Archives for category: भाषा

    नवऱ्याची भेट होईपर्यंत मी कर्नाटकात फारशी कधी गेले नव्हते. बहुसंख्य द्रविडेतरांप्रमाणे मलाही दक्षिणेतल्या सगळ्या जिलब्या सारख्याच अनाकलनीय होत्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला राहणारे सगळे ‘मद्राशी’ असा एक सोप्पा समज होता.कानडीशी आलेला संबंध म्हणजे एकदाच गाणगापूरहून सोलापूरला येताना चुकून गुलबर्ग्याऐवजी गाणगापूर रोडला गेल्यावर सोलापूरला परतण्यासाठी झालेले हाल, आणि एकदा विजापूर बघायला जाताना वाटेत गाडीचा अपघात झाल्यावर गाडीबाहेर ऐकलेली कडकड एवढाच. त्यातून हे काही गुजराती किंवा पंजाबी सारखं सहज समजणारं प्रकरण नाही याची मात्र खात्री झाली होती. तर कोथरूडमध्ये भेटलेला, चारचौघांइतपत बरं मराठी बोलणारा नवरोबा मुळचा असं काही वेडवाकडं बोलणारा निघेल याची मला कशी कल्पना असणार?
    लग्न ठरलं तेंव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकात गेले. आणि नवऱ्याच्या आजी आजोबांसकट निम्म्यापेक्षा जास्त नातेवाईकांना माझ्याशी मराठीत बोलताना ऐकून गार झाले. उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच लोकांना कोकणी येतं आणि त्यामुळे मराठी समजतं, तोडकंमोडकं का होईना, पण बोलता येतं हा शोध लागला. त्यात भाषावार प्रांतरचनेपूर्वी धारवाड – हुबळी मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे जुन्या मंडळींना बंगळूरपेक्षा मुंबई-पुणे जवळची हे ज्ञान प्राप्त झालं.
    नवऱ्याच्या काकूंनी कानडी अंकलीपी भेट दिली, आणि मग रस्त्याने चालताना प्रत्येक दुकानाची पाटी कोड्यासारखी ‘सोडवण्याचा’ नवा खेळ सुरू झाला. (अजूनही जोडाक्षरं आणि आकडे घात करतात, पण एव्हाना हुबळीतल्या नेहेमीच्या रस्त्यावरच्या बहुसंख्य पाट्या माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत:) ) देशपांडेनगर? हे देशपांडे इथे कर्नाटकात काय करताहेत? तर आजवर अस्सल मराठी समजत असलेली निम्मीअधिक नावं अस्सल कानडीसुद्धा आहेत हे समजलं. या नावांसारखेच हळुहळू अस्सल मराठी शब्दसुद्धा कानडी वेषात भेटायला लागले – अडनिडा, गडबड, किरणा, अडाकित्ता, रजा … परवा तर मामेसासुबाईंनी सुनेचं कौतुक करताना ‘अरभाट’ म्हटलं, आणि मला एकदम जीएंची अरभाट आणि चिल्लर माणसं आठवली.
    नुकतंच लग्न झालं होतं, तेंव्हा एकदा नवऱ्याच्या दोस्तांनी बाहेर जमायचा बेत केला एक दिवस. आणि नवऱ्याने घरी येऊन घोषणा केली,
    “आम्ही आज वैशालीला जाऊ.”
    “म्हणजे ? मला न विचारता ठरवताच कसं तुम्ही सगळे असं?”
    “अगं आम्ही वैशालीला जातोय. .. तुला आवडतं न तिथे जायला?”
    अस्सं. म्हणजे मला तिथे जायला आवडतं, म्हणून मुद्दाम मला वगळून वैशालीमध्ये भेटताय काय? बघून घेईन … हळुहळू तापमान वाढायला लागलं, आणि आमचं लग्नानंतरचं पहिलं कडाक्याचं भांडण झालं. या प्राण्याचा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ मध्ये हमखास गोंधळ होतो हे माझ्या हळुहळू लक्षात आलं. बेळगावच्या पलिकडून मराठीकडे बघणाऱ्यांची गोची लक्षात यायला लागली. ज्या भाषेत ‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते, ती भाषा शिकणं किती अवघड आहे तुम्हीच बघा!

