Archives for category: प्रासंगिक

कुंड्यांमधली बाग सुरू केली तेंव्हा पहिल्यांदा जी वीस – बावीस झाडं आणली त्यातला एक माझा सोनचाफा. गेली सहा वर्षं तो माझ्या एवढ्याश्या टेरेसवर भरभरून फुलतोय, सुगंधाची लयलूट करतोय. अगदी सुरुवातीला आमच्या समोरची इमारत झालेली नव्हती आणि टेरेसवर भन्नाट वारं यायचं, आणि अश्या वेड्या वार्‍यात हा कसा टिकेल म्हणून मला शंका वाटायची. पण तो नुसता टिकलाच नाही, तर फुलतही राहिला. टेरेसवर पहिल्यांदाच बाग करत असल्यामुळे तिथे मिळणार्यात सूर्यप्रकाशात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती फरक पडतो याची सुरुवातीला अजिबात कल्पना नव्हती. पाणी, सूर्यप्रकाश, खत सगळंच अजून शिकत होते मी. पण शिकाऊ माळीणबाईंना सांभाळून घेतलं त्यानं. 

त्याला आलेलं पहिलं फूल, त्याची सुरुवातीची पानं, ही “सुवर्णरेखा” जात आहे, हिची पानं अशीच असतात हे माहित नसल्यामुळे त्या पानांच्या वळलेल्या कडा पाहून माझी काळजी, पहिल्यांदा छाटणी करतानाची धाकधूक, खूप दिवस घराबाहेर राहून आल्यावर घरी आल्यावर अर्ध्या रात्रीसुद्धा बागेत काय चाललंय ते बघण्याची धडपड हे सगळं आज आठवतंय.

बागेत सगळ्यात जास्त गप्पा मी त्याच्याशी मारल्यात,  आणि आपण सांगितलेलं – न सांगितलेलं सगळं त्याला समजतंय याचाही अनुभव घेतलाय! अशीच एकदा एका निर्णयाची मोठी जबाबदारी वाटत होती. सगळं नीट होईल ना याची काळजी होती. अस्वस्थ आणि एकटं वाटत होतं. हे सगळं त्याच्याजवळ व्यक्त केलं, आणि भर उन्हाळ्यात, माझं तसं दुर्लक्षच होत असताना माझ्या एवढ्याश्या झाडाला त्या दिवशी तब्बल वीस फुलं आली! माझं झाड माझ्याशी बोलतं यावर त्या दिवशी माझा ठाम विश्वास बसला.

धाकटं भावंड स्वीकारणार्‍या समजूतदार मोठ्यासारखं त्याने माऊ आल्यावर मला बागेसाठी पूर्वीसारखा वेळ न देता येणंही मान्य केलंय. 
या एका झाडाने मला किती आनंद दिलाय ते शब्दात सांगणं शक्य नाही! इथे ब्लॉगवरच त्याच्या किती पोस्ट आहेत हे आज जाणवलं.

