Archives for category: नस्त्या उठाठेवी


माऊला कुत्री – मांजरं – एकूणातच सगळे प्राणीमात्र खूप आवडतात. म्हणजे टेकडीवर आम्ही मधून मधून फिरायला जातो तर तिथले जवळपास सगळे भुभू आणि त्यांचे ताई / दादा / काका / मावशी लोक तिला ओळखायला लागलेत! तर यंदा तिच्या वाढदिवसाला भुभूंना बोलावलंच पाहिजे असं ठरलं. मग कुणाकुणाला बोलवायचं, कसं करू या याची खलबतं सुरू झाली, प्लॅन ठरला, कार्डबोर्ड आणले, ते कापले, आज्जीने मस्त रंगवले आणि असे एक एक भुभू तयार झाले…

मोठ्ठा भुभू आणि छोटुस्सा भुभू!

हा झोपलाय

यांना आपल्या त्या ह्या पुस्तकातून बोलावलंय …

यांना पण!

आणि हा बुटकू

एवढे सगळे भुभू आल्यावर ते एका जागी कसे बसतील? त्यांच्या खेळण्यामध्ये सगळीकडे पायांचे ठसे उठणारच की! ते कसे करायचे? सोप्पंय! पाय बनवू या, म्हणजे त्याचा ठसा करता येईल!

हा पाय

आणि हा ठसा!

भुभूंना मातीचे पाय घेऊन सगळीकडे बागडायला माऊने मदत केलीय. 🙂
आले बघा सगळे … तय्यार!!!

हुश्श! पुढच्या वाढदिवसाला कुणाकुणाला बोलवायचं बरं? 🙂



गेली काही वर्षं जमेल तसं बाप्पा घरी बनवणं चाललंय. या वर्षीची प्रगती म्हणजे मागच्या वर्षी विसर्जन केल्यावर माती ठेवून दिली होती, तीच वापरली. विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर एक मातीचा केक तयार झाला होता. तो कुटून, चाळून घेतल्यावर नवी कोरी माती तयार! कुटायला फारसे कष्ट पडले नाहीत. आणि माती भिजायला जास्त वेळ द्यायची तयारी असेल तर माती चाळायची अजिबातच गरज नाही असं नंतर लक्षात आलं. नवीन माती विकत आणण्यापेक्षा ते जास्त सोयीचं आहे मला. तसंही मातीचा पुनर्वापर केला नाही तर बाप्पा इको – फ्रेंडली कसा होणार?


बाप्पा रंगवणं अजून काही मनासारखं जमत नाहीये. पहिल्या काही प्रयत्नात पोस्टर कलर वापरून बघितले. पण मातीच्या मूर्तीवर मला ते फार भडक वाटतात. आणि चंदेरी –सोनेरी रंग वापरले तर त्यांचा तवंग येतो विसर्जनाच्या पाण्यावर. मग मागच्या वर्षी फक्त पांढरा आणि केशरी पोस्टर कलर वापरून बघितले. तेही तितकंसं आवडलं नव्हतं. मी केलेल्या मातीच्या मूर्तीचा पोत बाजारातल्या मूर्तीइतका सुबक नसतो. (बाप्पा, तितकी सुबक मूर्ती करायचा पेशन्स कधी येणार माझ्यात?) पांढरा रंग लावल्यावर मूर्तीचा खडबडीतपणा अजून उठून दिसतो आणि ते नीट गिलवा न करता चुना फासल्यासारखं वाटतं. मग या वर्षी गेरूचा प्रयोग करून बघायचं ठरवलं. बेस म्हणून पांढरा रंग दिला, आणि मग त्यावर गेरू. (काही ठिकाणी गेरूमध्ये खालचा पांढरा मिसळून मार्बल टेक्श्चर आलंय ते आपोआपच.) आधी फक्त दाताला वेगळा रंग द्यायचा विचार होता, पण “डोळे काढच” म्हणून आग्रह झाल्यामुळे शेवटी डोळेपण केले. पांढर्‍या रंगापेक्षा चांगलं वाटलं हे. एकदा न रंगवता तशीच मूर्ती ठेवायची इच्छा आहे. रंगकामात अजून काही पर्याय सुचतोय का तुम्हाला? 


