Archives for category: छायाचित्र

कुंड्यांमधली बाग सुरू केली तेंव्हा पहिल्यांदा जी वीस – बावीस झाडं आणली त्यातला एक माझा सोनचाफा. गेली सहा वर्षं तो माझ्या एवढ्याश्या टेरेसवर भरभरून फुलतोय, सुगंधाची लयलूट करतोय. अगदी सुरुवातीला आमच्या समोरची इमारत झालेली नव्हती आणि टेरेसवर भन्नाट वारं यायचं, आणि अश्या वेड्या वार्‍यात हा कसा टिकेल म्हणून मला शंका वाटायची. पण तो नुसता टिकलाच नाही, तर फुलतही राहिला. टेरेसवर पहिल्यांदाच बाग करत असल्यामुळे तिथे मिळणार्यात सूर्यप्रकाशात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती फरक पडतो याची सुरुवातीला अजिबात कल्पना नव्हती. पाणी, सूर्यप्रकाश, खत सगळंच अजून शिकत होते मी. पण शिकाऊ माळीणबाईंना सांभाळून घेतलं त्यानं. 

त्याला आलेलं पहिलं फूल, त्याची सुरुवातीची पानं, ही “सुवर्णरेखा” जात आहे, हिची पानं अशीच असतात हे माहित नसल्यामुळे त्या पानांच्या वळलेल्या कडा पाहून माझी काळजी, पहिल्यांदा छाटणी करतानाची धाकधूक, खूप दिवस घराबाहेर राहून आल्यावर घरी आल्यावर अर्ध्या रात्रीसुद्धा बागेत काय चाललंय ते बघण्याची धडपड हे सगळं आज आठवतंय.

बागेत सगळ्यात जास्त गप्पा मी त्याच्याशी मारल्यात,  आणि आपण सांगितलेलं – न सांगितलेलं सगळं त्याला समजतंय याचाही अनुभव घेतलाय! अशीच एकदा एका निर्णयाची मोठी जबाबदारी वाटत होती. सगळं नीट होईल ना याची काळजी होती. अस्वस्थ आणि एकटं वाटत होतं. हे सगळं त्याच्याजवळ व्यक्त केलं, आणि भर उन्हाळ्यात, माझं तसं दुर्लक्षच होत असताना माझ्या एवढ्याश्या झाडाला त्या दिवशी तब्बल वीस फुलं आली! माझं झाड माझ्याशी बोलतं यावर त्या दिवशी माझा ठाम विश्वास बसला.

धाकटं भावंड स्वीकारणार्‍या समजूतदार मोठ्यासारखं त्याने माऊ आल्यावर मला बागेसाठी पूर्वीसारखा वेळ न देता येणंही मान्य केलंय. 
या एका झाडाने मला किती आनंद दिलाय ते शब्दात सांगणं शक्य नाही! इथे ब्लॉगवरच त्याच्या किती पोस्ट आहेत हे आज जाणवलं.

