट उंचीचा ओटा. तिथे या शबर्‍या दिसल्या:
कोटपाडच्या शबर्‍या

(हा सगळा भाग दण्डकारण्याचा भाग आहे .शबरी इथलीच होती असा इथल्या लोकांचा समज आहे. )

एका घरासमोर घातलेली छोटी पत्र्याची शेड. तिथेच लाकडातलं कोरीवकाम आणि लोखंडाचं काम चालू होतं:

लाकडातलं कोरीव काम
दगडातलं आणि लाकडातलं कोरीव काम
रॉट आयर्नचं काम

लोखंडातून साकारलेला शेतकरी आणि बैलजोडी

ही सगळी कौशल्य इथल्या जेमतेम सात आठ कुटुंबांकडे आहेत. आज बाहेरच्या बाजारात या वस्तूंच्या एथनिक लुकला मोठी किंमत आहे. त्यामुळे नवीन तरुणांसाठी हातमाग चालवण्याचं प्रशिक्षण गावात एकीकडे चालू आहे. हे कौशल्य त्यांना या भागात दुर्मिळ असणारा रोजगार मिळवून देऊ शकेल. प्रशिक्षणाच्या जागेवरची अस्वच्छता, गर्दी बघून तिथून बाहेर पडायची सगळ्यांना घाई होते. 
हातमाग प्रशिक्षण

थोडीफार खरेदी, कारागीरांची भेट, एका बचतगटाला भेट असं उरकून कोरापूटसाठी परत निघायचंय. जिल्हा नक्षलग्रस्त आहे, अंधार पडण्यापूर्वी प्रवास शक्यतो पूर्ण करायचाय. रस्ता स्टेट हायवे असला तरी यथातथाच आहे, आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे जगदालपूरची भेट रद्द करून आम्ही परत निघालो.

कोरापूटला परतल्यावर कोटपाडमध्ये काय काय बघितलं, तिथे आपण काय करू शकतो यावर लगेच कलेक्टरना फिडबॅक मिळतो, आणि या सूचना उपलब्ध निधीमध्ये कश्या बसवता येतील याचाही विचार सुरू होतो. हातमाग प्रशिक्षणासाठी चांगली प्रशस्त जागा हवीय. या सगळ्या मालाला खाजगी एम्पोरियममध्ये कमी पैसे मिळतात. सरकारी एम्पोरियमने हा माल विकण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवेत. सद्ध्या कपड्याचे रंग बाहेरून येतात. या झाडांची लागवड याच भागात करता येऊ शकेल.

आपण नुसतंच आपली हौस म्हणून काहीतरी बघायला गेलो असं नाही, तर आपल्या तिथे जाऊन येण्याने काही उपयोग होतोय, आपल्या सूचनेने लोकांच्या आयुष्यात काही बदल होऊ शकतो आहे ही भावना सुखावणारी असते.  
**********************
कोटपाडचे अजून फोटो इथे आहेत:
Kotpad

ओरिसाची भटकंती: केचला 
ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे …
केचलाहून परतल्यावर कोरापुटमधल्या काही बचतगटांचं काम बघायची संधी मिळाली. इथे मिशन शक्तीअंतर्गत स्त्रियांच्या बचतगटाची कामं जोरात चालू आहेत. मिशन शक्तीच्या कोऑर्डिनेटर सीता मॅडमबरोबर अंगणवाडीमध्ये पुरवण्यात येणारा सकस आहार (याला ओडियामध्ये छतुआम्हणतात) बनवणार्‍या बचत गटाला भेट दिली.