पण बाप्पाला इतका गडद रंग दिल्यावर सजावट कशी उठून दिसणार? मग लक्षात आलं, बाप्पाचा हा रंग मला अगदी सोयीचा आहे – मी सजावट करणार ती खर्‍या पानाफुलांचीच, आणि ती गेरूच्या रंगावर पुरेशी उठावदार दिसणार! 






या वेळी एक गंमत लक्षात आली – माती मळून झाल्यावर पहिल्यांदा मला काही सुचतच नव्हतं. मूर्ती करायला घेतांना आधी कितीतरी वेळ नुसते लाडू वळणंच चाललं होतं. कुठल्या क्रमाने करायची मूर्ती, काय प्रपोर्शन ठेवायचं हे काहीही आठवत नव्हतं. त्यामुळे फर्स्ट ड्राफ्ट आणि बिटा व्हर्जन झाल्याच. आणि बाप्पा बनवल्यावर मी उंदीरमामाला चक्क विसरून गेले होते! तो नंतर बनवला. (उंदीर मामा बघून माऊने सांगितलं, आई आता मी मनीमाऊ बनवणार! :D)
 
या वेळी चक्क बाप्पा चतुर्थीच्या आधी तीन – चार दिवस तयार होता. त्यामुळे ते तीन चार दिवस “आई बाप्पा आलाय का? अजून का झोपलाय तो?” या माऊच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचं काम होतं. 🙂      

तर अशी सगळी गंमत करून मग काल बाप्पा आलाय. आता त्याच्या माऊबरोबर गप्पा सुरू झाल्यात. आणि ते बघितल्यावर आपण वेळेवर मूर्ती पूर्ण करू शकलो याचं किती समाधान वाटतंय काय सांगू!

 


आज झोपतांना माऊला म्हटलं, “चल बाप्पाला गुड नाईट करू या. तू बाप्पाला सांग ’मी सारखे कारभार करणार नाही’ म्हणून, मी सांगते, ’माऊला सारखं रागवणार नाही’ म्हणून.”
“नको. आपण बाप्पाला म्हणू या, ’थॅंक यू बाप्पा!’”

 




माऊचा वाढदिवस झाला या आठवड्यात. वाढदिवसाच्या तयारीच्या निमित्ताने आईने आणि मी भरपूर मज्जा करून घेतली. दुपारी माऊ झोपली, की आमचे उद्योग सुरू व्हायचे. ती पण मग कधीतरी हळूच उठून येऊन आम्हाला चकित करायची. माऊपासून सगळ्या गमतीजमती लपवून ठेवणं ही मोठ्ठी कसरत होती!
तिच्या वाढदिवसाला तिच्या मित्रमैत्रिणी तर येणारच होत्या, मग लाडक्या बुक्काला आणि लंबूला पण बोलवायचं ठरवलं आम्ही.
बुक्का तयार झालाय …

आणि लंबूपण निघालाय ! 🙂
बुक्का, लंबूच्या मित्रमैत्रिणी त्यांच्या सोबत आल्याच मग 🙂 उरलेल्या कागदातून खारूताई, चिऊ, मनीमाऊ बनवल्या. रंगीत मॅगेझिनचे आणि घरात सापडलेले दुसरे कागद वापरून फुलं, फुलपाखरं तयार झाली. 
मनीमाऊ आणि खारूताई
एक एक चित्र झाल्यावर पुढच्यात अजून सुधारणा होत होती, वेगळं सुचत होतं. आईने बनवलेल्या मनीमाऊ, खारूताईच्या पुढे पहिले बनवलेला बुक्का बिचारा अगदीच साधासुधा दिसतोय!
 
