Archives for category: जगतांना


भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्‍यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्‍याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्‍या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्‍या, नवे रुपडे घेऊन येणार्‍या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्‍याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे. 

या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्‍या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!

मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्‍यावर डोलणारी पायर्‍या पायर्‍यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:

आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या?

भाताची रोपं उपटून झाली, बांधलेले गठ्ठे चिखलातून पळत इकडून तिकडे टाकून झाले. खेकडे बघून झाले.

शेताशेजारचा ओढा

 चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!

धरणाच्या पाण्याकडे

 धरणाचं पाणी बघायला जातांना कावळ्याच्या छत्र्या दिसल्या, मासे धरणारा काका दिसला. त्याच्या पिशवीचं इन्स्पेक्शन झालं.

धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!

पाणी!

 इथे एक तंबू हवा होता!

 वार्‍यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!

पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय.

 भात लावणीसाठी शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या मुलंसुना येतात … पण नांगर धरणं अजूनही अजोबांचंच काम! दुसर्‍या कुणालाच ते जमत नाही / शक्य नाही. आजोबांचे हातपाय चालेनासे झाल्यावर काय? घरोघरी हेच चित्र दिसतंय!


पुण्याच्या जवळ, जिथे माऊला घेऊन एक दिवस, रात्र धमाल करता येईल अशी जागा शोधत होतो आम्ही. पावसाळ्याचे दिवस असल्याने दिवसभर पाऊस पडला म्हणून हॉटेलच्या खोलीत नुसतं बसून रहावं लागलं असं होऊन चालणार नव्हतं, आणि पुण्याजवळच्या तारांकित रिझॉर्टसचे दर बघून तिथे जावंसं वाटत नव्हतं. अशी शोधाशोध चालू असतांना एका रिझॉर्टविषयी अर्धवट माहिती मिळाली. तिथे म्हणे शेत वगैरे होतं, आणि काही अनाथ मुलंही रहायला होती. रिझॉर्ट आणि अनाथालय? हे कॉम्बिनेशन काही पचण्यासारखं वाटलं नाही मला. पण चौकशी तर करून बघावी म्हणून फोन केला. इथला मालक पण गमतीशीरच वाटला. चौकशीला / बुकिंगला फोन केल्यावर चेक इनची वेळ, पैसे कधी भरायचे, आमचं रिझॉर्ट कसं जगात बेश्ट आहे यातलं काहीही सांगायला त्याला वेळच नव्हता. “आमच्याकडे जागा खाली आहे, तुम्ही किती जण, कधी येताय ते एसएमएस करा, मी कसं यायचं त्याचे डिटेल्स पाठवतो.” एवढं बोलून त्याने माझी बोळवण केली. हे कसं यायचं त्याचे डिटेल्स थेट आम्ही जायच्या आदल्या दिवसापर्यंत आलेच नव्हते! मी वैतागून फोन केला, तर याने “तुम्ही कधी येणार म्हणाला होता?” म्हणून विचारलं मला! हे काही खरं दिसत नाही. आपल्याला तिथे जाऊन बुकिंग नाही म्हणून परत यायला लागणार बहुतेक. मामला ठीकठीकच दिसतोय एकूण. मी मनाशी एका फसलेल्या सहलीची तयारी करत होते.

दुसर्‍या दिवशी निघाल्यावर तिथल्या मॅनेजरला फोन केला, त्यानेही “तुम्ही आज रात्री राहणार आहात का” म्हणून विचारलं आणि मी मनाशी म्हटलं, “बहुतेक आज संध्याकाळपर्यंत आपण घरीच.” मस्त पावसाळी वातावरणात चांगल्या रस्त्यावरून आणि अगदी नेमक्या खुणांसह पत्ता मिळाल्याने अजिबात न चुकता आम्ही चाललो होतो. ट्रीप छान होणार आजची अशी पहिली शक्यता वाटली ती एका वळणावर हिला पाहिल्यावर:
कळलावी / ‘अग्निशिखा’
गेली कित्येक वर्षं कळलावीच्या सुंदर फुलांचे फोटो बघून आपल्याला ही कधी भेटणार म्हणून मी तरसत होते. ती सहजच भेटली या वाटेवर!
“रिझॉर्ट”ला पोहोचल्यावर खोली बघितली आणि एकीकडे जीव भांड्यात पडला – माऊच्या उपद्व्यापात तुटेल असं काहीही नव्हतं खोलीत – खरं तर काहीच नव्हतं. दोन गाद्या जमिनीवर घालून चादरी उश्या दिल्या होत्या, आणि एकीकडे जास्तीच्या गाद्या, उश्या, चादरी ठेवलेल्या. बाकी मोठ्ठीच्या मोठ्ठी खोली रि..का..मी!!! तर दुसरीकडे नेमकं काय वाढून ठेवलंय समोर अशी जराशी काळजीही वाटली.
चहा – पोहे घेताघेता समजलं … इथे सुट्टीच्या दिवशी नेहेमी शंभर – दिडशे पर्यंत लोक येतात. आज चक्क कुणीच नव्हतं – फक्त आम्ही तिघं! या जागेला “रिझॉर्ट” म्हणणं तितकं बरोबर नाही. हे इको –फार्म आहे. एकूण शंभरएक एकराच्या परिसरामध्ये सेंद्रीय शेती आहे, गाई, इमू, ससे, घोडे, बकर्‍या, कोंबड्या – बदकं असे प्राणी – पक्षी आहेत, ऍडव्हेंचर स्पॉर्टच्या ऍक्टिव्हिटी आहेत,

बर्मा ब्रिज

आणि शेजारीच एका छोट्याश्या नदीवरचा बांध असल्याने हा परिसर पाऊस चांगला झाला असेल तर पावसाळ्याच्या दिवसात तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो!