शाळेतल्या माझ्या वह्या बघितल्या, तर प्रत्येक दिवशी वर्गात बाकावर माझ्या शेजारी कोण बसलं होतं ते सांगता यायचं. कारण माझं अक्षर रोज माझ्या त्या दिवशीच्या शेजारणीसारखं यायचं! म्हणजे कधी किरटं, कधी गोलमटोल, कधी डावीकडे झुकलेलं, कधी उजवीकडे झुकलेलं – रोज नवनवे प्रयोग. मला बाकीच्यांची अक्षरं सुवाच्य वाटायची, आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखंच अक्षर काढावं असं वाटायचं.
शाळेत आम्हाला वर्गपाठ, गृहपाठ, निबंध अश्या सगळ्या वह्यांना मार्कं असायचे. वर्षाच्या शेवटी सगळ्या वह्या तपासायला द्याव्या लागायच्या. तर वह्या तपासायला द्यायची वेळ आली, म्हणजे मला शोध लागायचा, की आपल्या प्रत्येक वहीमध्ये सर्व प्रकारची पेनं, वेगवेगळ्या शाया, आणि अक्षराची शक्य तेवढी सगळी वळणं यांचं एक मस्त प्रदर्शन भरलं आहे. मग मी वह्याच्या वह्या पुन्हा लिहून काढायचे. एकदा तर स.शा.च्या सरांनी वर्गात सगळ्यांना माझी वही दाखवली – बघा किती एकसारखं, नेटकं लिहिलं आहे म्हणून! आता एका वर्षभराची वही पुन्हा एकटाकी लिहून काढल्यावर एकसारखं अक्षर दिसणारच ना 😀

घरातल्यांना सुरुवातीला वाटलं होतं तसा हा लेखनाचा आजार हळुहळू आपोआप बरा होण्याऐवजी जास्तच बळावत गेला. वह्या उतरवून काढण्याची पुढची पायरी होती डायरी लिहिणं, आणि त्याहूनही पुढची अवस्था म्हणजे आवडलेल्या कविता लिहून घेणं. यातून तयार झाली ‘कवितांची वही’. वर्गातही आवडत्या सरांच्या, मॅडमच्या लेक्चरला त्यांचं वाक्य न वाक्य वर्गात उतरवून घेतलं जायला लागलं. नंतर सॉफ्टवेअरच्या कोर्समध्ये तर आमच्या बॅचने मला ‘ऑफिशिअल नोट्स टेकर’ पद बहाल केल्यावर वर्गात कितीही गर्दी असली -अगदी दोन बॅचेस एकत्र असल्या तरी पहिल्या रांगेत बसायला जागा मिळायला लागली. कॉलेजजवळच्या झेरॉक्सवाल्याला माझ्या वह्या ओळखता यायला लागल्या. (इंटरव्हूसाठी तयारी करायला कुणीतरी माझी ओरॅकलची वही नेलेली अजून परत केलेली नाही !)

कवितांच्या वहीमध्ये पहिल्यांदा माझ्या अक्षराचं, खास माझं असं वळण तयार झालं. कविता लिहिण्याची जांभळी शाई, बाकी लेखनाची काळी शाई, डायरी लिहिण्याची पॉईंट फाईव्हची पेन्सील, लाडकं शाईचं पेन, हातकागद असा सगळा सरंजाम हळुहळू गोळा झाला. आप्पा बळवंत चौकात‘व्हिनस’ मध्ये गेल्यावर तर एकदम डिस्नेलॅंडमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं… इतक्या प्रकारचं लेखन साहित्य!