ही सगळी सजावट:
सजावट
(वरच्या फोटोत मधली लाल फुलं ओळखीची वाटतात? मागच्या दिवाळीतल्या आकाशकंदिलाचे उरलेले तुकडे वापरून केलीत ती 😉 )
 
आलेल्या छोट्या मित्रमैत्रिणींना छोटीशी भेट द्यायला गुंजनच्या ब्लॉगवर आहेत तसे पाऊच पण बनवले मग … सुंदर चित्रांचं म्हणून वर्षानुवर्ष नुसतंच जपून ठेवलेलं कॅलेंडर सत्कारणी लागलं त्या निमित्तने. 🙂

भेटवस्तूंची पोतडी 🙂

फार फार तर अर्धा तासाचं काम, एकदम सोप्पं. 
 
हे सगळं विकत आणून / कंत्राट देऊन कमी कष्टात, सुबक झालं असतं बहुतेक … पण ते करतांना आलेली मज्जा विकत कशी मिळणार? 🙂

 


म्हणजे घरी बनवलेला, घरी सजवलेला, घरी बसवलेला आणि घरीच विसर्जित केलेला बाप्पा.

यंदा बाप्पाचे दिवस जवळ आले तसे दुकानातले बाप्पा बघून माऊ इतकी खूश होती, की बाप्पा घरी असणं मस्टच होतं. विकत घेतलेला बाप्पा आम्ही बसवत नाही, त्यामुळे बाप्पा बनवणं ओघाने आलंच. मागे केलेल्या बाप्पाच्या अनुभवावरून यंदा त्यापेक्षा चांगला बाप्पा बनवायचे मनसुबे मी रचत होते.
पण सुरुवातीलाच माशी शिंकली. माती आधी जास्त घट्ट, मग जास्त सैल, ती थोडी वाळल्यावर बनवावी इतका वेळ नाही अशी सगळी गंमत गंमत झाली, आणि “होईल तसा करू” म्हणून मी तश्या सैल मातीचाच बाप्पा बनवला. जरा वेळाने थोडा वाळल्यावर अजून एक हात फिरवता येईल अशी आशा होती, पण थोड्या वेळानंतरची ती घडी काही आलीच नाही. बिचारा बाप्पा बनवला तसाच ओबडधोबड वाळून गेला. आणि मी पण “हम तो बना चुके” म्हणून तसाच तो रंगवला. खरं तर मागच्या अनुभवावरून बाप्पा शक्यतो रंगवायचा नाही असं ठरवलं होतं (मूर्ती पाण्यात विरघळल्यावर पोस्टर कलरचा – प्रामुख्याने दागिन्यांना वापरलेला सोनेरी रंगाचा – वर तवंग आला होता मागच्या वेळी. त्यामुळे न रंगवताच बसवायचा विचार होता आधी.) पण मूर्ती सुबक न झाल्याने नुसता पांढरा रंग द्यायचा ठरवला मग. 
असा बाप्पा चतुर्थीच्या तब्बल एक दिवस आधी तयार झाला, आणि मग पानाफुलांची आरास करून झाल्यावर एकदम वेगळाच भासायला लागला. मातीची मूर्ती आणि बाप्पा यातलं ट्रान्स्फॉर्मेशन खरंच माझ्या समजण्याच्या पलिकडचं आहे. पण आपणच केलेली, आतापर्यंत सगळ्या अंगांनी बारकाईने निरखलेली मूर्ती आरती झाल्यावर वेगळीच दिसायला लागते एवढं खरं.

माऊच्या उत्साहापुढे मूर्ती तयार होईपर्यंत आणि नंतरही कशी टिकाव धरणार याची मला फार शंका होती. “आपला बाप्पा आहे, त्याला हात नाही लावायचा, दूरूनच ‘मोरया’ करायचं” हे तिला कितीही पढवलेलं असलं तरीही. पण दुसर्‍या दिवशी सकाळी तिला खुर्चीत चढून बाप्पाशी गप्पा मारतांना ऐकलं … “गुड मॉर्निंग बाप्पा … कसा आहेस? तुझी गाई झाली का? :)” आणि मग मी निश्चिंत झाले. बाप्पाचे पाच दिवस माऊला बाप्पा बाप्पा करत घरभर नाचतांना बघणं एवढं मोठं सुख नसेल. 

विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी बादलीत मूर्ती पूर्ण विरघळल्यावर “बाप्पा आता त्याच्या घरी गेलाय.” हे थोडंफार पटलंय, पण “आई आपला बाप्पा कुठे गेला? तो कधी येणार आहे?” हे प्रश्न अजून चाललेत. एवढ्यासाठीच तर होता ना घरचा बाप्पा? 🙂

Nobody has ever thrown away a throw away prototype

हे ब्रह्मसत्य सॉफ्टवेअरमध्ये काम केलेलं कुणीही सांगेल.Throwaway protptype” ही एक सॉफ्टवेअर इंजिनियरिंगमधली एक कवीकल्पना आहे. आजवर कुणी प्रोटोटाईप बनवायचे कष्ट घेतल्यावर तो टाकून देऊन पुन्हा शून्यातून काम केलेलं नाही.
यंदा कंदील बनवतांना या कंदिलाला नेमके किती गोल लागतात आणि ते कसे जोडायचे हे मला अजिबात आठवत नव्हतं. म्हणून मग त्याचा छोटा प्रोटोटाईप बनवला. आयुष्यात पहिल्यांदा थ्रो-अवे प्रोटोटाईप आपण बनवतोय म्हणून मी एकदम खूश वगैरे होते. कंदील तयार झाल्यावर हा प्रोटोटाईप जवळजवळ थ्रो-अवे केलाच होता – तेवढ्यात कीर्तीची प्रतिक्रिया आली – कंदील कसा बनवलाय ते लिही म्हणून. मला लगेच प्रोटोटाईप आठवला – याचा फोटो टाकला तर लगेच समजेल कंदील कसा बनवलाय ते, म्हणून मग मग पुन्हा उत्खनन करून तो वर  काढला, जरा ठीकठाक करून फोटो बिटो काढले त्याचे. (हे पोस्टेपर्यंत पूर्णिमाचीही प्रतिक्रिया येऊन जुनी झालीये, आता तिला पुढच्या ख्रिसमसला बनवावा लागेल असा कंदिल 😦 )
तर, कंदिलाची सोपी कृती अशी:
लागलेला वेळ:
मला अडीच तीन तास लागले.
साहित्य:
जाड कागद १ (मी ६० सेमी * ९० सेमीचा कार्डशीट पेपर वापरला.), पातळ कागद (हा चक्क जुना बटारपेपर वापरलाय ;), कात्री, फेवीकॉल, दोरा. डिझाईनला उठाव द्यायला हवं असेल तर मार्कर, स्केचपेन वगैरे.
कृती:
पहिल्यांदा जाड कागदाचे ७.५ सेंटीमीटर त्रिज्येचे एकूण २० गोल कापून घेतले. (१९ मध्येही काम चालू शकतं.) (याचा कंदील साधारण फुटबॉलएवढा होतो.)
त्यांच्या अश्या त्रिकोणी घड्या घातल्या. (या घड्या जितक्या नेटक्या होतील, तितक्या कमी फटी पडतील कंदील तेवढा चांगला दिसेल. माझ्याकडे मुळात कंपासच नसल्याने आणि “मनीमाऊ उठण्यापूर्वी” ही महत्त्वाची अट असल्याने मी चालू काम केलंय.)

त्रिकोणावर सोप्पं डिझाईन कापून त्यावर पातळ कागद चिकटवून घेतले. इथे तुमच्या कल्पनाशक्तीला वावच वाव आहे. खूप कलात्मक वगैरे करायचं असेल, तर घडी होणार्‍या भागावरही डिझाईन करता येईल.
आता हे त्रिकोण जोडायचेत. म्हणजे वर्तुळाचे घडी घातलेले भाग एकमेकांना जोडायचेत. एका तुकड्याला तिन्ही घड्यांवर जोडण्याने सुरुवात केली. (प्रत्येक घडी वाळेपर्यंत थांबणं शहाणपणाचं, जे मी केलेलं नाही.) प्रत्येक जॉईंटला पंचकोन तयार करायचाय. निम्मे भाग जोडल्यावर असं दिसतं:

(हाच तो माझा टाकाऊ प्रोटोटाईप. :D )
असेच उरलेले नऊ (किंवा दहा) तुकडेही वरच्या बाजूला जोडले. शेवटचा (सगळ्यात वर येणारा, विसावा त्रिकोण) जोडला नाही तरी चालतं, किंवा डिझाईन ऐवजी बल्ब आत सोडता येईल असं भोक पाडून तो त्रिकोण चिकटवला, तर कंदीलाला अधिक बळाकटी येते.
आता कंदील टांगायला दोरा ओवायचा, आणि कंदिल तयार! 

बघता बघता दिवाळी आलीसुद्धा. काही म्हणता काही तयारी केली नाही दिवाळीची. आज मग एकदम खडबडून जाग आली. काही नाही तर किमान कंदील तरी करावा!
साहित्य अर्थातच घरात सापडलं ते. कुठल्यातरी प्रोजेक्टसाठी केंव्हाचा लाल रंगाचा कार्डशीट पेपर पडलेला होता घरात. आईला आवराआवरी करतांना बटर पेपर सापडला, आणि एक काळं मार्कर सापडलं. एवढ्या सगळ्या साधनसंपत्तीच्या सहाय्याने, माऊ उठायच्या आत जे काही बनवता येईल ते बनवायचं असं उद्दिष्ट ठेवून डिझाईन (?) केलं. 😉
हे एंड प्रॉडक्ट – अजून गो लाईव्ह बाकी आहे :

तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा! अशी आयत्या वेळची नाहीतर नीट नियोजन करून केलेली – दिवाळी मस्त जाऊ देत तुमची!!!

बाप्पा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे.
आणि आभाळाएवढं मोठ्ठं मन दे.
.
.
.
.
.
.
आणि मला पुढच्या वर्षी वेळेवर मूर्ती बनवायला सुरुवात करायची बुद्धी दे. 🙂
***************************
हा आमचा मिनिमालिस्ट बाप्पा. यंदा चक्क गणेश चतुर्थीपूर्वी (अर्धा तास आधी) पूर्ण झालाय. त्यामुळॆ पूजा होण्याचं भाग्य लाभणार त्याला.
***************************
बाप्पा बनवतांचे हे अजून काही फोटो:

bappa_2012

या उद्योगाविषयी मी इथे आणि इथे लिहिलंय. हा यातला शेवटचा भाग.

या चुकत – माकत केलेल्या प्रयोगातून मिळालेले धडे:

१. फ्लॅटवासियांनी पहिला प्रयोग करताना शक्यतो कोणा जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावा. योग्य काळजी घेतली नाही तर घरात चिलटं, डास, किडे होण्याची  आणि आपण पुन्हा कंपोस्टिंगच्या वाटेला न जाण्याची शक्यता आहे.

२. डबे घासून रंग काढताना चांगलाच घाम निघाला. त्यामुळे डबे बाहेरूनही घासून चकाचक पांढरे करायचे आणि त्यावर मस्त वारली चित्र काढायची हा कलात्मक बेत रद्द करावा लागला. पण नंतर डब्याचा तळ कापण्याच्या ठोकाठोकीत हे रंगाचे उरलेले लपके इतके पटापट सुटे होत होते – पुन्हा हा प्रयोग केला, तर आधी डबे कापणार, मग उरलेला रंग घासणार.

३. ओला कचरा म्हणजे काय हे घरातल्यांना, कामवाल्या बाईला समजायला आणि पटायला हवंय. किती सांगितलं तरी अधून मधून कंपोस्ट बिनमध्ये प्लॅटिकच्या पिशव्या आणि ऍल्युमिनियम फॉईलचे तुकडे निघतातच.

