Archives for category: जर्मनी
    आपल्या जवळपास काही माणसं असतात. न बोलता, शांतपणे त्यांचं काम चाललेलं असतं. या माणसाचं केवढं ग्रेट काम आहे, ते आपल्याला नुसतं बोलून भेटून कधी समजणारही नाही. अशीच काही माणसं भटकंतीमध्ये भेटली, तर काही या भटकंतीच्या आधी भेटलेली आता या सगळ्याचा विचार करताना आठवली. सर्च किंवा हेमलकसा इतकं त्यांचं काम मोठं झालेलं नाही, पण आपल्याला जमेल तेवढं, जमेल तसं काम कसं करावं, ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय या भटकंतीची गोष्ट पूर्ण होणार नाही. – तर या विषयावरची ही पहिली पोस्ट.
*************************************************************
    संगणकक्षेत्रातलं काम म्हणजे दर प्रोजेक्टला नवी विटी, नवं राज्य. दर वेळी नवी टीम, नवे सहकारी. कधी कधी खूप इंटरेस्टिंग माणसं भेटतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, पण काम संपलं, म्हणजे सगळे इतक्या वेगाने पांगतात, की कितीतरी सुंदर ओळखी मैत्रीमध्ये बदलण्यापूर्वीच संपून जातात. रायनर माझा असाच एका प्रोजेक्टमधला सहकारी. एक ‘दीर्घकालच्या मैत्रीमध्ये बदलू शकली असती तर खूप आवडली असती’ अशी ओळख.

    आमच्या ओळखीची सुरुवात फारशी उत्साह वर्धक नव्हती. खरं तर रायनर एका दुसऱ्या कंपनीचा. आमच्या कंपनीने त्यांना टेकओव्हर केलं, आणि मनात नसताना रायनर या कंपनीत येऊन पोहोचला. त्यात त्याचा प्रोजेक्ट ऑफशोअरिंगसाठी निवडला गेलेला, आणि मी ‘ऑफशोअर’वरून आलेले. गेली दहा वर्षं जे काम मी करतो आहे, ते कोणी भारतात बसून करून दाखवेल यावर त्याचा विश्वास नव्हता, आणि दुर्दैवाने आमची ऑफशोअर टीमसुद्धा त्याचं म्हणणं खरं करून दाखवत होती. त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी ‘ही आता आणखी कशाला इथे’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण चार माणसांच्या त्याच खोलीत मला बसायला जागा मिळाली, आणि सहवासातून हळुहळू एकमेकांची ओळख होत गेली. थोडं काम आम्ही एकत्र केलं, आणि “together we make a great team” हे दोघांनाही पटलं. माझा जर्मनचा सराव करण्याचा बेत त्याच्या इंग्रजीच्या सराव करण्याच्या इच्छेपुढे बारगळला.

    रायनरच्या मशीनचा वॉलपेपर म्हणजे आल्प्सच्या पार्श्वभूमीवर एक रेस्क्यू हेलिकॉप्टर असा फोटो. थोडासा धूसर. आवर्जून वॉलपेपर म्हणून निवडावा असं काही मला त्या फोटोविषयी वाटलं नाही, त्यामुळे एकदा सहज त्याला विचारलं. तरूणपणी आल्प्समध्ये गिर्यारोहण करताना त्याला एकदा अपघात झाला, पाय मोडला. हा फोटो त्याच्यासाठी आलेल्या रेस्क्यू हेलिकॉप्टरचा. त्या हेलीकॉप्टरच्या खाली लोंबकळत त्याला हॉस्पिटलपर्यंत आणलं गेलं. त्यानंतर कित्येक महिने तो अंथरुणाला खिळून होता. नंतर सुदैवाने पूर्ण बरा झाला, पण हा फोटो समोर असला, म्हणजे ‘परिस्थिती तितकी वाईट नक्कीच नाही’ याचं स्मरण होतं, म्हणून अजूनही तो फोटो त्याच्या वॉलपेपरला होता.

    युरोपातली झाडं मला अनोळखी. त्यामुळे हिवाळा संपून वसंत सुरू झाला, आणि एका एका खराट्याचं झाडात रूपांतर व्हायला लागलं, तसतसा मी दिसतील त्या झाडांचे फोटो काढून ‘हे कुठलं झाड’ म्हणून रायनरला विचारायचा सपाटा लावला. त्या वर्षी उन्हाळा खूप मोठा, फारसा पाऊस नसलेला होता. दर शनिवार- रविवारी कॅमेरा आणि पाण्याची बाटली घेऊन माझं फुलांचे फोटो काढत भटकणं चाललं होतं. गुलाबी हॉर्स चेस्टनटच्या सुंदर फुलांचा फोटो मग रायनरने मला काढून आणून दिला.

    कितीही काम असलं, तरी रायनर आठवड्याचे तीन दिवस साडेपाचच्या पुढे ऑफिसमध्ये बसत नाही याचं मला आश्चर्य वाटायचं. नंतर समजलं – हे तीन दिवस तो स्वाहेली शिकायला जातो. याला एकदम स्वाहेली का बरं शिकावंसं वाटावं? मी विचार करत होते. तर केनियामधलं एक खेडं याने दत्तक घेतलंय. तिथे शाळा सुरू केलीय, तिथल्या दवाखान्यालाही मदत चालू आहे. बसल्या जागेवरून तिथे पैसे पाठवण्यापुरता त्याचा सहभाग मर्यादित नाही. दर वर्षी सुट्टीमध्ये रायनर आणि क्लाउडिया – त्याची बायको – स्वतः या गावाला भेट देतात. तिथल्या लोकांशी संवाद साधणं सोपं जावं म्हणून हा स्वाहेली शिकत होता! या कामासाठी नवरा- बायको दोघं मिळून एक संस्था चालवतात. रायनरने संस्थेसाठी वेबसाईट तयार केलीय. हे सगळं करताना आपण काही फार मोठं ग्रेट करतोय असा कुठलाच भाव नाही, त्याचं ओझं नाही. आपल्या शाळेविषयी तो जितक्या प्रेमाने बोलतो, तितक्याच प्रेमाने दुपारी ऑफिसमधल्या पोरांबरोबर ‘किका’ (फूसबॉल) खेळणार. ऑफिसच्या खोलीत दंगा करणार, रोज जिन्समध्ये येणार्‍या एका सहकार्‍याला कस्टमर व्हिजिटसाठी कडक फॉर्मलमध्ये यावं लागल्यावर दिवसभर त्याला चिडवून भंडावून सोडणार. एकदा एक सहकारी आमच्या या दंगेखोर खोलीमध्ये काहीतरी डिस्कस करायला आली, आणि दीड तास अखंड एकसूरी बडबडात होती. ती खोलीच्या बाहेर पडल्याबरोबर मी रायनरला म्हटलं, आमच्याकडे हिंदीमध्ये म्हणतात “इतनी बाते करनी होती तो भगवान ने दो मुह और एक कान दिया होता।”. रायनरने हे खोलीतल्या व्हाईट बोर्डवर रोमन लिपीत लिहून घेतलं, आणि दुसर्‍या दिवशी ती बाई आल्यावर त्याचा हिंदीचा जोरदार ‘अभ्यास’ सुरू झाला. हे वाक्य गाण्यासारखं चालीवर म्हणून त्याने खोलीतल्या बाकी तिघांना चेहेरे सरळ ठेवणं अवघड करून ठेवलं. यापुढे कधी त्या बाईने आमच्या खोलीत यायची हिंमत केली नाही 🙂

    आपल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिथल्या अवतारात रायनरची निवड झाली. आमच्या खोलीतल्या दंग्यात केबीसीच्या तयारीची भर पडली. अचानक “भारतामध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारं राज्य कुठलं?” यासारखे प्रश्न आमच्यावर बरसायला लागले. जय्यत तयारीनिशी रायनर शोच्या शूटिंगसाठी गेला. जाताना त्याला विचारलं, जिंकलेल्या पैशांचं काय करणार? “घराची दुरुस्ती आणि शाळेसाठी फर्निचर” रायनरचं शांत उत्तर. सगळे पैसे मलाच हवेत असा हव्यास नाही, आणि सगळे शाळेसाठी वापरून नंतर मग थोडे घराला हवे होते म्हणून हळहळणं नाही. मनात म्हटलं, देवा याला मिळू देत दहा लाख युरो. तो पैसा कसा वापरायचा ते याच्याएवढं कुणाला समजत नसेल. रायनर तिथे शेवटून तिसर्‍या प्रश्नापर्यंत यशस्वीरित्या पोहोचला, आणि ते पैसे त्याने नक्कीच आधी ठरवल्याप्रमाणे वापरले असतील अशी खात्री वाटते.