असं सगळं मस्त चाललं असताना एकीकडे एक टोचणी लागून होती … कितीही मोठी कुंडी असली तरी सोनचाफ्याला ती आयुष्यभर पुरणार नाहीये. त्याच्या पूर्ण क्षमतेवढं मोठं होण्यासाठी त्याला मोकळ्या जमिनीत रुजायची संधी मिळायला हवीय. पण झाड मोकळ्या जमिनीत लावताना मला त्याच्याजवळ राहता येणार नाही! त्याला असं घर सोडून दूर पाठवायची मनाची तयारी काही होत नव्हती. दोन – चार ठिकाणी मी झाड लावता येईल का म्हणून चौकशीही केली, पण त्या चौकशीत खरा जीव नव्हताच. आणि एक दिवस अचानक नवर्‍याने सांगितलं – “मी सोसायटीमध्ये विचारलंय. आपल्या इथे खाली झाड लावायला जागा शोधणार आहेत ते.” फार दूर नाही म्हणून आनंद, पण आता खरंच जाणार म्हणून दुःख असं चाललं होतं मग. मग सोसायटीचे लोक येऊन झाड पसंत करून गेले. एक दिवस माळीदादाही झाड बघायला आले. पण तेंव्हा झाडाला भरभरून पालवी आली होती, आणि कळ्याही. हा बहर संपल्यावर झाड हलवू या असं ठरलं, आणि हा बहर कधी संपूच नये असं मला मनाच्या कोपर्‍यात वाटायला लागलं! त्यात त्याच्यासाठी शोधलेली जागा म्हणजे केवडा आणि फणसाचं झाड काढून तिथली मोकळी जागा. मस्त वाढलेला केवडा आणि फणस का तोडायचा? (उद्या असाच माझा सोनचाफा तोडला यांनी तर? सोसायटीचं कुणी सांगावं! 😦 परत शंका!) तो बहर संपलाच शेवटी, पण मग पावसाची दडी, सोसायटीच्या बागेला पाणी पुरवणारी मोटर जळाली अशा विविध कारणांनी त्याचा मला अजून महिनाभर सहवास मिळाला. मग दोन वेळा झाड घ्यायला आलेले माळीदादा घरात कोणी नाही म्हणून परत गेले, आणि अखेरीस झाडाच्या पाठवणीची वेळ आलीच!
दुपारी माऊ झोपलेली असताना इतक्या झटकन नेलं त्यांनी झाड, की मला नीट निरोपही घेता आला नाही. माऊ उठल्यावर तिला सांगितलं, “आपलं झाड गेलं खाली!”
“खाली कुठे?”
“माहित नाही! मला माळीदादा दिसतच नाहीयेत खिडकीतून. आपण शोधू खाली जाऊन.”
“आई ते बघ माळीदादा झाड लावताहेत तिथे खाली!” माऊला दिसले ते बरोब्बर.

अगदी माझ्या खिडकीच्या खाली जागा मिळाली सोनचाफ्याला – लांबून का होईना, पण रोज दिसणार तो मला. अगदी खाली जाऊन गप्पा सुद्धा मारता येतील! टेरेसवरच्या त्याच्या रिकाम्या जागेकडे बघून रिकामंरिकामं वाटलं की फक्त खिडकीतून एकदा खाली बघायचं! 🙂 जीव भांड्यात पडणं म्हणतात ते हेच!

लॉंग विकेंडला घराबाहेर पडायचा काहीच प्लॅन ठरत नाहीये म्हणून हळहळ वाटत होती, पण या वर्षी ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलली आहे हे मायबोलीवर समजलं, आणि लगेच तिथे जाऊन बघण्याची संधी मिळाली. मुळशीचं पाणी बघण्याच्या नादात “क्विक बाईट्स” ची सांगितलेली खूण दिसलीच नाही, आणि अचानक अगदी रस्त्याच्या शेजारी कारवी येऊन भेटली!

कारवीच्या कळ्या
कारवीची फुलं

आणि ही झुडुपं

रस्त्यालगतचा डोंगराचा उतार कारवीनेच भरला आहे!

इथे पांढरी / गुलाबी कारवीसुद्धा फुलली आहे असं समजलं होतं ती काही दिसली नाही.  कारवीसोबत सोनकी आणि दुसरी रानफुलं होतीच.

कुर्डू

सोनकी

(बहुतेक) निसुर्डी

जांभळी चिरायत

रानपावटा

हा पण भेटला – बघा दिसतोय का तुम्हाला …

दिसतोय का मी?

माऊला कारवीपेक्षा जास्त इंटरेस्ट होता पलिकडे दिसणार्‍या धरणाच्या पाण्यात. म्हणजे फुलं वगैरे ठिक आहे, पण एवढं मोठ्ठं पाणी शेजारी दिसतंय आणि आपण तिथे जात नाही ही कल्पना काही तिला पटत नव्हती 🙂 फुलांना भेटून झाल्यावर मग पाण्याला भेटायला गेलो.

काल अर्धवट पाऊस पडल्याने चांगल्यापैकी उकडत होतं, त्यात सकाळ म्हणण्यापेक्षा दुपारीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे पाण्यात शिरल्यावर खरंच जीव शांत झाला. सगळं हिंडून झाल्यावर, पाण्यात शिरल्यावर जिवाला अजून शांत करायला शाण्यासारखा मस्त पाऊस पण आला!