असं सगळं मस्त चाललं असताना एकीकडे एक टोचणी लागून होती … कितीही मोठी कुंडी असली तरी सोनचाफ्याला ती आयुष्यभर पुरणार नाहीये. त्याच्या पूर्ण क्षमतेवढं मोठं होण्यासाठी त्याला मोकळ्या जमिनीत रुजायची संधी मिळायला हवीय. पण झाड मोकळ्या जमिनीत लावताना मला त्याच्याजवळ राहता येणार नाही! त्याला असं घर सोडून दूर पाठवायची मनाची तयारी काही होत नव्हती. दोन – चार ठिकाणी मी झाड लावता येईल का म्हणून चौकशीही केली, पण त्या चौकशीत खरा जीव नव्हताच. आणि एक दिवस अचानक नवर्‍याने सांगितलं – “मी सोसायटीमध्ये विचारलंय. आपल्या इथे खाली झाड लावायला जागा शोधणार आहेत ते.” फार दूर नाही म्हणून आनंद, पण आता खरंच जाणार म्हणून दुःख असं चाललं होतं मग. मग सोसायटीचे लोक येऊन झाड पसंत करून गेले. एक दिवस माळीदादाही झाड बघायला आले. पण तेंव्हा झाडाला भरभरून पालवी आली होती, आणि कळ्याही. हा बहर संपल्यावर झाड हलवू या असं ठरलं, आणि हा बहर कधी संपूच नये असं मला मनाच्या कोपर्‍यात वाटायला लागलं! त्यात त्याच्यासाठी शोधलेली जागा म्हणजे केवडा आणि फणसाचं झाड काढून तिथली मोकळी जागा. मस्त वाढलेला केवडा आणि फणस का तोडायचा? (उद्या असाच माझा सोनचाफा तोडला यांनी तर? सोसायटीचं कुणी सांगावं! 😦 परत शंका!) तो बहर संपलाच शेवटी, पण मग पावसाची दडी, सोसायटीच्या बागेला पाणी पुरवणारी मोटर जळाली अशा विविध कारणांनी त्याचा मला अजून महिनाभर सहवास मिळाला. मग दोन वेळा झाड घ्यायला आलेले माळीदादा घरात कोणी नाही म्हणून परत गेले, आणि अखेरीस झाडाच्या पाठवणीची वेळ आलीच!
दुपारी माऊ झोपलेली असताना इतक्या झटकन नेलं त्यांनी झाड, की मला नीट निरोपही घेता आला नाही. माऊ उठल्यावर तिला सांगितलं, “आपलं झाड गेलं खाली!”
“खाली कुठे?”
“माहित नाही! मला माळीदादा दिसतच नाहीयेत खिडकीतून. आपण शोधू खाली जाऊन.”
“आई ते बघ माळीदादा झाड लावताहेत तिथे खाली!” माऊला दिसले ते बरोब्बर.

अगदी माझ्या खिडकीच्या खाली जागा मिळाली सोनचाफ्याला – लांबून का होईना, पण रोज दिसणार तो मला. अगदी खाली जाऊन गप्पा सुद्धा मारता येतील! टेरेसवरच्या त्याच्या रिकाम्या जागेकडे बघून रिकामंरिकामं वाटलं की फक्त खिडकीतून एकदा खाली बघायचं! 🙂 जीव भांड्यात पडणं म्हणतात ते हेच!


कधी येणार पाऊस? येणारच नाही का अजून? 
हवामान खातं तर म्हणतंय मान्सूनचा पाऊस संपला. मान्सून किंवा बिगरमान्सून आम्हाला काही फरक पडत नाही हो, पाऊस येऊ देत म्हणजे झालं.
आणि आलाच नाही तर? तर आम्ही वर्षभर दुष्काळाचं फक्त राजकारण करत बसणार का?

गेले काही दिवस जे काही पर्यावरणाविषयी समजून घेते आहे त्याने अस्वस्थ व्हायला होतंय. या वर्षी पाऊस नीट पडला असता तर कदाचित मागे पडलाही असता हा विषय थोडा. या अभ्यासात एक नकाशा बघितला होता. जगभरातली पाण्याची स्थिती दाखवणारा. तो बघून मुळापासून हादरले होते. आणि त्यापाठोपाठ मिळालेल्या माहितीने तर झोप उडवली. 


 काय सांगतो हा नकाशा? जगभरातल्या पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती दाखवली आहे इथे. यानुसार आपल्या देशाचा बहुसंख्य भाग हा “ओव्हरएक्स्प्लॉयटेड” ते “हायली एक्स्प्लॉयटेड” गटात मोडतो. या नकाशावर लोकसंख्येचा नकाशा ठेवून बघितला, म्हणजे संकटाची व्याप्ती लक्षात येईल. आपली भूजलाची पातळी धोकादायकरित्या खालावलेली आहे. वर्षभरात जितकं पाणी जमिनीत जातं, त्यापेक्षा जास्त उपसा आपण करतो आहोत. “माझ्या मालकीच्या जमिनीमध्ये मी माझ्या खर्चाने बोअरवेल काढली, आणि त्यातून मिळवलेलं पाणी मला वाटेल तसं वापरलं. यावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण?” हा माज आपल्याला परवडणार नाही. याच वेगाने पाण्याचा उपसा होत राहिला तर काही दिवसांनी अपल्याला प्यायला सुद्धा पाणी पुरणार नाही! 