    ऑनसाईट असाईनमेंट संपवून परतताना रायनरला म्हटलं, तुझा मला हेवा वाटतोय. मला जे करावंसं वाटतं पण अजूनही माझ्या वेळेच्या, पैशाच्या गणितात बसत नाही, ते सगळं तू आज जगतो आहेस!

(मागच्या जर्मनी भेटीमध्ये काही पूर्व जर्मनीतले सहकारी, काही पश्चिमेचे, एक ब्राझिलची अशी टीम होती, त्यामुळे बर्‍याच गंमतीजमती झाल्या.त्याविषयी लिहायला सुरुवात केली होती, पण दोन महिन्यांपासून हे अर्धमुर्ध लिहून पडून आहे … आज तसंच प्रकाशित करते आहे.)

********************

माणसं तशी एकेकेट्याने असताना बर्‍यापैकी नॉर्मल वागतात – पण त्यांची काही कॉम्बिनेशन्स एकदम डेंजर असतात.  असंच एक कॉम्बिनेशन गेले दोन आठवडे झाले होतं. त्याचा हा कॅलिडोस्कोप.

********************

रात्री साडेनऊला ऑफिसमधून निघून वाट शोधत परदेशातलं अनोळखी गाव बघायला साधारणपणे शहाणी म्हणण्यासारखी माणसं जात नाहीत. पण सगळेच “जाऊन तर बघू या” म्हणणारे निघाल्यावर अश्या प्रवासात धमाल मजा येते. नकाशा, जीपीएस अश्या क्षुद्र साधनांवाचून तुमचं काही अडत नाही. एक एक्झिट चुकली तर पुढची … त्यात काय एवढं? नाही तरी आपल्याला काय घाई आहे पोहोचायची? रोज हॉटेलपासून ऑफिसपर्यंतचा प्रवासही रोमांचक असतो – कारण रोज नवाच रस्ता सापडतो.

********************

मला जर्मन बीयर चढलीय का? का खरंच माझ्या आजुबाजूचे लोक या भागातल्या डुकरांच्या संख्येविषयी, डुकरांच्या रोगांमधल्या स्पेशलायझेशनविषयी गंभीर चर्चा करताहेत? इथली डुकरं स्वच्छ असतात, त्यांची पिल्लं गोजिरवाणी दिसतात हे मान्य. पण डुक्कर हा प्राणी माणसाला स्पेशलायझेशन म्हणून का बरं निवडावासा वाटावा? आणि या उच्च शिक्षणासाठी ब्राझीलहून युरोपला शिकायला यावं? या परिसरात साडेचार लाख डुकरं आहेत? नाही ऍक्च्युअली त्यांनी साडेचार मिलियन म्हटलं … म्हणजे पंचेचाळीस लाख! (पुण्यात किती असावीत?) हानोवरचं व्हेटर्नरी कॉलेज आणि क्लिनिक डुकरांसाठी जगप्रसिद्ध आहे ही ज्ञानप्राप्ती हा सगळा संवाद ऐकण्यातून झाली. यांची चर्चा चाललीय तोवर अजून एक बियर घ्यावी हे बरं. इट हेल्प्स मेंटेन युअर सॅनिटी.

********************

एखाद्या माणसाची सूचना तुम्हाला मान्य होत नाही, परिस्थितीशी अगदीच विसंगत वाटते कधीकधी. मान्य. पण म्हणून तुम्ही कामाच्या ठिकाणी, मिटिंगमध्ये ‘हाल्फ’ (अर्धा) म्हणून त्याची संभवना करू शकता? हे जरा जास्तच होतंय. चारपाच वेळा ‘हाल्फ’ ऐकल्यावर मला शोध लागला … ही बाई हिच्या ब्राझिलियन पोर्तुगीज उच्चारांप्रमाणे जर्मन ‘राल्फ’ चा ‘हाल्फ’ बनवते आहे :D. आधी जर्मन ‘र’एवढा गटरल – बहुसंख्य अन्यभाषिकांना न झेपणारा … त्याचं पोर्तुगीज रूप एवढं भीषण असेल याची मला कल्पना नव्हती.

********************

जर्मन सॉसेजेस कुणी कसं खाऊ शकतं? त्याला एक विचित्र वास असतो, आणि प्लॅस्टिकचा तुकडा खाल्ल्यासारखा स्वाद असतो. एकदम साउअरक्राउटशी स्पर्धा करेल इतका अनइंटरेस्टिंग प्रकार आहे हा.

********************

दररोज स्टीक आणि वाईनवाचून जेवण न होणार्‍या ब्राझीलच्या बाईला जर्मनीमध्ये रात्री साडेबारा वाजता मेथी खाकरा आणि दही – पोहे मेतकूट खायला घालायची आयडिया कशी वाटते? याला आन्तरराष्ट्रीय स्तरावरची देवाणघेवाण म्हणायचं का? 😉 आणि जेंव्हा ही आंतरराष्टीय परिषद सिंगापूरमधल्या कुणाला तरी चर्चेत सामील करून घेते, तेंव्हा तर मी स्वतःच आचंबित होते. खरंच जग एवढं जवळ आलंय? जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून लोक एकमेकांच्या सहकार्याने एवढ्या मोठ्या आर्थिक उलथापालथी घडवून आणतात? यातल्या कुणालाच या आर्थिक घडामोडींमधून प्रत्यक्ष फायदा नाही. फायदा होणार तो कंपनीला. त्या अजस्त्र यंत्रातल्या खिळ्यांना कदाचित एखादी शाबासकीची मेल मिळेल या धडपडीकरता. बस. what motivates them to go that extra mile? याच्या एक शतांश डेडिकेशन दाखवलं तरी आपल्या देशाचे किती प्रश्न सुटतील!(मग पन्नास वर्षं झाली तरी बेळगावचा प्रश्न का बरं सुटत नाही? काश्मीर धुमसायचं का थांबत नाही? आपल्याला एकाही शेजार्‍याबरोबर बरे संबंध का निर्माण करता येत नाहीत? )

********************

राजाच्या जुन्या बागेतल्या मेळ्यामध्ये खेळ करणारे हे ऍक्रोबॅट्स रबराचे बनवलेले आहेत का? यांना मिळतात तश्या टाळ्या पुण्यातल्या दोरीवरच्या डोंबार्‍याच्या मुलीला कधी मिळणार? दर उन्हाळ्यात इथे आकर्षक दारूकामाची स्पर्धा असते. दर रविवारी एक या प्रमाणे आठ – दहा जगप्रसिद्ध फटाक्यांचे निर्माते आपलं दारूकाम सादर करतात, आणि त्यातून त्या वर्षाचा विजेता निवडला जातो. आजचं दारूकाम छानच होतं, पण तोक्योमध्ये त्यांच्या उन्हाळी उत्सवामध्ये (हानाबी मध्ये) याहून सरस काम बघायला मिळतं. दारूकामाच्या आधी एक गरम हवेचा बलून सोडतात, आणि त्या बलूनच्या खाली एक जिमनॅस्ट हवेत तरंगत कसरती करत असते. बलूनला लटकत कसरती करायला वेताचा मलखांब हा किती परफेक्ट प्रकार होईल!