फुलांचे फोटो काढेपर्यंत मोबाईल नक्की माझ्याजवळ होता. तो पाण्यात शिरण्यापूर्वी नव्हता. उतरतांना गाडीत राहिला असेल म्हणून मी तशीच पुढे गेले होते. परत येतांना भिजल्यामुळे माऊचे आणि तिच्या मैत्रिणीचे कपडे बदलणे वगैरे सोपस्कार करून घाईनेच गाडीत बसलो आणि निघालो. पाच मिनिटांनी आठवलं, मोबाईल कुठे दिसत नाहीये! कुठल्याच फोनला रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करून बघणं शक्य नव्हतं. तेवढ्यात माऊच्या मैत्रिणीची आजी म्हणाली, “आपण पाण्यात जाताना गाडी ठेवली होती, तिथे पडला होता एक मोबाईल!”

समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस, रस्त्यात चहाचे पाट वहायला लागलेले. रस्ता तसा वर्दळीचा. परत फिरून गाडी लावली होती तिथे पोहोचलो, तर खरंच मोबाईल पडलेला मिळाला! पंधरा मिनिटं गाड्या, पायी चालणारे, गुरं यांच्या कुणाच्या पायदळी न जाता, कुणी न उचलता फोन तिथेच रस्त्यात पडलेला होता. आणि आतपर्यंत चिखल भरलेला असूनही चालू होता!!! त्याचं आणि माझंही नशीब फार चांगलं असावं. मोबाईल मिळाल्यावर आधी स्विच ऑफ केला, जमेल तसा चिखल काढला. घरी आल्यावर ड्रायरखाली वाळवला. जरा वेळ इअयरफोन लावल्याचा सिंबॉल दाखवत होता, टाचस्क्रीन झोपलेला होता. पण नंतर झाला सुरळीत चालू! या वेळी पहिल्यांदा नोकिया नसलेला फोन  – सॅमसंग – घ्यायचं धाडस केलं होतं मी … तर नोकियाचा ठोकळा सोडून दुसरा कुठला फोनही मी वापरण्याच्या लायकीचा आहे हे सिद्ध झालं या भटकंतीमधून!!! 🙂



माऊला कुत्री – मांजरं – एकूणातच सगळे प्राणीमात्र खूप आवडतात. म्हणजे टेकडीवर आम्ही मधून मधून फिरायला जातो तर तिथले जवळपास सगळे भुभू आणि त्यांचे ताई / दादा / काका / मावशी लोक तिला ओळखायला लागलेत! तर यंदा तिच्या वाढदिवसाला भुभूंना बोलावलंच पाहिजे असं ठरलं. मग कुणाकुणाला बोलवायचं, कसं करू या याची खलबतं सुरू झाली, प्लॅन ठरला, कार्डबोर्ड आणले, ते कापले, आज्जीने मस्त रंगवले आणि असे एक एक भुभू तयार झाले…

मोठ्ठा भुभू आणि छोटुस्सा भुभू!

हा झोपलाय

यांना आपल्या त्या ह्या पुस्तकातून बोलावलंय …

यांना पण!

आणि हा बुटकू

एवढे सगळे भुभू आल्यावर ते एका जागी कसे बसतील? त्यांच्या खेळण्यामध्ये सगळीकडे पायांचे ठसे उठणारच की! ते कसे करायचे? सोप्पंय! पाय बनवू या, म्हणजे त्याचा ठसा करता येईल!

हा पाय

आणि हा ठसा!

भुभूंना मातीचे पाय घेऊन सगळीकडे बागडायला माऊने मदत केलीय. 🙂
आले बघा सगळे … तय्यार!!!

हुश्श! पुढच्या वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं बरं? 🙂



गेली काही वर्षं जमेल तसं बाप्पा घरी बनवणं चाललंय. या वर्षीची प्रगती म्हणजे मागच्या वर्षी विसर्जन केल्यावर माती ठेवून दिली होती, तीच वापरली. विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर एक मातीचा केक तयार झाला होता. तो कुटून, चाळून घेतल्यावर नवी कोरी माती तयार! कुटायला फारसे कष्ट पडले नाहीत. आणि माती भिजायला जास्त वेळ द्यायची तयारी असेल तर माती चाळायची अजिबातच गरज नाही असं नंतर लक्षात आलं. नवीन माती विकत आणण्यापेक्षा ते जास्त सोयीचं आहे मला. तसंही मातीचा पुनर्वापर केला नाही तर बाप्पा इको – फ्रेंडली कसा होणार?