यात पुढची गुंतागुंत म्हणजे आपल्याकडे पाण्याचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी होतो. आपल्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी शेतीचं उत्पन्न वाढायला हवंय, आणि आपण शेतमालाची निर्यातही करतो. म्हणजे शेतीची पाण्याची मागणी वाढत राहणार. एक किलो भात पिकवायला सुमारे ३५०० लिटर पाणी लागते. एक क्विंटल तांदळाची निर्यात म्हणजे तो एक क्विंटल पिकवण्यासाठी वापरलेल्या ३५०० * १०० लिटर पाण्याचीही निर्यात आहे! असं आपणं शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनतून पाणी “निर्यात” आणि “आयात”ही करतो. याला “व्हर्च्युअल वॉटर ट्रेड” म्हणतात. आपल्या देशाचं ही आयात आणि निर्यात यांचं गुणोत्तर कसं आहे? भयावह!!!

 आधीच जास्त उपसा झालेला आहे आणि ती तूट भरून निघण्याऐवजी आपण पाणी निर्यात करतो आहोत!

मोसमी पाऊस किती पडणार आणि कधी पडणार याचे आपले अंदाज अजूनही पुरेसे विश्वासार्ह आणि उपयुक्त
(actionable) नाहीत. वरचं सगळं पाण्याचं गणित बाजूला ठेवलं तरी आधीच आपल्या शेतकर्‍याची अवस्था बिकट आहे. एकरी उत्पन्नामध्ये आपण जगाच्या मागे आहोत. जमिनीचा कस टिकवणं / सुधारणं हे मोठं आव्हान आहे. नवी जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उपलब्ध नाही, आहे ती जमीन नागरीकरणामध्ये जाण्यापासून वाचवणं अवघड झालंय. काय करायला हवं अशा वेळी?

एका तज्ञांचं असं मत वाचलं, की आपल्याकडे मान्सून चांगला झाला तर सरासरीच्या ११०% पर्यंत पाऊस पडतो, वाईट झाला तरी ७५% तरी पडतोच. अजिबात पाऊस पडलाच नाही असं होत नाही. आहे ते पाणी नीट वापरलं तर आपल्याला पुरू शकतं. राजस्थानातील राजेंद्रसिंह यांचे “जोहड” चे यशस्वी प्रयोग, पाणी पंचायत अश्या कित्येक चळवळी मिळेल ते पाणी वाचवण्यात, त्याचा सुयोग्य वापर करण्यात यशस्वी झालेल्या दिसतात. पण या प्रश्नाची व्याप्ती बघितली तर हे लोकल प्रयत्न अपुरे वाटतात. आणि प्रत्येकाने फक्त दुष्काळाची थेट झळ लागल्यावरच प्रयत्न करायचे का?

मी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षेत्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून मला समजलंय ते हे. तुम्ही यातले तज्ञ असाल / यावर प्रकाश टाकणारं काही सुचवू शकत असाल, तर जरूर सुचवा – आपल्याकडच्या शेतीचं अर्थशास्त्र समजून घ्यायचंय मला. परवा ट्रेनने येतांना बघितलं, या दुष्काळातही तर भीमेच्या पात्रात पंप टाकून ऊसाला पाणी फिरवत आहेत. जिथे पाणी आहे तिथे ऊस आहे, जिथे नाही तिथे प्यायलाही पाणी नाही! ऊस केल्याशिवाय आपला शेतकरी जगूच शकणार नाही का? अन्नधान्यासाठी कितीतरी जास्त महत्वाची असणारी गहू, ज्वारी, बाजरी, भात, डाळी पिकवून त्याला पैसा का मिळू शकत नाहीये?

*** 
(Water stress indicator हा नकाशा http://www.unep.org वरून तर Virtual Water Trade हा नकाशा http://temp.waterfootprint.org या संकेतस्थळावरून साभार.)

