Archives for category: दिनविशेष


गेली काही वर्षं जमेल तसं बाप्पा घरी बनवणं चाललंय. या वर्षीची प्रगती म्हणजे मागच्या वर्षी विसर्जन केल्यावर माती ठेवून दिली होती, तीच वापरली. विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर एक मातीचा केक तयार झाला होता. तो कुटून, चाळून घेतल्यावर नवी कोरी माती तयार! कुटायला फारसे कष्ट पडले नाहीत. आणि माती भिजायला जास्त वेळ द्यायची तयारी असेल तर माती चाळायची अजिबातच गरज नाही असं नंतर लक्षात आलं. नवीन माती विकत आणण्यापेक्षा ते जास्त सोयीचं आहे मला. तसंही मातीचा पुनर्वापर केला नाही तर बाप्पा इको – फ्रेंडली कसा होणार?


बाप्पा रंगवणं अजून काही मनासारखं जमत नाहीये. पहिल्या काही प्रयत्नात पोस्टर कलर वापरून बघितले. पण मातीच्या मूर्तीवर मला ते फार भडक वाटतात. आणि चंदेरी –सोनेरी रंग वापरले तर त्यांचा तवंग येतो विसर्जनाच्या पाण्यावर. मग मागच्या वर्षी फक्त पांढरा आणि केशरी पोस्टर कलर वापरून बघितले. तेही तितकंसं आवडलं नव्हतं. मी केलेल्या मातीच्या मूर्तीचा पोत बाजारातल्या मूर्तीइतका सुबक नसतो. (बाप्पा, तितकी सुबक मूर्ती करायचा पेशन्स कधी येणार माझ्यात?) पांढरा रंग लावल्यावर मूर्तीचा खडबडीतपणा अजून उठून दिसतो आणि ते नीट गिलवा न करता चुना फासल्यासारखं वाटतं. मग या वर्षी गेरूचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. बेस म्हणून पांढरा रंग दिला, आणि मग त्यावर गेरू. (काही ठिकाणी गेरूमध्ये खालचा पांढरा मिसळून मार्बल टेक्श्चर आलंय ते आपोआपच.) आधी फक्त दाताला वेगळा रंग द्यायचा विचार होता, पण “डोळे काढच” म्हणून आग्रह झाल्यामुळे शेवटी डोळेपण केले. पांढर्‍या रंगापेक्षा चांगलं वाटलं हे. एकदा न रंगवता तशीच मूर्ती ठेवायची इच्छा आहे. रंगकामात अजून काही पर्याय सुचतोय का तुम्हाला? 


पण बाप्पाला इतका गडद रंग दिल्यावर सजावट कशी उठून दिसणार? मग लक्षात आलं, बाप्पाचा हा रंग मला अगदी सोयीचा आहे – मी सजावट करणार ती खर्‍या पानाफुलांचीच, आणि ती गेरूच्या रंगावर पुरेशी उठावदार दिसणार! 


या वेळी एक गंमत लक्षात आली – माती मळून झाल्यावर पहिल्यांदा मला काही सुचतच नव्हतं. मूर्ती करायला घेतांना आधी कितीतरी वेळ नुसते लाडू वळणंच चाललं होतं. कुठल्या क्रमाने करायची मूर्ती, काय प्रपोर्शन ठेवायचं हे काहीही आठवत नव्हतं. त्यामुळे फर्स्ट ड्राफ्ट आणि बिटा व्हर्जन झाल्याच. आणि बाप्पा बनवल्यावर मी उंदीरमामाला चक्क विसरून गेले होते! तो नंतर बनवला. (उंदीर मामा बघून माऊने सांगितलं, आई आता मी मनीमाऊ बनवणार! :D)
 
या वेळी चक्क बाप्पा चतुर्थीच्या आधी तीन – चार दिवस तयार होता. त्यामुळे ते तीन चार दिवस “आई बाप्पा आलाय का? अजून का झोपलाय तो?” या माऊच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचं काम होतं. 🙂      

तर अशी सगळी गंमत करून मग काल बाप्पा आलाय. आता त्याच्या माऊबरोबर गप्पा सुरू झाल्यात. आणि ते बघितल्यावर आपण वेळेवर मूर्ती पूर्ण करू शकलो याचं किती समाधान वाटतंय काय सांगू!