बाप्पा रंगवणं अजून काही मनासारखं जमत नाहीये. पहिल्या काही प्रयत्नात पोस्टर कलर वापरून बघितले. पण मातीच्या मूर्तीवर मला ते फार भडक वाटतात. आणि चंदेरी –सोनेरी रंग वापरले तर त्यांचा तवंग येतो विसर्जनाच्या पाण्यावर. मग मागच्या वर्षी फक्त पांढरा आणि केशरी पोस्टर कलर वापरून बघितले. तेही तितकंसं आवडलं नव्हतं. मी केलेल्या मातीच्या मूर्तीचा पोत बाजारातल्या मूर्तीइतका सुबक नसतो. (बाप्पा, तितकी सुबक मूर्ती करायचा पेशन्स कधी येणार माझ्यात?) पांढरा रंग लावल्यावर मूर्तीचा खडबडीतपणा अजून उठून दिसतो आणि ते नीट गिलवा न करता चुना फासल्यासारखं वाटतं. मग या वर्षी गेरूचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. बेस म्हणून पांढरा रंग दिला, आणि मग त्यावर गेरू. (काही ठिकाणी गेरूमध्ये खालचा पांढरा मिसळून मार्बल टेक्श्चर आलंय ते आपोआपच.) आधी फक्त दाताला वेगळा रंग द्यायचा विचार होता, पण “डोळे काढच” म्हणून आग्रह झाल्यामुळे शेवटी डोळेपण केले. पांढर्‍या रंगापेक्षा चांगलं वाटलं हे. एकदा न रंगवता तशीच मूर्ती ठेवायची इच्छा आहे. रंगकामात अजून काही पर्याय सुचतोय का तुम्हाला? 


पण बाप्पाला इतका गडद रंग दिल्यावर सजावट कशी उठून दिसणार? मग लक्षात आलं, बाप्पाचा हा रंग मला अगदी सोयीचा आहे – मी सजावट करणार ती खर्‍या पानाफुलांचीच, आणि ती गेरूच्या रंगावर पुरेशी उठावदार दिसणार! 






या वेळी एक गंमत लक्षात आली – माती मळून झाल्यावर पहिल्यांदा मला काही सुचतच नव्हतं. मूर्ती करायला घेतांना आधी कितीतरी वेळ नुसते लाडू वळणंच चाललं होतं. कुठल्या क्रमाने करायची मूर्ती, काय प्रपोर्शन ठेवायचं हे काहीही आठवत नव्हतं. त्यामुळे फर्स्ट ड्राफ्ट आणि बिटा व्हर्जन झाल्याच. आणि बाप्पा बनवल्यावर मी उंदीरमामाला चक्क विसरून गेले होते! तो नंतर बनवला. (उंदीर मामा बघून माऊने सांगितलं, आई आता मी मनीमाऊ बनवणार! :D)
 
या वेळी चक्क बाप्पा चतुर्थीच्या आधी तीन – चार दिवस तयार होता. त्यामुळे ते तीन चार दिवस “आई बाप्पा आलाय का? अजून का झोपलाय तो?” या माऊच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचं काम होतं. 🙂      

तर अशी सगळी गंमत करून मग काल बाप्पा आलाय. आता त्याच्या माऊबरोबर गप्पा सुरू झाल्यात. आणि ते बघितल्यावर आपण वेळेवर मूर्ती पूर्ण करू शकलो याचं किती समाधान वाटतंय काय सांगू!

 


आज झोपतांना माऊला म्हटलं, “चल बाप्पाला गुड नाईट करू या. तू बाप्पाला सांग ’मी सारखे कारभार करणार नाही’ म्हणून, मी सांगते, ’माऊला सारखं रागवणार नाही’ म्हणून.”
“नको. आपण बाप्पाला म्हणू या, ’थॅंक यू बाप्पा!’”

 





भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्‍यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्‍याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्‍या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्‍या, नवे रुपडे घेऊन येणार्‍या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्‍याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे. 

या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्‍या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!

मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्‍यावर डोलणारी पायर्‍या पायर्‍यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:

आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या?

भाताची रोपं उपटून झाली, बांधलेले गठ्ठे चिखलातून पळत इकडून तिकडे टाकून झाले. खेकडे बघून झाले.