केवळ नशीब म्हणून वाचले असं कितीतरी वेळा झालंय माझ्या बाबत. अशीच ही मी चौथी पाचवीत असतानाची गोष्ट. रेल्वे कॉलनीतली. रेल्वे कॉलनी म्हणजे एकदम सुस्त परिसर. जुन्या काळात बांधलेले प्रचंड बंगले, त्यांची भली मोठी आंगणं, पुढे – मागे – बाजूला प्रचंड आकाराची (बहुधा निगा न राखलेली) बाग. एका घराचा दुसर्‍याशी संबंध नाही. रस्त्यावरून किंवा गेटमधून घराचं दार सुद्धा नीट दिसणार नाही. संध्याकाळीसुद्धा रस्त्यात फारसं कुणी दिसायचं नाही. आता तर दुपारी अडीच ते साडेतीन मधली वेळ असेल. म्हणजे सगळं शांत शांत. घरात मी एकटीच जागी होते. दोघे भाऊ शाळेत / कॉलेजात, बाबा बाहेर गेलेले. आजी बहुतेक झोपलेली. दार वाजलं. मी जाळीच्या दारातून बघितलं तर एक नऊवारी नेसलेली गावाकडून आल्यासारखी दिसणारी मध्यमवयीन बाई बाहेर उभी.

डॉक्टरांनी प्रायव्हेट पेशंट घेऊ नयेत असा नियम असला तरी कितीतरी डॉक्टर घरी पेशंट बघत, त्यामुळे आईचे पेशंटही डॉक्टरांना भेटायला म्हणून वेळीअवेळी कधीही घरी येत. कधी बरी झालेली एखादी आजीबाई शेतावरनं पिशवीभर ताजी भाजी डॉक्टरीण बाईंसाठी घेऊन येई, कधी कुणी बाळाच्या जन्माचे पेढे-बर्फी घेऊन येई. तपासायला आलेल्यांना “घरी तपासत नाहीत, दवाखान्यात भेटा” म्हणून बोळवण करावी लागे, किंवा असे कुणी भेटायला आलं तर त्यांचा निरोप घेऊन ठेवावा लागे. दारात अनोळखी कुणी उभं असण्यात विशेष काहीच नव्हतं त्यामुळे.

“डॉक्टर नाहीत घरी. आणि घरी तपासत नाहीत त्या.” मी नेहेमीप्रमाणे सांगितलं. “ताई दार उघड जरा.” ती बाई म्हणाली. मी दार उघडलं. “इकडे ये.” तिने माझा हात धरला, आणि एकदम गॅरेजच्या दिशेने मला ती ओढतच न्यायला लागली. गॅरेजचं गेट वेगळं, घराचं वेगळं. गॅरेजच्या रस्त्याला तिने मला नेलं तर घरातून कुणाला दिसणारही नाही. तितक्यात घराचं गेट वाजलं – दवाखान्यातून आई अचानक घरी आली होती. गेटमध्ये कुणीतरी पाहून ही बाई माझा हात सोडून गॅरेजच्या दिशेने पसार झाली. मी गोठल्यासारखी जागीच उभी. किती मूर्ख आणि बावळट आहोत आपण! ही बाई आपल्याला पळवून नेत होती, आणि आपल्याला ते समजलंही नाही … आपण तिला प्रतिकार केला नाही! आई आत्ता आली नसती तर! हे सगळं आईला किंवा कुणाला सांगायचीही लाज वाटली मला!    

“का ग बाहेर का उभी आहेस अशी?” आईने विचारलं.

“काही नाही … बहुतेक पेशंट होती कुणीतरी. गेली.” मी.

“बर. येईल परत.”

