Archives for category: जगतांना

आईकडून ऐकलेली ही खास आमच्या आजीची कन्सेप्ट होती … कधीतरी सगळं काम उरकलं, म्हणजे ती जाहीर करायची, “आता मी राणीसारखी बसून चहा पिणार आहे.” मग छान चहा करून घ्यायचा, आणि तो अगदी निवांत बसून प्यायचा. आपण स्वतःच आपल्यासाठी चहा केला, तरी तो पिण्याची दहा मिनिटं का होईना, पण राणीपण अनुभवायचं!

रोजच्या रामरगाड्यात स्वतःकडे बघायलाही (तिच्याच भाषेत सांगायचं तर “xxx खाजवायला सुद्धा”)उसंत मिळाली नाही, तरी कधीतरी दहा मिनिटं का होईना, पण आवर्जून स्वतःसाठी वेळ ठेवायचा. या दहा मिनिटांमध्ये तुमच्या तैनातीला कुणी दासी, हुजरे नसणार, तर त्याची सगळी तयारी आधी करून ठेवायची … पण आपणच आपल्याला ही दहा मिनिटांची रॉयल ट्रीटमेंट बक्षीस द्यायची. मग तो चहा उरलासुरला, धड गरम नसणारा, टवका उडालेल्या कपातून नाही घ्यायचा – अगदी मनापासून आपल्याला आवडतो तसा करून घ्यायचा. आपलं असं कौतुक दुसरं कोणी करावं, म्हणून वाट बघत न बसता, स्वतःच मस्त एन्जॉय करायचं. या दहा मिनिटांच्या राणीपणाने इतकं मस्त वाटतं म्हणून सांगू?

कधीतरी मनात आलं की कामावरून घरी आल्यावर मस्त आवडतं गाणं लावायचं, फक्कड चहाचा बरोब्बर गरम कप घेऊन टेरेसवर सूर्यास्ताच्या रंगांची उधळण बघत बसायचं … पुढची दहा पंधरा मिनिटं मी कुणाचंही काहीही देणं लागत नाही, सगळे फोन मेलेले आहेत, अगदी दारावरची बेल वाजलेली सुद्धा मला ऐकू येणार नाहीये … कुठल्या राणीने एवढं मोठं सुख अनुभवलं असेल?

    आमची शाळा मुलाची आणि मुलींची एकत्र होती. प्रत्येक वर्गात साधारण २५ मुली, आणि ३० मुलं. तर शाळेत आठवीनंतर चित्रकलेऐवजी मुलांसाठी बागकाम आणि मुलींसाठी शिवण असे विषय होते. हा माझ्या मते भयंकर मोठा अन्याय होता. एक तर आवडती चित्रकला सोडून द्यायची, आणि शिवाय मुलं बागकाम करत असतांना मुलींनी शिवण शिकायचं? सगळ्या मुलांना बागकामात गती असते, आणि सगळ्या मुलींना(च) शिवण आलं पाहिजे हे लॉजिक तेंव्हा माझ्या काही पचनी पडलं नव्हतं. पण विद्यार्थांनी प्रश्न विचाराण्याची आणि त्यांच्या असल्या प्रश्नांना उत्तर देण्याची पद्धत शाळेत नव्हती आणि माझ्याखेरीज शाळेतल्या कुणाला – शिक्षकांना, मुलींना किंवा मुलांना यात काही वावगं वाटतही नव्हतं.
   
    हा अन्याय माझ्यावर नववीत होणार असला, तरी पाचवीपासूनच मला याचा भयंकर राग होता, आणि निषेध म्हणून मी चुकूनही शिवण शिकायचा कधी प्रयत्न केला नाही. अगदी आईचा भरतकामाचा सुंदर रेशमाच्या लडींनी भरलेला डबासुद्धा मला मोहवू शकला नाही. आईने कधी जबरदस्ती केली नाही, पण मला अगदी जुजबी का होईना पण शिवण शिकवायचा प्रयत्न नक्कीच केला. पण ज्याला शिकायचंच नाही त्याला कोण शिकवू शकणार? सुदैवाने आठवीनंतर मी ती शाळा सोडली, त्यामुळे ही नावड एवढ्यावरच राहिली.