सरकारी योजनेचे लाभार्थी ही माझ्यासाठी आजवर एक मिथिकल टर्म होती. हे लाभार्थी खरंच असतात का, असल्यास दिसती कसे आननी हे बघायला मिळालं पहिल्यांदाच. दहा दहा बायकांचे दोन बचत गट. छतुआसाठी लागणारे गहू,  डाळं, सोयाबीन असे घटक भाजायचे, गिरणीतून दळून आणायचे, ठरलेल्या वजनाची पाकिटं करायची आणि आंगणावाड्यांना पुरवायची. त्यांच्यातलीच थोडीफार शिकलेली बाई हिशोब ठेवणार. मोठाल्या कढयांमधून धान्य भाजताना हात भरून येतात, पण या महिन्याला प्रत्येकीला हजार – दोन हजाराची कमाई होईल. पुढच्या महिन्यात रोस्टर विकत घ्यायचा, म्हणजे भाजण्याचे कष्ट वाचतील. त्यानंतर मग चक्की घ्यायची … सरकारने पुरवलेल्या काही हजारांच्या बीज भांडवलातून या बायकांना ही स्वप्न बघण्याची उमेद मिळालीय. भाषा समजत नसली, तरी त्यांच्या डोळ्यातला उत्साह नक्की समजतो. पाचशे लोकसंख्येच्या वस्तीपैकी वीस कुटुंबांना यातून उत्पन्न मिळतंय. असे बचतगट गावागावात उभे करण्यात सिंहाचा वाटा आहे सिता मॅडमचा. मिशन शक्तीचं काम ही त्यांची केवळ नोकरी नाही, त्यांचं मिशन बनलं आहे. आणि त्यांची कल्पकता, तळमळ यांचं मोल ओळखून त्यांना संपूर्ण पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे कलेक्टर त्यांना लाभले आहेत.
छतुआचं पॅकिंग

ट्रायबल लाईव्हलीहूड प्रकल्पात आदिवासींना मिळालेल्या कोंबड्या
सरकारी नोकरी करणारी बाई. या बचतगटांच्या कामासाठीच पगार मिळतो ना तिला … मग ती करते आहे त्यात विशेष ते काय? असा प्रश्न पडेल वरचं सगळं कौतुक वाचून. पण हे सरकारी कर्मचारी किती मोठं काम करताहेत हे समजून घ्यायला त्यांच्या भोवतालची परिस्थिती समजायला हवी. कोरापूटची तुलना महाराष्ट्राच्या गडाचिरोलीशी होऊ शकेल कदाचित. दुर्गम, राज्याच्या राजकारणात नगण्य स्थान असणारा, अविकसित, आदिवासी भाग. इथे कुपोषण आहे, सेरेब्रल मलेरिया आहे. इथे बदली होणं म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग. या भागात बदली झाली, तरी कित्येक वेळा बाहेरचे लोक कार्यभार स्वीकारतच नाहीत. त्यामुळे इथे काम करणारे बाहेर कसे पडणार? त्यात नक्षलवादाचा प्रभाव. नारायणपटणामध्ये बायका बचतगटाच्या मिटिंगला गेल्या तर नक्षलवादी त्यांना दंड करतात. अश्या परिस्थितीमध्ये सिता मॅडम, त्यांच्यासारखे बाकीचे कर्मचारी, जिल्ह्याचे कलेक्टर ‘नक्षल प्रभावामुळे इथे विकासकामं शक्य नाहीत’ म्हणून हातावर हात धरून बदलीची वाट बघत बसू शकतात.

छतुआ बनवणार्‍या बचतगटाच्या बायका जेंव्हा आग्रहाने सरकारी पाहुण्यांना घरी चहाला बोलवतात, तेंव्हा त्या पाचशे लोकसंख्येच्या वस्तीमधली वीस घरं तरी नक्षलांपासून दूर राहतात. आणि मी भरलेल्या कराचा देशाच्या कुठल्यातरी कोपर्‍यात सुयोग्य वापर होतोय याचं मला समाधान मिळतं.  

ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे …

    विशाखापट्टण ते कोरापुट अंतर २१३ किमी. मधे एक तासभराचा जबरदस्त घाट आहे, आणि रस्ता खराब आहे. त्यामुळे चार – साडेचार तास सहज लागतात पोहोचायला. ताडाची झाडं, ताडाच्याच झावळ्यांनी शाकारलेली घरं, झावळ्यांच्याच विणलेल्या सुंदर छत्र्या आणि चांगला रस्ता हे संपलं म्हणजे समजायचं आपण आंध्र सोडून ओडिशामध्ये प्रवेश केला. पण रस्त्याकडे आणि घाटाच्या न  संपणाऱ्या वळणांकडे दुर्लक्ष करून जरा खिडकीतून बाहेर बघितलं, तर डोळ्यांचं पारणं फिटेल. (फोटो येतांना काढलेत.)

