Archives for category: http://schemas.google.com/blogger/2008/kind#post
लॉंग विकेंडला घराबाहेर पडायचा काहीच प्लॅन ठरत नाहीये म्हणून हळहळ वाटत होती, पण या वर्षी ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलली आहे हे मायबोलीवर समजलं, आणि लगेच तिथे जाऊन बघण्याची संधी मिळाली. मुळशीचं पाणी बघण्याच्या नादात “क्विक बाईट्स” ची सांगितलेली खूण दिसलीच नाही, आणि अचानक अगदी रस्त्याच्या शेजारी कारवी येऊन भेटली!

कारवीच्या कळ्या
कारवीची फुलं

आणि ही झुडुपं

रस्त्यालगतचा डोंगराचा उतार कारवीनेच भरला आहे!

इथे पांढरी / गुलाबी कारवीसुद्धा फुलली आहे असं समजलं होतं ती काही दिसली नाही.  कारवीसोबत सोनकी आणि दुसरी रानफुलं होतीच.

कुर्डू

सोनकी

(बहुतेक) निसुर्डी

जांभळी चिरायत

रानपावटा

हा पण भेटला – बघा दिसतोय का तुम्हाला …

दिसतोय का मी?

माऊला कारवीपेक्षा जास्त इंटरेस्ट होता पलिकडे दिसणार्‍या धरणाच्या पाण्यात. म्हणजे फुलं वगैरे ठिक आहे, पण एवढं मोठ्ठं पाणी शेजारी दिसतंय आणि आपण तिथे जात नाही ही कल्पना काही तिला पटत नव्हती 🙂 फुलांना भेटून झाल्यावर मग पाण्याला भेटायला गेलो.

काल अर्धवट पाऊस पडल्याने चांगल्यापैकी उकडत होतं, त्यात सकाळ म्हणण्यापेक्षा दुपारीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे पाण्यात शिरल्यावर खरंच जीव शांत झाला. सगळं हिंडून झाल्यावर, पाण्यात शिरल्यावर जिवाला अजून शांत करायला शाण्यासारखा मस्त पाऊस पण आला!

फुलांचे फोटो काढेपर्यंत मोबाईल नक्की माझ्याजवळ होता. तो पाण्यात शिरण्यापूर्वी नव्हता. उतरतांना गाडीत राहिला असेल म्हणून मी तशीच पुढे गेले होते. परत येतांना भिजल्यामुळे माऊचे आणि तिच्या मैत्रिणीचे कपडे बदलणे वगैरे सोपस्कार करून घाईनेच गाडीत बसलो आणि निघालो. पाच मिनिटांनी आठवलं, मोबाईल कुठे दिसत नाहीये! कुठल्याच फोनला रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करून बघणं शक्य नव्हतं. तेवढ्यात माऊच्या मैत्रिणीची आजी म्हणाली, “आपण पाण्यात जाताना गाडी ठेवली होती, तिथे पडला होता एक मोबाईल!”

समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस, रस्त्यात चहाचे पाट वहायला लागलेले. रस्ता तसा वर्दळीचा. परत फिरून गाडी लावली होती तिथे पोहोचलो, तर खरंच मोबाईल पडलेला मिळाला! पंधरा मिनिटं गाड्या, पायी चालणारे, गुरं यांच्या कुणाच्या पायदळी न जाता, कुणी न उचलता फोन तिथेच रस्त्यात पडलेला होता. आणि आतपर्यंत चिखल भरलेला असूनही चालू होता!!! त्याचं आणि माझंही नशीब फार चांगलं असावं. मोबाईल मिळाल्यावर आधी स्विच ऑफ केला, जमेल तसा चिखल काढला. घरी आल्यावर ड्रायरखाली वाळवला. जरा वेळ इअयरफोन लावल्याचा सिंबॉल दाखवत होता, टाचस्क्रीन झोपलेला होता. पण नंतर झाला सुरळीत चालू! या वेळी पहिल्यांदा नोकिया नसलेला फोन  – सॅमसंग – घ्यायचं धाडस केलं होतं मी … तर नोकियाचा ठोकळा सोडून दुसरा कुठला फोनही मी वापरण्याच्या लायकीचा आहे हे सिद्ध झालं या भटकंतीमधून!!! 🙂



भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्‍यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्‍याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्‍या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्‍या, नवे रुपडे घेऊन येणार्‍या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्‍याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे. 

या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्‍या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!

मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्‍यावर डोलणारी पायर्‍या पायर्‍यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:

आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या?

भाताची रोपं उपटून झाली, बांधलेले गठ्ठे चिखलातून पळत इकडून तिकडे टाकून झाले. खेकडे बघून झाले.

शेताशेजारचा ओढा

 चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!

धरणाच्या पाण्याकडे

 धरणाचं पाणी बघायला जातांना कावळ्याच्या छत्र्या दिसल्या, मासे धरणारा काका दिसला. त्याच्या पिशवीचं इन्स्पेक्शन झालं.

धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!

पाणी!

 इथे एक तंबू हवा होता!

 वार्‍यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!

पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय.

 भात लावणीसाठी शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या मुलंसुना येतात … पण नांगर धरणं अजूनही अजोबांचंच काम! दुसर्‍या कुणालाच ते जमत नाही / शक्य नाही. आजोबांचे हातपाय चालेनासे झाल्यावर काय? घरोघरी हेच चित्र दिसतंय!