Archives for category: पुस्तक

दोन चार दिवसांपूर्वी “अक्षरधारा” मधून माऊसाठी गोष्टीची ढीगभर पुस्तकं आणलीत … त्यातलंच हे एक. म्हणजे मला माहित आहे, माऊ अजून लहान आहे हे पुस्तक वाचायला, पण फारच छान वाटलं म्हणून घेतलंच मी ते पुस्तक.

आज ते वाचलं, आणि इतकं आवडलं, की पुस्तकावर माऊचं नाव घातलंय म्हणून … नाही तर ते चक्क ढापायचा विचार होता माझा. (“माऊची आई” म्हणून नाव बदलावं का त्या पुस्तकावरचं?) माऊची बरीचशी पुस्तकं मला आवडतात. म्हणजे काहीतली चित्र आवडतात, काहीतल्या गोष्टी आवडतात. काहीतलं सगळंच आवडतं!!! हे असंच वाईट्ट आवडलंय. पुस्तकातली चित्र एकदम गोड्ड आहेत. आणि गोष्टी वाचतांना मला थेट बिम्मची आणि लंपनची आठवण झाली … जोयानाचं विश्व इतकं सुंदर उभं केलं आहे ना इथे … “आजी काय बोलते हे मला कळत नाही. मिनी मांजर काय बोलते ते आजीला कळत नाही. रंग काय बोलतात ते मांजरीला कळत नाही. झाड काय बोलतं ते आभाळाला कळत असेल का?” असं मावशीला विचारणारी ही जोयाना!

 
आता अडचण एकच आहे. कवितामावशीला विचारायचंय, जोयानाच्या गोष्टी अजून सांगतेस का म्हणून. म्हणजे हे एक पुस्तक माऊच्या आईसाठी ठेवलं तरी बाकीच्या जोयानाच्या गोष्टी माऊला वाचायला मिळतील!!!

***
जोयानाचे रंग
लेखिका कविता महाजन
राजहंस प्रकाशन
किंमत ५० रुपये


“मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही!” असं ज्यांच्याविषयी त्यांच्या आईने म्हटलंय, त्या दाभोळकर “अजबखान्या”तलं एक आपत्य म्हणजे दत्तप्रसाद. यापूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांचे एक – दोन लेख वाचले होते, आणि अजून माहिती करून घ्यायची उत्सुकता होती. आईने “रंग याचा वेगळा” घेऊन दिलं आणि गेले तीन –चार दिवस वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून, सगळी कामं टाकून या पुस्तकात बुडून गेले होते.  
दत्तप्रसाद दाभोळकर यांनी संशोधक म्हणून मोठं काम केलंय. हौस म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. एखादा विषय भावला म्हणून त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी अभ्यासपूर्ण, सुंदर, मूलगामी असं काही लिहिलंय. त्यांच्या भावंडांपैकी नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसच्या कामाला वाहून घेतलं किंवा मुकुंद दाभोळकरांनी प्रयोग परिवार उभा केला. असं एकाच क्षेत्रात बुडून जाण्याचा दत्तप्रसादांचा पिंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जत्रेत फिरणार्‍या मुलाच्या उत्सुकतेने त्यांनी आयुष्याकडे बघितलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत.  
भारताच्या अंटार्टिका मोहिमेविषयीचा आणि एकूणातच भारतातल्या संशोधन क्षेत्राविषयी त्यांचा लेख वाचला आणि मोठ्ठा धक्का बसला. आपल्याकडे संशोधनाचं फारसं काही चांगलं नाही हे मी बाहेरून ऐकून होते, पण परिस्थिती इतकी भीषण असेल याची कल्पना नव्हती. सरकारी संशोधन संस्था, आपल्या उद्योगांमधले संशोधन विभाग या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या सुरस कहाण्या इथे वाचायला मिळतात.  
सरदार सरोवर, मोठे विकासप्रकल्प, विस्थापितांचे प्रश्न आणि पर्यावरण याविषयी माझ्या मनात मोठ्ठं कन्फ्यूजन आहे. मला यातल्या सगळ्यांच्याच बाजू बर्‍याच अंशी पटतात आणि नेमकं काय चुकतंय ते सांगता येत नाही. “माते नर्मदे” मी वाचलेलं नाही. (आजवर हे वाचलंच पाहिजे म्हणून कुणी समोर कसं ठेवलं नाही याचं आता आश्चर्य वाटतंय!) नर्मदा प्रकल्पाविषयी दाभोळकर जे म्हणतात त्यात अभिनिवेश दिसत नाही तर  स्पष्ट विचार आणि ठोस उपाययोजना आहेत असं वाटतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्ण पटतंय. आता “माते नर्मदे” वाचणं आलं! 
एके काळी विवेकानंदांची पारायणं केल्यावर गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या वाटेला गेलेले नाही. दाभोळकरांनी विवेकानंदाविषयी लिहिलेलं वाचून खूप काही नवं हाती सापडल्यासारखं वाटतंय, पुन्हा विवेकानंद वाचावेसे वाटताहेत, त्यांचं विवेकानंदांवरचं पुस्तक वाचावंसं वाटतंय.  
राजधानी दिल्लीची क्षणचित्रं, १८५७ वरची त्यांची टिप्पणी, १९९० च्या भांबावलेल्या रशियाचा त्यांनी घेतलेला वेध, किंवा त्यांची व्यक्तीचित्रं … या पुस्तकातले त्यांचे लेख वाचून अजून वाचायच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार झालीये मनात. एवढं दाभोळकरमय होऊन जाण्यासारखं काय आहे या पुस्तकात? दाभोळकरांची लेखनशैली आवडली, त्यांच्या अभ्यासाला, विचाराला दाद द्यावीशी वाटली हे तर आहेच. पण याहूनही आवडलंय ते त्यांचं जगणं, त्यांची वेगवेगळ्या प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. ज्या वेळी जे भावलं, ते तेंव्हा जीव ओतून करणं आणि नंतर त्यापासून वेगळं होणं. त्यांना संशोधनक्षेत्र आतून बाहेरून माहित आहे पण त्यातल्या राजकारणात ते नसतात. दिल्ली कशी चालते ते त्यांनी बघितलंय, पण ते ती चालवायला प्रयत्न करत नाहीत. अनेक साहित्यिकांचा त्यांचा स्नेह आहे, स्वतःचं लेखन आहे. ज्ञानपीठसारख्या पुरस्काराचं राजकारण त्यांनी बघितलंय. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावं म्हणून ते सर्व प्रयत्न करतात, पण स्वतः साहित्यातल्या राजकारणापासून दूर राहण्याचं साधतात. हे जाम आवडलंय!!!
***
रंग याचा वेगळा … दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन
संपादन: भानू काळे
कॉंटिनेंटल प्रकाशन
किंमत ४०० रू.