पहिलीमध्ये जाण्यापूर्वी मी घराजवळच्या रेल्वेच्या इंग्रजी शाळेत जात होते. इंग्रजांनी त्यांच्या दुष्ट भाषेत ‘b’,‘d’,‘p’,‘q’ अशी एकमेकांची मिरर इमेज असणारी अक्षरं निर्माण केल्यामुळे माझा फार गोंधळ उडायचा. हमखास उलटी सुलटी लिहिण्याची अजून काही अक्षरं म्हणजे ‘t’ आणि ‘j’. त्यात आणि गंमत म्हणजे मी दोन्ही हातांनी लिहायचे. उजव्या हाताने ‘b’ काढला आणि अगदी तसंच डाव्या हाताने लिहिलं म्हणजे नेमका ‘d’ व्हायचा. शेवटी यावर उपाय म्हणून शाळेतल्या टीचर आणि आई यांनी मिळून फतवा काढला, की यापुढे मी एकाच – rather उजव्याच – हाताने लिहावं. पुढे मराठी शाळेत हा गोंधळ आपोआपच संपला, पण डाव्या हाताने लिहिणं थांबलं ते थांबलंच.पुढे केंव्हा तरी लक्षात आलं, की आपली लीपी ही उजव्या हातानी लिहिणाऱ्या माणसांसाठी बनवलेली आहे – डाव्या हाताने ही अक्षरं काढताना जास्त वेळ लागतोय, पण आपण लिहितो त्याच्या उलट – मिरर इमेजसारखं लिहिणं मात्र डाव्या हाताने खूपच सोपं जातंय. (डावखुऱ्या लोकांवर अन्याय!)

हल्ली ‘डेड ट्री फॉर्मॅट’ मध्ये फारसं काही ठेवायची वेळ येत नाही. ऑफिसमध्ये तर नाहीच नाही. ऑफिसबाहेरही बरंचसं लेखन आता ब्लॉगवरच होतं. पण ब्लॉग असला, तरी डायरी मात्र लाडक्या पेन्सीलने, कागदावरच लिहावी लागते. आणि छान कविता दिसली, की पेनात जांभळी शाई भरावीच लागते. परवाच आईकडे साफसफाई करताना माझा जुना कप्पा तिने मोकळा केला … नव्वद सालापासूनच्या डायऱ्या मिळाल्या तिथे. त्या चाळताना सहजच वीस वर्षांची सफर झाली. हा लिहिण्याचा आजार लवकर बरा न होवो अशी माझी जाम इच्छा आहे.


(खूपखूप वर्षांपूर्वी मी एक याच नावाची पोस्ट भाग १ म्हणून टाकली होती, आणि तिथे क्रमशः म्हणून पण लिहिलं होतं. तर हा अंतीम भाग आहे बरं का)

प्राथमिक शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती – दीपाली बळेल नावाची. दुसरीमध्ये असताना मोत्यासारखं अक्षर होतं तिचं! इतकं सुंदर अक्षर की आमच्या बोंडे सरांनी मोठ्या शाळेच्या – म्हणजे चौथीपेक्षा सुद्धा मोठ्ठ्या मुलांना तिची वही दाखवून विचारलं होतं … बघा तुम्ही तरी इतकं सुवाच्य लिहिता का म्हणून! चांगलं अक्षर असलं म्हणजे असं मोठ्या वर्गाच्या शिष्ट मुलांसमोर ‘इम्प’ पाडता येतं हा साक्षात्कार मला तेंव्हा झाला.

