Archives for category: काऊचिऊच्या गोष्टी


माऊला कुत्री – मांजरं – एकूणातच सगळे प्राणीमात्र खूप आवडतात. म्हणजे टेकडीवर आम्ही मधून मधून फिरायला जातो तर तिथले जवळपास सगळे भुभू आणि त्यांचे ताई / दादा / काका / मावशी लोक तिला ओळखायला लागलेत! तर यंदा तिच्या वाढदिवसाला भुभूंना बोलावलंच पाहिजे असं ठरलं. मग कुणाकुणाला बोलवायचं, कसं करू या याची खलबतं सुरू झाली, प्लॅन ठरला, कार्डबोर्ड आणले, ते कापले, आज्जीने मस्त रंगवले आणि असे एक एक भुभू तयार झाले…

मोठ्ठा भुभू आणि छोटुस्सा भुभू!

हा झोपलाय

यांना आपल्या त्या ह्या पुस्तकातून बोलावलंय …

यांना पण!

आणि हा बुटकू

एवढे सगळे भुभू आल्यावर ते एका जागी कसे बसतील? त्यांच्या खेळण्यामध्ये सगळीकडे पायांचे ठसे उठणारच की! ते कसे करायचे? सोप्पंय! पाय बनवू या, म्हणजे त्याचा ठसा करता येईल!

हा पाय

आणि हा ठसा!

भुभूंना मातीचे पाय घेऊन सगळीकडे बागडायला माऊने मदत केलीय. 🙂
आले बघा सगळे … तय्यार!!!

हुश्श! पुढच्या वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं बरं? 🙂


दोन चार दिवसांपूर्वी “अक्षरधारा” मधून माऊसाठी गोष्टीची ढीगभर पुस्तकं आणलीत … त्यातलंच हे एक. म्हणजे मला माहित आहे, माऊ अजून लहान आहे हे पुस्तक वाचायला, पण फारच छान वाटलं म्हणून घेतलंच मी ते पुस्तक.

आज ते वाचलं, आणि इतकं आवडलं, की पुस्तकावर माऊचं नाव घातलंय म्हणून … नाही तर ते चक्क ढापायचा विचार होता माझा. (“माऊची आई” म्हणून नाव बदलावं का त्या पुस्तकावरचं?) माऊची बरीचशी पुस्तकं मला आवडतात. म्हणजे काहीतली चित्र आवडतात, काहीतल्या गोष्टी आवडतात. काहीतलं सगळंच आवडतं!!! हे असंच वाईट्ट आवडलंय. पुस्तकातली चित्र एकदम गोड्ड आहेत. आणि गोष्टी वाचतांना मला थेट बिम्मची आणि लंपनची आठवण झाली … जोयानाचं विश्व इतकं सुंदर उभं केलं आहे ना इथे … “आजी काय बोलते हे मला कळत नाही. मिनी मांजर काय बोलते ते आजीला कळत नाही. रंग काय बोलतात ते मांजरीला कळत नाही. झाड काय बोलतं ते आभाळाला कळत असेल का?” असं मावशीला विचारणारी ही जोयाना!

 
आता अडचण एकच आहे. कवितामावशीला विचारायचंय, जोयानाच्या गोष्टी अजून सांगतेस का म्हणून. म्हणजे हे एक पुस्तक माऊच्या आईसाठी ठेवलं तरी बाकीच्या जोयानाच्या गोष्टी माऊला वाचायला मिळतील!!!

***
जोयानाचे रंग
लेखिका कविता महाजन
राजहंस प्रकाशन
किंमत ५० रुपये


म्हणजे घरी बनवलेला, घरी सजवलेला, घरी बसवलेला आणि घरीच विसर्जित केलेला बाप्पा.

यंदा बाप्पाचे दिवस जवळ आले तसे दुकानातले बाप्पा बघून माऊ इतकी खूश होती, की बाप्पा घरी असणं मस्टच होतं. विकत घेतलेला बाप्पा आम्ही बसवत नाही, त्यामुळे बाप्पा बनवणं ओघाने आलंच. मागे केलेल्या बाप्पाच्या अनुभवावरून यंदा त्यापेक्षा चांगला बाप्पा बनवायचे मनसुबे मी रचत होते.
पण सुरुवातीलाच माशी शिंकली. माती आधी जास्त घट्ट, मग जास्त सैल, ती थोडी वाळल्यावर बनवावी इतका वेळ नाही अशी सगळी गंमत गंमत झाली, आणि “होईल तसा करू” म्हणून मी तश्या सैल मातीचाच बाप्पा बनवला. जरा वेळाने थोडा वाळल्यावर अजून एक हात फिरवता येईल अशी आशा होती, पण थोड्या वेळानंतरची ती घडी काही आलीच नाही. बिचारा बाप्पा बनवला तसाच ओबडधोबड वाळून गेला. आणि मी पण “हम तो बना चुके” म्हणून तसाच तो रंगवला. खरं तर मागच्या अनुभवावरून बाप्पा शक्यतो रंगवायचा नाही असं ठरवलं होतं (मूर्ती पाण्यात विरघळल्यावर पोस्टर कलरचा – प्रामुख्याने दागिन्यांना वापरलेला सोनेरी रंगाचा – वर तवंग आला होता मागच्या वेळी. त्यामुळे न रंगवताच बसवायचा विचार होता आधी.) पण मूर्ती सुबक न झाल्याने नुसता पांढरा रंग द्यायचा ठरवला मग. 
असा बाप्पा चतुर्थीच्या तब्बल एक दिवस आधी तयार झाला, आणि मग पानाफुलांची आरास करून झाल्यावर एकदम वेगळाच भासायला लागला. मातीची मूर्ती आणि बाप्पा यातलं ट्रान्स्फॉर्मेशन खरंच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. पण आपणच केलेली, आतापर्यंत सगळ्या अंगांनी बारकाईने निरखलेली मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं.