चेंगिझ खानाविषयी खूप उत्सुकता होती. भारताच्या वेशीपर्यंत तो आला आणि तिथून परत फिरला म्हणून आपण वाचलो – तो नेमका का बरं परत फिरला असेल हे जाणून घ्यायची इच्छा हे एक कारण, आणि हा बाबराचा पूर्वज होता – मुघल साम्राज्यात याच्या युद्धनीतीचा, विचाराचा, कर्तृत्वाचा ठसा कुठे दिसतो का हे तपासून बघायची उत्सुकता हे दुसरं. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी असूनही लगेच उचललं हे पुस्तक.
तेराव्या शतकातली मंगोल पठारावरची परिस्थिती माझ्या कल्पनेच्याही पलिकडली. अतिशय खडतर निसर्ग, शिकार आणि पशूपालन यावर गुजराण करणार्‍या भटक्या टोळ्या आणि त्यांच्यामधली न संपणारी वैमनस्य. लढाईत हरलेल्या टोळीतील पुरुषांची सर्रास कत्तल, त्यातली बायका मुले पळावणे, त्यांना गुलाम बनवणे या नेहेमीच्या गोष्टी. आज एका सरदाराच्या आधिपत्याखाली लढणारी माणसं उद्या सहज त्याच्याविरुद्ध लढायला तयार, कारण स्वतःचा आजचा स्वार्थ एवढाच लढण्यामागचा विचार.
लग्न करून नव्या नवरीला आपल्या टोळीकडे घेऊन जाणार्‍या नवरदेवाच्या सोबत्याने वाटेतल्या टोळीच्या सरदाराची खोड काढली आणि त्या सरदाराच्या टोळीने नवरीव्यतिरिक्त सगळ्या प्रवाश्यांना कंठस्नान घातलं. सरदाराने या पळवून आणलेल्या नवरीशी रीतसर लग्न केलं. या सरदाराचा मुलगा तेमजुंग – म्हणजे भविष्यातला चेंगिझ खान. मुलगा तीन वर्षांचा झाला की घोड्यावर मांड टाकायला शिकणार आणि शस्त्र हातात धरता यायला लागलं की शिकारीत आणि लढाईत भाग घेणार ही तिथली परंपरा. शिकार करणं, वाट काढणं, आग पेटवणं, स्वतःचा तंबू उभारणं हे सगळे मुलाच्या शिक्षणातले महत्त्वाचे घटक. तेमजुंग जेमतेम नऊ वर्षाचा असताना त्याच्या वडलांचा मृत्यू झाला, आणि टोळीने त्याच्या आईच्या विवाहाला आक्षेप घेतला आणि तिच्या सगळ्या मुलांना अनौरस ठरवत वडलांच्या वारश्यापासून दुरावलं. कालपर्यंत २० हजारांच्या टोळीचा भावी सरदार म्हणून बघितला जाणारा तेमजुंग अन्नाला मोदात झाला. रोज सगळ्या मुलांना जी काय लहान – मोठी शिकार मिळेल ती आणि आईने दिवसभरात मिळवलेली कंदमुळं यावर गुजराण करायची वेळ त्याच्यावर आली. टोळीतल्या त्याच्या विरोधकांच्या ताब्यात सापडून मरण डोळ्यापुढे दिसत असतांना तो शिताफीने निसटला. काही काळ लपत छपत काढल्यावर पुन्हा त्याच्या शत्रूंना धूळ चारायला उभा ठाकला. या सगळ्या काळात संपूर्ण मंगोल पठार एका राजाच्या आधिपत्याखाली आल्याशिवाय या कायमच्या लढाया संपणार नाहीत आणि मंगोल राज्य उभं राहू शकणार नाही हे तेमजिन समजून चुकला. राजकीय व्यवस्थेबरोबरच त्याला तिथेली टोळ्यांवर आधारित सामाजिक उतरंडही बदलायची होती. हे सगळं बदलण्याचा एकच मार्ग आहे यावर त्याचा ठाम विश्वास होता – बळाच्या जोरावर!
तेमजिनचा सगळा इतिहास म्हणजे लढाई –> जिंकल्यास अजून मोठे सैन्य + मालमत्तेत वाढ -> पुढची लढाई -> हरल्यास पूर्ण वाताहात -> पुन्हा सैन्याची जमवाजमव -> पुढची लढाई असं इन्फायनेट लूप आहे. मंगोल हे कसलेले योद्धे होतेच – दिवसचे दिवस ते घोड्यावर काढू शकत. वर्षानुवर्षं टिकणारं वाळवलेलं गाईचं मांस हे त्यांचं युद्धातलं अन्न. प्रत्येक सैनिकाकडे त्याचे घोडे, शस्त्र, पाणी असेच. उपासमारीची वेळ आली तर प्रसंगी स्वतंच्या घोड्याचं रक्त पिऊनसुद्धा जिवंत राहण्याची आणि लढण्याची त्यांची रीत होती. त्यांचे घोडेही मंगोल पठाराच्या खडतर निसर्गात टिकाव धरून राहणारे होते – पाणी नसेल तर बर्फ खाऊनही हे घोडे जगू शकत, बर्फाखालून स्वतःचं अन्न शोधू शकत. मंगोल भटके, त्यांचं घर कायमचं तंबूत, त्यामुळे कुठेही गेलं तरी काही तासात घर उभं राहू शके. लढण्यासाठीच ही माणसं जिवंत राहत असावीत असं वाटतं हे सगळं वाचतांना. अश्या योद्द्यांना तेमजिनने युद्धाची अजून नवी तंत्र शिकवली. उत्तम हेरखातं, जलद निरोप पोहोचवण्याची व्यवस्था आणि निशाण / विशिष्ट बाण याच्या वापरातून सैन्याला संदेश पोहोचवणं ही तंत्र त्याने अतिशय यशस्वीरित्या वापरली.
माणसांची पारख आणि त्यांच्या सेवेचं चीझ करणं ही त्याची खासियत होती. सैन्यासाठी आणि अन्य प्रजेसाठी त्याचे कायदे अतिशय कठोर होते, आणि चुकीला शिक्षा मिळाल्यावाचून राहणार नाही याची लोकांना खात्री होती. त्याचा वेश, अन्न, राहणी सामान्य सैनिकांसारखीच असायची. धर्म, टोळी, सामाजिक पत याच्या निरपेक्ष प्रत्येक माणसाच्या गुणांप्रमाणे त्याला वागणूक देण्यावर त्याचा भर असायचा. “माणसाला सगळ्यात प्रिय असतं ते त्याचं स्वातंत्र्य. पण ते मिळाल्यावरही त्याला एक रीतेपणा जाणवतो. कुणी तो रीतेपणा विसरण्यासाठी देवाच्या भजनी लागतो, कुणी विलासात स्वतःला विसरू इच्छितं, तर कुणी अजून काही. हे रीतेपण भरून टाकेल असं कारण तुम्ही मिळवून दिलंत, तर माणसं जगाच्या अंतापर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहतील!” हा चेंगिझ खानाचा त्याच्या मुलांना सल्ला.
साठाव्या वर्षी शिकार करतांना जायबंदी होऊन त्यातून चेंगिझ खानचा मृत्यू झाला. मरेपर्यंत त्याने मंगोल पठारावर एकछत्री अंमल आणला होताच, खेरीज चीन, कोरिया, खोरासान, पर्शिया, रशिया एवढे सगळे भाग जिंकलेले होते. मंगोल पठाराला कायद्याचं राज्य मिळालं होतं. त्याच्या मागे या साम्राज्याची भरभराट होत जाऊन त्याचा नातू कुबलाई खान याच्या काळात ते परमोच्च शिखरावर पोहोचलं – सयबेरिया पासून अफगाणिस्तानपर्यंत आणि प्रशांत महासागरापासून ते काळ्या समुद्रापर्यंत त्याची सत्ता होती!
हे सगळं वाचतांना द्रष्टा नेता, नवी समाज रचना निर्माण करणारा, उत्तम शास्ता म्हणून कुठेतरी मनात शिवाजी महाराज आठवतात ना? पण फार मोठा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि तेमजिनमध्ये. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या टोकाची क्रूर कृत्य त्याच्या लढायांमध्ये आणि शांतीकाळातही सहज चालायची. आपल्याला विरोध करणारं शहर जिंकल्यावर शहरातल्या एकूण एक माणसाची कत्तल करून त्यांच्या मुंडक्यांचे डोंगर त्याच्या सेनानींनी उभे केलेले आहेत! हेरात जिंकलं तेंव्हा सतरा लाख – सतरा वर पाच शून्य – इतकी माणसं मारली त्यांनी!!! लढायांनंतरच्या त्यांच्या विध्वंसाची वर्णनं वाचून सुन्न होतं मन.
***
चेंगिझ खान भारतात आला नाही कारण इथलं उष्ण हवामान, अस्वच्छ पाणी आणि वेगळ्या हवामानातले अनोळखी आजार या सगळ्यामुळे त्याने भारतात येण्याचा विचार रद्द केला. उत्तरेकडेचे थंड वारे अडवणार्‍या हिमालयाचे किती उपकार आहेत बघा अपल्यावर ! 
***
पुस्तक वाचून झाल्याझाल्या मनात साठलेली अस्वस्थता इथे सांडली आहे सगळी. सगळे संदर्भ परत तपासून मग पोस्ट टाकण्याइतकाही धीर नव्हता माझ्याकडे! हे सगळं आत्ताच लिहायचं होतं!