गराडे धरणाचं पाणी

कानात वारं शिरलेल्या वासरासारखं माऊने दिवसभर हुंदडून घेतलं इथे. 🙂  

फार्मपासून दीडएक किलोमीटरवर त्या बांधापर्यंत चालत जाता येतं, आणि मस्त पाण्यात खेळता येतं. ही जागा इतकी आवडली, की दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकदा “आबू बघायला” फेरी झाली आमची. 
बांधार्‍याजवळ
जातांना मोर दिसला, येतांना सुगरण पक्ष्यांची घरबांधणी प्रात्यक्षिकं बघायला मिळाली. 🙂

बांधाच्या वाटेवर खडकाळ माळ असल्याने मस्त रानफुलं भेटली …

दुसर्‍या दिवशी फार्मच्या मालकांची भेट झाली तिथे, आणि थोडा उलगडा झाला या जागेविषयी. हा माणूस मर्चंट नेव्हीमध्ये आहे. अगदीच उधळमाधळ केली नाही तर मर्चंट नेव्हीतल्या माणसाला म्हातारपणी पैशाचा प्रश्न पडू नये. पण सोबतीचा, आजूबाजूला माणसं असण्याचा प्रश्न त्यालाही असतोच. त्यावर तोडगा म्हणून त्यांनी इथे प्रथम वीसएक मुलांचं अनाथालय काढलं. मग उरलेल्या जागेत शेती, जनावरं वगैरे. या अनाथालयाचा खर्च निघावा इतपत पर्यटन हे त्यानंतर आलं. केवळ इथे येऊन गेलेल्या लोकांच्या अनुभवांवरून, कुठलीही जाहिरात न करता जितके लोक इथे येतात तेवढं त्यांना पुरेसं आहे. (यांची वेबसाईट आहे म्हणे, पण सध्या तरी चालत नाहीये.) स्वतः मालक पैश्याच्या मागे नसल्यामुळे इथल्या लोकांच्या वागण्यात कुठेच कमर्शियल विचार दिसत नाही फारसा. हा त्यांचा “रिटायरमेंट प्लॅन” ऐकून वाटलं, इतका शहाणा स्वार्थ सगळ्यांना जमला तर किती छान होईल!

***
हिडन ओऍसिस, सासवडजवळ. (इथून पुरंदर – वज्रगड मस्त दिसतात!)

 