 


आज झोपतांना माऊला म्हटलं, “चल बाप्पाला गुड नाईट करू या. तू बाप्पाला सांग ’मी सारखे कारभार करणार नाही’ म्हणून, मी सांगते, ’माऊला सारखं रागवणार नाही’ म्हणून.”
“नको. आपण बाप्पाला म्हणू या, ’थॅंक यू बाप्पा!’”

 
म्हणजे घरी बनवलेला, घरी सजवलेला, घरी बसवलेला आणि घरीच विसर्जित केलेला बाप्पा.

यंदा बाप्पाचे दिवस जवळ आले तसे दुकानातले बाप्पा बघून माऊ इतकी खूश होती, की बाप्पा घरी असणं मस्टच होतं. विकत घेतलेला बाप्पा आम्ही बसवत नाही, त्यामुळे बाप्पा बनवणं ओघाने आलंच. मागे केलेल्या बाप्पाच्या अनुभवावरून यंदा त्यापेक्षा चांगला बाप्पा बनवायचे मनसुबे मी रचत होते.
पण सुरुवातीलाच माशी शिंकली. माती आधी जास्त घट्ट, मग जास्त सैल, ती थोडी वाळल्यावर बनवावी इतका वेळ नाही अशी सगळी गंमत गंमत झाली, आणि “होईल तसा करू” म्हणून मी तश्या सैल मातीचाच बाप्पा बनवला. जरा वेळाने थोडा वाळल्यावर अजून एक हात फिरवता येईल अशी आशा होती, पण थोड्या वेळानंतरची ती घडी काही आलीच नाही. बिचारा बाप्पा बनवला तसाच ओबडधोबड वाळून गेला. आणि मी पण “हम तो बना चुके” म्हणून तसाच तो रंगवला. खरं तर मागच्या अनुभवावरून बाप्पा शक्यतो रंगवायचा नाही असं ठरवलं होतं (मूर्ती पाण्यात विरघळल्यावर पोस्टर कलरचा – प्रामुख्याने दागिन्यांना वापरलेला सोनेरी रंगाचा – वर तवंग आला होता मागच्या वेळी. त्यामुळे न रंगवताच बसवायचा विचार होता आधी.) पण मूर्ती सुबक न झाल्याने नुसता पांढरा रंग द्यायचा ठरवला मग. 
असा बाप्पा चतुर्थीच्या तब्बल एक दिवस आधी तयार झाला, आणि मग पानाफुलांची आरास करून झाल्यावर एकदम वेगळाच भासायला लागला. मातीची मूर्ती आणि बाप्पा यातलं ट्रान्स्फॉर्मेशन खरंच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. पण आपणच केलेली, आतापर्यंत सगळ्या अंगांनी बारकाईने निरखलेली मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं.

माऊच्या उत्साहापुढे मूर्ती तयार होईपर्यंत आणि नंतरही कशी टिकाव धरणार याची मला फार शंका होती. “आपला बाप्पा आहे, त्याला हात नाही लावायचा, दूरूनच ‘मोरया’ करायचं” हे तिला कितीही पढवलेलं असलं तरीही. पण दुसर्‍या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी गप्पा मारतांना ऐकलं … “गुड मॉर्निंग बाप्पा … कसा आहेस? तुझी गाई झाली का? :)” आणि मग मी निश्चिंत झाले. बाप्पाचे पाच दिवस माऊला बाप्पा बाप्पा करत घरभर नाचतांना बघणं एवढं मोठं सुख नसेल. 

विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी बादलीत मूर्ती पूर्ण विरघळल्यावर “बाप्पा आता त्याच्या घरी गेलाय.” हे थोडंफार पटलंय, पण “आई आपला बाप्पा कुठे गेला? तो कधी येणार आहे?” हे प्रश्न अजून चाललेत. एवढ्यासाठीच तर होता ना घरचा बाप्पा? 🙂