    पुढे कॉलेजमध्ये कधीतरी जाणवलं – पोहणं, स्वयंपाक यांसारखंच शिवणं हे सुद्धा एक जीवनावश्यक कौशल्य आहे. मुलींनाच नव्हे, सगळ्यांनाच आलं पाहिजे असं. त्यानंतर मग साधं कुठे उसवलं तर चार टाके घालणंच काय, पण अगदी हौसेने ड्रेसवर कर्नाटकी कशिदा भरण्यापर्यंत माझी प्रगती झाली. (त्यासाठी किती वेळ लागला हा भाग वेगळा – कारण प्रत्येक टाका मनासारखा आला पाहिजे ना!) नेटक्या,एकसारख्या टाक्यांमधलं सौंदर्य खुणवायला लागलं. काश्मिरी टाका, कांथा, कर्नाटकी कशिदा अशा आपल्या भरतकामातल्या सांस्कृतिक वारश्याचं महत्त्व जाणवायला लागलं. उत्तम बसणारा, आपल्याला हवा तसा (शिंप्याला नव्हे) कपडा शिवण्यातला सर्जनाचा आनंद आपण इतके दिवस का दूर ठेवला हा प्रश्न पडला. आयुष्यात एकदा तरी हे सगळं आपल्या हाताने करून बघितलं पाहिजे याची खात्री पटली. एवढे दिवस या कलेपासून आपण का फटकून वागत होतो याचा मागोवा घेताना लक्षात आलं, की याचं मूळ त्या (मी कधीच अटेंड न केलेल्या) जबरदस्तीने लादलेल्या शिवणाच्या तासामध्ये आहे!

अली माझा कॉम्प्युटर कोर्स मधला मित्र. कॉम्प्युटर कोर्सला मी ऍडमिशन घेतली ती नाईलाजाने, बऱ्याचशा अनिच्छेनेच. त्यात मला कोर्सला जाण्यापूर्वी प्रोग्रॅमिंगच काय साधा कॉम्प्युटर वापरण्याचासुद्धा अनुभव यथातथाच होता. १५ दिवसांच्या अभ्यासाच्या जोरावर मला दिवसभराच्या, तथाकथित ‘competitive’ कोर्सला प्रवेश कसा मिळाला हेच एक नवल होतं. तर वर्गात पहिल्याच दिवशी अलीची ओळख झाली ती ‘the guy with a funny accent’ म्हणून. हळुहळू वर्गात ओळखी वाढल्या, विषयातही थोडीफार रुची निर्माण झाली, आणि नाईलाजाने करायला घेतलेला कोर्स मी एन्जॉय करायला लागले. तरीही कोर्सपेक्षाही जास्त एन्जॉय केला, तो कोर्समध्ये मिळणारा मोकळा वेळ. या मोकळ्या वेळातल्या टवाळक्यांमध्ये लक्षात आलं, अली हे एक फार वेगळं रसायन आहे. वर्गात याचा पहिला नम्बर असला,तरी परीक्षेपलिकडच्या आयुष्यातल्याही बऱ्याच गोष्टी याला कळतात. भटकण्याची आणि निसर्गाची आवड हा एक कॉमन दुवा मला प्रथमच माझ्या ग्रूपमध्ये असणाऱ्या कुणामध्ये मिळाला होता. तर असे दोन भटके एका ग्रूपमध्ये एकत्र आल्याने आमच्या पूर्ण ग्रूपचं भटकणं भलतंच वाढलं होतं. म्हणजे ओरॅकलचं लेक्चर कॅन्सल झालं, चला नरिमन पॉईंटला. लॅबमध्ये प्रोग्रॅम चालत नाहीये – चला दहा मिनिटं समुद्रावर जाऊ या – असं अली आणि मी दिवसाच्या (आणि रात्रीच्याही) कुठल्याही प्रहरी समुद्रावर जायला निघायचो. ग्रूपमधलं निम्म्याहून जास्त पब्लिक या प्रकाराने वैतागायचं – ’आदमी नही, जानवर हो तुम दोनो – बंबई की धूप में कोई २ बजे घूमने के लिये निकलता है क्या?” म्हणून निम्मा ग्रूप वर्गातच टवाळक्या करत बसायचा प्रस्ताव मांडायचा… पण हळुहळू आम्ही ग्रूपच्या बऱ्याच सदस्यांना ‘आदमी’ मधून ‘जानवर’ मध्ये – किमान ‘animal lovers’ मध्ये कन्व्हर्ट केलं … म्हणजे ‘मी एवढ्या उन्हात बाहेर येणार नाही’ म्हणणारे हळुहळू ‘तुम्ही चालत पुढे व्हा …मी मागून बाईक घेऊन पोहोचतो’ म्हणण्यापर्यंत सुधारले. दुपारी तीन वाजताच्या चांदण्यात अभ्यासाची पुस्तकं घेऊन नरिमन पॉईंटला समुद्रावर ‘अभ्यास’ करत बसलेला ग्रूप तुम्ही बघितलाय कधी? आमचंच कर्तृत्व ते .:D