आमच्या शाळेच्या वर्गातली मुलं-मुली (वर्गातली मुलं-मुली ५० वर्षांनंतरसुद्धा मुलं-मुलीच असतात बरं! 🙂 ) शाळा संपल्यावर २५ वर्षांनी भेटली मागच्या रविवारी. गावातून, परगावहून, परदेशातून ठिकठिकाणून सगळे जमले होते – ४८ जण! जुन्या मित्रमैत्रिणींना खूप दिवसांनी भेटतांना खरं तर जरा धाकधूक असते माझ्या मनात. जुन्या आठवणी रम्य असतात, आणि आता त्या व्यक्तीला परत भेटतांना ती मजा आली नाही तर विरस होतो. त्यातून आमची एकत्र शाळा असली, तरी मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलणं म्हणजे अब्रम्हण्यम् असं वातावरण त्यावेळी असल्याने बहुसंख्य मुलांची नावं पण मला आठवत नव्हती! त्यामुळे निम्म्या पब्लिकची ओळख फारशी नाहीच असं एकीकडे वाटत होतं.
आमच्यातल्या संयोजकांची मेहनत नक्कीच दाद देण्यासारखी! कार्यक्रमाचं नियोजन एकदम नेटकं केलं त्यांनी. अगदी सगळ्यांचा ग्रूप फोटो काढून त्याची एक एक फ्रेम केलेली प्रतसुद्धा त्याच दिवशी प्रत्येकाच्या हातात! पण हा कार्यक्रम आवडला त्यामागे निव्वळ स्मृतीरंजनापेक्षा बरंच जास्त काहीतरी होतं.
सगळ्यांना भेटून मस्त वाटलं एकदम. (आपल्या वर्गात इतकी इंटरेस्टिंग मुलंमुली होती हे एकदम भारी – कॉलर ताठ वगैरे. 🙂 ) शाळेत असतांना व्हायच्या तश्याच मनमोकळ्या गप्पा. 
त्यापेक्षा मस्त वाटलं म्हणजे आमच्यातल्या एकाने स्वतःहून पुढाकार घेऊन गेटटुगेदरचा पूर्ण खर्च उचलल्याचं.
त्याहून मस्त वाटलं ते पुन्हा कधी जमू यात हे ठरवतांना, त्याही कार्यक्रमाचा खर्च उचलण्यासाठी दुसरा एक वर्गमित्र असाच स्वतःहून पुढे आल्यावर. 
या सगळ्यापेक्षाही मस्त म्हणजे आपल्या शाळेतल्या गरजू मुलांसाठी आपण आर्थिक मदत करू या असं ठरवून लगेच पहिली टोकन अमाऊंटही लगे हाथ जमा झाले. This group definitely means business.
पण सगळ्यात मला आनंद कसला झाला असेल तर अगदी अनपेक्षितरित्या गाजरे सर भेटल्याचा. शाळेत गाजरे सरांनी रसायनशास्त्र आणि गणित इतक्या प्रेमाने शिकवलं होतं … सातवीच्या स्कॉलरशिपला एक ते आगगाडी, तिचा वेग, पुलाची / बोगद्याची लांबी असलं गणित होतं. त्याचं लॉजिक काही केल्या माझ्या डोक्यात राहात नव्हतं. हे गणित मी सरांकडून किती वेळा समजावून घेतलं असेल, आणि त्यांनी न चिडता ते मला किती वेळा परत समजावलं असेल याची गणती नाही. रोज मी त्यांना विचारायचे, आणि दुसर्‍या दिवशीपर्यंत पुन्हा विसरून जायचे. शिक्षकाला किती पेशन्स पाहिजे म्हणून कुणी विचारलं तर मी म्हणेन सरांएवढा! 
पण सरांना मी कधीही विसरू शकणार नाही कारण त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं गणित आणि रसायनशास्त्रापलिकडचं काहीतरी. सातवी – आठवीतली गोष्ट असेल. शिल्पा आणि मी – एकदम घट्ट मैत्रिणी. कधीतरी आमच्यात ’तात्त्विक मतभेद’ झाले.
    “तू पाणी ‘प्यायलं’ काय म्हणतेस? पाणी ‘पिलं’ म्हणायला हवं.” तिने घरी, बाहेर ऐकलेली ही भाषा. 
    “‘प्यायलं’च बरोबर आहे ग!” माझ्या घरात बोलली जाणारी भाषा.
    “चल, आपण सरांना विचारू.”
सर सुद्धा ’पिलं’ म्हणणारे. हेच बरोबर म्हणून मला असंच बोलायचा आग्रह त्यांनी केला तर? It is a lost cause for me. निरिच्छेनेच मी तयार होते.
“बेटा, आपण इकडे ‘पिलं’ म्हणतो. काही चुकीचं नाही त्यात. बाहेर तिकडे पुण्यामुंबईकडे ‘प्यायलं’ म्हणतात. तेसुद्धा बरोबरच आहे हा. तुमचं दोघींचंही म्हणणं बरोबर आहे.” सर समजावून सांगतात. 
इतकी मामुली गोष्ट. आपण म्हणतो तेच बरोबर असं सहज म्हणू शकले असते सर. त्यात फार काही वावगं आहे असं मला तेंव्हाही वाटलं नसतं. तोवरचा मोठ्यांचा याबाबतचा अनुभव वाईटच. माणूस जितका मोठा तितका त्याचा भाषा, जात यांविषयीचा अभिनिवेश मोठा. पण आपल्यापेक्षा वेगळं काही बरोबर असतं, आपलं चुकीचं नसतांना दुसर्‍याचंही बरोबर असू शकतं हे ज्या सहजतेने त्यांनी एकदाच समजावून सांगितलं, त्यानंतर ते आगगाडी आणि बोगद्याच्या गणितापेक्षा पक्कं जाऊन बसलं डोक्यात.
‘ड्रीमरनर’ ही ऑस्कर पिस्टोरियसने सांगितलेली त्याची स्वतःची कहाणी. साऊथ आफ्रिकेच्या ऑस्करच्या दोन्ही पायांमध्ये जन्मत:च दोष होता, आणि आपल्या पायांवर तो शरीराचा भार तोलू शकणार नाही असं डॉक्टरांचं निदान होतं. आपल्या बाळासाठी सर्वात योग्य उपचार काय असू शकेल हे समजून घेण्यासाठी ऑस्करच्या आईवडिलांनी जगभरातल्या तज्ञांची मत घेतली, सर्व शक्यता पडताळून बघितल्या. आयुष्यभर व्हीलचेअर वापरणं किंवा पाय कापून टाकून कृत्रीम पाय लावणे असे पर्याय समोर होते. ऑस्कर चालायला शिकण्याच्या वयाचा होण्यापूर्वीच पायाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर तो कृत्रीम पायांनी चालायला लवकर शिकेल आणि त्याच्या मनात आपल्या ‘वेगळ्या’ पायांविषयी कुठलाही गंड निर्माण होणार नाही असं डॉक्टरांचं मत पडलं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्या, ऑस्करचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापण्यात आले, आणि आपल्या वयाच्या बाकी मुलांसारखाच ऑस्करही चालायला लागला – कृत्रीम पाय वापरून.
चालण्यापाठोपाठ सुरू झाली मोठया भावाच्या सोबतीने केलेली दंगामस्ती. ऑस्करच्या आईवडिलांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. बाळ जन्मल्याबरोबर त्याचे पाय पाहून ऑस्करच्या वडिलांनी म्हटलं, “याचे पाय वेगळे दिसताहेत.” सदोष नाही, तर फक्त वेगळे. ऑस्करच्या ‘वेगळ्या’ पायांचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. आवश्यक ते वैद्यकीय निर्णय योग्य वेळी घेतले, पण आपल्या मुलाला कधीही कुठली वेगळी वागणूक दिली नाही. मोठ्या कार्लने बूट घालायचे, तसेच ऑस्करने पाय आणि बूट घालायचे इतक्या सहज या कुटुंबाने ऑस्करचं पाय नसणं स्वीकारलं. इतर मुलांमध्ये त्याला नैसर्गिकपणे मिसळू दिलं, झाडावर चढणं, सायकल चालवणं, पोहणं, धडपडणं सगळं सगळं करू दिलं. वाढीचं वय आणि ऑस्करचा धडपडा स्वभाव, त्यामुळे दर दोन एक महिन्यांनी ऑस्करचे नवे पाय बनवण्याची वेळ यायची. पण त्याचा कुणी बाऊ केला नाही.
ऑस्करला सगळ्याच मैदानी खेळांमध्ये रस होता. शाळेच्या होस्टेलला रहायला गेल्यावर तो रग्बीमध्ये जास्त रमू लागला, या खेळात पुढे येण्यासाठी त्याची कसून तयारी सुरू झाली. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, रग्बीसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला दोन महिने फक्त ऍथलेटिक्सचा सराव करायला सांगितला गेला. ऍथलेटिक्सची ऑस्करला कधीच फारशी आवड नव्हती. रग्बीसाठी म्हणून नाईलाजाने त्याने पळण्याचा सराव सुरू केला, आणि त्याची पळण्यातली गती बघून कोच त्याला अपंगांच्या स्पर्धांसाठी १००, २००, ४०० मीटर पळण्यात तयार करायला लागले. २००४च्या अथेन्सच्या पॅरालिंपिक्समध्ये ऑस्करने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत पदक मिळवलं. पुढच्याच वर्षी त्याने साऊथ आफ्रिकन चॅम्पियनशीप स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत (अपंगाच्या नव्हे, धडधाकट खेळाडूंच्या) उत्तम वेळ नोंदवली. आपण पाय असणार्‍या स्पर्धकांच्या तोडीची कामगिरी करू शकत असू, तर त्यांच्याही स्पर्धांमध्ये भाग का घेऊ नये या विचाराने ऑस्करने अपंगांच्या आणि धडधाकट खेळाडूंच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून पुढे येण्यासाठी एकीकडे ऑस्करचा कसून सराव चालू होता, तर दुसरीकडे त्याच्या कृत्रीम पायांमुळे त्याला पळतांना धडधाकट खेळाडूंपेक्षा गैरवाजवी फायदा मिळतो म्हणून वादंग सुरू झाला. जानेवारी २००८ मध्ये आयएएएफनी (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिल्स फेडरेशन्स) ऑस्करवर धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली. ऑस्करने या बंदीविरुद्ध सीएएसकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) अपील केलं. त्याला कृत्रीम पायांमुळे जसे फायदे होतात, तसे तोटेही होतात. अन्य अपंग खेळाडू ऑस्करच्या कामगिरीच्या जवळपास पोहोचू शकलेले नाहीत. त्याची कामगिरी सातत्याने सुधारत असतांना त्याने कृत्रीम पायांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. हे मुद्दे विचारात घेऊन मे २००८ मध्ये ऑस्करवरची बंदी उठवण्यात आली. २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी ४०० मीटर स्पर्धेसाठीची पात्रता वेळ ऑस्करला नोंदवता आली नाही, आणि त्याने वाईल्ड कार्डवर प्रवेश मिळवण्यास नकार दिला. त्यावर्षीच्या पॅरालिंपिक्समध्ये त्याने १००, २०० आणि ४०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक आणि ४०० मीटरमध्ये (अपंगांसाठी) विश्वविक्रम आशी चमकदार कामगिरी केली. यंदाच्या लंडन ऑलिंपिक्समध्ये ४०० मीटर्स धावणे आणि ४०० x ४ रिलेमधल्या सहभागानंतर ऑस्कर अपंगांच्या पॅरालिंपिक्समध्ये आपली बीजिंगची तीन सुवर्णपदकं राखण्याचा प्रयत्न तर करेलच, शिवाय ४०० x ४ रिलेमध्येही तो सहभागी होतो आहे. आपली ओळख एक ऍथलिट म्हणून असावी, ‘अपंग असूनसुद्धा पळणारा’ अशी नको अशी ऑस्करची इच्छा आहे. त्याच्या मनोनिग्रहाने आणि मेहनतीने त्याच्या अपंगत्वावर कधीच मात केलीय. त्याची स्पर्धा आहे ती स्वतःशीच.
धावण्याच्या ट्रॅकवर इतिहास घडवत असतानाच ऑस्कर भूसुरुंगांच्या स्फोटामुळे हात पाय गमवून बसलेल्या लोकांना कृत्रीम हातपाय मिळवून देण्यासाठी काम करतो आहे. या कामात आर्थिक मदतीबरोबरच तो स्वतःचा वेळही देतोय.
ऑस्करची आत्मकथा विशेष भावते, ती त्यातल्या संयत चित्रणामुळे. तसं बघितलं तर दोन्ही पाय नसणं, लहानपणीच आई वडिलांचा डायव्होर्स, आईचा मृत्यू, प्रेमभंग, मोठ्या भावापासून दुरावणं, ऍथलेटिक्स संघटनेने बंदी घालणं आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूला झेलावे लागणारे ताणतणाव असा मेलोड्रामा तयार करायला लागणारा सगळा मालमसाला ऑस्करच्या गोष्टीत आहे. पण ऑस्कर कुठेही स्वतःची कीव करत नाही. कृत्रीम पायांच्या घर्षणामुळे पायावर होणार्‍या जखमा असोत, किंवा पावसात पळतांना येणार्‍या अडचणी असोत, या गोष्टी फक्त जाताजाता सांगण्याच्या ओघात नमूद केल्या जातात. त्यांचं तो भांडवल करत नाही.  माझ्याच वाट्याला हे का हा प्रश्न या गोष्टीत कुठेच येत नाही. तो खरा योद्धा आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारून आव्हानांना सामोरे जाण्याची त्याची धमक आचंबित करते.
मराठी पुस्तक वाचतांना अनुवाद म्हणून भाषा कुठे बोजड वाटत नाही हे अनुवादकर्तीचं यश. या अनुवादाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सोनाली नवांगुळ यांनी तो केलाय. लहानपणी बैलगाडीचं चाक पाठीवर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेत. इस्लामपूरसारख्या लहान गावात अपंगांसाठीच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणंसुद्धा शक्य नव्हतं. पण घरी अभ्यास करून, शिकून त्या आज कोल्हापूरमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. अपंगांना दया दाखवणाऱ्या पण समानतेची संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात त्या आज एकटीने स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्वावलंबी आयुष्य जगतात. त्यांचं आयुष्यही ऑस्करसारखंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्वतःचं जगणं ऑस्करशी खूप जवळ जाणारं आहे.