शेताशेजारचा ओढा

 चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!

धरणाच्या पाण्याकडे

 धरणाचं पाणी बघायला जातांना कावळ्याच्या छत्र्या दिसल्या, मासे धरणारा काका दिसला. त्याच्या पिशवीचं इन्स्पेक्शन झालं.

धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!

पाणी!

 इथे एक तंबू हवा होता!

 वार्‍यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!

पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय.

 भात लावणीसाठी शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या मुलंसुना येतात … पण नांगर धरणं अजूनही अजोबांचंच काम! दुसर्‍या कुणालाच ते जमत नाही / शक्य नाही. आजोबांचे हातपाय चालेनासे झाल्यावर काय? घरोघरी हेच चित्र दिसतंय!


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.
कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.
या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 
त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!
दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात…
***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून … पळा!!! 🙂 )

खूप दिवसत मी इथे बागेविषयी काही लिहिलेलं नाही. कारण बागेत मी काही केलेलंच नाही पाणी घालण्याखेरीज. पण रोज सूर्य उगवतो, झाडांना प्रकाश देतो. पाऊस पडतो, आणि ती थरारतात. काही ना काही नवीननवीन बागेत घडतच असतं. आपलं लक्ष नसेल, तर तो आपला करंटेपणा. तर जाता जाता ही गंमत बघायला मिळाली मला बागेत –

मागच्या पावसाळ्यात मी पांढर्‍या गोकर्णाच्या बिया लावल्या होत्या, आणि त्याचा मस्त वेल आला होता. त्याच्या बिया पडून या वर्षी आपोआप बाग गोकर्णाने भरून गेली होती. त्यातले तीन चार ठेवून मी बाकीचे काढून टाकले. या तीन – चार वेलांनी गंमत केली.
पहिल्याला अशी फुलं आली:
दुसर्‍याची अशी:
तर तिसर्‍याची अशी!
निळ्या गोकर्णाचा एकही वेल माझ्याकडे नव्हता. मग ही किमया कशी बरं झाली असेल? मागच्या पिढीमध्ये सुप्त राहिलेली गुणसूत्रं आता जागी झाल्यामुळे? का परागीभवन करणार्‍या किड्यांनी-माश्यांनी कुठूनतरी निळी गोकर्णाची फुलं शोधून काढली होती? पांढर्‍या गोकर्णावर निळी शाई कशी बरं सांडली असावी?

या पावसाळ्यात उशीरानेच जांभळ्या गोकर्णाच्या बिया सापडल्या त्या टाकल्यात मी एका कुंडीत. त्याला कुठल्या रंगाची फुलं येतील बरं? 🙂


पुण्याच्या जवळ, जिथे माऊला घेऊन एक दिवस, रात्र धमाल करता येईल अशी जागा शोधत होतो आम्ही. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर पाऊस पडला म्हणून हॉटेलच्या खोलीत नुसतं बसून रहावं लागलं असं होऊन चालणार नव्हतं, आणि पुण्याजवळच्या तारांकित रिझॉर्टसचे दर बघून तिथे जावंसं वाटत नव्हतं. अशी शोधाशोध चालू असतांना एका रिझॉर्टविषयी अर्धवट माहिती मिळाली. तिथे म्हणे शेत वगैरे होतं, आणि काही अनाथ मुलंही रहायला होती. रिझॉर्ट आणि अनाथालय? हे कॉम्बिनेशन काही पचण्यासारखं वाटलं नाही मला. पण चौकशी तर करून बघावी म्हणून फोन केला. इथला मालक पण गमतीशीरच वाटला. चौकशीला / बुकिंगला फोन केल्यावर चेक इनची वेळ, पैसे कधी भरायचे, आमचं रिझॉर्ट कसं जगात बेश्ट आहे यातलं काहीही सांगायला त्याला वेळच नव्हता. “आमच्याकडे जागा खाली आहे, तुम्ही किती जण, कधी येताय ते एसएमएस करा, मी कसं यायचं त्याचे डिटेल्स पाठवतो.” एवढं बोलून त्याने माझी बोळवण केली. हे कसं यायचं त्याचे डिटेल्स थेट आम्ही जायच्या आदल्या दिवसापर्यंत आलेच नव्हते! मी वैतागून फोन केला, तर याने “तुम्ही कधी येणार म्हणाला होता?” म्हणून विचारलं मला! हे काही खरं दिसत नाही. आपल्याला तिथे जाऊन बुकिंग नाही म्हणून परत यायला लागणार बहुतेक. मामला ठीकठीकच दिसतोय एकूण. मी मनाशी एका फसलेल्या सहलीची तयारी करत होते.