तर असं फिरायला जातांना आम्हाला काय काय गमती दिसायच्या. एकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाच्या फंदीवरून थेट आठ फूट खाली जमिनीपर्यंत जाळं बनवणारा कोळी आम्ही बघितला. नरिमन पॉईंटला समुद्रात केवढे मासे एकदम वर येतात ते बघितलं. मुंबई मला तशी नवीन होती, आणि एवढ्या माणसांच्या गजबजाटात मला फार हरवून गेल्यासारखं वाटायचं. मला बिनचेहेऱ्याच्या वाटणाऱ्या या शहरामध्ये सौंदर्याची बेटं शोधायला अलीने शिकवलं. मुंबईलासुद्धा सुंदर सूर्यास्त होतो, शोधला तर पौर्णिमेचा चंद्रही दिसतो हे त्याच्याबरोबर फिरतांना जाणवलं. एकदा नरिमन पॉईंटला आमच्या नेहेमीच्या अन्नदात्याकडून आम्ही सगळे नेहेमीसारखं ‘सॅंडविच आणि कटिंग’घेत होतो. शेजारच्या फुलवाल्याकडे बघून अली म्हणाला … ‘see … he is having the best job in the world … he is working with flowers while listening to music all day long!’ मुंबईच्या लोकलमधल्या गर्दीने उबून जाणाऱ्या मला, किती माणसांची स्वप्नं ही नगरी साकार करते याचा साक्षात्कार त्याच्यामुळे झाला. लोकलाच्या प्रवासात खरेदीपासून ते हळदीकुंकवापर्यंत कितीतरी गोष्टी आनंदाने साजऱ्या करणाऱ्या बायांमध्ये मला एवढ्या धावपळीत आणि गर्दीतसुद्धा स्वतःची आवडनिवड जिवंत ठेवणारी, स्वतःची स्पेस निर्माण करणारी बंडखोर ठिणगी दिसायला लागली. मुंबईच्या तिटकाऱ्याची जागा कौतुकाने घेतली.

अली एकदम कट्टर मुस्लीम घरातला – बोहरा. त्याच्याच शव्दात सांगायचं,तर ‘शुद्ध मांसाहारी’. मी कधी एखादा चिकनचा पीस खल्ला, तर तेंव्हा मला जाणवतं … चिकन टिक्का म्हणून पुढे आलेला छोटा तुकडा खातांना मला छान वाटतं … हीच जर माझ्यावर ते कोंबडं मारून खाण्याची वेळ आली, तर खाऊ शकेन मी आरामात? माझ्यासाठी ते डिस्टर्ब करणारं काम माझ्या दृष्टीआड कुणीतरी करावं आणि मी ती चव एन्जॉय करावी अशी माझी यात एक दुटप्पीपणाची, बोलून न दाखवलेली वागणूक आहे. मी जर रोज नॉनव्हेज खात असेन, तर कुर्बानीचं बकरं मला स्वतःला कापता आलं पाहिजे हा प्रामाणिकपणा आणि एवढे गट्स मला अलीमध्ये बघायला मिळाले.