आजवर हा प्रसंग कधी कुणाला सांगितला नव्हता. आज लेकीच्या शाळेतल्या आयांच्या ग्रूपवर पुण्यातल्या शाळेचा किस्सा फिरतोय – एक माणूस शाळेच्या दाराजवळ उभा होता, शाळा सुटल्यावर एका मुलाला म्हणाला, “आज तुझी आई नाहीये घरी. तिने मला तुला घेऊन यायला सांगितलंय!” सुदैवाने तो मुलगा शाळेत पळून गेला परत. हाच किस्सा पुण्याच्या अजून एक दोन शाळांमध्ये घडला म्हणे. कसं जपायचं मुलांना? कितीही पढवलेलं असलं, तरी त्या क्षणी मुलाला पळून जायचं सुचेल आणि / किंवा कुणीतरी दुसरं मदतीला येईल अशी आशा करायची आपण! त्यावरून हे आठवलं. आपला मूर्खपणा तेंव्हा मी आईला सांगितला असता तर कदाचित ती बाई सापडलीही असती … कोण जाणे तिच्या बरोबर अजून कोण कोण होतं, माझ्याबाबतचा प्रयत्न फसल्यावर तिने दुसरीकडे पुन्हा प्रयत्न केला का!


माऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही. 
 कारण तिची आई नोकरी करते. 
आई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांचा अभ्यास कोण करून घेणार? आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच!
नोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार?
नोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच! 
तिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच!
 करियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी … पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने!) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा!

याच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी!
सद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता,  आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय! “बरं झालंस नोकरी सोडलीस … पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया!” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही! 🙂  

निर्भयाची घटना घडली, तेंव्हा फक्त धक्का, अविश्वास एवढंच वाटलं होतं, यापलिकडे काही सुचणं शक्यच नव्हतं. त्या घटानेतलं क्रौर्यच इतकं होतं की विचारशक्ती गोठून जावी. हे सगळं घडलं तेंव्हा मी नवी आई होते, लेकीमध्ये पूर्ण बुडून गेलेली. आपल्यासमोरचं हे इवलुसं गाठोडं उद्या मोठं होऊन घराबाहेर पडणार आहे हा विचारही तेंव्हा मनाला शिवलेला नव्हता!
ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत होती तेंव्हा असंही वाटलं होतं, की हिला लवकर मरण यावं आणि या सगळ्यातून सुटका व्हावी तिची एकदाची. म्हणजे चारित्र्यावर कलंक वगैरे म्हणून नाही, पण यातून ही वाचलीच, तरी काय स्वरूपाचं जगणं वाट्याला येणार तिच्या? अजून एक अरुणा शानभाग म्हणून खितपत पडायचं का हिने? शारीरिक पंगुत्व घेऊन आणि आयुष्यभरासाठी “रेप सर्व्हायव्हर” चा शिक्का घेऊन हिला जगावं लागणार. १६ डिसेंबर २०१२ च्या मागे – पुढे तिला काही अस्तित्वच नाही!
“इंडियाज डॉटर” ही निर्भयाच्या केसची मला तरी अतिशय उत्तम हाताळाणी वाटली. निर्भयाचे आईवडील – सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या त्यांची मुलीच्या भल्यासाठीची धडपड आणि ती गेल्यावरही, तिने काही चूक केलेलं नाही, तिचं नाव का लपवून ठेवावं? हा विचार यामुळे त्यांना खरोखर सलाम करावासा वाटला. त्यांचं बोलणं ऐकल्यावर प्रथमच मनापासून वाटलं, निर्भया जगायला हवी होती. तिला जगायला मिळालं असतं.
सगळ्यात धक्का बसला तो गुन्हेगार (आणि त्यांचे वकील) यांचं बोलणं ऐकून. दिल्लीच्या रस्त्यावर दिसणार्‍या कुठल्याही सर्वसामान्य माणसासारखेच हे दिसतात, बोलतात. विकृत लिंगपिसाटसारखे नाही. त्यांच्या बोलण्यात केल्या गोष्टीचा पश्चात्ताप कुठे दिसला नाही – “दोन्ही हातांनी टाळी वाजते. तिला अद्दल घडवण्यासाठी आम्ही हे केलं. ती निमूट राहिली असती तर ही वेळ आलीच नसती!” असं समर्थनच दिसलं! दिल्लीत शिकत असतांना याच रस्त्यांवरून मी बसने प्रवास केलेला आहे. रात्री आठ वाजताही. फक्त मित्राबरोबरही. फरक इतकाच की बस इतक्या कमी गर्दीची नव्हती, खच्चून भरलेली असायची, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझं नशीब बलवत्तर होतं!  