(फोटो जालावरून साभार)

****************************

DreamRunner Oscar Pistorias Giyanni Meralo
ड्रीमरनर – ऑस्कर पिस्टोरिअस, सहलेखक – गियन्नी मेरलो,
अनुवाद – सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन
    आपल्या जवळपास काही माणसं असतात. न बोलता, शांतपणे त्यांचं काम चाललेलं असतं. या माणसाचं केवढं ग्रेट काम आहे, ते आपल्याला नुसतं बोलून भेटून कधी समजणारही नाही. अशीच काही माणसं भटकंतीमध्ये भेटली, तर काही या भटकंतीच्या आधी भेटलेली आता या सगळ्याचा विचार करताना आठवली. सर्च किंवा हेमलकसा इतकं त्यांचं काम मोठं झालेलं नाही, पण आपल्याला जमेल तेवढं, जमेल तसं काम कसं करावं, ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय या भटकंतीची गोष्ट पूर्ण होणार नाही. – तर या विषयावरची ही पहिली पोस्ट.
*************************************************************
    संगणकक्षेत्रातलं काम म्हणजे दर प्रोजेक्टला नवी विटी, नवं राज्य. दर वेळी नवी टीम, नवे सहकारी. कधी कधी खूप इंटरेस्टिंग माणसं भेटतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, पण काम संपलं, म्हणजे सगळे इतक्या वेगाने पांगतात, की कितीतरी सुंदर ओळखी मैत्रीमध्ये बदलण्यापूर्वीच संपून जातात. रायनर माझा असाच एका प्रोजेक्टमधला सहकारी. एक ‘दीर्घकालच्या मैत्रीमध्ये बदलू शकली असती तर खूप आवडली असती’ अशी ओळख.

    आमच्या ओळखीची सुरुवात फारशी उत्साह वर्धक नव्हती. खरं तर रायनर एका दुसऱ्या कंपनीचा. आमच्या कंपनीने त्यांना टेकओव्हर केलं, आणि मनात नसताना रायनर या कंपनीत येऊन पोहोचला. त्यात त्याचा प्रोजेक्ट ऑफशोअरिंगसाठी निवडला गेलेला, आणि मी ‘ऑफशोअर’वरून आलेले. गेली दहा वर्षं जे काम मी करतो आहे, ते कोणी भारतात बसून करून दाखवेल यावर त्याचा विश्वास नव्हता, आणि दुर्दैवाने आमची ऑफशोअर टीमसुद्धा त्याचं म्हणणं खरं करून दाखवत होती. त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी ‘ही आता आणखी कशाला इथे’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण चार माणसांच्या त्याच खोलीत मला बसायला जागा मिळाली, आणि सहवासातून हळुहळू एकमेकांची ओळख होत गेली. थोडं काम आम्ही एकत्र केलं, आणि “together we make a great team” हे दोघांनाही पटलं. माझा जर्मनचा सराव करण्याचा बेत त्याच्या इंग्रजीच्या सराव करण्याच्या इच्छेपुढे बारगळला.