कोर्स सुरू असतानाच रमझानचा महिना सुरू झाला. तश्या माझ्या यापूर्वीही मुस्लीम मित्रमैत्रिणी होत्या, पण रमझान ही काय चीज आहे हे मी यापुर्वी कधी एवढ्या जवळून बघितलं नव्हतं. अफाट शरीरक, बौद्धिक आणि मानसिक क्षमता असणारा माझा हा मित्र दिवसभर पाण्याचा थेंबही न पीता नेहेमीइतक्याच एकाग्रतेने सगळे तास अटेंड करायचा, लॅब असाईनमेंट पूर्ण करायचा, नेहेमीप्रमाणे समुद्रावर फिरायलाही यायचा. रोजे पाळणाऱ्या आमच्या इतर मित्रांप्रमाणे त्याच्या चेहेऱ्यावर मरगळ आणि थकवा कधी दिसला नाही. एकदा ग्रूपच्या नेहेमीप्रमाणे टवाळक्या चालल्या होत्या. कुणीतरी अलीला म्हटलं, तू फार चहा पितोस. इतका चहा पिणं चांगलं नाही. अली म्हणाला,ठीक आहे.आता नाही पिणार. त्या दिवसापासून त्याने चहा सोडून दिला! मोठ्या मोठ्या आध्यात्मिक गुरूंना मोहातून बाहेर पडण्यासाठी झगडावं लागतं. एवढा मनोनिग्रह त्याने कुठल्या जन्मात कमावला होता माहित नाही.

एरव्ही रमझानच्या महिन्यातच काय,पण अन्यथाही मी महम्मद अली रोडवरून प्रवास शक्यतो टाळला असता. त्या रमझानमध्ये मी एक दिवस मुद्दम नेहेमीची लोकल सोडून महम्मद अली रोडने येणाऱ्या बसने घरी आले – रमजानचा बाजार बघायला मिळावा म्हणून! त्या रस्त्याने जाताना मला असुरक्षित, ‘त्यांच्या देशात’ असल्यासारखं वाटलं नाही. रस्त्यावरच्या त्या गर्दीत अजूनही काही असे अली असतील. मी जर भारतात किंवा पाकिस्तानात एका मुस्लीम घरात जन्माला आले असते तर? कितीही सुसंस्कृत वागणूक असली, उत्तम काम केलं, तरी माझ्या नावामुळे जग माझ्याकडे साशंकतेने, रागाने, भीतीने बघत असतं तर? त्या बाजूने बघतांना खूप अवघड वाटत होतं सगळंच.

मैत्रीची काही नाती अशी असतात, की वर्षानुवर्ष तुम्ही भेटला नाहीत, तरी काल भेटलो होतो असा सहजपणा पुढच्या भेटीत राहतो. तारा कायम जुळलेल्याच राहतात. अशीच ही सखी. अम्ही गेल्या आठ दहा वर्षात भेटलेलो नाही. फोन नाही, इ-मेल नाही, पत्र नाही. पण जिवश्च कंठश्च मैत्रीण म्हटलं म्हणजे पहिलं नाव आठवतं ते तिचंच. माझी बालपणीची सखी.

तसं बघितलं तर आमचं जगणं आज एकमेकांना कुठेच छेद देत नाही. मला खात्री आहे, मी हे जे खरडते आहे, त्याची तिला आयुष्यात कधी गंधवार्ताही लागणार नाही. त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन, मोकळेपणाने मी इथे हे लिहिते आहे.

पाच भावंडातली ही चौथी. घरात प्रचंड कर्मठ वातावरण. अगदी विटाळाच्या वेळी शिवलेलं चालत नाही इथपर्यंत. सगळ्या रीतीभाती, सणवार सगळं यथासांग पार पडलंच पाहिजे. आणि कडधान्य विकत आणून घरी जात्यावर डाळी काढण्यापर्यंत सगळी कामं घरी. या धबडग्यामुळेच का काय, पण सखीची आई सारखी आजारी. घरातली ही सगळी कामं करायची ती शाळकरी वयाच्या या सगळ्या भावंडांनी. म्हणजे काका तसे अतिशय सज्जन होते, पण त्यांच्या मते हीच जगायची रीत होती. मला काय भातुकलीसारखी ही पण एक गंमत होती. संध्याकाळभर सखीच्या घरात पडीक असायचे मी. पण खेळून झालं, की जेवायला आणि झोपायला माझ्यासाठी एक खूप वेगळं घर होतं. तिथे मला आजच्या स्वयंपाकाची काळजी करावी लागत नव्हती का रात्रभर जागून दिवाळीचा फराळ करावा लागत नव्हता.