या गुन्ह्यातला तथाकथित बालगुन्हेगार अजून नऊ दहा महिन्यात उजळ माथ्याने पुन्हा दिल्लीत वावरत असेल या कल्पनेने थरकाप उडाला. तिहार जेलचे मानसतत्ज्ञ म्हणतात, तिहारमध्ये दोनशे दोनशे बलात्कार केलेलेही कैदी आहेत. दोनशे हा त्यांना आठवणारा आकडा. खरा आकडा याहून मोठाही असू शकेल! यातल्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या बलात्कारांसाठी त्यांना शिक्षा झालीय आजवर. बलात्कार झाल्यावर गुन्हेगार सहीसलामत सुटणं ही नेहेमीची बाब, शिक्षा होणं अपवादात्मक. आणि स्त्री समोर दिसली, तर पुरुषाचा हक्कच आहे हा ही भावना. ज्यांच्याकडे पैसे असतात ते पैसे फेकून मिळवतात, आमच्यात धमक होती म्हणून आम्ही पैसे न फेकता उपभोग घेतो हा माज! फाशीच्या शिक्षेने हे संपणारं नाही, मान्य. वृत्ती बदलायला हवी, मान्य. कुठे, कधी, कसं बदलणार हे सगळं? तोवर मुलींनी मुळात जन्मालाच येऊ नये, आलं तर घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यास परिणाम निमूट भोगावेत असं म्हणायचं का?


गेल्या पाच – सहा महिन्यांपासून जमेल तसं एका नावाजलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये थोडं काम करत होते. त्या कामावर आधारित पेपर मांडायला एका सेमिनारला गोव्याला जायची संधी मिळाली या आठवड्यात. मी गावाला जाणार म्हणजे अर्थातच माऊला घेऊन. तिला घेऊन एकटीने एवढा उद्योग करावा का नाही अश्या विचारात होते आधी. पण संस्थेतल्या सहकारी म्हणाल्या, जरूर घेऊन ये तिला. मग ठरवलं, जिवाचा गोवा करूनच यावा!

आजवर माऊला घेऊन केलेले प्रवास तिची गैरसोय होणार नाही असं बघून, शक्यतो तिच्या पेसने असे होते. यावेळी प्रथमच दुसर्‍याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, धावपळीचा प्रवास होता, आणि माऊचा बाबा सोबत नसणार होता. त्यामुळे पेपर वाचायच्या तयारीपेक्षा मला माऊच्या तयारीची जास्त काळजी होती!
प्रत्यक्ष कॉन्फरन्स माझ्यापेक्षा माऊने जास्त एन्जॉय केली! पंधरा – वीस कॉलेजवयीन दादा-ताई कौतुक करायला + खेळायला, आणि जरा चेंज हवा असेल तर मग मावशी मंडळी … दोन दिवस नुसता कल्ला केला माऊने! “दोन वर्षांच्या लेकीला घेऊन एवढा प्रवास म्हणजे धीराची आहेस तू!” पासून ते “कॉन्फरन्सला लहान मुलांना घेऊन यायला परवानगी असते का?” पर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तिथे. (यातल्या बहुसंख्य मी कानाआड केल्यात.) 