४. कचरा कुजताना त्यातून पाणी गळतं. हे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पाणी साचून राहिलं तर दुर्गंधी आणि माश्या, डास होण्याची शक्यता आहे. कंपोस्ट बिन तुम्ही अगदी घरात सुद्धा ठेवू शकता असं तज्ञ म्हणतात. पण मला तरी कुठलंच डिझाईन या गळणार्‍या पाण्याची पूर्ण काळजी घेतं आहे असं वाटलं नाही. त्यामुळे कंपोस्ट बाल्कनीमध्ये ठीक आहे, घरात नको. (बाल्कनीत  एका पसरट, उथळ कुंडीत कोरडी माती ठेवून मी ती कंपोस्टच्या स्टॅंडखाली ठेवून दिली त्यामुळे या पाण्याचा त्रास झाला नाही.)

५. कंपोस्ट लवकर होण्यासाठी खरं म्हणजे दोन महिन्यांनी त्यात गांडुळं सोडायला हवी. (गांडुळं बिनमधून बाहेर पडत नाहीत. सूर्यप्रकाशात त्यांची त्वचा कोरडी पडते आणि ती मरतात.) पण याला घरच्या ५०% लोकसंख्येचा तीव्र विरोध होता. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण मायक्रोबनाच हे काम करायला लावायचं असं ठरवलं. गांडुळं वापरली तर चहासारखं दाणेदार, एकसारखं दिसणारं खत मिळतं. मायक्रोबने केलेल्या कंपोस्टला हे टेक्श्चर नसतं.

६. कंपोस्ट बनत असताना त्यात बारीक किडे झाले होते. हे किडे बिनच्या बाहेर पडत नाहीत. पण नवरोबाने किडे बघितल्यावर बिनचं झाकण घट्ट बंद करायला सुरुवात केली. हवा खेळती राहणं बंद झाल्यावर किडे अजून वाढले. त्यावर माती टाकल्यावर जास्तीची ओल शोषली गेली, किडे कमी झाले.

७. आंब्याच्या कोयी कुजायला खूप जास्त वेळ लागतो. शक्यतो आंब्याच्या कोयी घरातल्या कंपोस्ट बिन मध्ये टाकू नयेत.

८. कंपोस्ट बिन उघड्यावर ठेवणार असाल तर झाकण लावायला विसरू नका – कबुतरं, कावळे कचरा पसरून ठेवतात.

९. डेली डंपचं डिझाईन खरोखर मस्त आहे. जागा कमी लागते, तयार कंपोस्ट वेगळ्या डब्यात असल्यामुळे अर्धवट कुजलेल्या कचर्‍यातून वेगळं करत बसावं लागत नाही, आणि कचर्‍याला सुटणारं पाणी खालच्या खतात बर्‍याच अंशी सामावलं जातं.

१०. कचरा पहिल्या दिवशी दिसतो त्यापेक्षा खूप कमी होतो. सुरुवातीला मला रोज वाटायचं – या आठवड्यानंतर डबा भरणार, दुसरा डबा सुरू करावा लागणार. पण आठवडाभराने पुन्हा कचरा जुन्या पातळीलाच असायचा!

११. प्रयोगासाठी लागणारा वेळ : बिन तयार करणे – एक दिवस. त्यानंतर रोज दोन मिनिटं, आणि आठवड्यातून एकदा दहा मिनिटं.

१२. प्रयोगाचा खर्च –

  • सकाळ फुलोरा कार्यशाळा – १०० रु. (खरं तर मी फुलोरा चे वर्षभराचे पैसे भरले होते. पण वर्षभरातल्या पाच कार्यशाळांपैकी या एकाच दिवशी जाता आलं मला. तो एक दिवस सत्कारणी लावला असं नंतर मनाचं समाधान करून घेतलं 😉 )
  • रंगाचे रिकामे डबे – १०० रु ला एक, एकूण २०० रू.
  • स्टॅंड – आईकडून दान
  • मायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड आणि मिक्श्चर – सुमारे ५० रू (लिक्वीड अजून भरपूर शिल्लक आहे)
  • गार्डन स्प्रे – ६० रू (रोज लिक्वीडची फवारणी करायला)

अन्य साहित्य:

  • तिखट पावडर – साधारण १० -१२ चमचे
  • खायचा सोडा – १० -१२ चमचे (जुनं, खराब झालेलं इनो वापरलं)