सद्ध्या मऊचा आणि माझा दिवस पुस्तक वाचल्याशिवाय पूर्णच होत नाही. तिची सुंदर सुंदर पुस्तकं बघितली की पुन्हा मला तिच्या वयाचं होऊन ही पुस्तकं बघावीशी वाटतात.

आज तिच्या लाडक्या “बुप्पा” आणि “मंबू” विषयी. ही सद्ध्या माऊची सगळ्यात आवडती पुस्तकं.
जंगलातल्या सगळ्या लहान प्राण्यांच्या खोड्या काढणार्‍या, त्यांना त्रास देणार्‍या बुक्का हत्तीला एक दिवस चांगलीच अद्दल घडते. त्याची आई, बाबा, मित्र कुणी सापडत नाहीत, आणि जंगलातलं कुणीच त्याला मदत करायला तयार होत नाही. मग बुक्का शहाणा होतो. सुंदर चित्र, सोप्पी गोष्ट, वाजवी किंमत. नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक.

लंबू जिराफ आणि नॉटी खारुताई यांच्या मैत्रीची गोष्टही एनबीटीचीच. लंबू जिराफ आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे मग आपला मित्र कसा होणार असा प्रश्न पडलेल्या नॉटीला लंबू जूंबा हत्ती आणि गप्पू माकड, रंगीला फुलपाखरू आणि फुलं असे मित्र दाखवतो, आणि आपल्यापेक्षा वेगळा असला तरी लंबू आपला मस्त मित्र आहे हे नॉटीला पटतं. 