    कोरापुटला गेल्यावर पहिलं काम म्हणजे केचलाची शाळा बघायला जायचं. मला जायचं होतं त्याच दिवशी केचलाच्या शाळेच्या मुलांचा कोरापुटला कार्यक्रम होता. त्यामुळे मुलांबरोबरच त्यांच्या शाळेला परत जाणं शक्य होतं. कार्यक्रमाच्या ठिकाणी शाळेच्या मुलांच्या कलावस्तूंचं एक छोटंसं प्रदर्शन होतं. ते बघूनच केचलाला काय बघायला मिळणार याची छोटीशी झलक मिळाली.

ताजमहाल, कुतुबमिनार, मोर … मुलांनी बनवलेल्या वस्तू

सात – आठ वर्षाच्या मुलाने तयार केलेलं हे गोष्टीचं पुस्तक:

The brave elephant story

    गोष्ट त्याने रचलेली, चित्रं स्वतः काढलेली, आणि लेखनही त्याचंच. आपल्या बोलीभाषेखेरीज कुठल्याच भाषेचा गंध नसलेल्या निरक्षर आईबापांचा हा मुलगा या शाळेत जाऊन पुण्यातल्या पहिली – दुसरीतल्या मुलाइतकं सहज इंग्रजी बोलतोय!

    त्यानंतरचा कार्यक्रम बघतांना जाणवलं, शाळेतला फक्त एकच ‘स्कॉलर’ मुलगा इतक्या आत्मविश्वासाने वावरणारा नाहीये … सगळीच मुलं सहजपणे, कुठलं दडपण न घेता पाहुण्यांशी गप्पा मारताहेत. कलेक्टर सर, पोलीस अंकल हे सगळे त्यांचे ‘फ्रेंड्स’ आहेत.

जवळजवळ त्याच्याच उंचीचा ढोल वाजवणारा कमलू
यात निम्म्याहून जास्त मुली आहेत!
कार्यक्रमात सादर काय करायचं, हे मुलांनीच ठरवलंय!

    कार्यक्रम संपल्यावर एकेका सिक्स सीटरमध्ये बारा मुलं, दोन मोठे आणि ड्रायव्हर, खेरीज मागे ड्रम आणि बाकीचं सामान अश्या तीन गाड्यांमधून सगळे लॉंच सुटते तिथवर पोहोचलो. तासाभराच्या प्रवासात आमच्या गाडीतली निम्मी बच्चेकंपनी बसल्या जागी झोपली. खड्डे भरलेल्या रस्त्याने जाताना झोपलेली मंडळी (आणि त्यांचं सामान) कुठेतरी पडू नये म्हणून जागे असणारे सगळे इतक्या प्रेमाने काळजी घेत होते … कार्यक्रमाच्या सादरीकरणापेक्षाही या प्रवासातलं आणि नंतर शाळेतलं मुलांचं वागणं बघून मला शाळेच्या यशाची खात्री पटली.

    कोलाब धरणाच्या पाण्यातून तासभर लॉंचने प्रवास केल्यावर आम्ही शाळेच्या बाजूला पोहोचलो. तिथून पुढचा अर्धा – एक किलोमीटर चालत. ही जागा इतकी शांत आणि सुंदर आहे … इथे जाणं थोडं जरी सुलभ असतं, तर इथे हॉलिडे रिझॉर्ट उभे राहिले असते!


लॉंचमधल्या सहप्रवासी



शाळेचं पहिलं दर्शन.

