Archives for category: हिरवाई

कुंड्यांमधली बाग सुरू केली तेंव्हा पहिल्यांदा जी वीस – बावीस झाडं आणली त्यातला एक माझा सोनचाफा. गेली सहा वर्षं तो माझ्या एवढ्याश्या टेरेसवर भरभरून फुलतोय, सुगंधाची लयलूट करतोय. अगदी सुरुवातीला आमच्या समोरची इमारत झालेली नव्हती आणि टेरेसवर भन्नाट वारं यायचं, आणि अश्या वेड्या वार्‍यात हा कसा टिकेल म्हणून मला शंका वाटायची. पण तो नुसता टिकलाच नाही, तर फुलतही राहिला. टेरेसवर पहिल्यांदाच बाग करत असल्यामुळे तिथे मिळणार्यात सूर्यप्रकाशात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती फरक पडतो याची सुरुवातीला अजिबात कल्पना नव्हती. पाणी, सूर्यप्रकाश, खत सगळंच अजून शिकत होते मी. पण शिकाऊ माळीणबाईंना सांभाळून घेतलं त्यानं. 

त्याला आलेलं पहिलं फूल, त्याची सुरुवातीची पानं, ही “सुवर्णरेखा” जात आहे, हिची पानं अशीच असतात हे माहित नसल्यामुळे त्या पानांच्या वळलेल्या कडा पाहून माझी काळजी, पहिल्यांदा छाटणी करतानाची धाकधूक, खूप दिवस घराबाहेर राहून आल्यावर घरी आल्यावर अर्ध्या रात्रीसुद्धा बागेत काय चाललंय ते बघण्याची धडपड हे सगळं आज आठवतंय.

बागेत सगळ्यात जास्त गप्पा मी त्याच्याशी मारल्यात,  आणि आपण सांगितलेलं – न सांगितलेलं सगळं त्याला समजतंय याचाही अनुभव घेतलाय! अशीच एकदा एका निर्णयाची मोठी जबाबदारी वाटत होती. सगळं नीट होईल ना याची काळजी होती. अस्वस्थ आणि एकटं वाटत होतं. हे सगळं त्याच्याजवळ व्यक्त केलं, आणि भर उन्हाळ्यात, माझं तसं दुर्लक्षच होत असताना माझ्या एवढ्याश्या झाडाला त्या दिवशी तब्बल वीस फुलं आली! माझं झाड माझ्याशी बोलतं यावर त्या दिवशी माझा ठाम विश्वास बसला.

धाकटं भावंड स्वीकारणार्‍या समजूतदार मोठ्यासारखं त्याने माऊ आल्यावर मला बागेसाठी पूर्वीसारखा वेळ न देता येणंही मान्य केलंय. 
या एका झाडाने मला किती आनंद दिलाय ते शब्दात सांगणं शक्य नाही! इथे ब्लॉगवरच त्याच्या किती पोस्ट आहेत हे आज जाणवलं.