माऊसाठी आतापर्यंत जी काही पुस्तकं धुंडाळलीत, त्यात मला ज्योत्स्ना प्रकाशन, प्रथम प्रकाशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांची पुस्तकं सगळ्यात आवडली. पुस्तकातली चित्र, गोष्ट, किंमत या सगळ्यात उजवी. बाकी स्लीपिंग ब्युटी आणि सिंडरेला सगळीकडे सहज मिळताहेत, पण कितीही सुंदर कागदावर छापलेली मिळाली तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही.  
तुम्ही दीड वर्षाचे असाल तर काय काय वाचाल? अजून कुठली पुस्तकं सुचवाल मनीमाऊला?

    नाट्यक्षेत्राशी, अभिनयाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. अगदी शाळेतल्या नाटकात भाग घेण्याचा अनुभवसुद्धा गाठीशी नाही … मुळात आमच्या शाळेत गॅदरिंग आणि नाटक हे प्रकारच नव्हते! पडद्याच्या दुसर्‍या बाजूने नाटकाकडे बघण्याचा अनुभवही जेमतेमच. त्यामुळे या पुस्तकाची बहुधा मी ढ मधली ढ वाचक असेन. तरीही, इतक्या मंद वाचकाला खिळवून ठेवणारं विजयाबाई लिहितात. त्यांची गोष्ट वाचतांना त्यांच्या चष्म्यातून आपल्याला मराठी (आणि काही अंशी भारतीय आणि जागतिक रंगभूमीचीसुद्धा) सहा दशकांची वाटचाल बघायला मिळते.
    बाईंच्या कहाणीतली मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे इतकी वर्षं एका क्षेत्रात वावरूनसुद्धा त्यांच्यामध्ये साचलेपणा नाही, बनचुकेपणा नाही. बर्‍याच वेळा असं दिसतं, की तुम्ही एखाद्या क्षेत्रातले तज्ञ म्हणून प्रसिद्ध होता, लोक तुमच्याकडे शिकायला येतात, आणि तुमचं पुढे शिकणं राहूनच जातं. इतक्या कार्यशाळा घेऊन, इतक्या लोकांना तयार करूनही बाईंच्या शिकण्यात खंड पडलेला नाही, नवं शिकण्याची, वेगळं काही करून बघण्याची आच कमी झालेली नाही. कलाकार म्हणून त्या पुस्तकाच्या अखेरपर्यंत तेवढ्याच जिवंत वाटातात.
    या पुस्तकात मला फार जवळचं वाटणारं म्हणजे कार्यक्षेत्रातला बदल. बारा वर्षं जीव ओतून रंगायनची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना त्यापेक्षा वेगळं काही करावंसं वाटतं, आणि आपल्या ‘प्रायोगिक’ प्रतिमेचं कुठलंही गाठोडं सोबत न घेता त्या लोकमान्य रंगभूमीवर काम करून बघतात. ब्रेश्तचं जर्मन नाटक मराठीमधून लोकनाट्याच्या अंगाने उभं करून त्याचे जर्मनीमध्ये यशस्वी प्रयोग करणं, मुद्राराक्षस, हयवदन, नागमंडल  ही नाटकं जर्मन कलाकारांबरोबर जर्मन भाषेत बसवणं असं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं अवघड आव्हान स्वीकारतात, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका बनवून बघतात आणि एनएसडीची धुरा असेल किंवा एनसीपीएचं संचालकत्व असेल, या भूमिकाही स्वीकारतात. आपल्याला सद्ध्याच्या कामात तोचतोचपणा जाणवतोय, नवं काही करायला हवंय हे समजून, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून असं नवं नवं करून बघण्याची ‘रिस्क’ आयुष्यभर घेऊ शकणारी माणसं थोडी असतात. ती भूतकाळाचं ओझं बाळगत नाहीत, आणि मनाने कधी म्हातारी होत नाहीत.
    या वृत्तीचाच दुसरा भाग म्हणजे जे करायचं ते मनापासून, जीव ओतून. पाट्या टाकायच्या नाहीत. टाळ्या मिळत असल्या तरीही आपल्याला खोटी वाटणारी भूमिका करायची नाही. असं म्हणणारं कुणी भेटलं म्हणजे मधूनच डळमळीत होणर्‍या आपल्या विचाराला पुन्हा बळ येतं.

     नाटक हे टीमवर्क आहे. सगळ्या टीमच्या तारा जुळल्या तरच सुस्वर ऑर्केस्ट्रा उभा राहील. बाकीच्या नटांना खाऊन टाकणारा ‘सोलो’ अभिनय करायचा नाही. वेळेची शिस्त, तालमींमधली मेहनत यात चालढकल नाही. आपल्या भूमिकेचं बेअरिंग नटाला सापडणं हे सगळ्यात महत्त्वाचं. रंगमंचावरचा अभिनय प्रेक्षकाला बेगडी वाटता कामा नये, सहज वाटला पाहिजे. अर्थात ही ‘सहजता’ येण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. अभिनयातलं ओ का ठो समजलं नाही, तरी बाईंना काय म्हणायचंय ते अगदी नीट समजतंय असं वाटतं या बाबत. 

    एका मनस्वी बाईची मस्त गोष्ट. अगदी ओघवत्या शब्दात, गप्पा माराव्यात त्या सहजतेने मांडलेली. जरूर, जरूर वाचा.