माऊच्या उत्साहापुढे मूर्ती तयार होईपर्यंत आणि नंतरही कशी टिकाव धरणार याची मला फार शंका होती. “आपला बाप्पा आहे, त्याला हात नाही लावायचा, दूरूनच ‘मोरया’ करायचं” हे तिला कितीही पढवलेलं असलं तरीही. पण दुसर्‍या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी गप्पा मारतांना ऐकलं … “गुड मॉर्निंग बाप्पा … कसा आहेस? तुझी गाई झाली का? :)” आणि मग मी निश्चिंत झाले. बाप्पाचे पाच दिवस माऊला बाप्पा बाप्पा करत घरभर नाचतांना बघणं एवढं मोठं सुख नसेल. 

विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी बादलीत मूर्ती पूर्ण विरघळल्यावर “बाप्पा आता त्याच्या घरी गेलाय.” हे थोडंफार पटलंय, पण “आई आपला बाप्पा कुठे गेला? तो कधी येणार आहे?” हे प्रश्न अजून चाललेत. एवढ्यासाठीच तर होता ना घरचा बाप्पा? 🙂

शाळेला जायची गडबड. अजून माऊची पोळी संपयचीय, मोजे, बूट घालून व्हायचेत, औषध घ्यायचं राहिलंय.

खिडकीत आई एक एक घास भरवते आहे, एकीकडे माऊचं खिडकीतून बाहेर बघणं चाललंय. औषध काढायला आई तिथून बाजूला गेल्यावर माऊ तिच्याकडच्या गाणार्‍या भूभूला खिडकीतून दिसणारी आज्जी, काका दाखवायला लागते. खिडकीच्या आतून भूभूला नीट दिसत नाहीये सगळं, म्हणून मग भूभूला गजाबाहेर काढते. तेवढ्यात आई आल्यामुळे घाईघाईने भूभूला आत घेण्याची धडपड सुरू होते, आणि भूभू अडकून बसतो.
“अग, थांब … भूभू पडेल खाली!” आई ओरडल्याबरोबर पटकन माऊ भूभूला सोडून देते आणि बिचारा भूभू बाहेरच्या विंडोसीलवर जाऊन बसतो. आता इथे आई, बाबा कुणाचाच हात पोहोचणार नाहीये. भूभूचा त्रिशंकू झालाय. तिथून खाली पडला तर बिचारा थेट सात मजले खालीच जाईल. भूभू माऊचा लाडका असला तरी तो तिचा नाहीचे मुळी. खालच्या दादाने उदारपणे थोडे दिवस खेळायला दिलाय तो माऊला. बर्‍यापैकी महागातला. थोडक्यात, आता काय करायचं या विचाराने आईला घाम फुटलाय. एकीकडे माऊला धपाटा घालायला हात शिवशिवतोय, दुसरीकडे तिचं “भूभू, तिकडे काका शिमिंग करतोय बघ, दिसला ना तुला?” संभाषण ऐकलेलं असल्यामुळे हसू आवरत नाहीये.
कशीतरी माऊला वेळेत तयार करून आई शाळेत घेऊन जाते. तिथे आज एक वेगळंच रहस्य आहे आईसाठी. भूभूचा विचार करायला वेळच नाहीये. काल माऊच्या डे केअरच्या बॅगेत काल दुसर्‍याच कुणाचा तरी फ्रॉक आणि चड्डी बदललेल्या ओल्या कपड्यांमध्ये आलेय, आणि माऊची चड्डी आणि शॉर्ट गायब आहे. या गमतीजमती नेहेमी शाळेत होतात, पण हे सगळं डे केअरच्या बॅगेत बघून आई चक्रावून गेली आहे. डे केअर – वर्ग – डे केअर अश्या फेर्‍या केल्यावर अखेरीस हे रहस्य उलगडतं. काल माऊ वर्गातून डे केअरला पिवळा फ्रॉक घालून आली होती ना, तो आणि चड्डी भिजली म्हणून डे केअरच्या ताईंनी बदलली, बदललेले कपडे नेहेमीप्रमाणे डे केअरच्या बॅगेत.
पण पिवळा फ्रॉक तर माऊचा नाहीचे!
वर्गात माऊने जीन्सची शॉर्ट आणि चड्डी ओली केली म्हणून वर्गातल्या ताईंनी कपडे बदलले तिचे आणि तो पिवळा फ्रॉक – चड्डी घातली. तो वर्गातल्या अजून कुणाचातरी हरवलेला असणार!
हे कोडं सुटल्यावर आईचं डोकं तेज चालायला लागतं. घरी आल्यावर खिडकीतून आरसा बाहेर काढून ती भूभूची पोझिशन नीट बघून घेते. आणि कपड्यांच्या हॅंगरने अलगद भूभूला वर उचलते. माऊ येण्यापूर्वी रोजच्या दिवसात इतक्या प्रकारचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आईने स्वप्नातही केलं नसेल.  
माऊच्या खिडकीमध्ये दिवसभर काय काय घडामोडी चाललेल्या असतात याचा कुणी व्हिडिओ केला तर इतका मनोरंजक होईल ना!
 