********************

ब्राझिल हा दक्षिण अमेरिकेतला एकमेव पोर्तुगीजभाषिक देश आहे. (बाकी संपूर्ण दक्षिण अमेरिका स्पॅनिश बोलणारी.) काही काळ पोर्तुगीज साम्राज्याची राजधानी रिओला होती. ब्राझिलची सहकारी म्हणजे गोरी, काळी, पिवळी, इंडियन – काय रंगाची असणार याविषयी मला काहीही कल्पना नव्हती. प्रत्यक्ष भेटल्यावर समजलं – ब्राझिलची सहकारी म्हणजे कुठल्याही रंगाची असू शकते. ब्राझिल हा अतिशय सुंदर देश आहे, भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, लोकशाही विशेष रुजलेली नाही. इथली संस्कृती काही बाबतीत अमिरिकेला अगदी जवळची, तर कौटुंबिक संबंध एकदम भारतातल्यासारखे. आपली सासू ऐशीव्या वर्षी केवढी ऍक्टिव्ह आहे याचं वर्णन वर्णन ओल्गा सांगत होती … आयुष्यभर तिने पब चालवला – अजूनही ती रोज थोडा वेळ गल्ल्यावर बसते. काठापदराची साडी, ठसठशीत कुंकू आणि हातभर बांगड्या घालणारी माझी सासू पबच्या गल्ल्यावर बसली तर कसं दिसेल असं चित्र क्षणभर माझ्या डोळ्यापुढे तरळून गेलं 🙂

********************

  सुसान हे मूळ जर्मन गाणं नाही. ते लिहिलं आणि गायलं कॅनडाच्या लिओनार्ड कोहेनने (Leonard Cohen), इंग्रजीमध्ये.   इथे ते मूळ गाणं आहे. त्याची अनेक भाषांतरं झाली, अनेक गायकांनी ते गायलं. जर्मनमध्ये याच्या दोन आवृत्त्या आहेत. हेरमान व्हान वीन (Herman van Veen) या डच गायकाने म्हटलेली जर्मन आवृत्ती मी प्रथम ऐकली,आणि तिच्या प्रेमात पडले. मूळ इंग्रजी गाण्याचा शोध नंतर लागला, पण हेरमान गातो तो थोमास वोईटकेविट्शने केलेला काहीसा स्वैर अनुवाद मला जामच आवडतो. मूळ काव्यातल्या हाडामांसाच्या सुसानला या अनुवादात जलपरी बनवलं आहे. मूळ गाणं इंग्रजी आहे हे माहित नसताना जर्मनवरून मराठीत मी केलेला हा अनुवाद. (भाषांतर करताना काय काय करू नये याचं उदाहरण म्हणा याला.) इंग्रजी गाणं उपलब्ध असताना जर्मन भाषांतरावरून भाषांतर करण्यात काय हाशील म्हणून आजवर प्रकाशित केला नव्हता. हेरंबचा खो पार शिळा होऊन गेलाय आणि अजूनही अडेलतट्टू डोकं काम करायला तयार नाहीये, म्हणून हे नाईलाजाने पोस्टते आहे.

हे मी निवडलेलं जर्मन गाणं: (थोमास वोईटकेविट्शने केलेला स्वैर अनुवाद)
***********************************************************************
Suzanne

Suzanne lacht dich an
auf der Bank, die beim Fluß steht
tausend Schiffe ziehn vorbei
und sie zeigt dir wie ein Kuß geht
du sagst dir sie muß verrückt sein
denn sie fällt aus dem Rahmen
mit dem Übermut der Menschen
deren Kräfte nie erlahmen
und du willst ihr gerade sagen
ich muß gehen es ist zuende
doch sie hält deine Hände
über deine Lippen kommt kein Wort
Und sie will ans andre Ufer,
und du möchtest mit ihr mitgehn
zusammen Hand in Hand
sie ist deine große Liebe
aber noch kämpft dein Gefühl mit dem Verstand

Hat Jesus nicht bewiesen,
daß selbst Wunder noch geschehen
er, der frei von Furcht und Angst war,
konnte übers Wasser gehen
wenn sie dich allein zurückläßt
würde dich das sehr verletzen
doch du läßt die Zeit verstreichen
anstatt Berge zu versetzen
und du weißt wohl, du wirst leiden
doch du kannst dich nicht entscheiden
und sie fragt dich mit den Augen
über deine Lippen kommt kein Wort
und du möchtest mit ihr mitgehn
zusammen Hand in Hand
sie ist deine große Liebe
aber noch kämpft dein Gefühl mit dem Verstand

 Suzanne lacht dich an
auf der Bank die beim Fluß steht
und du hörst ihre Pläne
und du denkst, daß dein Bus geht
über euch kreisen Möven
das Licht wird langsam blasser
und du spürst wie es kalt wird
und du starrst auf das Wasser
niemand gibt dir die Antwort auf all deine Fragen
was euch drüben erwartet
kann Suzanne auch nicht sagen
und du siehst, daß sie aufsteht
und du möchtest mit ihr mitgehn
zusammen Hand in Hand
sie ist deine große Liebe
aber über dein Gefühl siegt der Verstand
***********************************************************************

हे मूळ इंग्रजी गाणं:
***********************************************************************
Suzanne takes you down to her place near the river

You can hear the boats go by
You can spend the night beside her
And you know that she’s half crazy
But that’s why you want to be there
And she feeds you tea and oranges
That come all the way from China
And just when you mean to tell her
That you have no love to give her
Then she gets you on her wavelength
And she lets the river answer
That you’ve always been her lover
And you want to travel with her
And you want to travel blind
And you know that she will trust you
For you’ve touched her perfect body with your mind.

And Jesus was a sailor
When he walked upon the water
And he spent a long time watching
From his lonely wooden tower
And when he knew for certain
Only drowning men could see him
He said “All men will be sailors then
Until the sea shall free them”
But he himself was broken
Long before the sky would open
Forsaken, almost human
He sank beneath your wisdom like a stone
And you want to travel with him
And you want to travel blind
And you think maybe you’ll trust him
For he’s touched your perfect body with his mind.

Now Suzanne takes your hand
And she leads you to the river
She is wearing rags and feathers
From Salvation Army counters
And the sun pours down like honey
On our lady of the harbour
And she shows you where to look
Among the garbage and the flowers
There are heroes in the seaweed
There are children in the morning
They are leaning out for love
And they will lean that way forever
While Suzanne holds the mirror
And you want to travel with her
And you want to travel blind
And you know that you can trust her
For she’s touched your perfect body with her mind.
***********************************************************************

(इंग्रजी गाणं जालावर इथे उपलब्ध आहे.)