शाळेतल्या पुस्तकी अभ्यासात सखी तशी मागेच असायची काहीशी. म्हणजे काकांच्या मते माझ्या संगतीमुळे ती शाळेत पास होत होती ही चांगली प्रगती होती. पण खरं तर पुस्तकांपलिकडच्या शाळेत मी तिच्या संगतीमुळे केवढं तरी शिकत होते. शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या सगळ्या गोष्टीत आम्ही बरोबर असायचो – खेळ, चित्रकला, गर्ल गाईड, गाणी, नाच, सबकुछ. शिवाय शाळेबाहेरचे उद्योगही – नदीवर पोहायला जाणं, वॉल-हॅंगिंग, मेंदी असले क्लासही आमचे बरोबर चालायचे. त्याशिवाय आमच्या डोक्यातनं आलेले प्रकल्प सुद्धा असायचे – अगदी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी पैसे जमा करायचे, म्हणून रोज चिवडा बनवून तो शाळेत मधल्या सुट्टीत विकण्यापर्यंत। नेतृत्व, स्वतः जबाबदारी घेऊन काही करणं आणि आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढणं सखीकडून शिकावं. आम्ही गाव सोडून गेलो त्यानंतर सखीचा पुस्तकी अभ्यास मागे पडला, तर माझा पुस्तकांबाहेरचा.

नंतर असंच काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सखीची निवांत भेट झाली. माझ्या घरातल्या मुक्त वातावरणात आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हे शोधण्यासाठी मी धडपडत होते. पैशाचं पाठबळ नसणाऱ्या, तीन मुलींची लग्नं कशी जुळवायची याच्या विवंचनेतल्या मारवाडी घरात सखी आपण आईवडिलांना अजून संकटात घालायचं नसेल, तर पदरी पडेल ते दान स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे हे समजून त्यात आपण काय काय करू शकतो याच्या शक्यता पडताळून पाहत होती. काकांची मतं अजूनही बदललेली नव्हती. मुलींनी नोकरी करणं, पैसा कमावणं त्यांना मान्य नव्हतं. क्षमता (आणि खरं तर गरजही) असूनही काम करायचं नाही? एक वेळ नोकरी आणि पैशाचा विचार बाजूला ठेवू – पण पूर्ण स्वातंत्र्याची चटक लागलेल्या माझ्या मनाला, आवडत असलं तरी काहीतरी करायचंच नाही ही कल्पनाच सहन होण्यापलिकडची होती. सखीच्या आयुष्यात चार दिवस डोकावतानाच मला घुसमटायला लागलं. सिद्धेश्वराच्या तलावात दोघींनीच जाऊन रोईंग केल्यावर सखी म्हणाली, तिच्या नव्या मैत्रिणींमध्ये असली यडच्याप गंमत करणारी कोणीच नाहीये. तिच्या जागी असते तर काय केलं असतं मी? जगाशी भांडायला निघाले असते? फ्रस्ट्रेट होऊन माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं जगणं हराम करून टाकलं असतं? निघून गेले असते हे सगळं सोडून? हाय खाऊन, मरेपर्यंतचे दिवस ढकलत राहिले असते?