आजपर्यंत माऊ आणि काम या गोष्टी एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या ठेवायचा माझा प्रयत्न होता. त्याची काही गरज नाही असं जाणवलं मला. तिच्या सोबत असण्याने मला नक्कीच फायदा झाला – जनरली अनोळखी घोळक्यामध्ये मी फार तोंड उघडत नाही. इथे माऊची आई म्हटल्यावर तोंड बंद ठेवण्याची संधीच नव्हती. तरीही माझ्या दसपट तरी ’नेटवर्किंग’ माऊने केलं असेल कॉन्फरन्समध्ये. आणि तिलाही यातून नवं काही अनुभवण्याची संधी मिळेल असं वाटतंय. माऊचं रोजचं रूटीन पाळणं नक्कीच जमणार नव्हतं हे दोन दिवस, पण रूटीनचा बाऊ केला तर नव्या ठिकाणी, नवे अनुभव घ्यायला मिळणं आणि जुळवून घेता येणं कसं शिकणार? एखाद्या वेळी असं झोपायची वेळ आली तर फार वाईट वाटून घ्यायचं नाही असं ठरवलंय मी!
कारण त्यानंतर असा दंगा करायची संधी मिळते!

कोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं!
 

“कोर्सेरा” हे माझं मागच्या वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं! जगाच्या पाठीवर कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात.  साधारण सहा आठवडे ते बारा आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत. (दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत मी अनुभवलेला तिथे शिकवणार्‍यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्‍या गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.
तिथला तेल अवीव युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली! झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का … एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले! 😉 ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स!!! आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा … केवढातरी खजिना गवसेल!

शाळेला जायची गडबड. अजून माऊची पोळी संपयचीय, मोजे, बूट घालून व्हायचेत, औषध घ्यायचं राहिलंय.

खिडकीत आई एक एक घास भरवते आहे, एकीकडे माऊचं खिडकीतून बाहेर बघणं चाललंय. औषध काढायला आई तिथून बाजूला गेल्यावर माऊ तिच्याकडच्या गाणार्‍या भूभूला खिडकीतून दिसणारी आज्जी, काका दाखवायला लागते. खिडकीच्या आतून भूभूला नीट दिसत नाहीये सगळं, म्हणून मग भूभूला गजाबाहेर काढते. तेवढ्यात आई आल्यामुळे घाईघाईने भूभूला आत घेण्याची धडपड सुरू होते, आणि भूभू अडकून बसतो.
“अग, थांब … भूभू पडेल खाली!” आई ओरडल्याबरोबर पटकन माऊ भूभूला सोडून देते आणि बिचारा भूभू बाहेरच्या विंडोसीलवर जाऊन बसतो. आता इथे आई, बाबा कुणाचाच हात पोहोचणार नाहीये. भूभूचा त्रिशंकू झालाय. तिथून खाली पडला तर बिचारा थेट सात मजले खालीच जाईल. भूभू माऊचा लाडका असला तरी तो तिचा नाहीचे मुळी. खालच्या दादाने उदारपणे थोडे दिवस खेळायला दिलाय तो माऊला. बर्‍यापैकी महागातला. थोडक्यात, आता काय करायचं या विचाराने आईला घाम फुटलाय. एकीकडे माऊला धपाटा घालायला हात शिवशिवतोय, दुसरीकडे तिचं “भूभू, तिकडे काका शिमिंग करतोय बघ, दिसला ना तुला?” संभाषण ऐकलेलं असल्यामुळे हसू आवरत नाहीये.
कशीतरी माऊला वेळेत तयार करून आई शाळेत घेऊन जाते. तिथे आज एक वेगळंच रहस्य आहे आईसाठी. भूभूचा विचार करायला वेळच नाहीये. काल माऊच्या डे केअरच्या बॅगेत काल दुसर्‍याच कुणाचा तरी फ्रॉक आणि चड्डी बदललेल्या ओल्या कपड्यांमध्ये आलेय, आणि माऊची चड्डी आणि शॉर्ट गायब आहे. या गमतीजमती नेहेमी शाळेत होतात, पण हे सगळं डे केअरच्या बॅगेत बघून आई चक्रावून गेली आहे. डे केअर – वर्ग – डे केअर अश्या फेर्‍या केल्यावर अखेरीस हे रहस्य उलगडतं. काल माऊ वर्गातून डे केअरला पिवळा फ्रॉक घालून आली होती ना, तो आणि चड्डी भिजली म्हणून डे केअरच्या ताईंनी बदलली, बदललेले कपडे नेहेमीप्रमाणे डे केअरच्या बॅगेत.
पण पिवळा फ्रॉक तर माऊचा नाहीचे!
वर्गात माऊने जीन्सची शॉर्ट आणि चड्डी ओली केली म्हणून वर्गातल्या ताईंनी कपडे बदलले तिचे आणि तो पिवळा फ्रॉक – चड्डी घातली. तो वर्गातल्या अजून कुणाचातरी हरवलेला असणार!
हे कोडं सुटल्यावर आईचं डोकं तेज चालायला लागतं. घरी आल्यावर खिडकीतून आरसा बाहेर काढून ती भूभूची पोझिशन नीट बघून घेते. आणि कपड्यांच्या हॅंगरने अलगद भूभूला वर उचलते. माऊ येण्यापूर्वी रोजच्या दिवसात इतक्या प्रकारचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आईने स्वप्नातही केलं नसेल.  
माऊच्या खिडकीमध्ये दिवसभर काय काय घडामोडी चाललेल्या असतात याचा कुणी व्हिडिओ केला तर इतका मनोरंजक होईल ना!
 