तिसरीमध्ये आम्हाला सुलेखन – म्हणजे टाक वापरून पुस्ती काढायची – होती. तिसरीतल्या पोरांच्या शाई सांडून ठेवण्याच्या अपार क्षमतेवर संपूर्ण विश्वास असणाया चौधरी सरांनी सरळ पोरांकडून ती पुस्ती निळ्या स्केचपेनानी भरून घेतली होती, त्यामुळे अक्षर सुधारण्याची एक सुंदर संधी हुकली. पण मग नंतर घरातल्या आमच्या प्रयोगांमध्ये अजितने मला घरी एक मस्त बोरू बनवून दिला, आणि वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखा माझा बोरू दिसेल त्या कागदावर चालायला लागला. घरी बाबा सोडून सगळ्यांची अक्षरं सुंदर होती (बाबा आपल्या व्यवसायाला जागून खास डॉक्टरी लीपीमध्ये लिहायचे – त्यांनी लिहिलेलं वाचणं सोडा – हे बाळबोध मराठीमध्ये आहे का इंग्रजीमध्ये हे सुद्धा खात्रीने सांगता येत नाही कुणाला!) पण अक्षर चांगलं असलं तरी एकजात सगळ्यांना लिहिण्याचा मनस्वी कंटाळा होता.(कुणा दुष्टाने लीपीचा शोध लावला त्याची शिक्षा म्हणून आम्हाला गृहपाठ म्हणून धडेच्या धडे उतरवून काढावे लागतात – इति आमचे ज्येष्ठ बंधू.) त्यामुळे हे असलं लिहिण्याचं नतद्रष्ट खूळ माझ्या डोक्यात कुठून शिरलं त्याचा घरच्यांना अंदाज येईना. सुधरेल हळुहळू शेंडेफळ म्हणून त्यांनी सोडून दिलं.

बोरूचा आणि एकंदरीतच लेखनप्रेमाचा परिणाम म्हणून चौथी-पाचवीपर्यंत माझं अक्षर थोडंफार वाचनीय झालं होतं. पण मग शुद्धलेखन नावाचा नवीन शत्रू प्रबळ झाला होता. अक्षर वाचता आलं की शुद्धलेखनाच्या चुका जास्त समजतात, हा बोरू – सरावाचा तोटा नव्यानेच लक्षात आला. पाचवीत एकदा एक तास ऑफ होता, त्यामुळे दुसऱ्या वर्गावरच्या यमुना महाजन टीचर आमच्या वर्गावर (पोरं वळायला) आल्या. त्यांनी सहज म्हणून माझी भूगोलाची वही बघितली. ‘भुगोला’च्या त्या वहीत मी पहिल्याच पानावर ‘दीशां’ची नावे अशी लिहिली होती – पुर्व, पश्चीम, उत्तर (अ ला उकार देऊन उ) आणि दक्षीण. हे वाचून त्या बेशुद्ध पडायच्याच बाकी होत्या. (तेंव्हा मी नुकतंच सावरकरांचा देवनागरी सुलभीकरणाविषयीचा लेख वाचला होता कुठेतरी, त्यामुळे माझ्या मते ‘अ’ ला उकार देऊन लिहिलेलं ’उत्तर’ बरोबरच आहे असा माझा दावा होता. टिळकांनी नाही का संत शब्द तीन प्रकारे लिहून दाखवला होता – पण आमच्या शाळेतले शिक्षक टिळकांच्या शिक्षकांसारखे मोकळ्या मनाचे नसल्यामुळे मी हे मत टीचरना सांगायचं धाडस केलं नाही.)

तशी तेंव्हा वर्गातल्या बहुसंख्य मुलामुलींची शुद्धलेखनाची परिस्थिती माझ्याइतपतच होती. आमच्या वर्गात प्रत्येक शब्द देवनागरीमध्ये कसा लिहायचा हे पाठ करणारे काही महाभाग होते, ते सोडता.

म्हणजे मी वाचायचे भरपूर, त्यामुळे शब्दसंपत्ती चांगली होती – पण प्रत्येक शब्द कसा लिहायचा हे लक्षात राहणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा कानाला योग्य वाटणारं लिहायचं हे जास्त सोयीचं वाटत होतं, तिथे पंचाईत होती. परत ‘पाणी’ शुद्ध, तर मग ‘आणी’ अशुद्ध कसं असे प्रामाणिक प्रश्न खूपच होते. उच्चार करून बघितला, तर ‘आणी’, आणि, ‘अणी’, ‘अणि’ हे चारही उच्चार बरोबरच वाटायचे.