  ही शाळा आहे अरविंद आश्रमाची. इथल्या दुर्गमातल्या दुर्गम भागात उत्तम शाळा चालवून दाखवण्याच्या जिद्दीने प्रांजल जौहार या माणसाने उभी केलेली. शाळेसाठी पैसा उभा करणं, जमीन मिळवणं, बांधकाम, मुलं आणि शिक्षक गोळा करणं ही सगळी या माणसाची धडपड. शाळा सुरू होऊन चार वर्षं झालीत. इथल्या शाळेची मुलं बारा महिने शाळेच्या वसतीगृहात राहतात, आठवड्यातून एक दिवस रात्री आपापल्या घरी जातात. शाळेत सद्ध्या सहा ते नऊ वयोगटातली सुमारे ७० मुलं आहेत. ही ‘फ्री प्रोग्रेस स्कूल’ आहे. कुठलीच शैक्षणिक पार्श्वभूमी नसणाऱ्या या मुलांचा आत्मविश्वास जागा करणं, त्यांना शिक्षणाची गोडी लावणं, त्यांना इंग्रजी, हिंदी, ओडिया भाषेत सहज संवाद साधता येणं हे या शाळेचं यश. ही मुलं मोठी झाल्यावर बहुधा आसपासच्या दुसऱ्या साध्या शाळेत जातील. केचलाच्या शाळेतलं शिक्षण त्यांना तिथे टिकून रहायला बळ देईल.

    गावात अजूनही वीज नाही. मोबाईल कव्हरेज बहुतेक भागात नाही. शाळेने सोलार, बोअर  आणि पवनचक्कीच्या सहाय्याने वीज आणि पाण्याची व्यवस्था केलीय. आम्ही पोहोचलो त्या दिवशी संध्याकाळी वीज नव्हती. सगळे अंधारात चाचपडतांना “सोनू को देखा क्या?” म्हणून विचारत होते. प्रत्येकाने चौकशी करावी असा / अशी सोनू कोण बरं? म्हणून विचार करत होते. लवकरच उलगडा झाला – सोनू हे शाळेत पाळलेल्या साळिंदराचं नाव. गावातल्या आदिवासींनी खाण्यासाठी धरलेलं हे साळिंदराचं पिल्लू त्यांना पैसे देऊन शाळेने सोडवून घेतलंय. सध्या त्याचा शाळेच्या आवारात मुक्तसंचार आहे. सूर्य मावळला, म्हणजे सोनूचा दिवस सुरू होतो. शाळेची मुलं त्याला घाबरत नाहीत, बाहेरून येणारे मात्र घाबरतात. आणि सोनूला लोकांना घाबरवायला आवडतं. जेवतांना कधी सहज मागे बघितलं, तर अचानक सोनू मागे उभा दिसतो! चपला खाणं, रात्रभर कुठल्या तरी खोलीच्या दारावर धडका देत राहणं, खोलीचं दार उघडं दिसलं, की लगेच आत शिरून गादी ‘पावन’ करून ठेवणं अश्या सोनूच्या लीला ऐकायला मिळतात. पण हा खोडकरपणा सोडला, तर सोनूचा कुणाला त्रास नाही. केचलाच्या शाळेचा तो एक अविभाज्य भाग आहे.

सोनू

    सोनूसारखंच एक हरणाचं पिल्लूसुद्धा सोडवून आणलंय शाळेने.

    दुसऱ्या दिवशी हरी, जगन, मुदली आणि त्यांचा अजून एक मित्र असे चौघं मला आश्रमाची बाग दाखवायला घेऊन गेले. भाजीपाला, फुलझाडं, फळझाडं रानफुलं असं जे त्यांना आवडेल त्याचा फोटो घ्यायचा असे आम्ही दीड – दोन तास बागेत भटकत होतो. सहा सात वर्षांची मुलं सोबत आहेत आणि तुमचा कॅमेरा हाताळायला मागत नाहीत असा माझा पहिलाच अनुभव. आपल्या सोडून कुणाच्याही खोलीत शिरायचं नाही, कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही, पाहुण्याचा कॅमेरा मागायचा नाही अश्या सगळ्या गोष्टी इतकी सहज शिकली आहेत ही मुलं … दोन दिवस त्यांच्यासोबत राहतांना कुठे भांडण, मारामाऱ्या बघायला मिळाल्या नाहीत!