लहानपणी आमचा एकत्र ‘अभ्यास’ चालायचा, खेळ चालायचे, बाकीचे अनंत उद्योग चालायचे. असंच एकदा आम्ही मिळून रोजचं दिवसभराचं ‘वेळापत्रक’ बनवलं होतं. म्हणजे दुपारी दोन ते तीन अभ्यास (?), त्यानंतर अर्धा तास विश्रान्ती वगैरे वगैरे. तर हे वेळापत्रक बनवताना मी सखीला विचारलं … अगं तुझी सगळी कामं तू यात कुठे बसवणार? त्यासाठी किती वेळ ठेवायचा? सखीचं उत्तर, “ते मी बघून घेईन … तू सांग आपला दिनक्रम”. मी ते वेळापत्रक’ दोन दिवसाच्या वर काही पाळलं नसेल … ती किमान आठवडाभर तरी पाळत होती … मला लाज वाटून मी तिला ते बंद करायला सांगेपर्यंत. आज सखीचं लग्न झालंय, तिला दोन मुलं आहेत. मारवाडी घरामध्ये एकत्र कुटुंबामध्ये राहाताना, घरातले सगळे रीतीरिवाज, कामं, मुलांचं सगळं करताना तिने स्वतःचं ब्युटी पर्लर सुरू केलंय. सासू सासऱ्यांची आजारपणं काढता काढता, मुलांचं करता करता, नवरोबाचा इगो जपता जपता तिने लहानपणीच्याच सहजतेने “ते मी बघून घेईन” म्हटलं असणार. नवऱ्याने नवरेशाही गाजवलीच पाहिजे असं बाळकडू घेऊन मोठं झालेला तिचा नवरा आज तिला तिच्या घरकामात मदत करतोय, तिला पार्लर चालवायला पाठिंबा देतोय. सखी, तू जिंकलंस.