    रायनरच्या मशीनचा वॉलपेपर म्हणजे आल्प्सच्या पार्श्वभूमीवर एक रेस्क्यू हेलिकॉप्टर असा फोटो. थोडासा धूसर. आवर्जून वॉलपेपर म्हणून निवडावा असं काही मला त्या फोटोविषयी वाटलं नाही, त्यामुळे एकदा सहज त्याला विचारलं. तरूणपणी आल्प्समध्ये गिर्यारोहण करताना त्याला एकदा अपघात झाला, पाय मोडला. हा फोटो त्याच्यासाठी आलेल्या रेस्क्यू हेलिकॉप्टरचा. त्या हेलीकॉप्टरच्या खाली लोंबकळत त्याला हॉस्पिटलपर्यंत आणलं गेलं. त्यानंतर कित्येक महिने तो अंथरुणाला खिळून होता. नंतर सुदैवाने पूर्ण बरा झाला, पण हा फोटो समोर असला, म्हणजे ‘परिस्थिती तितकी वाईट नक्कीच नाही’ याचं स्मरण होतं, म्हणून अजूनही तो फोटो त्याच्या वॉलपेपरला होता.

    युरोपातली झाडं मला अनोळखी. त्यामुळे हिवाळा संपून वसंत सुरू झाला, आणि एका एका खराट्याचं झाडात रूपांतर व्हायला लागलं, तसतसा मी दिसतील त्या झाडांचे फोटो काढून ‘हे कुठलं झाड’ म्हणून रायनरला विचारायचा सपाटा लावला. त्या वर्षी उन्हाळा खूप मोठा, फारसा पाऊस नसलेला होता. दर शनिवार- रविवारी कॅमेरा आणि पाण्याची बाटली घेऊन माझं फुलांचे फोटो काढत भटकणं चाललं होतं. गुलाबी हॉर्स चेस्टनटच्या सुंदर फुलांचा फोटो मग रायनरने मला काढून आणून दिला.

    कितीही काम असलं, तरी रायनर आठवड्याचे तीन दिवस साडेपाचच्या पुढे ऑफिसमध्ये बसत नाही याचं मला आश्चर्य वाटायचं. नंतर समजलं – हे तीन दिवस तो स्वाहेली शिकायला जातो. याला एकदम स्वाहेली का बरं शिकावंसं वाटावं? मी विचार करत होते. तर केनियामधलं एक खेडं याने दत्तक घेतलंय. तिथे शाळा सुरू केलीय, तिथल्या दवाखान्यालाही मदत चालू आहे. बसल्या जागेवरून तिथे पैसे पाठवण्यापुरता त्याचा सहभाग मर्यादित नाही. दर वर्षी सुट्टीमध्ये रायनर आणि क्लाउडिया – त्याची बायको – स्वतः या गावाला भेट देतात. तिथल्या लोकांशी संवाद साधणं सोपं जावं म्हणून हा स्वाहेली शिकत होता! या कामासाठी नवरा- बायको दोघं मिळून एक संस्था चालवतात. रायनरने संस्थेसाठी वेबसाईट तयार केलीय. हे सगळं करताना आपण काही फार मोठं ग्रेट करतोय असा कुठलाच भाव नाही, त्याचं ओझं नाही. आपल्या शाळेविषयी तो जितक्या प्रेमाने बोलतो, तितक्याच प्रेमाने दुपारी ऑफिसमधल्या पोरांबरोबर ‘किका’ (फूसबॉल) खेळणार. ऑफिसच्या खोलीत दंगा करणार, रोज जिन्समध्ये येणार्‍या एका सहकार्‍याला कस्टमर व्हिजिटसाठी कडक फॉर्मलमध्ये यावं लागल्यावर दिवसभर त्याला चिडवून भंडावून सोडणार. एकदा एक सहकारी आमच्या या दंगेखोर खोलीमध्ये काहीतरी डिस्कस करायला आली, आणि दीड तास अखंड एकसूरी बडबडात होती. ती खोलीच्या बाहेर पडल्याबरोबर मी रायनरला म्हटलं, आमच्याकडे हिंदीमध्ये म्हणतात “इतनी बाते करनी होती तो भगवान ने दो मुह और एक कान दिया होता।”. रायनरने हे खोलीतल्या व्हाईट बोर्डवर रोमन लिपीत लिहून घेतलं, आणि दुसर्‍या दिवशी ती बाई आल्यावर त्याचा हिंदीचा जोरदार ‘अभ्यास’ सुरू झाला. हे वाक्य गाण्यासारखं चालीवर म्हणून त्याने खोलीतल्या बाकी तिघांना चेहेरे सरळ ठेवणं अवघड करून ठेवलं. यापुढे कधी त्या बाईने आमच्या खोलीत यायची हिंमत केली नाही 🙂

    आपल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिथल्या अवतारात रायनरची निवड झाली. आमच्या खोलीतल्या दंग्यात केबीसीच्या तयारीची भर पडली. अचानक “भारतामध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारं राज्य कुठलं?” यासारखे प्रश्न आमच्यावर बरसायला लागले. जय्यत तयारीनिशी रायनर शोच्या शूटिंगसाठी गेला. जाताना त्याला विचारलं, जिंकलेल्या पैशांचं काय करणार? “घराची दुरुस्ती आणि शाळेसाठी फर्निचर” रायनरचं शांत उत्तर. सगळे पैसे मलाच हवेत असा हव्यास नाही, आणि सगळे शाळेसाठी वापरून नंतर मग थोडे घराला हवे होते म्हणून हळहळणं नाही. मनात म्हटलं, देवा याला मिळू देत दहा लाख युरो. तो पैसा कसा वापरायचा ते याच्याएवढं कुणाला समजत नसेल. रायनर तिथे शेवटून तिसर्‍या प्रश्नापर्यंत यशस्वीरित्या पोहोचला, आणि ते पैसे त्याने नक्कीच आधी ठरवल्याप्रमाणे वापरले असतील अशी खात्री वाटते.

    ऑनसाईट असाईनमेंट संपवून परतताना रायनरला म्हटलं, तुझा मला हेवा वाटतोय. मला जे करावंसं वाटतं पण अजूनही माझ्या वेळेच्या, पैशाच्या गणितात बसत नाही, ते सगळं तू आज जगतो आहेस!