(क्रमशः)

एका भाषेतले शब्द इतके बेमालूमपणे दुसऱ्या भाषेत मिळून जातात, की आपल्याला याचं मूळ कुठलं अशी शंकासुद्धा येणार नाही.

श्रीलंकन एअरलाईन्समध्ये ‘serendip’ नावाचं पुस्तक बघितलं. काय अर्थ असावा बरं ‘सेरेन्डिप’चा? ’सेरेंडिपिटी’चा या ’सेरेन्डिप’शी काही संबंध? उत्सुकता चळावली गेली. थोडंसं गुगलल्यावर काही गमतीशीर माहिती हाताला लागली.

Serendipity म्हणजे काय माहित आहे? सेरेंडिपिटी म्हणजे अपघाताने आणि उत्तम निरीक्षणशक्तीमुळे वेगळीच मौल्यवान गोष्ट सापडणे – विशेषतः दुसरंच काहीतरी शोधत असतांना. (विकिपेडियाच्या मते हा इंग्रजी भाषेतल्या भाषांतराला कठीण अशा पहिल्या दहा शब्दातला एक शब्द आहे.) हे तर माझ्या बाबतीत नेहेमीच होत असतं – चष्मा शोधताना डोळ्याच्या औषधाची बाटली सापडते. गाडीची किल्ली शोधताना आठवडाभरापासून गायब असणारी लाडकी पेन्सील सापडते. अपघाताने सापडणं – उत्तम निरीक्षणशक्ती असल्यामुळे सापडणं – आणि मौल्यवान गोष्ट सापडणं – हे तीनही निकष पूर्ण होतात की या सगळ्या शोधांमध्ये!!! 😉 त्यामुळे आपल्या रोजच्या अनुभवाला चपखल बसणारा हा शब्द मला ‘सेरेंडिपिटी’ने सापडला म्हणून मी खूश होते.

आणि हो – हा शब्द ‘सेरेन्डिप’वरूनच आलेला आहे. हा एक फिरत फिरत इंग्रजीमध्ये पोहोचलेला शब्द आहे. ‘सेरेन्डिप‘चे तीन राजपुत्र’ नावाच्या पर्शियन टाईमपास परिकथेमध्ये त्या राजपुत्रांना अपघाताने + त्यांच्या तेज दृष्टीमुळे असे शोध लागत असतात, त्यावरून.

आणि सेरेन्डिप म्हणजे श्री लंका. सेरेन्डिप हे अरबांनी दिलेलं नाव – अपल्या संस्कृतमधल्या ’सिंहलद्वीप’ वरून आलेलं!!! म्हणजे आता ‘सेरेंडिपिटी’ला सरळ ‘सिंहलद्वीपीय न्याय’ म्हणायला हवं. 😉

काही वर्षांपूर्वीपर्यन्त – म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर सात वर्षांपूर्वीपर्यन्त – मी असं हिरीरीने म्हणत होते, की माझ्या मुलांचं शिक्षण मराठीमधूनच व्हायला हवं. मतृभाषेमधून शिक्षण घेणं मुलांना सोपं जातंच, शिवाय आपल्या भाषेशी, आपल्या मातीशी नाळ न तुटणं फार महत्त्वाचं आहे.माझ्या मुलांना पुण्यातल्या ’अक्षरनन्दन’ सारख्या शाळेत घालण्याचं – खरं म्हणजे स्वतः अशी शाळा सुरु करण्याचं स्वप्न मी बघत होते.