झिम्मा: आठवणींचा गोफ
विजया मेहता
राजहंस प्रकाशन 
किंमत रु. ३७५

‘ड्रीमरनर’ ही ऑस्कर पिस्टोरियसने सांगितलेली त्याची स्वतःची कहाणी. साऊथ आफ्रिकेच्या ऑस्करच्या दोन्ही पायांमध्ये जन्मत:च दोष होता, आणि आपल्या पायांवर तो शरीराचा भार तोलू शकणार नाही असं डॉक्टरांचं निदान होतं. आपल्या बाळासाठी सर्वात योग्य उपचार काय असू शकेल हे समजून घेण्यासाठी ऑस्करच्या आईवडिलांनी जगभरातल्या तज्ञांची मत घेतली, सर्व शक्यता पडताळून बघितल्या. आयुष्यभर व्हीलचेअर वापरणं किंवा पाय कापून टाकून कृत्रीम पाय लावणे असे पर्याय समोर होते. ऑस्कर चालायला शिकण्याच्या वयाचा होण्यापूर्वीच पायाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर तो कृत्रीम पायांनी चालायला लवकर शिकेल आणि त्याच्या मनात आपल्या ‘वेगळ्या’ पायांविषयी कुठलाही गंड निर्माण होणार नाही असं डॉक्टरांचं मत पडलं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्या, ऑस्करचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापण्यात आले, आणि आपल्या वयाच्या बाकी मुलांसारखाच ऑस्करही चालायला लागला – कृत्रीम पाय वापरून.
चालण्यापाठोपाठ सुरू झाली मोठया भावाच्या सोबतीने केलेली दंगामस्ती. ऑस्करच्या आईवडिलांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. बाळ जन्मल्याबरोबर त्याचे पाय पाहून ऑस्करच्या वडिलांनी म्हटलं, “याचे पाय वेगळे दिसताहेत.” सदोष नाही, तर फक्त वेगळे. ऑस्करच्या ‘वेगळ्या’ पायांचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. आवश्यक ते वैद्यकीय निर्णय योग्य वेळी घेतले, पण आपल्या मुलाला कधीही कुठली वेगळी वागणूक दिली नाही. मोठ्या कार्लने बूट घालायचे, तसेच ऑस्करने पाय आणि बूट घालायचे इतक्या सहज या कुटुंबाने ऑस्करचं पाय नसणं स्वीकारलं. इतर मुलांमध्ये त्याला नैसर्गिकपणे मिसळू दिलं, झाडावर चढणं, सायकल चालवणं, पोहणं, धडपडणं सगळं सगळं करू दिलं. वाढीचं वय आणि ऑस्करचा धडपडा स्वभाव, त्यामुळे दर दोन एक महिन्यांनी ऑस्करचे नवे पाय बनवण्याची वेळ यायची. पण त्याचा कुणी बाऊ केला नाही.
ऑस्करला सगळ्याच मैदानी खेळांमध्ये रस होता. शाळेच्या होस्टेलला रहायला गेल्यावर तो रग्बीमध्ये जास्त रमू लागला, या खेळात पुढे येण्यासाठी त्याची कसून तयारी सुरू झाली. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, रग्बीसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला दोन महिने फक्त ऍथलेटिक्सचा सराव करायला सांगितला गेला. ऍथलेटिक्सची ऑस्करला कधीच फारशी आवड नव्हती. रग्बीसाठी म्हणून नाईलाजाने त्याने पळण्याचा सराव सुरू केला, आणि त्याची पळण्यातली गती बघून कोच त्याला अपंगांच्या स्पर्धांसाठी १००, २००, ४०० मीटर पळण्यात तयार करायला लागले. २००४च्या अथेन्सच्या पॅरालिंपिक्समध्ये ऑस्करने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत पदक मिळवलं. पुढच्याच वर्षी त्याने साऊथ आफ्रिकन चॅम्पियनशीप स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत (अपंगाच्या नव्हे, धडधाकट खेळाडूंच्या) उत्तम वेळ नोंदवली. आपण पाय असणार्‍या स्पर्धकांच्या तोडीची कामगिरी करू शकत असू, तर त्यांच्याही स्पर्धांमध्ये भाग का घेऊ नये या विचाराने ऑस्करने अपंगांच्या आणि धडधाकट खेळाडूंच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून पुढे येण्यासाठी एकीकडे ऑस्करचा कसून सराव चालू होता, तर दुसरीकडे त्याच्या कृत्रीम पायांमुळे त्याला पळतांना धडधाकट खेळाडूंपेक्षा गैरवाजवी फायदा मिळतो म्हणून वादंग सुरू झाला. जानेवारी २००८ मध्ये आयएएएफनी (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिल्स फेडरेशन्स) ऑस्करवर धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली. ऑस्करने या बंदीविरुद्ध सीएएसकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) अपील केलं. त्याला कृत्रीम पायांमुळे जसे फायदे होतात, तसे तोटेही होतात. अन्य अपंग खेळाडू ऑस्करच्या कामगिरीच्या जवळपास पोहोचू शकलेले नाहीत. त्याची कामगिरी सातत्याने सुधारत असतांना त्याने कृत्रीम पायांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. हे मुद्दे विचारात घेऊन मे २००८ मध्ये ऑस्करवरची बंदी उठवण्यात आली. २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी ४०० मीटर स्पर्धेसाठीची पात्रता वेळ ऑस्करला नोंदवता आली नाही, आणि त्याने वाईल्ड कार्डवर प्रवेश मिळवण्यास नकार दिला. त्यावर्षीच्या पॅरालिंपिक्समध्ये त्याने १००, २०० आणि ४०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक आणि ४०० मीटरमध्ये (अपंगांसाठी) विश्वविक्रम आशी चमकदार कामगिरी केली. यंदाच्या लंडन ऑलिंपिक्समध्ये ४०० मीटर्स धावणे आणि ४०० x ४ रिलेमधल्या सहभागानंतर ऑस्कर अपंगांच्या पॅरालिंपिक्समध्ये आपली बीजिंगची तीन सुवर्णपदकं राखण्याचा प्रयत्न तर करेलच, शिवाय ४०० x ४ रिलेमध्येही तो सहभागी होतो आहे. आपली ओळख एक ऍथलिट म्हणून असावी, ‘अपंग असूनसुद्धा पळणारा’ अशी नको अशी ऑस्करची इच्छा आहे. त्याच्या मनोनिग्रहाने आणि मेहनतीने त्याच्या अपंगत्वावर कधीच मात केलीय. त्याची स्पर्धा आहे ती स्वतःशीच.
धावण्याच्या ट्रॅकवर इतिहास घडवत असतानाच ऑस्कर भूसुरुंगांच्या स्फोटामुळे हात पाय गमवून बसलेल्या लोकांना कृत्रीम हातपाय मिळवून देण्यासाठी काम करतो आहे. या कामात आर्थिक मदतीबरोबरच तो स्वतःचा वेळही देतोय.
ऑस्करची आत्मकथा विशेष भावते, ती त्यातल्या संयत चित्रणामुळे. तसं बघितलं तर दोन्ही पाय नसणं, लहानपणीच आई वडिलांचा डायव्होर्स, आईचा मृत्यू, प्रेमभंग, मोठ्या भावापासून दुरावणं, ऍथलेटिक्स संघटनेने बंदी घालणं आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूला झेलावे लागणारे ताणतणाव असा मेलोड्रामा तयार करायला लागणारा सगळा मालमसाला ऑस्करच्या गोष्टीत आहे. पण ऑस्कर कुठेही स्वतःची कीव करत नाही. कृत्रीम पायांच्या घर्षणामुळे पायावर होणार्‍या जखमा असोत, किंवा पावसात पळतांना येणार्‍या अडचणी असोत, या गोष्टी फक्त जाताजाता सांगण्याच्या ओघात नमूद केल्या जातात. त्यांचं तो भांडवल करत नाही.  माझ्याच वाट्याला हे का हा प्रश्न या गोष्टीत कुठेच येत नाही. तो खरा योद्धा आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारून आव्हानांना सामोरे जाण्याची त्याची धमक आचंबित करते.
मराठी पुस्तक वाचतांना अनुवाद म्हणून भाषा कुठे बोजड वाटत नाही हे अनुवादकर्तीचं यश. या अनुवादाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सोनाली नवांगुळ यांनी तो केलाय. लहानपणी बैलगाडीचं चाक पाठीवर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेत. इस्लामपूरसारख्या लहान गावात अपंगांसाठीच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणंसुद्धा शक्य नव्हतं. पण घरी अभ्यास करून, शिकून त्या आज कोल्हापूरमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. अपंगांना दया दाखवणाऱ्या पण समानतेची संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात त्या आज एकटीने स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्वावलंबी आयुष्य जगतात. त्यांचं आयुष्यही ऑस्करसारखंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्वतःचं जगणं ऑस्करशी खूप जवळ जाणारं आहे.