    सद्ध्या थोरोचं ‘वॉल्डन ऍन्ड अदर रायटिंग्ज’ वाचते आहे. नेहेमी पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे ते हातावेगळं होईपर्यंत त्याच्याविषयी बोलायला मला वेळ नसतो. हे मात्र चवीचवीने, रोज थोडं वाचावंसं वाटतंय. पुस्तकाचा अजून जेमतेम पाचवा हिस्सा संपलाय, पण मी थोरोच्या प्रेमात पडले आहे. सद्ध्या मला चावत असणारे गैरसोयीचे प्रश्नच हा बाबा विचारतोय.
    कुठल्या तरी आर्किटेक्टने त्याच्या विचाराने बांधलेलं घर माझं घर कसं असू शकेल? माझं घर माझ्या गरजांप्रमाणे, माझ्या प्रकृतीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे बनलं पाहिजे. मी ते बांधलं, तरंच ते खरं माझं घर होईल असं थोरो म्हणतो. एकदम पट्या. घर घ्यायचं ठरवल्यापासून हा प्रश्न मला छळतोय.

    थोरोने काही इंटरेस्टिंग दगड गोळा केले होते. हे दगड घरात ठेवल्यावर त्याच्या लक्षात आलं – त्यावर धूळ बसते, आणि ही धूळ नियमित झटकण्याचा नवा व्याप आपण निष्कारण मागे लावून घेतलाय. त्याने शांतपणे ते दगड पुन्हा बाहेर टाकून दिले. मी गोळा केलेले, दुसर्‍या कुणी प्रेमाने दिलेले किती धोंडे मी उगाचच वाहत असते. ही सगळी अडगळ मी कधी घरातून काढून टाकणार?

    कुठल्याही जागी जाण्याचा सर्वोत्तम मार्ग पायी जाणं हा आहे. नाही पटत? विचार करा. मी विमानाने गेले, तर प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ चालण्यापेक्षा खूपच कमी असेल. पण त्या विमानाच्या तिकिटाचे पैसे कमावण्यासाठी मी घालवलेला वेळ हा प्रवासावर खर्च केलेला वेळंच आहे. म्हणजे मी एवढा वेळ केवळ प्रवासाच्या पूर्वतयारीत खर्च केला, आणि पायी जाताना ज्या गोष्टी बघायला मिळाल्या असत्या, त्या बघण्याची संधीही घालवली. डोक्याला फार त्रास देतोय हा थोरो.

    माझे दिवसाचे नऊ किंवा त्याहून जास्त तास कमवण्यावर खर्च होतात. खेरीज ऑफिसला जाण्यायेण्यातला वेळ, ऑफिसचा विचार करण्यात घालवलेला ऑफिसबाहेरचा वेळ वेगळा. वर्षाकाठच्या दहा सुट्ट्या आणि मला घेता येणारी बावीस दिवसांची रजा हा माझा ‘फावला वेळ’. वॉल्डनच्या प्रयोगानंतर थोरो म्हणतो, की वर्षाचे सहा आठवडे काम त्याच्या अन्न-वस्त्र-निवारा या प्रथमिक गरजा भागवायला पुरेसं होतं. उरलेला वेळ त्याला वाटेल तसा वापरायला मोकळा होता. म्हणजे थोरोच्या हिशोबाच्या नेमकं उलटं माझं गणित आहे. वर्षाचे शेहेचाळीस आठवडे काम आणि सहा आठवडे मोकळीक. याचा अर्थ एक तर मला माझ्या नोकरीमधून अन्न-वस्त्र-निवार्‍यापलिकडचं बरंच काही मिळतंय, किंवा मी वेळेचा अतिशय इनएफिशिअंट वापर करते आहे. सोचनेकी बात है.

    साधारणपणे पुस्तक हातात आलं, म्हणजे मला थेट विषयाला भिडायची घाई असते, की प्रस्तावना, लेखक परिचय, अर्पणपत्रिका असल्या गोष्टींच काय- कित्येक वेळा पुस्तकाचं नावसुद्धा मी धड वाचत नाही. (आत्ता सुद्धा पुस्तकाचं नाव हे लिहिताना प्रथम नीट वाचलं 😉 ) पण या घिसडघाईला वॉल्डन अपवाद ठरलं. राफ वॉल्डो इमरसनची प्रस्तावना मी चक्क मुख्य पुस्तक वाचण्यापूर्वी, मनापासून वाचली. एका समकालीनाला थोरो किती समजला होता हे या प्रस्तावनेत प्रतिबिंबित होतं.

    मराठीतून थोरोला भेटायचं असेल, तर दुर्गाबाईंनी ‘वॉल्डनकाठी विचारविहार’ नावाने थोरोच्या लिखाणाचा गाभा असणारं ‘वॉल्डन’ मराठीत आणलंय.  इंग्रजी पुस्तक ई-बुक स्वरूपातही उपलब्ध आहे.

Walden & other writings
Henry David Thoreau
2002 Modern Library Paperback Edition

वॉल्डनकाठी विचार विहार
अनुवाद: दुर्गा भागवत
१९६५

इ-प्रत: http://books.google.com/books?id=yiQ3AAAAIAAJ&printsec=frontcover&dq=walden

अचानक ध्यानीमनी नसताना आय सी यू बाहेरच्या प्रतिक्षाकक्षामध्ये तळ ठोकायची वेळ आली, आणि एक वेगळंच जग बघायला मिळालं.

जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल, डिलक्स वगैरे वर्गभेद इथे नसतात.
“तुमचं कोण?” एवढा एकच प्रश्न या परिवाराचा एक भाग होण्यासाठी पुरेसा असतो.
“आमच्या पेशंटने आज म्हणे एक डोळा उघडला!” एवढी बातमी इथल्या लोकांना आनंदित करायला पुरेशी असते.
तुमचा पेशंट एकदा त्या काचेच्या दाराआड गेला, की तुम्ही फक्त बाहेर वाट बघायची.
आत ठेवलेल्या आपल्या माणसाला भेटता येत नाहीये, म्हणून तळमळणार्‍या काकूंना कुणी गावाकडची ताई “तुमच्या पेशंटला पाजायला घेऊन जा” म्हणून शहाळ्याचं पाणी देते, तेंव्हा काकूंबरोबरच अजून कुणाकुणाच्या नातेवाईकांचेही डोळे भरून येतात.