आजची परिस्थिती खूपच बदललेली आहे. माझ्या मुलांची मातृभाषा कोणती असणार? प्रसाद अणि मी एकमेकांशी मराठीमधून बोलतो, पण प्रसादचं मराठीचं ज्ञान कामचलाऊ म्हणता येईल इतपतच आहे. त्याला मराठी लिहिता – वाचता येत नाही, मराठी नाटक, कविता, वाङ्मयाचा गंध नाही. माझ्या मुलांची ’पितृभाषा’ कन्नड आहे – जिच्यामध्ये मला एक वाक्य सुद्धा धड बोलता येणार नाही. मी मराठीचा हट्ट धरून प्रसादला मुलांच्या शिक्षणापासून दूर ठेवणं हा प्रसादवर अन्याय होईल. आणि मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्येच राहणार असा निर्णय मी आज कसा घेऊ? महाराष्ट्रामध्ये – दस्तूरखुद्द पुण्यामध्ये आज मराठी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. माझ्या मुलांना वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या, वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर शिकायला मिळायला हवंय. त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी, हिन्दी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, जपानी … शक्य तेवढ्या सगळ्या भाषा पडायला हव्यात. आपल्या देशामध्ये – खरं तर जगात कुठेही – त्यांना सहज संवाद साधता यायला हवाय. बंगळूरला रहायचं आणि पुण्याची स्वप्नं बघायची अशी त्यांची अवस्था होता कामा नये. Let them become citizens of the world!

पण अशी जडणघडण झाल्यावर मातीशी नातं जडणं त्यांना जड जाईल का? ती कुठल्या भाषेत कविता वाचतील? त्यांचा ब्लॉग, डायरी – जे काही ज्या कुठल्या स्वरूपात असेल, तसं, कुठल्या भाषेत लिहितील? कुठल्या भाषेत संवाद साधतांना त्यांना घरच्यासारखं वाटेल? त्यांना शिवाजी महाराज कसे भावतील? एवढॆ सगळे वेगवेगळे संस्कार घेतल्यानंतर त्यांचं भारतीयपण, मराठीपण / कानडीपण, पुणेकर / मंगळूरकरपण कशामध्ये असेल? तानाजी आणि शेलारमामाची, हिरकणीची गोष्ट ते त्यांच्या मुलांना कुठल्या भाषेमध्ये सांगतील?

सध्या ज्या वेगाने भाषांची, संस्कृतींची सरमिसळ चालू आहे, ती बघून असं वाटतंय की आणखी वीसएक वर्षांनी प्रादेशिक संस्कृती, भाषेची अस्मिता असं काही शिल्लकच राहणार नाही. खरं म्हणजे प्रादेशिक भाषाच आज आहेत तशा शिल्लक राहू शकणार नाहीत. आज माझ्या ऑफिसमध्ये मला मराठीमधून व्यवहार करता येईल का? नाही. महेशशी माझं बोलणं वरकरणी मराठीमधून असलं, तरी आमच्या संवादाची दोन – तीन वाक्यं घेतली तरी जाणवेल – या संवादाचा गाभा मराठी नाही. “या jar साठी E1 वर सर्च मार. नाहीतर google वर सापडेलच. ती FTP ने डाउनलोड करून मला मेल कर, निखिलला cc कर.” या भाषेला काय म्हणायचं? ही आजची बोलीभाषा आहे. अन्य प्रांतीय कुणी असतील, तर या वाक्यांमधल्या मराठी शब्दांच्या जागी हिंदी / दुस‍र्‍या भाषेतले शब्द येतात एवढाच फरक. मित्रमंडळींच्या अड्ड्यांवर अशीच चौपाटीवरच्या भेळेसारखी भाषा असते. कॉलेजचीसुद्धा अशीच. आणखी पाच – दहा वर्षांनी नवे लेखक जे पुढे येतील, त्यांची मतृभाषा हीच असेल. त्यांचं ललित लेखन याच भाषेत असेल. या भाषेच्या व्याकरणाचे नियम (?), म्हणी, वाक्प्रचार, शुद्धलेखन यांची पुस्तकं येतील. (:०) ) आणि हो, या भाषेत स्माईली पण असतील. “r u thr?” हे एक प्रमाणभाषेतलं, शुद्ध वाक्य असेल. (डिक्शनरीमध्ये r – from old English ‘are’ असं स्पष्टीकरण सुद्धा सापडेल बहुतेक :))