आणि हा मराठी भावानुवाद:

***********************************************************************
सुसान

नदीकाठच्या बाकावर
सुसान तुझ्याकडे बघून हसते आहे.
हजारो नावा तुमच्या समोरून ये जा करताहेत
आणि ती तुला दाखवते आहे – मुका कसा घेतात ते.
तू स्वतःशीच म्हणतोस, वेड लागलंय हिला
कारण प्रसंगाच्या चौकटीत बसत नाही ती
ज्यांचं बळ कधीच सरत नाही,
अश्या माणसांचा आत्मविश्वास घेऊन वावरणारी
अन तिला पलिकडच्या तिरावर जायचंय

तिच्या हातात हात घेऊन
तुला तिच्यासोबत जावंसं वाटतंय
फार प्रेम आहे तुझं तिच्यावर
पण तुझ्या भावनांचा अजून विचारांशी लढा चाललाय
आणि तुला तिला आत्ता सांगायचंय
मला निघायला हवंय, सगळं संपलंय
पण तुझे हात तिने हातात घेतलेत
आणि तुझ्या ओठांतून शब्द फुटत नाहीयेत

येशूने हे दाखवून दिलंय
की चमत्कार अजुनही घडतात
भीतीपासून मुक्त असणाऱ्याला
पाण्यावर चालत जाता येतं
ती एकटं सोडून गेली
तर तुला फार वाईट वाटेल
तरीही इकडचे पहाड तिकडे करण्याऐवजी
तू वेळ काढतो आहेस
ती नजरेने तुला विचारते आहे
आणि तुझ्या ओठांतून शब्द फुटत नाहीयेत

नदीकाठच्या बाकावर
सुसान तुझ्याकडे बघून हसते आहे.
तिच्या योजना तू ऐकतो आहेस
तुझ्या मनात चुकणाऱ्या बसचा विचार आहे
तुम्हा दोघांच्यावर आकाशामध्ये
घारी घिरट्या घालताहेत
हळुहळू प्रकाश मंदावतोय
थंडी वाढते आहे, तुला जाणवतंय
तू पाण्याकडे टक लावून बघतो आहेस
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
कुणाकडेच नाहीत
तुमच्यापुढे वर काय वाढून ठेवलंय
ते सुसानलाही ठावूक नाही
ती उठलेली तू बघतोस

तिच्या हातात हात घेऊन
तुला तिच्यासोबत जावंसं वाटतंय
फार प्रेम आहे तुझं तिच्यावर
पण तुझ्या भावनांवर विचारांनी जय मिळवलाय

***********************************************************************
    हेरंब तुझा खो वाया घालवल्याबद्दल स्वारी. मावसबोलीतल्या एखाद्या अस्सल कवितेचं मनापासून केलेलं भाषांतर टाकते लवकरच.
 
    आता कुणाला खो देऊ मी? अनुजा, अनघा आणि G (तुझा ब्लॉग इंग्रजी असला, तरी तिथे मी सुंदर मराठी कविता बघितल्या आहेत) – तुम्हाला माझा खो.

    ऑफिसच्या कामानिमित्त थोडया दिवसांसाठी हानोवरला आले आहे. रोज दिवसभर कामच चालतं, त्यामुळे गावात फेरफटका मारला नव्हता. काल ती संधी मिळाली.

    हानोवरला पर्यटक फारसे येत नाहीत. पर्यटकांनी आवर्जून यावं असं इथे काहीच नाही. पण चुकूनमाकून कुणी आलंच, तर त्यांना आपलं गाव बघता यावं, म्हणून हानोवरच्या सगळ्या प्रेक्षणीय जागी घेऊन जाणारा एक लाल पट्टा रस्त्यावर आखला आहे. मुख्य रेल्वे स्टेशनपासून सुरुवात करून गावातली सगळी प्रेक्षणीय स्थळं बघून पुन्हा स्टेशनवर आणून सोडणारी ही चार – साडेचार किलोमीटरची वाट आहे. काल या वाटेवरून हानोवरमध्ये भटकले. सगळ्यात दुष्टपणा म्हणजे जिथून ही वाट सुरू होते, तिथेच नेमकं काही बांधकाम चालू आहे, आणि रस्त्यावर कुठेच लाल पट्टा नाही. पंधरा मिनिटं शोधल्यावर पुढे तो पट्टा सापडाला. काही वैशिष्ठ्यपूर्ण वास्तुरचना, जुनी चर्च, ज्यूंचं स्मारक असं बघत बघत टाऊन हॉलला पोहोचले. अतिशय सुंदर वास्तू आहे ही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इथे बांधकाम सुरू करण्यापूर्वी दलदल होती – तिथे भराव घालून त्यावर देखणी इमारत बांधली आहे. घुमटाच्या वरून शहराचं विहंगम दृष्य बघायला मिळावं, म्हणून वर घेऊन जाणारी खास लिफ्ट आहे. घुमटाच्या सौंदर्याला बाहेरून किंवा आतून बाधा न आणता आपल्याला चाळीस मीटरपेक्षा जास्त उंच नेणारी ही लिफ्ट घुमटाच्या आकाराप्रमाणे वळत, १५ अंशात तिरपी वर जाते (जर्मन इंजिनियरिंग!), आणि आपण जमिनीपासून सुमारे १०० मीटर उंचीवर येऊन पोहोचतो. वरून दिसणारं गावाचं विहंगम दृष्य खासच.

    नवा टाऊन हॉल वगळता अगदी आवर्जून बघायला म्हणून जावं, असं इथे फारसं काही नाही. साधं गावासारखं गाव. तरीही त्याचा खरा चेहेरा दिसल्यावर एखादं गाव तुम्हाला आवडून जातं. काल असंच झालं. ‘लाल वाटेवरून’ जाता जाता पायाचे तुकडे पडायची वेळ आली होती. सहा तास भटकून झालं होतं, आणि आता नवं काही बघायला डोळे, कॅमेरा, पाय उत्सुक नव्हते. हवा फारशी उबदार नव्हती. थोडक्यात, छान कुठेतरी बसून कॉफी घ्यावी असा मूड होता. आता अश्या वेळी मस्त टेबल बघून रस्त्यावरच्या कॅफेमध्ये बसायचं, का ‘काफे टू गो’ घ्यायची? तंद्रीमध्ये ‘काफे टू गो’ ऑर्डर केली, आणि आता कुठे निवांत बसायला मिळणार म्हणून स्वतःवरच वैतागले. सुदैवाने मार्केट चर्चशेजारी वार्‍यापासून आडोश्याला एक बाक होता. तिथे बसकण मारली, आणि कॉफी प्यायले. शेजारीच उघड्यावर एक पुस्तकांचं कपाट होतं. मी तिथे १५-२० मिनिटं बसले असेन. तेवढया वेळात एक काकू पुस्तकं बघून गेल्या. एक तरूण छानसं स्माईल देत आला, एक पुस्तक ठेवून दुसरं घेऊन गेला, एक जोडगोळी येऊन पुस्तकं बघून गेली. कसली पुस्तकं आहेत म्हणून मी ही डोकावले. आत डॅफ्ने ड्यू मॉरिएची कातडी बांधणीमधली जुनी ‘रेबेका’ होती. फ्रेड्रिक फोरसिथ होता. काही कॉम्प्युटरविषयक पुस्तकं होती. नवी, जुनी, वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं. एक कपाट भरून. बाजाराच्या चौकात ठेवलेली. कपाटावर लिहिलं आहे,

    “हे आपल्या शहरातलं पुस्तकांचं कपाट आहे. तुम्ही इथली पुस्तकं कधीही घेऊ शकता, स्वतः शोधू शकता. तुम्ही इथली पुस्तकं वाचा. त्यासाठी ती घरी न्यायला काहीच हरकत नाही. इथलं पुस्तक घेऊन तुमच्याकडचं दुसरं पुस्तक त्याच्याजागी आणून ठेवू शकता. तुम्हाला ते आवर्जून वाचावंसं वाटलं, म्हणजे ते नक्कीच इतरांनीही वाचण्यासारखं आहे. तेंव्हा तुमचं वाचून झाल्यावर इतरांना वाचायला ते परत कपाटात ठेवायला विसरू नका. तुमच्याकडे भरपूर पुस्तकं असतील, आणि तुम्ही ती इथे आणून ठेवू इच्छित असाल, तर या कपाटात मावतील एवढीच पुस्तकं ठेवा.”