(फोटो जालावरून साभार)

****************************

DreamRunner Oscar Pistorias Giyanni Meralo
ड्रीमरनर – ऑस्कर पिस्टोरिअस, सहलेखक – गियन्नी मेरलो,
अनुवाद – सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन
काही दिवसांपूर्वी ‘सामाजिक कामाचं कॉर्पोरेटायझेशन’ या विषयावर या लेखाच्या अनुषंगाने जाणकारांचे विचार वाचायला मिळाले. होते. नुकतंच जॉन वुडचं ‘Leaving Microsoft to change the World‘ वाचलं. मला या विषयावर काय वाटतं, ते या पुस्तकामुळे थोडं स्पष्ट झालं, म्हणून ही पोस्ट.

*******************************
    १९९९ मधली गोष्ट. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारा जॉन वुड एका तीन आठवड्यांच्या सुट्टीसाठी नेपाळला गेला. तिथल्या भटकंतीमध्ये त्याला नेपाळच्या दुर्गम भागातली एक शाळा बघायला मिळाली. मुख्याध्यापकांनी कुलुप लावलेल्या कपाटातली चित्रविचित्र पुस्तकं शाळेचं ‘ग्रंथालय’ म्हणून दाखवल्यावर जॉन थक्क झाला. इटालियन भाषेतल्या कादंबरीपासून ते ‘लोनली प्लॅनेट गाईड टू मंगोलिया’ पर्यंत जी काही पुस्तकं त्या भागात आलेले पर्यटक मागे सोडून गेले होते, ती पुस्तकं एखाद्या मौल्यवान ठेव्यासारखी शाळेने कपाटात जपून ठेवली होती – मुलांनी हाताळून खराब होऊन येत म्हणून! जॉनला आपलं बालपण आठवलं, अमेरिकेत कार्नेजीनी गावागावात उभ्या केलेल्या ग्रंथालयांनी आपल्या शिकण्यामध्ये किती मोलाची कामगिरी बजावली आहे हे त्याला जाणवलं, आणि प्रश्न पडला, की नेपाळच्या त्या शाळेतल्या मुलांनाही अशी पुस्तकं वाचायची संधी का मिळू नये?

तसं बघितलं, तर हिमालयात ट्रेकला येणार्‍या अनेक संवेदनशील माणसांना हे जाणवतं. त्या क्षणी त्या शाळेसाठी काही करायची ऊर्मीही दाटून येते, पण हिमालयातून परत जाऊन रोजच्या रूटीनला लागलं, की विसरूनही जाते. जॉनचं वेगळेपण म्हणजे नेपाळहून परत गेल्यावरही आपण या शाळेसाठी पुस्तकं कशी पाठवायची हा प्रश्न त्याच्या डोक्यात राहतो, आणि पुढच्या वर्षी जॉन आणि त्याचे वडील पुस्तकांची खोकी घेऊन नेपाळमध्ये दाखल होतात!

या नेपाळ भेटीनंतर जॉनला जाणवलं, की आपण पुन्हा पुन्हा इथे येत राहणार आहोत. एका शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं पुरवण्याने इथलं काम पूर्ण होणार नाहीये. त्याने आपल्या आजवर जमवलेल्या पुंजीचा अंदाज घेतला, मायक्रोसॉफ्टला राजिनामा दिला, आपल्या गर्लफ्रेंडला हा निर्णय सांगितला, तिला यात आपली साथ देणं शक्य नाही हे स्वीकारून हे नातं संपवलं, आणि नोकरीनिमित्तचा बीजिंगमधला तळ हलवून तो अमेरिकेला परत गेला. यापुढची जॉनची गोष्ट म्हणजे एका मायक्रोसॉफ्ट एक्झिक्युटिव्हने आपल्या कंपनीतलं वर्क कल्चर वापरून मायक्रोसॉफ्ट इतक्याच वेगाने वाढणारं एक सामाजिक काम कसं उभं केलं याची कहाणी आहे.