दुसर्‍या दिवशी निघाल्यावर तिथल्या मॅनेजरला फोन केला, त्यानेही “तुम्ही आज रात्री राहणार आहात का” म्हणून विचारलं आणि मी मनाशी म्हटलं, “बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आपण घरीच.” मस्त पावसाळी वातावरणात चांगल्या रस्त्यावरून आणि अगदी नेमक्या खुणांसह पत्ता मिळाल्याने अजिबात न चुकता आम्ही चाललो होतो. ट्रीप छान होणार आजची अशी पहिली शक्यता वाटली ती एका वळणावर हिला पाहिल्यावर:
कळलावी / ‘अग्निशिखा’
गेली कित्येक वर्षं कळलावीच्या सुंदर फुलांचे फोटो बघून आपल्याला ही कधी भेटणार म्हणून मी तरसत होते. ती सहजच भेटली या वाटेवर!
“रिझॉर्ट”ला पोहोचल्यावर खोली बघितली आणि एकीकडे जीव भांड्यात पडला – माऊच्या उपद्व्यापात तुटेल असं काहीही नव्हतं खोलीत – खरं तर काहीच नव्हतं. दोन गाद्या जमिनीवर घालून चादरी उश्या दिल्या होत्या, आणि एकीकडे जास्तीच्या गाद्या, उश्या, चादरी ठेवलेल्या. बाकी मोठ्ठीच्या मोठ्ठी खोली रि..का..मी!!! तर दुसरीकडे नेमकं काय वाढून ठेवलंय समोर अशी जराशी काळजीही वाटली.
चहा – पोहे घेताघेता समजलं … इथे सुट्टीच्या दिवशी नेहेमी शंभर – दिडशे पर्यंत लोक येतात. आज चक्क कुणीच नव्हतं – फक्त आम्ही तिघं! या जागेला “रिझॉर्ट” म्हणणं तितकं बरोबर नाही. हे इको –फार्म आहे. एकूण शंभरएक एकराच्या परिसरामध्ये सेंद्रीय शेती आहे, गाई, इमू, ससे, घोडे, बकर्‍या, कोंबड्या – बदकं असे प्राणी – पक्षी आहेत, ऍडव्हेंचर स्पॉर्टच्या ऍक्टिव्हिटी आहेत,

बर्मा ब्रिज

आणि शेजारीच एका छोट्याश्या नदीवरचा बांध असल्याने हा परिसर पाऊस चांगला झाला असेल तर पावसाळ्याच्या दिवसात तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो!

गराडे धरणाचं पाणी

कानात वारं शिरलेल्या वासरासारखं माऊने दिवसभर हुंदडून घेतलं इथे. 🙂  

फार्मपासून दीडएक किलोमीटरवर त्या बांधापर्यंत चालत जाता येतं, आणि मस्त पाण्यात खेळता येतं. ही जागा इतकी आवडली, की दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा “आबू बघायला” फेरी झाली आमची. 
बांधार्‍याजवळ
जातांना मोर दिसला, येतांना सुगरण पक्ष्यांची घरबांधणी प्रात्यक्षिकं बघायला मिळाली. 🙂