    मी हानोवरच्या प्रेमात पडले आहे. कारण इथे असं पुस्तकांचं कपाट आहे, आणि त्याचा वापर करणारी माणसं आहेत. टाऊन हॉलच्या घुमटाच्या शंभर मीटर उंचीवरून दिसणार्‍या देखाव्याइतकंच पाच फुटावरून बघितलेलं हे जुनं कपाटही मनोहर आहे.

*******************************
(फोटो काढलेत, पण कार्ड रीडर सोबत आणला नाहीये. त्यामुळे पुण्याला परतल्यावर फोटो टाकेन थोडेफार.)

हरेकृष्णजींची ही पोस्ट वाचली, आणि निकोलाउस लेनाऊ (Nikolaus Lenau) या ऑस्ट्रियन कवीची Die drei Zegeuner (तीन जिप्सी) ही कविता आठवली. लेनाऊची मूळ कविता बॅलड प्रकारची – म्हणजे गेय आहे. हा त्या कवितेचा मी केलेला स्वैर अनुवाद …

************************************************************
एकदा माझी थकली भागलेली गाडी
रेताड माळरानावरून
रडत खडत चालली होती
तेंव्हा कुरणामध्ये मला तीन जिप्सी दिसले.

सायंकाळच्या प्रकाशात उजळून
त्यांच्यातला एकजण आपल्याचसाठी
हातातल्या सारंगीवर
एक मनस्वी गाणे छेडत होता

दुसर्‍याच्या हातात चिलीम होती
आणि जगातल्या आणखी कुठल्याच गोष्टीची
गरज नसावी अश्या समाधानात
तो चिलीमीच्या धुराकडे बघत होता

तिसर्‍याने आपल्या झांजा एका झाडावर अडकवून
मस्त ताणून दिली होती
झांजांच्या दोरीवरून वार्‍याची झुळुक जात होती
आणि त्याच्या हृदयावरून एक स्वप्न चाललं होतं

तिघांच्या फाटालेल्या कपड्यांवर
रंगीबेरंगी ठिगळं होती
पण नियतीवर
तिघांनीही मात केली होती

आयुष्य आपल्यावर रुसतं तेंव्हा
त्याला कसं झटकून टाकायचं
हे झोपून, चिलीम ओढून, सारंगी वाजवून
तीन प्रकारे त्यांनी मला दाखवलं होतं.

जिप्सींचे सावळे चेहेरे
आणि काळेभोर केस
कितीतरी वेळ बघितल्यावर
पुढे जाणं भाग होतं

************************************************************

बेरटोल्ड ब्रेख्त हा एक जर्मन साहित्यातला दिग्गज. डाव्या विचारसरणीचा ब्रेख्त आपल्याला भेटलेला असतो तो पुलंनी मराठीत आणलेल्या ‘तीन पैश्याच्या तमाशा’मुळे, किंवा त्याने आणलेल्या रंगभूमीवरच्या नव्या प्रवाहांमुळे.

ब्रेख्तच्या एका कवितेचा हा मराठी स्वैर अनुवाद …

*****************************************************

वाचणाऱ्या कामगाराचे प्रश्न

सात दरवाजे असणारं थेबेस कुणी बांधलं?
पुस्तकांमध्ये बांधणाऱ्या राजांचे उल्लेख आहेत.
हे राजे स्वतः त्या शिळा वाहत होते का?
आणि अनेक वेळा बेचिराख झालेलं बॅबिलॉन
इतक्या वेळा परत कुणी बांधलं? सोन्याने भरलेल्या लिमा शहराच्या
कुठल्या घरांमध्ये तिथले बांधकाम कामगार राहत होते?
चीनची भिंत बांधून पूर्ण झाल्यावर
संध्याकाळी तिथले सगळे गवंडी कुठे गेले?
भव्य रोममध्ये
कितीतरी विजयाच्या कमानी आहेत. कुणी बांधल्या या?
सिझरचे हे सगळे विजय कुणाविरुद्ध होते?
एवढा बोलबाला असणाऱ्या बायझांझमध्ये
सगळ्या रहिवाश्यांसाठी फक्त प्रासादच होते का?
महासागरामध्ये रात्री अटलांटिस बुडत होती तेंव्हासुद्धा
मालक त्यांच्या गुलामांना आज्ञा सोडत होते.
तरूण अलेक्झांडरने भारतात विजय मिळवले.
त्याने एकाट्याने?
सिझर गॉल्सशी लढला.
त्याने सोबत किमान एक आचारी तरी नेला असेल ना?
आपलं आरमार बुडाल्यावर स्पेनचा फिलिप रडला.
दुसरं कुणीच रडलं नाही?
पानापानागणिक विजय.
विजयाच्या मेजवानीसाठी कोण खपलं?
दर दहा वर्षांकाठी एक महापुरुष.
त्याची किंमत कोण चुकती करतं?
इतक्या गोष्टी,
इतके प्रश्न.

*****************************************************

मीही कामगारच आहे. जरा ‘ग्लोरिफाईड’ कामगार म्हणा फार तर. ब्रेख्तच्या कामगाराएवढं माझं जगाच्या इतिहासाचं वाचन नाही. पण आपल्या इतिहासातला ‘सोन्याचा धूर निघणारा काळ’ वाचताना मलासुद्धा हे प्रश्न पडले होते 🙂

मूळ जर्मन कविता इथे सापडेल.

    ऍनच्या ८० व्या वाढदिवसाची बातमी पाहिली तेंव्हापासून लिहायचं होतं तिच्याविषयी. महेंद्र काकांनी शिंडलर्स लिस्टविषयी लिहिलं आणि पुन्हा आठवण करून दिली.

***********************************************

    ऍन फ्रॅंक पहिल्यांदा भेटली कॉलेजमध्ये असताना. तिच्या डायरीचा मराठी अनुवाद वाचताना. पहिल्या भेटीतच चटका लावून गेली, पण आधाश्यासारखं वाचत गेलं म्हणजे वाचलेलं पचवायला फारसा अवधी मिळत नाही. हळुहळू मी तिला विसरले.

    पुढच्या वेळी आमची भेट झाली ती स्टाइलिस्टिक्समध्ये … भाषांतर कसं करू नये याचा उत्तम नमुना म्हणून! ऍन फ्रॅंकने तिची डायरी लिहिली डच भाषेत. डच मधून जर्मन, इंग्रजी, फ्रेंच अशी ती हळुहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होत होत जगभर पोहोचली. प्रत्येक भाषांतरकारने `ये हृदयीचे ते हृदयी’ करताना थोडंफार गाळलं होतं, आणि एका भाषांतरावरून दुसरं भाषांतर अशी भाषांतरं झाल्यामुळे कानगोष्टींसारखी गत झाली होती. मूळ डयरी म्हणजे पौगंडावस्थेतल्या ऍनची जीवाभावाची सखी होती. त्यात तिने आपल्या आईवडिलांविषयी, नव्यानेच जाग्या होत असणाऱ्या लैंगिक जाणिवांविषयी मोकळेपणाने लिहिलं होतं. ही भाषांतरावरून केलेली भाषांतरं अधिकधिक सोज्ज्वळ होत गेली, आणि त्याच वेळी खऱ्या ऍनपसून दूरही. या अभ्यासाच्या निमित्ताने ऍनची डायरी इंग्रजी, मराठी, जर्मन मधून वाचली. त्या वेळी आमच्यावर हिटलर, थर्ड राईश आणि दुसऱ्या महायुद्धाविषयीच्या इतक्या पुस्तकांचा मारा होत होता, की ऍन पुन्हा एकदा विस्मृतीमध्ये गेली.