असं सगळं मस्त चाललं असताना एकीकडे एक टोचणी लागून होती … कितीही मोठी कुंडी असली तरी सोनचाफ्याला ती आयुष्यभर पुरणार नाहीये. त्याच्या पूर्ण क्षमतेवढं मोठं होण्यासाठी त्याला मोकळ्या जमिनीत रुजायची संधी मिळायला हवीय. पण झाड मोकळ्या जमिनीत लावताना मला त्याच्याजवळ राहता येणार नाही! त्याला असं घर सोडून दूर पाठवायची मनाची तयारी काही होत नव्हती. दोन – चार ठिकाणी मी झाड लावता येईल का म्हणून चौकशीही केली, पण त्या चौकशीत खरा जीव नव्हताच. आणि एक दिवस अचानक नवर्‍याने सांगितलं – “मी सोसायटीमध्ये विचारलंय. आपल्या इथे खाली झाड लावायला जागा शोधणार आहेत ते.” फार दूर नाही म्हणून आनंद, पण आता खरंच जाणार म्हणून दुःख असं चाललं होतं मग. मग सोसायटीचे लोक येऊन झाड पसंत करून गेले. एक दिवस माळीदादाही झाड बघायला आले. पण तेंव्हा झाडाला भरभरून पालवी आली होती, आणि कळ्याही. हा बहर संपल्यावर झाड हलवू या असं ठरलं, आणि हा बहर कधी संपूच नये असं मला मनाच्या कोपर्‍यात वाटायला लागलं! त्यात त्याच्यासाठी शोधलेली जागा म्हणजे केवडा आणि फणसाचं झाड काढून तिथली मोकळी जागा. मस्त वाढलेला केवडा आणि फणस का तोडायचा? (उद्या असाच माझा सोनचाफा तोडला यांनी तर? सोसायटीचं कुणी सांगावं! 😦 परत शंका!) तो बहर संपलाच शेवटी, पण मग पावसाची दडी, सोसायटीच्या बागेला पाणी पुरवणारी मोटर जळाली अशा विविध कारणांनी त्याचा मला अजून महिनाभर सहवास मिळाला. मग दोन वेळा झाड घ्यायला आलेले माळीदादा घरात कोणी नाही म्हणून परत गेले, आणि अखेरीस झाडाच्या पाठवणीची वेळ आलीच!
दुपारी माऊ झोपलेली असताना इतक्या झटकन नेलं त्यांनी झाड, की मला नीट निरोपही घेता आला नाही. माऊ उठल्यावर तिला सांगितलं, “आपलं झाड गेलं खाली!”
“खाली कुठे?”
“माहित नाही! मला माळीदादा दिसतच नाहीयेत खिडकीतून. आपण शोधू खाली जाऊन.”
“आई ते बघ माळीदादा झाड लावताहेत तिथे खाली!” माऊला दिसले ते बरोब्बर.

अगदी माझ्या खिडकीच्या खाली जागा मिळाली सोनचाफ्याला – लांबून का होईना, पण रोज दिसणार तो मला. अगदी खाली जाऊन गप्पा सुद्धा मारता येतील! टेरेसवरच्या त्याच्या रिकाम्या जागेकडे बघून रिकामंरिकामं वाटलं की फक्त खिडकीतून एकदा खाली बघायचं! 🙂 जीव भांड्यात पडणं म्हणतात ते हेच!

लॉंग विकेंडला घराबाहेर पडायचा काहीच प्लॅन ठरत नाहीये म्हणून हळहळ वाटत होती, पण या वर्षी ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलली आहे हे मायबोलीवर समजलं, आणि लगेच तिथे जाऊन बघण्याची संधी मिळाली. मुळशीचं पाणी बघण्याच्या नादात “क्विक बाईट्स” ची सांगितलेली खूण दिसलीच नाही, आणि अचानक अगदी रस्त्याच्या शेजारी कारवी येऊन भेटली!

कारवीच्या कळ्या
कारवीची फुलं

आणि ही झुडुपं

रस्त्यालगतचा डोंगराचा उतार कारवीनेच भरला आहे!

इथे पांढरी / गुलाबी कारवीसुद्धा फुलली आहे असं समजलं होतं ती काही दिसली नाही.  कारवीसोबत सोनकी आणि दुसरी रानफुलं होतीच.

कुर्डू

सोनकी

(बहुतेक) निसुर्डी

जांभळी चिरायत

रानपावटा

हा पण भेटला – बघा दिसतोय का तुम्हाला …

दिसतोय का मी?

माऊला कारवीपेक्षा जास्त इंटरेस्ट होता पलिकडे दिसणार्‍या धरणाच्या पाण्यात. म्हणजे फुलं वगैरे ठिक आहे, पण एवढं मोठ्ठं पाणी शेजारी दिसतंय आणि आपण तिथे जात नाही ही कल्पना काही तिला पटत नव्हती 🙂 फुलांना भेटून झाल्यावर मग पाण्याला भेटायला गेलो.

काल अर्धवट पाऊस पडल्याने चांगल्यापैकी उकडत होतं, त्यात सकाळ म्हणण्यापेक्षा दुपारीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे पाण्यात शिरल्यावर खरंच जीव शांत झाला. सगळं हिंडून झाल्यावर, पाण्यात शिरल्यावर जिवाला अजून शांत करायला शाण्यासारखा मस्त पाऊस पण आला!