मागच्या वर्षी याच सुमाराला प्रवासाला निघालो होतो आम्ही … उत्सुकता, काळजी, युफोरिया असं सगळं ओझं सोबत घेऊन. रात्रभराच्या प्रवासात झोप लागणं शक्यच नव्हतं … डोळ्यात न बघितलेल्या बाळाविषयी इतकी स्वप्नं होती, की झोपायला वेळच नव्हता.
कशी असेल ती? मनात नाही भरली तर? आपल्याला जमेल ना सगळं नीट? घरातले सगळे स्वीकारतील ना? जन्मदात्री गेली म्हणून बाळाला देऊन टाकायला तयार झालेले नातेवाईक कसे असतील? सौदा करताहेत का ते बाळाचा? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?
“इतक्या लहान बाळात काही मेडिकल प्रॉब्लेम असले तरी समजणार नाहीत. फार मोठी रिस्क आहे ही.” एका अनुभवी हितचिंतकांचा प्रामाणिक सल्ला. “बाळ न बघता हो म्हणू नका, आणि इतकं लहान शक्यतो नकोच.” सगळंच इतकं अचानक झालंय, की धड विचार करायला वेळच झाला नाही. अजून काहीच नक्की नाही, त्यामुळे कुणाला सांगणं, त्यांचं मत घेणंही शक्य नाही. फक्त कायदेविषयक आणि वैद्यकीय सल्ला मात्र घेतलाय.
सगळं नीट झालं, तर आयुष्य बदलूनच जाईल एकदम. आणि फिसकटलं काही कारणाने तर? न बघितलेल्या बाळासाठी घेतलेल्या अंगड्या-टोपड्यांकडे बघायची हिंमत होईल परत? प्रवास संपता संपत नाही. तिथे पोहोचल्यावरसुद्धा पहिला दिवस फक्त पूर्वतयारीचा. उरलीसुरली खरेदी करायची आणि वाट बघत बसायची.
कसा तरी दिवस संपतो. दुसर्‍या दिवशी सकाळीच एक एवढुस्सं गाठोडं हातात येतं. नव्या स्पर्शामुळे बावरलेला चेहरा तासाभरात शांत होतो. हे इतकं गोडुलं आहे, की बघताक्षणी त्याच्या प्रेमात न पडणं अशक्य. पण अजून सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायचीय. आपल्या हातात आहे, पण अजून हे आपलं नाही. हा दिवस कालच्या दिवसापेक्षा जास्त छळणारा. समोर आहे, त्याला आपलं म्हणायचं नाही हे कसं शक्य आहे?
दुसर्‍या दिवशी दुपारी अखेर सगळे सोपस्कार पूर्ण होतात. ही लाडूबाई आता आपली! एवढी निराशा आणि अनिश्चितता अनुभवल्यावर विश्वास बसत नाही यावर. पुढचा महिनाभर तरी जमीन दिसूच नये एवढी हवेत आहे मी! या परीने अशी काही जादूची कांडी फिरवली आहे, की सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात, शंका हवेत विरूनच जातात. 
आपल्यांना मनवण्यात खर्च केलेला वेळ आणि एनर्जी, सरकारी दिरंगाई, झारीतले शुक्राचार्य आणि न संपणारं वाट बघणं … तरीही, It was worth the wait.
आपण काहीही न करता वय वाढतच असतं. तसा ब्लॉग एका वर्षाने मोठा झालाय. आता “अरे वा, वाढदिवस!” असं कौतुकाने म्हणण्याऐवजी त्याचे वय चोरायचे दिवस जवळ आले आहेत.
गेल्या वर्षभरात इथे ओरिसाची भटकंती वगळता फारसं काही घडलेलं नाही. म्हणजे गेल्या वर्षभरात काही घडलंच नाही का लिहिण्याजोगं? तसं बघितलं तर बरंच काही घडलं, पण ते सगळं अनुभवण्यात मी इतकी बुडून गेले आहे, की त्याविषयी लिहिणं शक्य नाही. इथे काही लिहायला थोडी अस्वस्थता, बेचैनी लागते, काहीतरी सांगायची आस लागते, ती नाहीये सद्ध्या. भरल्या पोटी लिहायला सुचत नाही तसंच भरल्या मनानेही लिहिणं अवघडच जातं, नाही का? अजून काही दिवस हे असेच जातील असं वाटतंय. मग पुन्हा नव्या उत्साहाने काहीतरी सांगावंसं वाटेल, एखादा फोटो, एखादं पुस्तक लिहितं करेल. तोवर मी पुन्हा गायबते इथून.