    पुन्हा एकदा वर्षभरापूर्वी ऍनच्या भेटीचा योग आला … ऍमस्टरडॅम बघताना. इतक्या वर्षांपासून माहित असलेली गोष्ट. नुकतीच डाखाऊची छळछावणी बघितलेली. एवढ्या छळकथा ऐकल्यावर अजून काय धक्का बसणार ऍनचं घर बघताना? त्यामुळे गावातल्या टूरिस्ट ऍटॅक्शन्सपैकी एक आयटम – आलोच आहोत तर बघू या असा दृष्टीकोन होता ऍन फ्रॅंक म्युझियमला जाताना. पण ऍनने पुन्हा एकदा रडवलं. अंगावर येणाऱ्या त्या छोट्याश्या जिन्याने वर जाताना ऍनच्या डायरीमधलं वास्तव समोर आलं. एवढ्याश्या जागेत महिनोनमहिने एवढी माणसं कशी राहिली असतील? बिग बॉसचा पहिलाच एपिसोड बघून मी नवऱ्याला म्हटलं होतं … कुणी मला कितीही पैसे दिले तरी अश्या बंदिस्त घरात मी दोन दिवसांच्या वर काही नॉर्मल राहू शकणार नाही. दिवसरात्र घरातच राहायचं. घराबाहेर पडणं सोडा, पण खिडकीचा पडदासुद्धा वर करायचा नाही. दिवसा कामगार खाली काम करत असताना पाण्याचा नळ, फ्लश असले आवाज होऊ द्यायचे नाहीत. रात्री खालच्या कारखान्यातली माणसं घरी गेली, म्हणजे थोडी फार मोकळीक जिन्याने खाली – वर करायला, थोडा आवाज करायला. देश जर्मनीच्या कब्जामध्ये. जगभर युद्ध पेटलेलं. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा. त्यात कधी नव्हे तेवढा कडक हिवाळा. बाहेरच्यांनी जिवावर उदार होऊन त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू कश्या पुरवल्या असतील? गोष्ट एका दिवसाची नाही. महिने च्या महिने असं जगायचंय. हा अज्ञातवास कधी संपणार माहित नाही. त्यांचं मनोबल कसं टिकून राहिलं असेल? असं दिवाभीतासारखं अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा छळछावणीतल्या यातना परवडल्या असं नसेल वाटून गेलं या माणसांना? खिडक्यांच्या पडद्याच्या फटीतून बाहेर बघताना बारा तेरा वर्षाच्या ऍनला कसं दिसलं असेल जग?

    काही दिवसांपूर्वी जर्मन बातम्यांमध्ये ऐकलं … ऍन फ्रॅंक आज जिवंत असती तर ८० वर्षांची झाली असती. ८० वर्षांच्या आयुष्यात बघावं लागणार नाही एवढं तिने १५ – १६ वर्षात भोगलंय. ऍन कशी म्हातारी होईल? जगायला उत्सुक असणारी एक टीनेजर मुलगी म्हणून ती मनाच्या कोपऱ्यात कायमची जाऊन बसलीय.

***********************************************

    ऍनच्या आयुष्यावर ऑस्कर विजेता हॉलिवूडपट आहे. पुन्हा एकदा तिचं आयुष्य अनुभवायची माझी तरी तयारी नाही सद्ध्या. पण तुम्हाला मिळाला तर आवश्य बघा.

(ऍनचं छायाचित्र जालावरून साभार)

साब्रिये टिंबरकेन नावाची एक जर्मन मुलगी आहे. तिने कॉलेजमध्ये तिबेट आणि चीनच्या संस्कृतींचा, भाषांचा अभ्यास करायचं ठरवलं. हा अभ्यास करायला मोठ्ठी अडचण होती. कारण साब्रिये नेत्रहीन आहे, आणि तिबेटी भाषेसाठी आजवर कुणी ब्रेल लीपी तयारच केली नव्हती. अशा वेळी तुम्ही काय कराल? जगात तिबेट सोडून बाकी एवढया संस्कृती पडलेल्या आहेत. दुसरी कुठली तरी संस्कृती निवडयची ना मग अभ्यासासाठी. साब्रियेचं मित्रमंडळ, शिक्षकवर्ग यांनीसुद्धा तिला हाच सल्ला दिला. पण साब्रिये ने वेगळंच काही करायचं ठरवलं. तिने स्वतःच तिबेटी भाषा ब्रेलमध्ये लिहिण्याची पद्धत विकसित केली, आणि तिबेटचा अभ्यास केला.

जी भाषा ब्रेलमध्ये कशी लिहावी याचा आजवर कोणी विचारही केला नव्हता, ती भाषा बोलणाऱ्या अंध लोकांची परिस्थिती काय असेल? त्यांना निश्चितच शिक्षण घेता येत नसणार. काय करत असतील तिबेटमधली अंध मुलं? साब्रियेला प्रश्न पडला. तिने स्वतःच तिबेटला जाऊन हे बघायचं ठरवलं. डोळे नसणारी मुलगी हे सगळं कसं बघणार? तिला तिथे कोण घेऊन जाणार? पण साब्रियेला कुणाबरोबर जायचंच नव्हतं. आजवर आपल्या भोवताली असणारं सुरक्षित, ओळखीचं जग तिला सोनेरी पिंजऱ्यासारखं वाटत होतं. तिथून बाहेर पडून, स्वतःच्या हिंमतीवर नवं जग अनुभवण्याची तिला अनिवार इच्छा होती.

साब्रिये एकटी तिबेटला गेली. तिथल्या अंध मुलांची, मोठ्यांची परिस्थिती तिने स्वतः अनुभवली. सगळे सरकारी अडथळे पार करत, जिथे कुठे शाळेच्या वयाच्या अंधळ्या मुलामुलींची माहिती मिळेल, त्या तिबेटच्या दुर्गम खेड्यापाड्यात ती स्वतः गेली. या मुलांच्या घरच्यांशी बोलली. त्या मुलांना ल्हासाला घेऊन आली, आणि तिने या मुलांसाठी शाळा सुरू केली. पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरच या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, कुणाच्या दयेवर जगण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची उमेद जागी करणं, त्यांना स्वप्नं देणं हे या शाळेने केलेलं काम. शाळेचं उद्दिष्ट आहे एक दिवस या मुलांना शाळेबाहेरच्या जगात स्वतंत्रपणे जगण्याइतकं सक्षम बनवणं.
ज्या सहजतेने साब्रियेने तिबेटला जाण्याचा निर्णय घेतला, तिला साजेशा सोप्या सरळ भाषेत तिने तिचे हे अनुभव शब्दबद्ध केले आहेत, ‘Mein Weg führt nach Tibet ‘ या पुस्तकात. जमेल तसं ते मराठीमध्ये मांडण्याची इच्छा आहे.

गेल्या १० नोव्हेंबरला ’क्रिस्टालनाख्त’ ला ७० वर्षे पूर्ण झाली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून बर्लिनमध्ये चॅन्सलर आंगेला मार्केल यांच्या हस्ते एका सिनेगॉगचं उदघाटन होतं. सर्व उपग्रह वाहिन्यांवरच्या बातम्यांमध्ये ती एक ठळक बातमी होती. योगायोग म्हणजे बर्लिनची भिंतसुद्धा १९८९ मध्ये १० नोव्हेंबरलाच पडली. खरं तर हा जर्मनीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा प्रसंग. पण आज त्याची आठवण म्हणून कुठेही आनंदोत्सव साजरा होतांना दिसत नाही. १० नोव्हेंबरला असलेल्या ‘क्रिस्टालनाख्त’च्या पार्श्वभूमीमुळे जर्मन एकीकरणाचा दिवस सुद्धा १० नोव्हेंबर ऐवजी ३ ऑक्टोबरला साजरा करतात! बर्लिनची भिंत पडण्यापेक्षा जास्त महत्त्व मिळणारा हा ’क्रिस्टालनाख्त’प्रकार आहे तरी काय?