“आपल्याच नशीबात अमूक तमूक का” असा प्रश्न पडत असेल तर जरा वेळ इथे बसा. आपण किती नशीबवान आहोत याचा साक्षात्कार होतो.
कारण इथे तुम्हाला जबरी अपघातानंतर गेले दहा दिवस मृत्यूशी झगडणार्‍या पंचवीस वर्षांच्या मुलाची आई भेटते.
पंधरा दिवसांपूर्वी ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेल्या बाईचा नवरा भेटतो.
चार दिवसांपासून मुलांना आजोळी धाडून, कपड्यांची बॅग भरून सासूबरोबर पुण्याला आलेली, इथल्याच बाकड्यावर रात्री झोपणारी सून दिसते.
पोराच्या इलाजासाठी आज लगेच पंचवीस हजार कुठून आणू म्हणून काळजीत पडलेले गावाकडचे आजोबा दिसतात.
ज्यांचे नातेवाईक आयसीयू पर्यंत पोहोचूच शकले नाहीत, त्यांच्यापेक्षा हे सगळे नशीबवान असतात.
आणि तुम्ही?

    ती माझ्याकडे गेली चार वर्षे पोळ्या, केर-फरशी करते आहे. वर्षाला तिच्या मोजून चार ते पाच सुट्ट्या असतात, आधी सांगून घेतलेल्या. रोज सकाळी साडेसातला ती कामावर हजर असते. बाई ग, शनिवार-रविवारी जरा उशिरा आलीस तरी चालेल (खरं म्हणजे पळेल … तेवढीच मला उशिरा उठायला संधी) हा माझा सल्ला तिला फारसा पटत नाही. सकाळचं पहिलं काम उशीरा सुरू केलं म्हणजे तिचं वेळापत्रक कोलमडतं.

    चार दिवसांपूर्वी तिची काकू गेली, त्याच दिवशी बहिणीचं अचानक ऑपरेशन करावं लागलं. दवाखान्यात बायकांच्या वॉर्डात पुरुषमाणसांना थांबायला परवानगी नाही. माहेरची मंडळी सुतकात अडकलेली. म्हणजे दवाखान्यात बहिणेवेसोबत हिला थांबायला हवं. रोज रात्री दवाखान्यात झोपून ती सकाळी कामावर हजर आहे. सकाळची घाईची कामं उरकून मगच ती घरी जाते. Business Continuation Plan in place, and successfully applied.

    आपल्याला कामावर पोहोचायला उशीर झाला किंवा खाडा झाला, तर घड्याळाच्या तालाबरहुकूम धावणार्‍या किती घरांची वेळापत्रकं कोलमडतील याची एवढी समज हिला मुळातूनच असेल? वेळेचं नियोजन, प्रायॉरिटी ठरवणं, कामामधलं डेडिकेशन कुठे आणि कधी शिकली ही? सातत्याचा विचार करायचा तर मी हिला सीएमएमआय लेव्हल ५ देईन!

    तथाकथित उच्च कौशल्याची आणि ‘जबाबदारीची’ कामं करणार्‍यांना आठवड्याचे सातही दिवस, वर्षाकाठी चार दिवसाच्या सुट्टीवर या सातत्याने काम करता येईल?

    आठवड्याच्या सुट्टीनंतर आलेल्या सोमवारची सकाळ. मनाला शनिवार – रविवारमधून बाहेर काढण्यासाठी धडपड चालू असते. शुक्रवारी रात्री निग्रहाने मिटलेल्या लॅपटॉपवरच्या न वाचलेल्या मेलची संख्या एकीकडे अस्वस्थ करत असते. आणखी तासाभरात ऑफिसमध्ये पोहोचलं, म्हणजे सरळ शुक्रवार रात्रीपर्यंत वेळ काळ काही सुचू नये एवढं काम आहे याचं कुठेतरी दडपण येत असतं. पुढच्या शनिवार रविवारचे बेत मनाच्या एका कोपर्‍यात हळूच आकार घेत असतात. खूप दिवसात न ऐकलेलं ‘म्युझिक ऑफ सीज’आठवणीने लावलेलं असतं. थोडक्यात, नेहेमीसारखाच एक सोमवार. नेहेमीच्याच सरावाने घरून ऑफिसकडे ड्रायव्हिंग. नेहेमीच्याच सुसाट वेगाने हायवेवरून पळणार्‍या गाड्या. आल इझ वेल.
    अचानक गाड्यांच्या रांगेत पुढे कुठेतरी करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज येतो. मागच्या गाड्याही ब्रेक लावतात, टायर रस्त्यावर घासत गेल्याचे आवाज, कुणी समोरच्या गाडीला धडकलेलं, कुणाला मागच्या गाडीने ठेकलेलं, एखादा नशीबवान कुठला ओरखाडा न उठता त्या गर्दीतून सहीसलामत सुटतो. गाडी शिकताना शिकवलेलं डबल ब्रेकिंगचं तंत्र तिच्याकाडून आपोआप वापरलं जातं. स्किड न होता, समोरच्या गाडीला धक्काही न लागता गाडी थांबते. मागचीही थांबणार, तेवढ्यात मागून त्या गाडीला धक्का बसतो, आणि ती गाडी मागून येऊन धडकते.
    सुदैवाने फार नुकसान नाही झालेलं गाडीचं. थोडक्यात निभावलंय. ऑफिसच्या कामाचा मात्र आज जबरी खोळंबा होणार. गाडी आधी मेकॅनिककडे न्यायची म्हणजे अर्धा दिवस तरी गेलाच … दोन मिनिटात मनात हिशोब होतो. पुढे रांगेत काय झालंय बघितल्यावर तिला कळतं … बाकी सगळ्या गाड्यांना लहानसहान पोचे आलेत, दिवे फुटलेत. पण एक गाडी सोडून पुढे टाटा सफारी पुढच्या मिनीट्रकवर जबरदस्त आदळलीय … सफारीची टाकी फुटून रस्त्यावर तेल पसरलंय, गाडीचं नाकाड ट्रकखालून काढायला क्रेन लागणार.
    पुढ्चे सगळे सोपस्कार पार पडतात, गाडी मेकॅनिककडे पोहोचवायला नवरा येतो. उरलेला दिवस ऑफिसच्या कामाचा ढीग उपसण्यात जातो. रात्री मात्र मनाची बेचैनी जाणवते. काय झालंय आपल्याला ? एक छोटा अपघात. सुदैवाने आपली त्यात काही चूक नव्हती. गाडीलाही मोठं काही झालेलं नाही. अपघाताच्या जागेपासून गॅरेजपर्यंत आपणच गाडी चालवत नेली. मग हे काय वाटतंय आता नेमकं?
    टेल लॅम्प नसणार्‍या त्या मिनीट्रकच्या मागे आपली गाडी असती तर?
    रस्ताभर स्किड झालेल्या चाकांच्या खुणा उमटवत त्या ट्रकवर आदळाणारी टाटा सफारी आपल्या मागे असती तर?
    प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डबल ब्रेकिंग झालं नसतं तर?
    कधीही ड्रायव्हिंग करताना तो सोबत असतो, तिच्या नकळत तो अपघात टाळत असतो हे खरंय. पण म्हणून मुद्दाम त्याची परीक्षा बघणं बरोबर नाही.
    कधीतरी मरायचंय हे माहित आहे, पण तो कधीतरी नेहेमीच दूरवरच्या भविष्यातला आहे असं आपण समजून चालतो. आपल्याला कसं मरायचंय हे तरी आपण कुणाला सांगितलंय का? कुठलंही क्रियाकर्म करण्यापेक्षा देहदान कर माझं … आणि एक मस्त वडाचं झाड लाव म्हणून सांगायला पाहिजे नवरोबाला.
   आताशी तर कुठे कसं जगायचं ते उमगायला लागलंय. एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आणि कुठली गोष्ट अर्धवट सोडणं तिला आवडत नाही. जास्त जागरूक रहायला हवं तिने. तिची गाडी नकळतच नेहेमी फास्ट लेनमध्ये असते. कुठे पोहोचायचंय इतक्या वेगाने? ठरवून फास्ट लेनमधून बाहेर पडायला हवंय.
    गाडी दुरुस्त झाली, पुन्हा रूटीन सुरू झालं. पण रस्त्यावर त्या जागी गाडी स्किड झालेल्या खुणा बघितल्या, म्हणजे रोज तिला जाणवतं. its just not worth being in the fast lane.