फुलांचे फोटो काढेपर्यंत मोबाईल नक्की माझ्याजवळ होता. तो पाण्यात शिरण्यापूर्वी नव्हता. उतरतांना गाडीत राहिला असेल म्हणून मी तशीच पुढे गेले होते. परत येतांना भिजल्यामुळे माऊचे आणि तिच्या मैत्रिणीचे कपडे बदलणे वगैरे सोपस्कार करून घाईनेच गाडीत बसलो आणि निघालो. पाच मिनिटांनी आठवलं, मोबाईल कुठे दिसत नाहीये! कुठल्याच फोनला रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करून बघणं शक्य नव्हतं. तेवढ्यात माऊच्या मैत्रिणीची आजी म्हणाली, “आपण पाण्यात जाताना गाडी ठेवली होती, तिथे पडला होता एक मोबाईल!”

समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस, रस्त्यात चहाचे पाट वहायला लागलेले. रस्ता तसा वर्दळीचा. परत फिरून गाडी लावली होती तिथे पोहोचलो, तर खरंच मोबाईल पडलेला मिळाला! पंधरा मिनिटं गाड्या, पायी चालणारे, गुरं यांच्या कुणाच्या पायदळी न जाता, कुणी न उचलता फोन तिथेच रस्त्यात पडलेला होता. आणि आतपर्यंत चिखल भरलेला असूनही चालू होता!!! त्याचं आणि माझंही नशीब फार चांगलं असावं. मोबाईल मिळाल्यावर आधी स्विच ऑफ केला, जमेल तसा चिखल काढला. घरी आल्यावर ड्रायरखाली वाळवला. जरा वेळ इअयरफोन लावल्याचा सिंबॉल दाखवत होता, टाचस्क्रीन झोपलेला होता. पण नंतर झाला सुरळीत चालू! या वेळी पहिल्यांदा नोकिया नसलेला फोन  – सॅमसंग – घ्यायचं धाडस केलं होतं मी … तर नोकियाचा ठोकळा सोडून दुसरा कुठला फोनही मी वापरण्याच्या लायकीचा आहे हे सिद्ध झालं या भटकंतीमधून!!! 🙂


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.
कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.
या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 
त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!
दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात…
***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून … पळा!!! 🙂 )

खूप दिवसत मी इथे बागेविषयी काही लिहिलेलं नाही. कारण बागेत मी काही केलेलंच नाही पाणी घालण्याखेरीज. पण रोज सूर्य उगवतो, झाडांना प्रकाश देतो. पाऊस पडतो, आणि ती थरारतात. काही ना काही नवीननवीन बागेत घडतच असतं. आपलं लक्ष नसेल, तर तो आपला करंटेपणा. तर जाता जाता ही गंमत बघायला मिळाली मला बागेत –

मागच्या पावसाळ्यात मी पांढर्‍या गोकर्णाच्या बिया लावल्या होत्या, आणि त्याचा मस्त वेल आला होता. त्याच्या बिया पडून या वर्षी आपोआप बाग गोकर्णाने भरून गेली होती. त्यातले तीन चार ठेवून मी बाकीचे काढून टाकले. या तीन – चार वेलांनी गंमत केली.
पहिल्याला अशी फुलं आली:
दुसर्‍याची अशी:
तर तिसर्‍याची अशी!
निळ्या गोकर्णाचा एकही वेल माझ्याकडे नव्हता. मग ही किमया कशी बरं झाली असेल? मागच्या पिढीमध्ये सुप्त राहिलेली गुणसूत्रं आता जागी झाल्यामुळे? का परागीभवन करणार्‍या किड्यांनी-माश्यांनी कुठूनतरी निळी गोकर्णाची फुलं शोधून काढली होती? पांढर्‍या गोकर्णावर निळी शाई कशी बरं सांडली असावी?