माऊला प्रथमच भेटायला येणार्‍या एका आजीने तिला दाबल्यावर वाजणार्‍या प्राण्यांचा एक सेट आणला होता दीड एक वर्षापूर्वी. तसा चांगला होता तो … पण जांभळ्या रंगाचा उंट किंवा गुलाबी हत्ती म्हणजे यक्क … असले कसले रंग वापरतात हे लोक खेळण्यांना? काळा हत्ती आणि पिवळसर मळकट राखाडी उंट बनवणं इतकं अवघड आहे का? त्या उंटाचे पाय तर हिप्पोसारखे वाटताहेत!
त्यातलं एक एक खेळणं वापरायला काढतांना सगळ्यात शेवटी, बाकीची वाजेनाशी झाल्यावर नाईलाजाने दोन महिन्यांपूर्वी जांभळा उंट खेळायला बाहेर पडला. आणि पाहिल्याक्षणी माऊला एकदम आवडला.  रस्त्यात बघितलेला उंट आणि हा प्राणी एकच आहे याविषयी जरासुद्धा कन्फ्युजन नाही. सद्ध्या “ओंटो” मंमं, शीशी, आबू सगळीकडे सोबत असतो. 

दीड वर्षाने का होईना पण जांभळा उंट किती मत्त असतो ते समजलं एकदाचं आईला! तिच्या डोक्यातला असला सगळा कचरा दूर करायला बरेच कष्ट पडणार माऊला. तशी थोडी थोडी सुधारते आहे ती … परवाच आईने माऊला जिराफावर बसलेलं हिरवं माकड आणलंय. 🙂

सद्ध्या मऊचा आणि माझा दिवस पुस्तक वाचल्याशिवाय पूर्णच होत नाही. तिची सुंदर सुंदर पुस्तकं बघितली की पुन्हा मला तिच्या वयाचं होऊन ही पुस्तकं बघावीशी वाटतात.

आज तिच्या लाडक्या “बुप्पा” आणि “मंबू” विषयी. ही सद्ध्या माऊची सगळ्यात आवडती पुस्तकं.
जंगलातल्या सगळ्या लहान प्राण्यांच्या खोड्या काढणार्‍या, त्यांना त्रास देणार्‍या बुक्का हत्तीला एक दिवस चांगलीच अद्दल घडते. त्याची आई, बाबा, मित्र कुणी सापडत नाहीत, आणि जंगलातलं कुणीच त्याला मदत करायला तयार होत नाही. मग बुक्का शहाणा होतो. सुंदर चित्र, सोप्पी गोष्ट, वाजवी किंमत. नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक.

लंबू जिराफ आणि नॉटी खारुताई यांच्या मैत्रीची गोष्टही एनबीटीचीच. लंबू जिराफ आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे मग आपला मित्र कसा होणार असा प्रश्न पडलेल्या नॉटीला लंबू जूंबा हत्ती आणि गप्पू माकड, रंगीला फुलपाखरू आणि फुलं असे मित्र दाखवतो, आणि आपल्यापेक्षा वेगळा असला तरी लंबू आपला मस्त मित्र आहे हे नॉटीला पटतं. 

माऊसाठी आतापर्यंत जी काही पुस्तकं धुंडाळलीत, त्यात मला ज्योत्स्ना प्रकाशन, प्रथम प्रकाशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांची पुस्तकं सगळ्यात आवडली. पुस्तकातली चित्र, गोष्ट, किंमत या सगळ्यात उजवी. बाकी स्लीपिंग ब्युटी आणि सिंडरेला सगळीकडे सहज मिळताहेत, पण कितीही सुंदर कागदावर छापलेली मिळाली तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही.  
तुम्ही दीड वर्षाचे असाल तर काय काय वाचाल? अजून कुठली पुस्तकं सुचवाल मनीमाऊला?