    नवऱ्याची भेट होईपर्यंत मी कर्नाटकात फारशी कधी गेले नव्हते. बहुसंख्य द्रविडेतरांप्रमाणे मलाही दक्षिणेतल्या सगळ्या जिलब्या सारख्याच अनाकलनीय होत्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला राहणारे सगळे ‘मद्राशी’ असा एक सोप्पा समज होता.कानडीशी आलेला संबंध म्हणजे एकदाच गाणगापूरहून सोलापूरला येताना चुकून गुलबर्ग्याऐवजी गाणगापूर रोडला गेल्यावर सोलापूरला परतण्यासाठी झालेले हाल, आणि एकदा विजापूर बघायला जाताना वाटेत गाडीचा अपघात झाल्यावर गाडीबाहेर ऐकलेली कडकड एवढाच. त्यातून हे काही गुजराती किंवा पंजाबी सारखं सहज समजणारं प्रकरण नाही याची मात्र खात्री झाली होती. तर कोथरूडमध्ये भेटलेला, चारचौघांइतपत बरं मराठी बोलणारा नवरोबा मुळचा असं काही वेडवाकडं बोलणारा निघेल याची मला कशी कल्पना असणार?
    लग्न ठरलं तेंव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकात गेले. आणि नवऱ्याच्या आजी आजोबांसकट निम्म्यापेक्षा जास्त नातेवाईकांना माझ्याशी मराठीत बोलताना ऐकून गार झाले. उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच लोकांना कोकणी येतं आणि त्यामुळे मराठी समजतं, तोडकंमोडकं का होईना, पण बोलता येतं हा शोध लागला. त्यात भाषावार प्रांतरचनेपूर्वी धारवाड – हुबळी मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे जुन्या मंडळींना बंगळूरपेक्षा मुंबई-पुणे जवळची हे ज्ञान प्राप्त झालं.
    नवऱ्याच्या काकूंनी कानडी अंकलीपी भेट दिली, आणि मग रस्त्याने चालताना प्रत्येक दुकानाची पाटी कोड्यासारखी ‘सोडवण्याचा’ नवा खेळ सुरू झाला. (अजूनही जोडाक्षरं आणि आकडे घात करतात, पण एव्हाना हुबळीतल्या नेहेमीच्या रस्त्यावरच्या बहुसंख्य पाट्या माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत:) ) देशपांडेनगर? हे देशपांडे इथे कर्नाटकात काय करताहेत? तर आजवर अस्सल मराठी समजत असलेली निम्मीअधिक नावं अस्सल कानडीसुद्धा आहेत हे समजलं. या नावांसारखेच हळुहळू अस्सल मराठी शब्दसुद्धा कानडी वेषात भेटायला लागले – अडनिडा, गडबड, किरणा, अडाकित्ता, रजा … परवा तर मामेसासुबाईंनी सुनेचं कौतुक करताना ‘अरभाट’ म्हटलं, आणि मला एकदम जीएंची अरभाट आणि चिल्लर माणसं आठवली.
    नुकतंच लग्न झालं होतं, तेंव्हा एकदा नवऱ्याच्या दोस्तांनी बाहेर जमायचा बेत केला एक दिवस. आणि नवऱ्याने घरी येऊन घोषणा केली,
    “आम्ही आज वैशालीला जाऊ.”
    “म्हणजे ? मला न विचारता ठरवताच कसं तुम्ही सगळे असं?”
    “अगं आम्ही वैशालीला जातोय. .. तुला आवडतं न तिथे जायला?”
    अस्सं. म्हणजे मला तिथे जायला आवडतं, म्हणून मुद्दाम मला वगळून वैशालीमध्ये भेटताय काय? बघून घेईन … हळुहळू तापमान वाढायला लागलं, आणि आमचं लग्नानंतरचं पहिलं कडाक्याचं भांडण झालं. या प्राण्याचा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ मध्ये हमखास गोंधळ होतो हे माझ्या हळुहळू लक्षात आलं. बेळगावच्या पलिकडून मराठीकडे बघणाऱ्यांची गोची लक्षात यायला लागली. ज्या भाषेत ‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते, ती भाषा शिकणं किती अवघड आहे तुम्हीच बघा!