जॉन वुडसारखा माणूस जेंव्हा कॉर्पोरेट जगातल्या तिमाही टार्गेट्सच्या भाषेत बोलत सामाजिक काम उभं करतो, तेंव्हा त्याचे फायदे – तोटे काय आहेत ?

मान्य आहे फक्त रिझल्ट्सचा विचार करताना फार मूलगामी विचार करता येणार नाही. ‘तुमचं शिक्षणविषयक तत्त्वज्ञान काय?’या प्रश्नावर जॉनच्या संस्थेकडे उत्तर नाही, ते उत्तर शोधण्याची गरजही त्यांना वाटणार नाही. पण आजच्या घडीला किती देशांमध्ये किती शाळा बांधून झाल्या, किती पुस्तकं या मुलांपर्यंत पोहोचवून झाली हा नेमका आकडा ते देऊ शकतात. आणि हे आकडे पुरेसे बोलके आहेत. शिक्षणक्षेत्राविषयी मूलगामी विचार करणार्‍या, शैक्षणिक प्रयोग करणार्‍या कामांची गरज तर आहेच. पण साक्षरता आणि जगभरात सर्वांना प्राथमिक शिक्षण हे अगदी प्राथमिक उद्दिष्ट गाठायला जॉनच्या ‘रिडिंग रूम’चीही तितकीच आवश्यकता आहे. There is enough space for all kind of work in this field.

आंद्रे आगासी. माझ्या मनातली त्याची प्रतिमा म्हणजे खेळ कमी आणि दिखावा जास्त. मुद्दाम पुस्तक मिळवून त्याच्याविषयी वाचावं असं काही मला आपणहून वाटलं नसतं. खरं सांगायचं तर माझ्या लाडक्या स्टेफीच्या नव‍र्‍याचं पुस्तक म्हणून हे पहिल्यांदा वाचायला घेतलं… म्हणजे पुस्तक सुंदर आहे म्हणून अनघाने आधी सांगितलं होतं,पण अंतस्थ हेतू स्टेफीला या पंकमध्ये नेमकं काय बरं दिसलं असावं हे तपासण्याचा होता. 😀

पण पुस्तक वाचत गेले तसतसा त्यात दिसणारा आंद्रे खूप ओळखीचा वाटायला लागला. टेनिस आवडतही नाही, आणि सोडवतही नाही अश्या चक्रव्यूहात धडपडणारा. स्वतःच्या शोधातला.

व्यावसायिक टेनिसमधलं करियर म्हणजे पंधराव्या-सोळाव्या वर्षी सुरू होणार आणि तीस – पस्तिसाव्या वर्षी तुम्हाला ‘माजी’मध्ये जमा करणार. जे काही करून दाखवायचंय ते या पंधरा-वीस वर्षांच्या काळात. स्पर्धा, प्रसिद्धी, पैसा, फिरती आणि टेनिससारखा शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस लावणारा खेळ. इथे जागेवर टिकून राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. हा सांघिक खेळ नाही. त्यामुळे विजयही तुमचाच आणि अपयशही फक्त तुमचांच. त्यात वाटेकरी नाहीत. तुमची एक एक चूक मॅग्निफाय करून जगाच्या कानाकोपर्‍यात स्लो मोशनमध्ये हजारो वेळा चघळली जाते. तुमचं काम म्हणजे हारेपर्यंत खेळत रहायचं, आणि हारल्यावर पुन्हा जिंकण्यासाठी!

अश्या खेळामध्ये एक मनस्वी खेळाडू उतरतो – किंवा ढकलला जातो. त्याला या खेळाविषयी कधीच प्रेम नव्हतं. त्याच्या लहानपणी त्याच्या वडलांनीच ठरवून टाकलंय की आन्द्रे टेनिस खेळणार, आणि तशी तयारीही चालू झालीय. टेनिस सोडून आन्द्रेला दुसरं काही येत नाही, आणि टेनिसचा तर मनापासून तिटकारा आहे. इतक्या वषांच्या सरावातून तो तांत्रिक दृष्ट्या खूपच सरस आहे. पण व्यावसायिक स्तरावर खेळताना खेळाचं तंत्र हा जिंकण्यातला फार छोटा भाग असतो. इथे बाजी मारून जातात त्या लढण्याची इच्छा, एकाग्रता, चिकाटी,consistancy अश्या गोष्टी. आणि मनातून वाटल्याशिवाय यांत्रिकपणे खेळणं आन्द्रेला येत नाही. त्यामुळे कधी उत्तम खेळी,कधी पहिल्याच फेरीत नामुष्कीचा पराभव, कधी लोकांच्या गळ्यातला ताईत, कधी सगळीकडून टीकेचा मारा असा आन्द्रेचा हा सगळा प्रवास आहे. निराशेच्या गर्तेत म्हणजे अगदी उत्तेजक द्रव्य घेण्यापर्यंत जाऊन तो परत येतो. परत उभा राहतो, कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो.

चुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.

बाकी त्याचं विश्व आणि माझं विश्व यांची काहीच तुलना नसेल, पण आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे. 😀 😀

Open – An Autobiography
Andre Agassi
2009, Harper Collins Publishers

मागच्या आठवड्यात ‘द पियानिस्ट’ बघितला – त्याच्यावरून नॉर्मलला यायच्या आधी आज ‘हॅनाज सूटकेस’ हाती पडलं, आणि वाचून होईपर्यंत खालीच ठेवता आलं नाही. इथे लिहिल्यावर कदाचित थोडं मनाला हलकं वाटेल, म्हणून इथे लिहिते आहे – नाहीतर आकाश भरून भरून आलंय. काळेकुट्ट ढग जमलेत अगदी  😦

झेकोस्लोवाकियामधल्या एका बारा – तेरा वर्षाच्या ज्यू मुलीची, हॅना ब्रॅडीची ही गोष्ट. ‘डायरी ऑफ ऍन फ्रॅंक’ची झेक आवृत्ती म्हणू का याला? तितकीच अस्वस्थ करणारी.