’क्रिस्टालनाख्त’ ही नाझी राजवटीमध्ये म्युनिकमध्ये घडलेली एक ऐतिहासिक घटना. हा प्रसंग म्हणजे जर्मनीमध्ये हिटलरशाहीमधल्या ज्यूंवरच्या उघड अत्याचारांची सुरुवात होती. पोलीश ज्यूंच्या जर्मनीतून हद्दपारीचा परिणाम म्हणून १९३८ साली पॅरिसमधल्या जर्मन राजदूताची एका १७-१८ वर्षांच्या ज्यू विद्यार्थ्याने हत्या केली. या घटनेला नाझी प्रचारतंत्राने ज्यूंच्या जर्मन राष्ट्रविरोधी उठावाचं रूप दिलं, आणि हा ’उठाव शमवण्यासाठी’ हिटलरच्या आमदानीतली जर्मनीमधली पहिली ज्यूंची धरपकड म्युनिकमध्ये झाली. त्यांची घरं, दुकानं जाळली गेली. म्युनिकच्या रस्त्यावर फुटलेल्या काचांचा सडा पडला, आणि लागलेल्या आगीमुळे हे दृष्य कुणा नाझीला ’स्फाटिकांसारखं’ सुंदर दिसलं, म्हणून या रात्रीला नाझींनी अभिमानाने ’क्रिस्टालनाख्त’ (स्फटिकांची रात्र) असं नाव दिलं. या घटनेचे देशात किती पडसाद उमटतात याचा नाझींनी अंदाज घेतला. ज्यूंच्या धरपकडीविरुद्ध विशेष कुठे प्रतिक्रिया उमटली नाही, आणि मग जर्मनीमध्ये राजेरोसपणे, मोठ्या प्रमाणावर ज्यूंची गळचेपी सुरू झाली. आज म्युनिकमध्ये राहताना या साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या इतिहासाकडे इथले लोक कसं बघतात हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. सगळं जग ज्या कृत्यांकडे सैतनी म्हणून बघतं, ती आपल्या देशात, आपल्या आईवडिलांच्या काळात घडली. आपले आईवडील, आपले काका-मामा या सगळ्यात समील होते, किंवा मूग गिळून बसले होते ही केवढी लाजिरवाणी गोष्ट वाटत असेल त्यांच्या वंशजांना!

इथे राहतांना जर्मन इतिहासाचे आणि वर्तमानाचे काही नवीनच पैलू समजले.

पहिला प्रश्न होता तो छळछावणीमधल्या पहारेकऱ्यांचा. बंद्यांवर इतका प्रदीर्घ काळ इतके अत्याचार सातत्याने करवले तरी कसे? एकादा माणूस दुष्ट असू शकतो. पण एकजात सगळे पहारेकरी इतके आंधळे होते? तर डाखाऊची छळछावणी बघताना समजलं, की छळछावणीमध्ये काम करणाऱ्या नाझी पहारेकऱ्यांचं सरासरी वय होतं १६ ते १८ वर्षे! या मुलांमध्ये काही वेळा आजच्या दिवसात किती ज्यू मारले अशा पैजासुद्धा लागत. मध्ययुगीन युरोपातल्या ‘धर्मयुद्ध’ खेळण्यासाठी तयार केलेल्या बारा-पंधरा वर्ष वयाच्या सैनिकांसारखं किंवा आजच्या अतिरेक्यांसारखं त्यांचं पूर्ण ब्रेनवॉशिंग झालेलं होतं.

आजच्या जर्मनीमधल्या ज्यू आणि ख्रिश्चन समाजाचे परस्पर संबंध कसे आहेत याचाही शोध घ्यावासा वाटला.म्युनिकची दुसऱ्या महायुद्धामधल्या बॉम्बिंगमुळे खूपच पडझड झाली होती. युद्ध संपल्यावर ६०% शहर पुन्हा उभारावं लागलं. म्युनिकमधलं प्रसिद्ध ’मारिएन चर्च’सुद्धा पुन्हा उभं केलं गेलं. या चर्चमध्ये युद्धानंतरच्या पुनर्निमाणासाठी ज्यांनी हातभार लावला, त्या संस्थांची चिन्हं काढलेली आहेत. त्यामध्ये एक ज्युईश कॅंडलस्टॅंडचं चिन्ह आहे. चर्चमध्ये ज्यू कॅंडलस्टॅंडचं चित्रं? म्युनिकच्या ज्यू समाजाने या चर्चच्या बांधणीसाठी देणगी दिली होती. आणि अशीच देणगी म्युनिकच्या कॅथोलिक चर्चनेसुद्धा ज्यूंचं बेचिराख झालेलं सिनेगॉग बांधण्यासाठी तेंव्हा दिली होती. हिटलर जसा ज्यूविरोधी होता, तसाच त्याचा अन्य धर्मांनासुद्धा विरोध होता. ख्रिश्चन धर्मगुरूंनाही त्याने छळछावण्यांमध्ये डांबले होते. तो स्वतःला निधर्मी – atheist – समजत असे. त्यामुळे संघर्ष सर्व धर्म विरुद्ध हिटलर असा होता … ज्यू विरुद्ध ख्रिश्चन असा नाही.

एकदा आमच्या जर्मन शिक्षिकेने दिल्लीमध्ये भारत – पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष बघितला. हा खेळातला विजय आहे का युद्धातला असा प्रश्न पडला तिला. आताआतापर्यंत फुटबॉल मॅचमध्ये जर्मन संघ जिंकला तर जर्मनीचं राष्ट्रगीतसुद्धा वाजत नसे. ‘Das Lied der Deutschen’ (The song of the Germans) हे १९२२ पासून जर्मन राष्ट्रगीत आहे. वायमार प्रजासत्ताकाच्या काळात ते राष्ट्रगीत झालं, नाझी जर्मनीमध्येही वापरलं गेलं, आणि युद्धानंतर पश्चिम जर्मनीने परत हेच राष्ट्रगीत निवडलं. कित्येकांना हे नाझी वापरामुळे कलंकित झालेलं राष्ट्रगीत बदललं पाहिजे असं वाटतं. प्रसिद्ध जर्मन नाटककार आणि साहित्यिक बेर्टोल्ड ब्रेख्त याचं एक गाणं आहे – Kinderhymne नावाचं. त्याला राष्ट्रगीताचा दर्जा द्यावा अशी एक मागणी होत असते. दर वर्षी ३ ऑक्टोबरला जर्मन एकीकरण दिवसाची सुट्टी असते – पण चुकूनही कुठे मार्चपास्ट, ध्वजवंदन असे काही कार्यक्रम होत नाहीत. आपल्या राष्ट्रीय भावनेचं चुकूनसुद्धा कुठे प्रदर्शन करत नाहीत हे लोक.