    मागच्या आठवड्यात माऊ शाळेत जायला लागली. काल आणि आज परत माऊला शाळेत एक मुलगा चावला. चावला म्हणजे अजून दाताचे वळ दिसताहेत, संध्याकाळी बिचारीला ताप आला इतका वाईट चावला. याला शाळेचा हलगर्जीपणा, मुलाच्या पालकांची बेपर्वाई का अजून काय कारण आहे ते शोधण्यात मला रस नाहीये. दुर्दैवाने अशी मुलं माऊला आयुष्यभर भेटणार आहेत, त्यांना पाठीशी घालणारे आईबाप भेटणार आहेत, त्यांना आवरायला असमर्थ असणारी यंत्रणा भेटणार आहे.
    हा मुलगा परत नुसता जवळ आला तरी त्याला एक कचकून फटका द्यायचा म्हणून सांगायचा मोह होतोय तिला. पण कधी टीचरना सांगायचं, कधी स्वतः फटका द्यायचा हे कसं समजावं तिला? शाळेत तिने मुक्त बागडायचं का त्याच्यावर लक्ष ठेवत रहायचं सारखं? असल्या दुष्ट मुलांपायी तिने तिला मनापासून आवडणार्‍या शाळेची धास्ती घ्यावी? माऊची आई म्हणून मी फार कमी पडते आहे असं वाटतंय.
    आजवर माऊच्या विश्वात वाईट कुणीच नव्हतं. कुठलीही अनोळखी व्यक्ती म्हणजे अजून ओळख न झालेले काका – मावशी – आजी – आजोबा – ताई – दादा होते. ओळखीच्यांच्या इतक्याच विश्वासाने ज्यांच्याशी वागावं असे. घराबाहेर पहिलं पाऊल ठेवतांना एकदम एवढा मोठा धडा शिकायचा तिने? काही माणसं वाईट असतात, आपल्याला त्रास देतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही हे शिकायला पावणेदोन म्हणजे फार लहान वय झालं. “हा मुलगा वेडा आहे” हे तिला शिकवणं फार जड जातंय.

मलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी केलेला हल्ला, त्यातून तिचं वाचणं आणि मग जगभर तिचं झालेलं कौतुक हे सगळं मागच्या वर्षी उडत उडत वाचलं. चौदा – पंधरा वर्षांच्या मुलीला अशी कितीशी समज असणार? तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा?) बघून थक्क झाले. 
बाबारे, तुला कुटुंबकबिला घेऊन पळून नाही जावंसं वाटलं? माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला? स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं? मनात आणलं असतं तर स्वात सोडून जाणं अशक्य नव्हतं तुला. अवघड नक्कीच होतं … आपलं घर सोडून परमुलुखात वसणं कुणाला सोपं असतं? 
आम्हाला पत्ताही नसतांना तुझ्यासारखे वेडे लोक जगभरातल्या कुठल्या कुठल्या दुर्गम भागात तालिबानशी वेड्यासारखे लढत असतात म्हणून त्यांना जिंकता येत नाही.

***
मलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.