तोक्योच्या हॉलोकास्ट एज्युकेशन रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर फुमिको इशिओका यांच्या हाती हॉलोकास्टची स्मृती म्हणून एक सूटकेस आली. पोलंडमध्ये आऊसश्विट्झच्या संग्रहालयाकडून आलेल्या या सूटकेसवर तिच्या तेरा वर्षांच्या मालकिणीचं नाव होतं. एवढ्या माहितीच्या जोरावर फुमिकोनी जगभरची हॉलोकास्ट संग्रहालयं, ज्यूंविषयी माहिती देणारी केंद्र धुंडाळली. या शोधाशोधीतून त्यांना जगाच्या दुसर्‍या टोकाला कॅनडामध्ये स्थायिक झालेल्या हॅनाच्या भावाचा पत्ता मिळाला, आणि संग्रहालयातल्या एका अनोळखी वस्तूला चेहरा मिळाला. लहान मुलांसाठी लिहिलेल्या या पुस्तकात हॅनाची गोष्ट आणि फुमिकोची हॅनाच्या शोधाची गोष्ट अश्या दोन्ही गोष्टी समांतर जातात.

जेमतेम शंभर – सव्वाशे पानांचं पुस्तक. लहानच काय, मोठ्यांनासुद्धा मुळापासून हलवून सोडणारं. सत्यकथा.

इथे हॅनाविषयी अजून माहिती मिळेल. इनसाईड हॅनाज सूटकेस नावाची डॉक्युमेंटरी आहे या गोष्टीविषयी. सध्यातरी मला ही डॉक्युमेंटरी बघण्याची हिंमत नाही.

    एक वर्ष पूर्ण झालं जस्मिन रिव्होल्युशनला. अजून तिचं यश अपयश ठरायचंय.
   
    असेच आशा घेऊन आलेले दिवस इजिप्तने मागच्या शतकातही बघितले होते. लोकशाहीची स्वप्न तेंव्हाच्या तरुणांनीही बघितली होती. ‘कैरो ट्रायलॉजी’ वाचलं तेंव्हापासून या पुस्तकाविषयी लिहायचं मनात होतं. आता वाचून खूप दिवस झालेत, फारसे तपशील आठवत नाहीयेत, पण एका वेगळ्याच विश्वाची ओळख करून देणार्‍या या पुस्तकाविषयी आठवेल तसं लिहायचंच असं ठरवलंय.

    इजिप्तचे नजीब महफूझ हे नोबेल पुरस्कार विजेते लेखक. कैरोमधलं १९१९ ते १९४४ या काळातलं लोकजीवन वर्णन करणार्‍या तीन कादंबर्‍यांची ही महफूझ यांची मूळ अरबी भाषेतली मालिका. मी वाचलं ते या कादंबर्‍यांचं इंग्रजी भाषांतर.

    अल सयीद अहमद आणि अमीनाबी हे कैरोमधलं एक जोडपं. त्यांच्या कुटुंबाची गोष्ट या तीन कादंबर्‍यांमधून महफूझ यांनी सांगितली आहे. पहिली कादंबरी वाचतांना मला आपल्या ह ना आपट्यांच्या “पण लक्ष्यांत कोण घेतो?” ची आठवण झाली. गोष्टीची तीच लय, आणि सामाजिक परिस्थितीही काहीशी तशीच. आणि पुस्तकाचं आकारमान बघता तब्येतीत वाचण्याची गोष्ट.

    या कादंबरीत आपल्याला दिसतो तो अल सयीद अहमद हा इजिप्तच्या पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतिक म्हणता येईल असा कुटुंबप्रमुख. त्याच्या एकाधिकारशाहीखाली जगणारं त्याचं कुटुंब. अमीनाबी ही पतीचा प्रत्येक शब्द झेलण्यात धन्यता मानणारी आज्ञाधारक पत्नी. तिला बाहेरचं जग दिसतं ते केवळ खिडकीच्या नक्षीदार झरोक्यातून. नवर्‍याची परवानगी न घेता दर्ग्याला गेली म्हणून अल सयीद बायकोला थेट घराबाहेरसुद्धा काढतो! कादंबरी वाचतानाच आपल्याला गुदमरायला होतं. मुंगीच्या गतीने काळ सरकत असतो, आणि त्याच गतीने या घराचं जगणंही बदलत जातं.

    अल सयीदची शारीरिक ताकद हलूहळू वयाप्रमाणे कमी होत जाते. मुलींची लग्न होतात आणि त्या आपापल्या सुखदुःखात बुडून जातात. यासीन बापाचं कर्तृत्त्व न घेता फक्त बाहेरख्यालीपणाच घेतो. कवी मनाचा फहमी मोर्चामध्ये चुकून गोळी लागून मरतो. धाकटा कमाल धर्म, प्रेम, परंपरा यापासून दूर जाताजाता जगाकडे पाठ फिरवणारा तत्त्वज्ञ बनतो. शेवटापर्यंत धीराने जगत राहते ती अमीनाबी. संपूर्ण कादंबरीतली सगळ्यात मृदु वागणारी खंबीर स्त्री.

    गेल्या वर्षी तहरीर चौकाच्या बातम्या बघताना लोकशाहीची स्वप्न बघणारा, झगलूलपाशाला पाठिंबा देणारा फाहमी आठवला कैरो ट्रायलॉजीमधला. डोळ्यात स्वप्न असणारे असे किती फाहमी क्रांतीमध्ये हकनाक मरत असतील !

**************************************
The Cairo Trilogy (Palace Wअlk, Palace of Desire & Sugar Street)
Author: Naguib Mahfouz

पुस्तक फ्लिपकार्टवर इथे आहे.
(ही तिन्ही पुस्तकं स्वतंत्र उपलब्ध आहेत. माझ्याकडे ट्रायलॉजी म्हणून एकच हार्डबाऊंड ठोकळा आहे.)