Kechla – Orchard

    दुपारच्या वेळी एक गावातली बाई औषध घ्यायला शाळेत आली होती. गावातल्यांना लागतील अशी थोडीफार औषधं शाळा पुरवते. वैद्यकीय मदत हवी असेल, तर शाळेच्या लॉंचमध्ये घालून दवाखान्यात पोहोचवतात काही वेळा. नकळत मनात हेमलकसा प्रकल्पाचा विचार आला. तोही दुर्गम आदिवासी भागातच आहे. दोन्ही ठिकाणची गरज बऱ्याच प्रमाणात सारख्याच असणार. पण दृष्टीकोनात फरक आहे. केचला प्रकल्प मुख्यतः पुढची पिढी डोळ्यासमोर ठेवून उभा केलेला आहे.

    परतीचा प्रवास सरकारी लॉंचमधून आणि सरकारी गाडीमधून झाला. ज्या प्रवासाला जातांना तीन तास लागले होते, तेच अंतर परततांना आम्ही एक – दीड तासात कापलं. हा आहे शाळेकडच्या आणि सरकारी रिसोर्सेसमधला फरक. तसं बघितलं, तर केचलाच्या मुलांना शाळा उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम. ते काम कुणी स्वयंस्फूर्तीने करत असेल, आणि सरकारने त्यांना मदत केली, तर किती चांगला परिणाम साधता येतो, हे पुढच्या भटकंतीमध्ये बघायला मिळालं.

क्रमशः

केचलाचे अजून काही फोटो इथे आहेत.

    “इथे एक तोत्तोचानची शाळा आहे. तू बघायलाच हवीस!” हे निमंत्रण मिळाल्यावर माझ्या तोंडाला पाणी न सुटलं तरच नवल. फक्त एक छोटीशी अडचण होती – शाळेची जागा एखाद्या दिवसात जाऊन परतावी इतक्या जवळची नव्हती. पण एक नवा भाग बघायला मिळणार होता, आणि सरकारी काम कसं चालतं ते टेबलाच्या दुसर्या बाजूने बघायची संधीही होती. ज्या गावाचं नावसुद्धा मी कधी ऐकलं नव्हतं, अश्या ‘केचला’ नावाच्या ओरिसातल्या गावी ही शाळा होती. त्यामुळे साधारण ८ – १० दिवसांचा ‘फ्लेक्झिबल’ प्लॅन ठेवून पुण्यातून निघाले. (पुणे ते विशाखापट्टण रेल्वेने, पुढे होस्ट नेतील तसं कोरापुट या जिल्ह्याच्या गावी, केचलाच्या शाळेत, आणि जवळपास. येतांना परत विशा्खापट्टण ते हैद्राबाद, एक दिवस तिथे मुक्काम करून पुण्याला परत)