बाप्पा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे.
आणि आभाळाएवढं मोठ्ठं मन दे.
.
.
.
.
.
.
आणि मला पुढच्या वर्षी वेळेवर मूर्ती बनवायला सुरुवात करायची बुद्धी दे. 🙂
***************************
हा आमचा मिनिमालिस्ट बाप्पा. यंदा चक्क गणेश चतुर्थीपूर्वी (अर्धा तास आधी) पूर्ण झालाय. त्यामुळॆ पूजा होण्याचं भाग्य लाभणार त्याला.
***************************
बाप्पा बनवतांचे हे अजून काही फोटो:

bappa_2012

दिवाळीच्या शुभेच्छा!

मी पणत्यांच्या प्रकाशाच्या प्रेमात आहे. विजेच्या माळांची भगभग कुठे, आणि पणत्यांचा मंद प्रकाश कुठे. हा प्रकाश आसमंताला एकदम रोमॅंटिक करून टाकतो. आज संध्याकाळी बाहेर पणत्या लावल्यावर कॅमेर्‍याच्या नाईट मोडवर केलेले हे उद्योग 🙂

    महाशिवरात्रीची व्याधाची गोष्ट आपल्याला माहित असते.
    शिकारीसाठी झाडावर बसलेला असताना समोरचं नीट दिसावं म्हणून तो समोरची पान तोडत होता. योगायोगाने ते झाड बेलाचं होतं. योगायोगाने झाडाखाली महादेवाची पिंड होती. आणि योगायोगानेच तोडलेली पानं पिंडीवर पडत होती. त्यामुळे शंकर व्याधाला प्रसन्न झाला इ.इ.
    योगायोगाने परवा गहू निवडले, आणि त्यातला कचरा केराच्या टोपलीत टाकण्याऐवजी चिमण्या खातील म्हणून बाहेर कुंडीत टाकला. योगायोगाने चिमण्यांनी तो खल्ला नाही,आणि योगायोगानेच नेमके घट बसण्याच्या दिवशी त्या गव्हाला मस्त कोंब आलेत.

    पण देवी म्हणजे काही भोळा सांब नव्हे. माझं पाखंडीपण तिला चांगलंच माहित आहे. ती मला प्रसन्न होईल अशी उगाचच आशा लावून बसू नये. 🙂

*****************************************
रच्याकने, आमच्या कासवाने आज चक्क शंभरी गाठलीय. ही माझी शंभरावी पोस्ट. त्यातल्या १० -१२ पोस्टा आवडत्या कवितांच्या आहेत ते सोडा … ‘मी लिहिलेली शंभरावी पोस्ट’ कुठे म्हटलंय 😉

    धड दुपार नाही, धड संध्याकाळ नाही अशी वेळ असते. कुंद वातावरण. सगळा आसमंत चिडिचुप्प. झाडाचं पानही हलत नाही. मुलंमाणसं कावलेली. सगळे त्याच्या कोसळण्याची आतुरतेने वाट बघत असतात. आभाळ भरून आलेलं … ओथंबणार्‍या ढगांना अगदी बोट लागलं तर सरी कोसळायला लागतील असं वाटावं अशी हवा. अश्या जीवघेण्या वातावरणातच कुठेतरी दिलासा – आता थोड्याच वेळात तो येईल, पिसाटासारखा बरसेल, मातीचा वेड लावणारा गंध उधळेल, धुळीची पुटं चाढलेल्या म्हातार्‍या झाडांनाही लहान पोरांसारखा पिंगा घालायला लावेल, लहानमोठी पोरंटोरं मोका साधून भिजून घेतील, आणि तासा – दोन तासात तो आला तसा निघूनही जाईल . कधी कुणाच्या घरात शिरेल, कुठे छप्परच उडवून नेईल – पण त्याच्या येण्याचं एवढं अप्रूप असतं, की त्याला धसमुसळेपणाही माफ असतो. कारण तो संध्याकाळच्या उन्हात चमकणार्‍या सगाळ्या दिशा,अवखळ वारा यांना मागे सोडून जाणार असतो. कोरडं कुणालाच राहू देणार नसतो. तो येऊन गेल्यावरच्या मोकळ्या आकाशाची तुलना तर कशाशीच नाही.