या पावसाळ्यात उशीरानेच जांभळ्या गोकर्णाच्या बिया सापडल्या त्या टाकल्यात मी एका कुंडीत. त्याला कुठल्या रंगाची फुलं येतील बरं? 🙂


खूप खूप दिवसांपूर्वी इथे एका बागुलबुवाची गंमत सांगितली होती. तेंव्हा सुरवंटराव उडून गेल्यावर नुसता रिकामा कोष मागे ठेवून गेले होते. आज त्यांना मुद्देमालासह पकडलं:
इतके सुंदर रंग! आणि हे सोनचाफ्यावर असं लपून बसलं होतं, की मला दिसलंच नव्हतं. वाळकं पान म्हणून काढायला मी हात घातला, आणि जवळजवळ त्याला हात लागल्यावर माझ्या लक्षात आलं … हे ताजं ताजं फूलपाखरू आहे ! हिरवा रंग थेट सोनचाफ्याच्या कोवळ्या पानाचा, तर राखाडी रंग वाळक्या पानासारखा. झाडाचाच एक भाग होऊन पानाच्या खालच्या बाजूने बसलंय ते. अजून पंख चिकटलेले आहेत त्यामुळे उडता येत नाहीये त्याला.

सकाळी अजून जरा लवकर हा शोध लागला असता तर कदाचित कोषातून बाहेर पडण्याचं नाट्य बघायला मिळालं असतं! अजून तासाभराने इथे फक्त मागच्या वेळसारखाच रिकामा कोष होता 🙂

फूलपाखरू बघितल्यावर लक्षात आलं … याचे सुरवंट भारी खादाड असतात. त्यांना कसला स्पर्श झाला म्हणजे ते एक दुर्गंध सोडतात, त्यामुळे बहुतेक पक्षी यांच्या वाटेला जात नसावेत. त्यांना मी कित्येक वेळा सोनचाफ्यावरून हुसकून लावलं आहे. हे फूलपाखरू मात्र कधीच बघितलं नव्हतं बागेत. कुठे बरं जात असतील ही फुलपाखरं?
***
फुलपाखरू सापडल्यावर मी खूश होते, लगेच ही पोस्ट टाकली. त्याचा रंग जरा वेगळा वाटत होता नेहेमी पाहिलेल्या फुलपाखरांपेक्षा … पण नाव गाव शोधायचा काही प्रयत्न नव्हता केलेला. मधे जरा सवड मिळाली आणि उगाचच हे फूलपाखरू आठवलं. जरा शोधून बघू या याचा कुलवृत्तांत म्हणून गूगलबाबाला विचारलं, आणि मोठ्ठा खजिना हाती लागला! याचं नाव आहे tailed Jay (Graphium agamemnon agamemnon). आणि याच्या जीवनक्रमावर ही अप्रतिम ब्लॉगपोस्ट आहे!

कित्येक महिन्यात मी इथे बागेविषयी काहीही लिहिलेलं नाही. 
कारण सध्या मला बागेत जायलाच मिळत नाहीये! टेरेसचं दार उघडलं, की मनीमाऊ बागेत हजर होते, आणि पानं तोडणं, मातीत हात घालणं असे उद्योग ताबडतोब सुरू होतात! सद्ध्या मला बागेला कबुतरांपेक्षा जास्त तिच्यापासूनच जपावं लागतंय.
घरातल्या झाडांची केंव्हाच उचलबांगडी झाली. ती कशीबशी बाहेरच्या उन्हात तग धरून आहेत. यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे काही झाडं गेली माझी. 😦
पण आपण ढवळाढवळ केली नाही, तरी बागेतलं जीवन काही थांबत नाही. सद्ध्या इतका मस्त पाऊस पडतोय, त्याने नवी संजीवनी दिलीय माझ्या झाडांना! फेब्रुवारी – मार्चमध्ये (अजून मनीमाऊ रांगायला नव्हती तेंव्हा) मी उत्साहाने बाळागाजरांचं बी पेरलं होतं. ते कबुतरांपासून वाचवण्यासाठी त्या कुंडीत बर्‍याच काड्या खोचून ठेवल्या होत्या. त्यानंतर मला फक्त पाणी घालायला वेळ झाला. ते सुद्धा मला जमलं नाही तर मी बाईंनाच सांगत होते. जी काही बाळागाजराची रोपं आली होती, ती ऊन, कबुतरं या सगळ्यात वाळून गेली. मी सगळ्या कुंड्यांना पाणी घालायचं सांगितलंय म्हणून बाई याही कुंडीत पाणी घालत होत्या अधूनमधून. आता ती कुंडी अशी दिसते आहे:
“ब्लीडिंग हार्ट”चा वेल
कबुतरांसाठी खोचलेल्या काड्यांपैकी “ब्लीडिंग हार्ट” च्या वेलाच्या काडीला पालवी फुटली, आणि आता पावसात अशी मस्त फुलं आली आहेत! गंमत म्हणजे हा नवा वेल रुजत असतांना माझ्याकडचं ब्लीडिंग हार्टचं चांगलं मोठं झालेलं मूळ झाड उन्हाने वाळून गेलं!
पावसाळा सुरू होतांना दुहेरी गोकर्णाच्या बिया दुसर्‍या कुंडीत टाकल्या. त्या आल्याच नाहीत. त्याऐवजी मागच्या वर्षीच्या स्पायडर फ्लॉवरचं एक मस्त रोपट आलंय! या फुलाच्या बिया गोळा करायच्या राहून गेल्या होत्या मागच्या वर्षी.
मागच्या वर्षी उन्हाने करपून गेलेलं सनसेट बेल्सचं झाड पण आपणहून आलंय यंदा!
स्पायडर फ्लॉवर आणि सनसेट बेल्सची रोपटी
जांभळी अबोली टिकवायचा मी या उन्हाळ्यात जमेल तितका प्रयत्न केला, पण ती गेली. आणि मी पूर्ण दुर्लक्ष करूनही बहरणारं हे खोटं ब्रह्मकमळ: 
खोटं ब्रह्मकमळ