१३. “काय मस्त भाज्यांची देठं जमली आहेत तुझ्याकडे – मी घेऊन जाऊ का खतात घालायला?” असं आईला म्हणण्याचा मोह झाला तरी टाळावा. आपल्याला कंपोस्टिंग प्रकल्पाने झपाटलं असलं, तरी बाकी जग नॉर्मलच चालत असतं. त्यामुळे आल्यागेल्या पाहुण्यांना उत्साहाने कंपोस्ट बिन उघडून दाखवू नये.  😀

***************************
पहिल्या पोस्टीत म्हटलंय तसं हा प्रयोग माफक प्रमाणात यशस्वी झाल्याचं मी घोषित केलंय. सद्ध्या फक्त बागेतल्या कचर्‍याचं कंपोस्टिंग चाललंय. जरा बाल्कनीतलं ऊन, पाऊस आणि कंपोस्टिंगला लागणारा वेळ याचं गणित जुळवायचा प्रयत्न आहे. तो जमला, की पुन्हा सगळा ओला कचरा यात वापरता येईल.

धागेदोरे वर कंपोस्टिंगच्या प्रकल्पाविषयी प्राची यांनी लिहिलंय. त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे माझ्या कंपोस्ट प्रकल्पाचे काही फोटो आणि माहिती.

मागे कं पोस्टमधे म्हटलंय त्याप्रमाणे मी कंपोस्ट बिन घरीच बनवली, ‘डेली डंप’चं डिझाईन वापरून. हे त्या प्रयोगाचे टप्पे:

१. रंगाचे २० लिटरचे २ रिकामे डबे घेतले.

कंपोस्ट बिनसाठी वापरलेले रंगाचे डबे

    (आता खरं तर डेली डंपच्या डिझाईनमध्ये ३ डबे आहेत. वरच्या डाब्यात कचरा टाकत रहायचा. दुसर्‍या डब्यात तयार होत असलेलं कंपोस्ट असतं, आणि सगळ्यात खालच्या तिसर्‍या डब्यात तयार कंपोस्ट ठेवतात. पण रंगाच्या दुकानात तेंव्हा दोनच रिकामे डबे शिल्लक होते आणि एकदा प्रयोग करायची सुरसुरी आल्यावर तिसरा डबा मिळेपर्यंत मला दम नव्हता :). त्यामुळे कंपोस्ट तयार झाल्यावर जेंव्हा गरज पडेल तेंव्हा तिसरा डबा घेऊ असा विचार करून दोन डबे घरी आणले.

    तुम्ही कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनवलेले डबे वापरा असं डेली डंपवाल्यांचं म्हणणं आहे. रंगाचे डबे बायोडिग्रेडेबल नसले तरी रिसायकल्ड आहेत त्यामुळे चालतील असं मी ठरवलंय.)

२. या डब्यांमध्ये वाळलेल्या रंगाचा जाड थर होता. डबे घासून शक्य तितका रंग काढून टाकला.

३. रंगाचा वरच्या डब्याचा तळ आणि खालच्या डब्याचं झाकण घरच्या विंजिनेराकडून याप्रमाणे कापून घेतलं:

खालच्या डब्याचं झाकण आणि वरच्या डब्याचा तळ दोन्ही असं कापून घेतलं.

(दुसर्‍या डब्याचा तळ नंतर गरज लागेल तेंव्हा कापू असा विचार केला. तो नंतर अंमळ महागात पडला. कसा ते पुढे समजेलच.)

४. ड्राय बाल्कनीमध्ये ओल्या – सुक्या कचर्‍याचे डबे होते, तिथेच शक्यतो हा खांब ठेवायचा विचार होता. खालचा डबा, त्यावर कापलेलं झाकण, त्यावर तळ कापलेला डबा असा पिसाचा मनोरा तिथे ठेवला. वरचा डबा ठेवताना त्याच्या तळाच्या पट्ट्या आणि खालच्या झाकणाच्या पट्ट्या शक्यतो एकावर एक ठेवल्या.