आज म्युनिक हे विदेशी पर्यटकांचं एक मोठं आकर्षण आहे – इथला सुंदर निसर्ग, आल्प्सपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे ट्रेकिंग / स्किईंगला जाण्यासाठी सोयीचा बेस, आणि बाकी जर्मनीपासून हटके असणारी म्युनिकची खास एक वेगळी संस्कृती यामुळे बर्लिनच्या बरोबरीने परदेशी पर्यटक म्युनिकमध्ये येतात. पण म्युनिकला एक अंधारी बाजूसुद्धा आहे – थर्ड राईशच्या काळातली. हिटलर मूळचा ऑस्ट्रियाचा असला, तरी तो राजकीय क्षितिजावर पुढे आला, तो म्युनिकमधून. त्याचा बीअर हॉलमधला फसलेला उठाव इथेच झाला. ’क्रिस्टालनाख्त’ पण म्युनिकमध्येच. पहिली आणि ’आदर्श’ छळछावणी म्युनिकजवळ डाखाऊ मध्ये. विदेशी पर्यटकांपासून म्युनिक हा सगळा काळा इतिहास लपवून ठेवणार का? अनुल्लेखाने किंवा downplay करून त्याचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न करणार का? हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. म्युनिकची प्रवासी माहिती देणाऱ्या साईट्स आवर्जून या इतिहासाचा उल्लेख करतात.हे परत घडू नये म्हणून त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याचं भीषण स्वरूप लोकांना समजले पाहिजे असा दृष्टीकोन आहे. म्युनिकमध्ये, किंवा हाम्बुर्गसारख्या lively शहरामध्ये फिरताना आपण मध्येच या इतिहासाला ठेचकाळतो.एखाद्या सुंदर भागातून फिरतांना सहज खाली लक्ष गेले तर फुटपाथच्या टाईल्समध्ये मध्येच एक छोटीशी पितळी पाटी असते … अमुक तमुक ज्यू इथे राहत होता – या या दिवशी नाझींनी त्याला पकडून नेलं,अमुक अमुक छळछावणीमध्ये डांबून ठेवलं, या तारखेला त्याला मृत्यू आला. एकदम दाताखाली खडा आल्यासारखं होतं.बर्लीनमध्ये एक मोठं स्मारक आहे हिटलरशाहीमध्ये भरडल्या गेलेल्या युरोपातल्या सगळ्या ज्यूंचं. पण मोठं स्मारक एखाद्या दिवशी बघितलं जातं, दुसऱ्या दिवशी आपण परत आपल्या विश्वात परत येतो. या छोट्या पाट्या तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग असतात. त्या तुम्हाला रोज आठवण करून देतात. मला असं वाटतं की अशी स्मारकं उभी करण्यासाठी खूप धैर्य लागतं.

कुठलाही समाज समजून घेणं ही प्रक्रिया न संपणारी असते.ही फक्त त्या प्रक्रियेमधली एका टप्प्यावरची निरिक्षणं.

*******************************
हा लेख मी शब्दबंध २००९ मध्ये वाचला होता.

एक होता राजा. त्याला पुस्तकांच्या राज्यात हरवून जायला आवडायचं. हुजऱ्यांच्या गर्दीमध्ये राहण्यापेक्षा एकान्त आवडायचा. निसर्ग आवडायचा. संगीत वेडावून टाकायचं. सुंदर सुंदर वास्तू बांधण्याची स्वप्नं पडायची. दरबाराची कटकारस्थानं विसरून तो काव्यानंदात बुडून जायचा.

असा राजा काय कामाचा? राजाने राज्य केलं पाहिजे. राज्य वाढवलं पाहिजे. शत्रूंबरोबर लढाया केल्या पाहिजेत. दरबारातल्या कारस्थानी लोकांवर नजर ठेवायला पाहिजे. जमलंच, तर प्रजेच्या भल्यासाठीसुद्धा काहीतरी करायला पाहिजे. एवढा कवीमनाचा, संवेदनाक्षम आणि अंतर्मुख माणूस काय राज्य करणार? मध्ययुगातल्या राजेपणाच्या सगळ्याच निकषांवर पार कुचकामी ठरणारा राजा निपजला हा. त्याला सत्तेपासून दूर करण्याचा सोपा मार्ग शोधला दरबारी मंडळींनी. राजा वेडा आहे म्हणून जाहीर केलं. दूर एकाकी अशा एका वाड्यामध्ये त्याची पाठवणी केली. आणि अगदी मोजक्या दिवसात, या वेड्या राजाने जवळच्या नदीमध्ये ’आत्महत्या केली’. राजाला वेडा घोषित करणाऱ्या मानसोपचारतज्ञाचं पण प्रेत त्याच नदीमध्ये ’योगायोगाने’ सापडलं.

पण त्या राजाने त्याच्या सुंदर वास्तू उभारण्याच्या वेडामुळे काहीतरी जगावेगळं निर्माण करून ठेवलं होतं. आजसुद्धा हे अर्धं पुरं झालेलं स्वप्न बघितलं, म्हणजे वाटतं, बाबा रे, तू राजा का झालास? तुला राज्यकारभारात काडीचाही रस नव्हता. आपल्या प्रजेकडे दुर्लक्षच केलं असणार तू. त्याऐवजी तुला जर एक कलाकार म्हणून जगायची संधी मिळाली असती तर? जितक्या औदार्याने तू तुला सापडलेल्या कलाकारांना राजाश्रय दिलास, तसा तुला कोणी राजाश्रय दिला असता तर?

लुडविग दुसरा हा बव्हेरियाचा राजा. बव्हेरिया म्हणजे तेंव्हाच्या युरोपातलं एक प्रबळ राज्य. लुडविग हा रिचर्ड वागनर या संगीतकाराचा चाहता. नुसता चाहताच नाही, तर त्याच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्याने वागनरला कधी पैशाची कमतरता पडू दिली नाही. वागनरच्या संगीताच्या सन्मानार्थ राजाने एक सुंदर किल्ला बांधला. या पूर्ण किल्ल्यामध्ये त्या राजाची राजचिन्हं, प्रतिकं कुठेच दिसत नाहीत. हा किल्ला लुडविगने बांधला याचा साधा उल्लेख सुद्धा कुठे नाही. किल्ल्यातली सगळी महत्त्वाची दालनं वागनरच्या प्रसिद्ध रचनांवर आधारित सजावटीने मढलेली आहेत. तिथे वागनरचं संगीत कायम ऐकायला मिळावं अशी लुडविगची इच्छा होती. किल्ल्याची बांधणी खरोखर परिकथेत शोभावी अशी. वॉल्ट डिस्नेने त्याचा परिकथेतला किल्ला या किल्ल्यापसून स्फूर्ती घेऊन बनवला! एवढ्या मोठ्या मनाचा (किंवा अव्यवहारी) राजा जगात दुसरा कोणी नसेल. तर अशा या ’अनफिट’ राजाचं हे संगीतमय स्वप्न म्हणजे नॉयश्वानश्टाईन (Neuschwanstein) चा किल्ला. म्युनिकपासून एका दिवसात बघून येण्यासारखी एक अनोखी जागा. चारही बाजूंनी जंगलाने, डोंगरांनी वेढलेला. बघितल्यावर फक्त एकच मनात आलं, अप्रतिम. बाकी राजा म्हणून, एक माणूस म्हणून लुडविग वेडा, शहाणा कसा का असेना, या एका किल्ल्यासाठीसुद्धा त्याला मानलं पाहिजे. (लुडविगने एकूण सहा किल्ले बांधले बव्हेरियामध्ये. आमच्या ’दहा मार्कांचा ज्ञानेश्वर’ श्टाईल प्रवासामुळे यंदा त्याचा एवढा एकच किल्ला बघितला आम्ही.)

किल्ला कसा दिसतो, ते मी सांगण्यापेक्षा फोटोमधूनच जास्त चांगलं समजेल. वर टाकलाय तो मोठा फोटो मुख्य प्रवेशद्वारामधून काढलेला. प्रवेशद्वाराच्या कमानीमुळे या फोटोला एक वेगळा गेट़अप येतोय असं मला वाटलं, म्हणून काढलेला. नाहीतर नॉयश्वानश्टाईनचे प्रसिद्ध फोटो वेगळ्या ऍंगलमधले असतात. (दोन नंबरचा फोटो आहे तसा.) अजून फोटो पिकासावर नक्की टाकते – सद्ध्या माझा लॅपटॉप मेलाय … इथे तात्पुरता वापरण्यासाठी दिलाय ऑफिसने. त्याच्यावर पिकासा install नाही करत बसत आता – आठवडाभरात परत सगळं uninstall करून, मिळाला तसा परत करायचा आहे लॅपटॉप. त्यामुळे बाकी फोटो नंतर.)