आईकडे मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडले नव्हते. एक तर ते बाबांचं ‘designated’ काम होतं, आणि मी उठेपर्यंत बहुधा ताक घुसळून झालेलं असायचं. सकाळी (साखरझोपेमध्ये) बाबांचा ताक घुसळण्याचा आवाज ऐकला म्हणजे मनात ’अरे वा आज ताजं ताक मिळणार’ अशी नोंद घ्यायची आणि पुन्हा कुशीवर वळून झोपायचं एवढाच ताक घुसळणे / लोणी काढणे प्रकाराशी नियमित संबंध. भुसावळला कधीतरी मंजूकडे ताक केलं असेल किंवा एखाद्या वेळी बाबांना बरं वगैरे नसल्यामुळे कधी ताक घुसळलं असेल तेवढंच.
लग्नानंतर आम्ही ’चंद्रकांत’चं दूध घ्यायला सुरुवात केली आणि एक नवीन समस्या निर्माण झाली. एवढ्या सायीचं करायचं काय? बाबांसारखं एका दिवसाआड ताक करायला तर परवडणार नव्हतं. प्रसादचा ’साय टाकून दे’ हा पर्याय मी ताबडतोब हाणून पाडला. ’फार साय येते. दूध फार चांगलं आहे’ म्हणून दूध बदलणं फारच गाढवपणाचं वाटत होतं. अखेर आठवडाभराच्या सायीला विरजण न लावताच मिक्सरमध्ये (ताक टाकून देऊन) लोणी करायची वेळ आली.मिक्सरमध्ये ताक मी कधी केलंच काय, झोपेमध्ये ऐकलं सुद्धा नव्हतं. रविवारी तासभर खास या कामासाठी राखून ठेवून, बाई आणि प्रसाद आपले प्रयोग बघायला नाहीत याची खात्री करून घेतली. मनाचा हिय्या करून ती साय मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सर लावला. त्या सायीला काही दया येईना. सुदैवाने मिक्सर प्रसादच्या ’फिलिप्स’चा होता – त्यामुळे एकीकडे साय लावून मला दुसरे उद्योग करता येत होते. अखेरीस अर्ध्या तासाने कसंतरी लोणी निघालं. विरजण लावलंच नव्हतं,त्यामुळे ताजं ताक मिळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढे कष्ट करून ताक न मिळणं म्हणजे फारच झालं. पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रयोग,विरजण लावून. एक कवकवीत, बेचव रसायन ताक म्हणून उरलं. मागच्या वेळेसारखं ते धड टाकूनही देता येईना – किती झालं तरी ते शेवटी ’ताजं ताक’ होतं ना! पुढच्या वेळी ठरवलं – या मिक्सरच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं साधं रवी घेउन ताक करावं.(बाबांची आठवण काढत)रवी घेऊन बसले. अर्धा तास घुसळून काही होईना. बाबा नेमके किती वेळ ताक घुसळत असावेत बरं सकाळी? तेवढ्यात कुणाचातरी वेळखाऊ फोन आला. तो संपेपर्यंत प्रसाद आला, आणि कुठेतरी बाहेर जायचं निघालं. आता या अर्धवट झालेल्या ताकाचं मी काय करू? ते तसंच टाकून शेवटी गेले. परत आल्यावर बघितलं तर ताक / साय परत मूळपदाला.
दर आठवड्याचे प्रयोग अयशस्वी होता होता अखेरीस दर रविवारी सायीची भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोणी काढणे हे माझी सगळी कल्पकता, एनर्जी आणि वेळ खाऊन टाकणारं एक ’कॄष्णविवर’ दर्जाचं, ’काळ्या यादीमधलं’ काम बनलं. दर रविवारी पुढे ढकलून शेवटी साय काढायला आणि फ्रिजमध्ये ठेवायला घरात एकाही भांड्यात कणभरही जागा शिल्लक नाही अशी परिस्थिती आल्यावर नाईलाजाने मी महिनाभराची साय एका रविवारी दिवसभर घुसळून टाकली आणि बाबांनी केलेल्या ताज्या ताकाच्या आठवणी काढत पुढच्या सायमुक्त रविवारची वाट बघत बसले. महिनाभराच्या(?) सायीसाठी एक मोठ्ठं पातेलं बनवायला सुरुवात केली, आणि महिन्याला तीनच रविवार असतात हे कटु सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी केली.
असंच एकदा सायीचं ते जंगी पातेलं भरल्यावर मी शनिवारी त्याला विरजण लावून ठेवलं होतं. रविवारी नेमक्या मी घरात नसतांना दुपारी बाई कामाला आल्या. हे कसलं पातेलं आहे ते त्यांना कळेना. अखेरीस त्यांनी आणि प्रसादने “दूध नासलेलं दिसतंय” असा निष्कर्ष काढला, आणि पातेलं रिकामं करून चांगलं स्वच्छ घासून ठेवलं!
अखेर एका रविवारी ती अटळ घटना घडली. माझा साय-प्रयोग करायला एकांतच मिळेना! एवढी तयारी करून मी नेमकं काय करणार अहे, ते बघायला बरोब्बर सासुबाई आल्या. नाईलाजाने मी त्यांच्या समक्ष मिक्सर सुरू केला. त्यांनी २-४ मिनिटं एकंदर रागरंग बघितला, मग हळूच सांगितलं-“मिक्सरचं कुठलं पातं लावलं आहेस तू? फ्लिपर लावत जा. आणि मिक्सर असा फुल स्पीडला नाही चालवायचा लोण्यासाठी.” पुढच्या रविवारी (सासुबाई नसतांन अर्थातच – त्या तोवर परत गेल्या होत्या हुबळीला) माझा नवा प्रयोग. दहा मिनिटांत लोणी तयार, आणि शिवाय पिणेबल ताजं ताकसुद्धा!
जवळजवळ वर्षभर चाललेल्या या लोणी प्रकल्पामधून एक ’मंथन थिअरी’ तयार झाली माझ्याजवळ. पहिली गोष्ट म्हणजे, आपण घाईकरून मंथन लवकर संपत नाही. दुसरं म्हणजे, या मंथनातून काहीही निष्पन्न होणं अशक्य आहे असं वाटायला लागेपर्यंत आपल्याला कुठलीच प्रगती दिसत नाही. खूप वेळ तुम्ही नुसतेच प्रयत्न करत राहता, दॄष्य परिणाम काहीच नसतो. या स्थितीमध्ये प्रयत्नांना चिकटून रहावंच लागतं. त्यानंतर जेंव्हा परिणम दिसायला लागतो, तेंव्हा होणारा आनंद खास असतो. या वेळेपर्यंत ’by grace of God things are taking place’ असं म्हणण्याची आपल्या मनाची तयारी झालेली असते, कर्ताभाव संपलेला असतो. तिसरा मुद्दा म्हणजे परिणाम दिसायला लागले म्हणून ताबडतोब थांबण्यासारखा गाढवपणा नाही. अजून थोडंसं टिकून राहिलं तर याच्या कितीतरी पट जास्त फळ मिळतं. Take things to their logical conclusion. चौथी गोष्ट म्हणजे,अत्याधुनिक सधनं हा तुमच्या अडाणीपणावरचा उतारा नाही. ती कशी वापरायची हे तुम्हाला कळायला हवं. आणि शेवटचं म्हणजे, ask your mom in law… she also knows something.