    पहिला दणका पुण्यातून निघतानाच मिळाला. तिकिट इमर्जन्सी कोट्यातून कन्फर्म होणार होतं. जायच्या दिवशी सकाळपासून वीज नाही, त्यामुळे नेटवर स्टेटस बघणं शक्य नाही. रेल्वे एन्क्वायरीचा एकही फोन लागत नाही, लागला तर कुणी उचलत नाही. दुपारी साडेतीनची गाडी. अर्धा तास आधी स्टेशनवर पोहोचले. ‘भारतीय रेल’ने बहुतेक या गाडीला आज वाळीत टाकलं होतं. गाडीच्या नावाची अनाउन्समेंट नाही, डिस्प्लेवर नाव नाही. चार्टचा पत्ता नाही. असा परिपूर्ण ‘Be Happy!’ अनुभव. अर्धा तास असाच गेल्यावर एकदाची गाडी “पाच बजे आने की संभावना है” म्हणून डिस्प्लेवर माहिती मिळाली. सवा पाच वाजले तरी गाडी “पाच बजे आने की संभावना” कायम. प्लॅटफॉर्म नंबरचा पत्ता नाही. सव्वा पाचला अखेरीस त्या पाच च्या संभावनेची सहा वाजताची संभावना झाली. सहा दहा वाजता भारतीय रेलला यात्रीगणांची बहुतेक थोडी कीव आली, आणि डिस्प्लेवर प्लॅटफॉर्म नंबरही दिसायला लागला. प्लॅटफॉर्मवर जाऊन पोहोचल्यावर दहा मिनिटांनी दुसरीच एक गाडी तिथे लावणार म्हणून अनाउन्समेंट. हिचं कुठे नावच नाही. चार्टचा पत्ता नाही. एव्हाना ‘इमर्जन्सी कोट्यातून तिकिट कम्फर्म झालेलं नाही’ ही आनंदाची बातमी पण मिळाली होती. चोवीस तासांपेक्षा लांबचा प्रवास एकटीने रिझर्वेशन नसताना करायची माझी तयारी नाही. पण तीन तास स्टेशनावर काढलेच आहेत, तेंव्हा पुढच्या दहा मिनिटांनी गाडी आलीच, आणि टीसी भेटलाच, तर एक शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून चिकटपणाने थांबले. अर्ध्या तासाने गाडी (शेजारच्या) प्लॅटफॉर्मला आली, टीसीचं दर्शन व्हायच्या आत निघूनही गेली. आता ब्यागा उचलून पुन्हा घरी जाणे. बॅक टू पॅव्हेलियन.

    प्रचंड वैतागून घरी परतताना बरोब्बर कुणीतरी भेटतं, “गावाहून येते आहेस का? कुठे गेली होतीस? कसा झाला प्रवास?” या प्रश्नांना उत्तर देणं भाग पडतं. डोकं जरा शांत झाल्यावर जुनी रिझर्वेशन्स रद्द करणं, नवी करणं, बदललेल्या तारखा सगळ्यांना कळवणं आणि पुन्हा नव्याने प्रवासाची तयारी. जले पे नमक म्हणजे मी गावाला जाणार म्हणून नवर्याने ‘माहेरी’ जायचं बुकिंग करून ठेवलं होतं आधीच. (तो गेल्यावर मी माझा सगळा वैताग कुणावर काढू? :))

    तर इतकी हॅपनिंग अ-सुरुवात झाली तरी बाकी प्रवास मस्त झाला.

    पुण्याहून निघालेली गाडी मजल दर मजल करत दुसर्या दिवशी रात्री विशाखापट्टणला पोहोचली. दुसर्या दिवशी दुपारी तिथून निघायचं होतं, त्यामुळे सकाळचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी तिथल्या बीचवर एक फेरफटका मारला. समुद्रकिनारा आणि हिरवेगार डोंगर अशी दोन्ही नेत्रसुखं इथे एकाच ठिकाणी बघायला मिळतात. गाव पाहिल्याबरोबर आवडलंआटोपशीर, पण सर्व सोयीसुविधा असणारं असं वाटलं. जातानाच इथेला समुद्रकिनारा बघायला मिळाला, ते बरं झालंपुण्याहून आल्यावर जे शहर आटोपशीर आणि सुंदर वाटलं, ते कोरापुटहून आल्यावर वाटलं नसतं 🙂

Vizag Beach



Vizag Beach
क्रमशः
श्रावण मोडक यांनी प्रसिद्ध केलेलं हे बोलकं पत्र विचार करायला लावणारं आहे. तुमच्याशी ते शेअर करावंसं वाटलं, म्हणून इथे कॉपी – पेस्ट केलंय. तुम्हाला भावलं, तर तुम्हीही आवश्य ब्लॉगवरून, मेलमधून हे अजून पुढे प्रसारित करा !

**************************************

ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.
——————————————————————————————————-

प्रिय विनील,

    परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

    रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

   तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

    तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

    मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

    तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

    हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

    आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

    हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

    एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

    कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

    तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

    विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

    आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

    विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

    आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

    विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

    हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

    पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

    विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

    तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

    तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

    आय सॅल्यूट यू, सर!