एकूणात काय, तर न पेरिले तेही उगवते, पेरिले ते न उगवते, बोलण्यासारखे नाही, पण काहीतरी उत्तर निश्चित येते एवढं नक्की! :D
आज गॅलरीमध्ये पाणी घालतांना हे मोती सापडले!

फिलोडेड्रॉनवरचे मोती 🙂

प्रत्येक मोत्यामध्ये एक वेगळं स्वप्न!


पावसाळ्यात गोव्याला फक्त येडे लोक जातात असा माझा आजवर समज होता. इतकी वर्षं पुण्यात राहून मी गोव्याला गेले नव्हते, त्यामुळे पावसाळ्यात का होईना, पण गोव्याला जायला मिळतंय म्हटल्यावर मी संधी साधून घेतली. पावसाळ्यात गोवा बघितल्यावर, “पावसाळ्यात गोव्याला जाऊन लोक येडे होतात” अशी सुधारणा जुन्याच समजामध्ये झाली आहे. 🙂
वनश्रीची कारागिरी …

सागरात खेळे चांदी …



से कॅथेड्रल

शांतादुर्गा
 गोव्याचे अजून फोटो इथे आहेत:


 

दूधसागर फॉल्स म्हणजे गोवा – कर्नाटक सीमा. पश्चिम घाटातला सगळ्यात मोठा धबधबा. बारा महिने, खरोखर दुधासारखं पाणी असतं या धबधब्याला. इथे पोहोचण्यासाठी एकच मार्ग – वास्को – लोंढा मार्गावरून येणार्‍या रेल्वेगाड्या. ऑफिशिअल प्रवासी थांबा नसला, तरी प्रत्येक गाडी इथे थांबतेच. गोव्याहून येणारी गाडी घाट चढल्यावर दम खायला दूधसागरला थांबते, आणि लोंढ्याहून जाणारी घाट उतरण्यापूर्वी इथलं सौंदर्य न्याहाळायला. यंदा मला ऐन पावसाळ्यात दूधसागर बघायची संधी मिळाली. त्या भटकंतीचे हे फोटो:

वळणावळणाची वाट

स्कूल चले हम!

शेतकरीदादा नांगरत होते

शेतीच्या कामाची लगबग

भातखाचरात लावणी चालली होती



यांनी स्वागत केलं
गाडी थांबते तिथून साधारण एक – दीड किलोमीटरवर धबधबा आहे.

अंधारातून प्रकाशाकडे !

खालच्या फोटोत दूर डोंगरात आडवी रेघ दिसते ना पांढरी, ती गाडी आहे!