बांधाच्या वाटेवर खडकाळ माळ असल्याने मस्त रानफुलं भेटली …

दुसर्‍या दिवशी फार्मच्या मालकांची भेट झाली तिथे, आणि थोडा उलगडा झाला या जागेविषयी. हा माणूस मर्चंट नेव्हीमध्ये आहे. अगदीच उधळमाधळ केली नाही तर मर्चंट नेव्हीतल्या माणसाला म्हातारपणी पैशाचा प्रश्न पडू नये. पण सोबतीचा, आजूबाजूला माणसं असण्याचा प्रश्न त्यालाही असतोच. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी इथे प्रथम वीसएक मुलांचं अनाथालय काढलं. मग उरलेल्या जागेत शेती, जनावरं वगैरे. या अनाथालयाचा खर्च निघावा इतपत पर्यटन हे त्यानंतर आलं. केवळ इथे येऊन गेलेल्या लोकांच्या अनुभवांवरून, कुठलीही जाहिरात न करता जितके लोक इथे येतात तेवढं त्यांना पुरेसं आहे. (यांची वेबसाईट आहे म्हणे, पण सध्या तरी चालत नाहीये.) स्वतः मालक पैश्याच्या मागे नसल्यामुळे इथल्या लोकांच्या वागण्यात कुठेच कमर्शियल विचार दिसत नाही फारसा. हा त्यांचा “रिटायरमेंट प्लॅन” ऐकून वाटलं, इतका शहाणा स्वार्थ सगळ्यांना जमला तर किती छान होईल!

***
हिडन ओऍसिस, सासवडजवळ. (इथून पुरंदर – वज्रगड मस्त दिसतात!)

 


म्हणजे घरी बनवलेला, घरी सजवलेला, घरी बसवलेला आणि घरीच विसर्जित केलेला बाप्पा.

यंदा बाप्पाचे दिवस जवळ आले तसे दुकानातले बाप्पा बघून माऊ इतकी खूश होती, की बाप्पा घरी असणं मस्टच होतं. विकत घेतलेला बाप्पा आम्ही बसवत नाही, त्यामुळे बाप्पा बनवणं ओघाने आलंच. मागे केलेल्या बाप्पाच्या अनुभवावरून यंदा त्यापेक्षा चांगला बाप्पा बनवायचे मनसुबे मी रचत होते.
पण सुरुवातीलाच माशी शिंकली. माती आधी जास्त घट्ट, मग जास्त सैल, ती थोडी वाळल्यावर बनवावी इतका वेळ नाही अशी सगळी गंमत गंमत झाली, आणि “होईल तसा करू” म्हणून मी तश्या सैल मातीचाच बाप्पा बनवला. जरा वेळाने थोडा वाळल्यावर अजून एक हात फिरवता येईल अशी आशा होती, पण थोड्या वेळानंतरची ती घडी काही आलीच नाही. बिचारा बाप्पा बनवला तसाच ओबडधोबड वाळून गेला. आणि मी पण “हम तो बना चुके” म्हणून तसाच तो रंगवला. खरं तर मागच्या अनुभवावरून बाप्पा शक्यतो रंगवायचा नाही असं ठरवलं होतं (मूर्ती पाण्यात विरघळल्यावर पोस्टर कलरचा – प्रामुख्याने दागिन्यांना वापरलेला सोनेरी रंगाचा – वर तवंग आला होता मागच्या वेळी. त्यामुळे न रंगवताच बसवायचा विचार होता आधी.) पण मूर्ती सुबक न झाल्याने नुसता पांढरा रंग द्यायचा ठरवला मग. 
असा बाप्पा चतुर्थीच्या तब्बल एक दिवस आधी तयार झाला, आणि मग पानाफुलांची आरास करून झाल्यावर एकदम वेगळाच भासायला लागला. मातीची मूर्ती आणि बाप्पा यातलं ट्रान्स्फॉर्मेशन खरंच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. पण आपणच केलेली, आतापर्यंत सगळ्या अंगांनी बारकाईने निरखलेली मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं.

माऊच्या उत्साहापुढे मूर्ती तयार होईपर्यंत आणि नंतरही कशी टिकाव धरणार याची मला फार शंका होती. “आपला बाप्पा आहे, त्याला हात नाही लावायचा, दूरूनच ‘मोरया’ करायचं” हे तिला कितीही पढवलेलं असलं तरीही. पण दुसर्‍या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी गप्पा मारतांना ऐकलं … “गुड मॉर्निंग बाप्पा … कसा आहेस? तुझी गाई झाली का? :)” आणि मग मी निश्चिंत झाले. बाप्पाचे पाच दिवस माऊला बाप्पा बाप्पा करत घरभर नाचतांना बघणं एवढं मोठं सुख नसेल. 

विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी बादलीत मूर्ती पूर्ण विरघळल्यावर “बाप्पा आता त्याच्या घरी गेलाय.” हे थोडंफार पटलंय, पण “आई आपला बाप्पा कुठे गेला? तो कधी येणार आहे?” हे प्रश्न अजून चाललेत. एवढ्यासाठीच तर होता ना घरचा बाप्पा? 🙂

शाळेला जायची गडबड. अजून माऊची पोळी संपयचीय, मोजे, बूट घालून व्हायचेत, औषध घ्यायचं राहिलंय.

खिडकीत आई एक एक घास भरवते आहे, एकीकडे माऊचं खिडकीतून बाहेर बघणं चाललंय. औषध काढायला आई तिथून बाजूला गेल्यावर माऊ तिच्याकडच्या गाणार्‍या भूभूला खिडकीतून दिसणारी आज्जी, काका दाखवायला लागते. खिडकीच्या आतून भूभूला नीट दिसत नाहीये सगळं, म्हणून मग भूभूला गजाबाहेर काढते. तेवढ्यात आई आल्यामुळे घाईघाईने भूभूला आत घेण्याची धडपड सुरू होते, आणि भूभू अडकून बसतो.
“अग, थांब … भूभू पडेल खाली!” आई ओरडल्याबरोबर पटकन माऊ भूभूला सोडून देते आणि बिचारा भूभू बाहेरच्या विंडोसीलवर जाऊन बसतो. आता इथे आई, बाबा कुणाचाच हात पोहोचणार नाहीये. भूभूचा त्रिशंकू झालाय. तिथून खाली पडला तर बिचारा थेट सात मजले खालीच जाईल. भूभू माऊचा लाडका असला तरी तो तिचा नाहीचे मुळी. खालच्या दादाने उदारपणे थोडे दिवस खेळायला दिलाय तो माऊला. बर्‍यापैकी महागातला. थोडक्यात, आता काय करायचं या विचाराने आईला घाम फुटलाय. एकीकडे माऊला धपाटा घालायला हात शिवशिवतोय, दुसरीकडे तिचं “भूभू, तिकडे काका शिमिंग करतोय बघ, दिसला ना तुला?” संभाषण ऐकलेलं असल्यामुळे हसू आवरत नाहीये.
कशीतरी माऊला वेळेत तयार करून आई शाळेत घेऊन जाते. तिथे आज एक वेगळंच रहस्य आहे आईसाठी. भूभूचा विचार करायला वेळच नाहीये. काल माऊच्या डे केअरच्या बॅगेत काल दुसर्‍याच कुणाचा तरी फ्रॉक आणि चड्डी बदललेल्या ओल्या कपड्यांमध्ये आलेय, आणि माऊची चड्डी आणि शॉर्ट गायब आहे. या गमतीजमती नेहेमी शाळेत होतात, पण हे सगळं डे केअरच्या बॅगेत बघून आई चक्रावून गेली आहे. डे केअर – वर्ग – डे केअर अश्या फेर्‍या केल्यावर अखेरीस हे रहस्य उलगडतं. काल माऊ वर्गातून डे केअरला पिवळा फ्रॉक घालून आली होती ना, तो आणि चड्डी भिजली म्हणून डे केअरच्या ताईंनी बदलली, बदललेले कपडे नेहेमीप्रमाणे डे केअरच्या बॅगेत.
पण पिवळा फ्रॉक तर माऊचा नाहीचे!
वर्गात माऊने जीन्सची शॉर्ट आणि चड्डी ओली केली म्हणून वर्गातल्या ताईंनी कपडे बदलले तिचे आणि तो पिवळा फ्रॉक – चड्डी घातली. तो वर्गातल्या अजून कुणाचातरी हरवलेला असणार!
हे कोडं सुटल्यावर आईचं डोकं तेज चालायला लागतं. घरी आल्यावर खिडकीतून आरसा बाहेर काढून ती भूभूची पोझिशन नीट बघून घेते. आणि कपड्यांच्या हॅंगरने अलगद भूभूला वर उचलते. माऊ येण्यापूर्वी रोजच्या दिवसात इतक्या प्रकारचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आईने स्वप्नातही केलं नसेल.  
माऊच्या खिडकीमध्ये दिवसभर काय काय घडामोडी चाललेल्या असतात याचा कुणी व्हिडिओ केला तर इतका मनोरंजक होईल ना!