 सचिन जाधव, आयएएस, ओरिसा

    सुट्टीमध्ये थोडा ओरिसाचा फेरफटका झाला. ओरिसामध्ये बघण्यासारखं म्हणजे पुरी आणि कोणार्क. दोन्ही भुवनेश्वरहून जाण्यासारख्या जागा आहेत. आपलं वाहन असेल, तर भुवनेश्वरहून पुरी आणि कोणार्क दोन्ही एका दिवसात बघता येतं.  भुवनेश्वरमध्ये असलेलं लिंगराज मंदिरही पुरीच्या जगन्नाथ  मंदिराच्याच शैलीतलं. खेरीज इतिहासाची आवड असेल, तर भुवनेश्वरजवळ धौलीही बघायला आवडेल. सम्राट अशोकाचा शिलालेख, तिथे नव्याने बांधलेला शांतीस्तूप, कलिंगचं युद्ध जिथे झालं  ती राणभूमी या गोष्टी धौलीला आहेत. भुवनेश्वरजवळ खंडगिरी – उदयगिरी ही प्रसिद्ध जैन लेणीही आहेत. हे सगळं एका दिवसात भुवनेश्वरहून बघता येतं. हे या भटकंतीमधले फोटो. (यातले बरेचसे फोटो आळश्यांच्या राजाने काढलेले आहेत.)
    कोणार्कला जाताना वाटेत – ओरिसाच्या हस्तकला विकणारं रंगीबेरंगी दुकान. गावाचं नाव विसरले 😦
    “ही जागा पुरातत्वखात्याच्या मालकीची आहे …. फोटो काढण्यास सक्त मनाई” वगैरे नेहेमी दिसणार्‍या प्रेमळ पाट्यांऐवजी पुरातत्त्व खात्याने इथे छान मंदिराची माहिती दिली आहे. अशी माहिती महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरही लिहिण्याची बुद्धी आपल्या पुरातत्त्व खात्याला होवो!

    मंदिराचा संपूर्ण परिसर. समुद्रकिनार्‍यावर, मऊ दगडात बांधकाम केल्यामुळे खूप झीज झालेली आहे. डागडुजी / दुरुस्ती चालू आहे. उत्तरायण – दक्षिणायनाप्रमाणे सूर्याचे किरण गर्भगृहात कसे प्रवेश करतील याचा अभ्यास करून मंदिराची रचना केलेली होती.

    हे छोटे खांब एकविसाव्या शतकात मंदिरासमोर फोटो काढता यावा म्हणूनच केले होते गंग राजानी 🙂

    मंदिराचा side view. या मंदिराच्या बांधकामामध्ये चुन्याचा वापर नाही. लोखंडी सळया वापरून दगड एकमेकांवर बसवलेले आहेत! कळसामध्ये एक शक्तीशाली लोहचुंबक बसवलेलं होतं. सोळाव्या शतकात कळसामधलं लोहचुंबक काढून टाकल्यानंतर गर्भगृहाचा कळस पडला, हळुहळू गर्भगृहाचा फक्त चौथरा उरला. (आमच्या गाईडच्या सांगण्याप्रमाणे या लोहचुंबकामुळे वास्को द गामाचा कंपास नीट दिशा दाखवत नव्हता, म्हणून त्याने ते लोहचुंबक काढून टाकलं :D) आज जे काय उभं आहे, ते लॉर्ड कर्झनच्या (बंगालची फाळणी करणारा हाच लॉर्ड कर्झन) कृपेने. चौथर्‍यावरचा डावीकडे मोकळा दिसणारा भाग म्हणजे मूळ गर्भगृहाची जागा.

    सूर्यमंदिराचं प्रसिद्ध चाक … अशी एकूण २४ चाकं आहेत – प्रत्येकावरचं कोरीव काम वेगवेगळं. कुठे दिवसाचे आठ प्रहर, तर कुठे ऋतू.

    कोणार्कहून पुरीला जाणार्‍या रस्त्यावरचा हा निवांत समुद्र! अंधारात पुरीचं मंदिर बघण्यापेक्षा इथेच थोडा वेळ निवांत बसावं म्हटलं. जगन्नाथ इथेच भेटला. 🙂