    असाच वळीव कधी मनातही बरसतो. त्यानंतर आतलं आकाश जे मोकळं होतं, ते टिपण्यासाठी हा ब्लॉग. (‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ नाही, तर ‘गेला वळीव बरसून, झाले मोकळे आकाश’.) त्याचा आज तिसरा वाढदिवस आहे. तीन वर्षाचा झाला तरी तो अजून रांगताच आहे. त्याने पोस्टांची शंभरीही गाठली नाहीये. हिट काऊंटर तर मागेच हटवलाय, त्यामुळे किती हजार,किती लाख अश्या हिशोबाचा प्रश्नच नाही. तीन वर्षात ब्लॉग टेम्प्लेटमध्ये फक्त वरवरचे बदल झालेत. कधी तर महिनेच्या महिने कोरडे ठणठणीत, रखरखीत गेलेत, एवढं असूनही इथे टिकून राहिलेल्या बिचार्‍या तुमच्या सगळ्यांच्या सहनशक्तीची कमाल आहे. तुमच्यासाठी हा खास केक:

(त्याचं काय आहे, मस्त ब्लॅक फॉरेस्ट बनवायचा विचार होता … पण मेणबत्त्या पेटवायची एवढी घाई झाली, की आयसिंग राहूनच गेलं बघा 🙂
G, खास तुझ्या मागच्या वेळेच्या सूचनेप्रमाणे तीन मेणबत्त्या लावल्यात बघ 😀

आपला एक ब्लॉग आहे हे विसरण्याची वेळ आलीय असं वाटत असतानाच पुन्हा कधीतरी वळीव बरसतो, काहीतरी लिहावंसं वाटतं. आता ब्लॉगचं नाव बदलून ‘वळीव’ करावं असं म्हणतेय. 🙂घाबरू नका … मी यापुढे दिवसाला तीन पोस्ट लिहायला सुरुवात करणार नाहीये … ही पोस्ट २ महिन्यांपासून ड्राफ्ट म्हणून पडून आहे योग्य मुहुर्ताची वाट बघत … आज फक्त ती प्रकाशित केलीय वेळेचं औचित्य साधून.

*************************************************************
    वैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरतीवर आपल्या सौम्य शीतल चांदण्याची वृष्टी करणारा पौर्णिमेचा चंद्र. जे परिपूर्ण असतं, ते सुंदर असतं, आनंदी असतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं. एका तपश्चर्येची पूर्तता होण्यासाठी याहून सुयोग्य वेळ कुठली असणार?    
    सत्य शोधायला महालाबाहेर पडलेला, अपार करुणेने भरलेला तो राजपुत्र. सत्य शोधायला त्याने सर्व मार्ग अवलंबले. देहदंडन करून बघितलं, वेगवेगळे गुरू करून बघितले. त्याला सत्य सापडलं ते स्वतःच्या आत शोधल्यावरच. आयुष्य हे दुःखाने भरलेलं आहे. या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. ही तृष्णा विझवून टाका, दुःख आपोआप दूर जाईल. वैशाख पौर्णिमेला त्याला हे गूढ उकललं. आयुष्यभर ज्याचा ध्यास होता, ते सत्य सापडण्याच्या क्षणी तो म्हणतो …

अनेक जाति संसारं संधाबिस्सं अनिब्बस्सं
गहकारक गवेसन्तु, दुक्ख जाति पुन: पुन:
गहकारकं दिठ्ठोसि पुन गेह न काहसि
सब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसङ्गमत्
विसंङ्खारगतं चित्तं तण्हानं खयमज्झगा

    आनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय – परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.

*************************************************************
    बौद्ध होणं सोपं आहे … बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार?