५. टाकलेला कचरा खालच्या डब्यात पडू नये आणि थोडं पाणी शोषलं जावं, म्हणून वरच्या डब्यात तळाला टाईम्सचा एक अख्खा पेपर घातला. त्यावर ‘इनोरा’चं कंपोस्ट स्टार्टिंग मिक्स घातलं. थोडी बागेतली खराब झालेली माती घातली. कंपोस्ट बिन तयार! हा होता मागचा फेब्रुवारी महिना.

६. यावर रोज स्वयंपाकघरातला ओला कचरा आणि बागेतला कचरा घातला. त्यावर पाण्यात मिसळलेलं ‘इनोरा’चं मायक्रोबॅक्टेरियल लिक्वीड रोज फवारायचं आणि कचरा वरखाली करायचा. बिनचं झाकण लावताना थोडी फट ठेवायची.

७. आठवड्यातून एकदा एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा खायचा सोडा यात मिसळला. यामुळे वास येत नाही आणि किडे कमी होतात. फार ओलसर वाटलं, तर माती / पेपराच्या कपट्या असं घालायचं.

८. असं साधारण मार्च मध्यापर्यंत चाललं. एक दीड महिना हा प्रयोग केल्यावर घरात मोठे डास आणि चिलटं दिसायला लागली, बिनला वास यायला लागला, आणि बिनची रवानगी बंदिस्त ड्राय बाल्कनीतून बाहेरच्या बाल्कनीत झाली. माझी बाहेरची बाल्कनी उघडी आणि उत्तरेला आहे. उन्हाळ्यात पूर्ण बाल्कनी उन्हाने भाजून निघते. कंपोस्ट बिन सावलीच्या जागी कुठे ठेवणार? बाल्कनीतच कमीत कमी ऊन लागेल अश्या कोपर्‍यात हा खांब ठेवला.

बाल्कनीतला खताचा खांब

    (बिन हलवताना लक्षात आलं – खालच्या डब्याला भोकं न पाडल्याने कचर्‍यातून पडणारं पाणी खाली गोळा झालं होतं. त्यामुळे डास झाले होते. तातडीने खालच्या डब्याला भोकं पाडून घेतली. पाणी साठायचं थांबल्यावर डास गेले. )

९. साधारण दोन महिन्यांनी एप्रिलमध्ये वरचा डबा भरला. तो खाली ठेवून खालचा रिकामा डबा वर घेतला. पुन्हा डब्यात कचरा टाकायला सुरुवात केली.

१०. उन्हाळा संपला आणि पाऊस सुरू झाला. आता वरच्या डब्याचं झाकण थोडंही उघडं ठेवता येई ना. पावसाचं पाणी आत जायला लागलं. शिवाय पाऊस पडत असताना बाहेर जाऊन कचरा टाकायचा मंडळी हळुहळू कंटाळा करायला लागली. शेवटी मी पावसाळ्यापुरता हा प्रयोग स्थगित केल्याचं जाहीर केलं.

११. साधारण दिवाळीच्या सुमाराला मी पहिला डबा कंपोस्ट म्हणून वापरायला घेतला. गांडुळ खतासारखं चहाच्या भुकटीचं टेक्श्चर यात तयार होत नाही, पण तयार खताला अजिबात वास वगैरे नाही.

**********************************************

याचा पुढचा भाग लवकरच पोस्टते.

पिकासामध्ये सेपियाचे प्रयोग …

आणि हा ब्लॅक ऍंड व्हाईट …

फोटोमधले रंग कमी झाल्यावर तो जास्त सुंदर का दिसतो? 🙂

*****************************
प्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात आलं … पोस्टीच्या नावामुळे वाचणार्‍यांचा गोंधळ होतोय. हे जुने फोटो नाहीत. नव्याच फोटोंना पिकासामध्ये जुनं रूपडं दिलंय. नोस्टाल्जिया आहे तो जुन्या फोटोंच्या रूपड्याबाबतचा. आणि पहिल्या फोटोतली कॅमेरावाली आजी आणि नात मधली लाडूबाई आहे.