आणि हा धबधबा! रेल्वेच्या पुलावरून फोटो काढलेत. गाडीतून जातांनाही इतक्या जवळून बघता येतो, त्याचे तुषार अंगावर घ्यायला मिळतात.

दूधसागर

दूधसागर

दूधसागर

या पाण्यात खेळायला पुन्हा दिवाळीच्या सुमाराला यायला हवं. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याला प्रचंड वेग असतो आणि दगड निसरडे होतात, त्यामुळे पाण्यात जाता येत नाही 😦

ही दूधसागर स्पेशल ऑर्किड्स – मला पूर्ण प्रवासात ही फक्त इथेच बघायला मिळाली. रेल्वेच्या बोगद्यांच्या जवळच्या उघड्या कातळावर यांचा मस्त गालीचा होता. मातीत कुठेच दिसली नाहीत ही. एक तर चक्क वडाच्या पारंबीवर  आलेलं सापडलं!
दूधसागरचं ऑर्किड

या भटकंतीचे अजून फोटो इथे आणि इथे आहेत:

 
तीन वेळा परतीचं तिकीट बदलूनही कोरापूट पोटभर बघून झालंय असं वाटत नाही. दर वर्षी इथे ‘परब’ नावाचा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असतो. परब बघायला परत यायचं असा बेत करतच कोरापूट सोडलं. येतांना विशाखापट्टण – कोरापूट रस्त्याच्या सृष्टीसौंदर्याला न्याय देता आला नव्हता. त्यामुळे परत जातांना रस्त्याचे मनसोक्त फोटो काढले.

या डोंगराळ  भागात आदिवासी वस्ती विखुरलेली आहे. जेमतेम आठ – दहा घरांचा एक पाडा – आजूबाजूला फक्त डोंगर. अश्या एकेका वस्तीपर्यंत रस्ते – वीज – पाणी – आरोग्यकेंद्र – आंगणवाडी – शाळा पोहोचवायची, म्हणजे जितका खर्च येईल, तितकाच खर्च अन्यत्र एखाद्या पाचशे – हजार लोकवस्तीच्या खेड्यासाठी येईल. नुसत्या रिपोर्टमध्ये वाचून कदाचित ही मागणी अवास्तव वाटेल,पण  प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र इथे विकासासाठी जास्त पैसा का घालायला हवा हे अगदी पटतं.

आदिवासी पाडा

 कोरापूट जिल्हा संपतो, आपण आंध्रात प्रवेश करतो. या सीमेवर एक सुंदर वडाचं झाड आपलं स्वागत करतं.

आंध्र – ओडिशा सीमा

 स्वप्नातले डोंगर अजून थोडा वेळ सोबत करतात.

पंधरा दिवस दिवस रात्र संधी मिळेल तेंव्हा गप्पा मारूनही गप्पा संपलेल्या नसतात. त्यामुळे आमचा प्रवास एकाच गाडीतून चाललेला असतो – कलेक्टरांची लाल दिव्याची गाडी मागून रिकामी येत असते. 🙂 

आमच्या मागून येणारी लाल दिव्याची एस्कॉर्ट कार 🙂

  हा प्रवास एखाद्या टाईम मशीनमध्ये बसून केल्यासारखा वाटतो. शतकानुशतकं गोठल्यासारखे एकाच स्थितीत राहिलेलं कोरापूटचं आदिवासी जनजीवन, घनदाट जंगलं, डोंगरदर्‍या संपून अचानक आपण एकविसाव्या शतकात पोहोचतो.  जणू काही हा  बदल ठळक करण्यासाठीच आंध्र किनारपट्टीलगतच्या या भागात नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट शेतं आणि बांधावर ताडाची झाडं नजरेला पडतात.

डोंगर संपले, ताडाची झाडं आली, आंध्रात पोहोचलो.

परततांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला उतरून पोचमपल्ली बघून परत येण्याचा बेत असतो. कोरापूट आणि पोचमपल्ली दोन्ही नक्षलग्रस्त भाग. कलेक्टरांकडून घेतलेलं ‘रेड सन’ वाचता वाचता दोन्ही भागांची तुलना करायची संधी असते.