    २४मे ला ब्लॉगचा दुसरा वाढदिवस होता. ब्लॉगवरचं दुसरं वर्ष कसं होतं याचा सहजच मनाशी आढावा झाला. यावर्षी कितीतरी मराठी ब्लॉगर्सशी मैत्री झाली. ब्लॉगर मेळावे, इ-सभा आणि व्यक्तिगत पातळीवरही ब्लॉगर्सचा परस्परसंवाद या वर्षी वाढल्यासारखा वाटतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता ‘मराठी ब्लॉगर परिवार’असं काही आहे असं वाटतंय. कदाचित असा परिवार पूर्वीही असेल आणि मला त्याची कल्पना नसेल, किंवा तेंव्हा थोडा विस्कळित असेल. 
   ब्लॉग हे मराठीमध्ये तुलनेने नवीन माध्यम आहे, आणि हळुहळू ते बाळसं धरतंय. त्याचा आवाका, शक्तीस्थानं आणि मर्यादा यांचा आपल्याला अजून अंदाज येतोय. मराठी ब्लॉगलेखनाचं स्वरूप, दर्जा, ब्लॉगकडून अपेक्षा याविषयी गेल्या काही दिवसात नीरजाच्या आणि वटवट सत्यवानाच्या पोस्टच्या निमित्ताने भरपूर लिहिलं गेलंय. त्यात अजून भर टाकण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.
    माझ्या ब्लॉगवरच्या लेखनाच्या स्वरूपात बदल झालाय. अगदी सुरुवातीच्या पोस्ट या वहीतलं लिखाण ब्लॉगवर पुन्हा उतरवणं या स्वरूपाच्या होत्या. दोन वेळा हाताखालून गेल्यामुळे त्याच्या मांडणीमध्ये जास्त नेमकेपणा होता, लांबीही जास्त होती. भाषेचा बाज काहीसा वेगळा होता. हळुहळू पोस्टची लांबी कमी झालीय. फोटोचा, दुव्यांचा वापर वाढलाय. लिहिण्यातला प्रवाहीपणा वाढल्यासारखा वाटतोय. स्वतःचं नसलेलं लिखाण इथे न टाकण्याचा माझा मूळ बेत होता. पण कवितांच्या वहीमधून हळुहळू माझे आवडते कवी इथे दिसायला लागलेत. आपले नसलेले फोटो, चित्रं न टाकण्याचं मात्र एक ऍन फ्रॅंकचा अपवाद सोडल्यास जमलंय. नेहेमीच्या मराठी अनुभवविश्वाबाहेरचं काही मांडता आलं तर बघावं अशी एक इच्छा होती. फुटकळ अनुवादांमधून ती काही अंशी का होईना पण साधता येते आहे असं वाटतंय. फुकटात जागा मिळते आहे म्हणून वाट्टेल ते (महेंद्र काका, मला उगीचच तुमच्या ब्लॉगवर टीका केल्यासारखं वाटतंय हे लिहिताना … तुमच्या ब्लॉगचं नाव बदला प्लीज 😀 ), लिहिणं टाळायचं, जे जालावर उपलब्ध आहे, त्याची द्विरुक्ती टाळायची असं एक धोरण होतं. तरीही थोड्याफार ‘टाईमपास’ पोस्ट झाल्यात. पण एकंदरीत स्वतःच्या मनाला भिडणारं, आपल्याला परत कधी वाचावंस वाटेल असं लिहायचं हे बर्‍यापैकी जमलंय असं वाटतंय.
    दोन वर्षात पन्नास -पंचावन्न पोस्ट म्हणजे मी अजूनही ‘स्लो ब्लॉगर’च आहे. अर्थात ब्लॉगला सुरुवात करताना याची कल्पना होती. माझ्या कामाचं स्वरूप बैठं आहे, आणि कामानिमित्त‘व्हर्च्युअल टीम’ मध्येच बहुधा आठवडेच्या आठवडे संवाद असतो. त्यामुळे हाडामांसाच्या माणसांशी प्रत्यक्ष बोलणं, लॅपटॉपच्या बाहेरच्या खर्‍याखुर्‍या जगाकडे बघणं ही प्रायॉरिटी होती. आणि लिहिल्यापेक्षा जास्त वाचणं ही सुद्धा. त्यामुळे साधारण दोन आठवड्याला एक पोस्ट झाली तरी मी सुखी आहे. ब्लॉगवरच्या प्रतिक्रियांना आवर्जून उत्तरं लिहिणं हे मात्र ‘ब्लॉगेटिकेट्स’ मधून शिकलेय.
    ब्लॉग दोन वर्षांचा झाल्यासारखा वाटतोय का तुम्हाला? ‘मोठा’ झाल्यावर त्याने अजून काय काय करायला हवं असं तुमचं मत आहे? आणि हो, वर वाढदिवसाचा केक ठेवलाय 🙂