Archives for category: Profound thoughts from empty mind ;)

कधी येणार पाऊस? येणारच नाही का अजून? 
हवामान खातं तर म्हणतंय मान्सूनचा पाऊस संपला. मान्सून किंवा बिगरमान्सून आम्हाला काही फरक पडत नाही हो, पाऊस येऊ देत म्हणजे झालं.
आणि आलाच नाही तर? तर आम्ही वर्षभर दुष्काळाचं फक्त राजकारण करत बसणार का?

गेले काही दिवस जे काही पर्यावरणाविषयी समजून घेते आहे त्याने अस्वस्थ व्हायला होतंय. या वर्षी पाऊस नीट पडला असता तर कदाचित मागे पडलाही असता हा विषय थोडा. या अभ्यासात एक नकाशा बघितला होता. जगभरातली पाण्याची स्थिती दाखवणारा. तो बघून मुळापासून हादरले होते. आणि त्यापाठोपाठ मिळालेल्या माहितीने तर झोप उडवली. 


 काय सांगतो हा नकाशा? जगभरातल्या पाण्याच्या उपलब्धतेची स्थिती दाखवली आहे इथे. यानुसार आपल्या देशाचा बहुसंख्य भाग हा “ओव्हरएक्स्प्लॉयटेड” ते “हायली एक्स्प्लॉयटेड” गटात मोडतो. या नकाशावर लोकसंख्येचा नकाशा ठेवून बघितला, म्हणजे संकटाची व्याप्ती लक्षात येईल. आपली भूजलाची पातळी धोकादायकरित्या खालावलेली आहे. वर्षभरात जितकं पाणी जमिनीत जातं, त्यापेक्षा जास्त उपसा आपण करतो आहोत. “माझ्या मालकीच्या जमिनीमध्ये मी माझ्या खर्चाने बोअरवेल काढली, आणि त्यातून मिळवलेलं पाणी मला वाटेल तसं वापरलं. यावर आक्षेप घेणारे तुम्ही कोण?” हा माज आपल्याला परवडणार नाही. याच वेगाने पाण्याचा उपसा होत राहिला तर काही दिवसांनी अपल्याला प्यायला सुद्धा पाणी पुरणार नाही! 

यात पुढची गुंतागुंत म्हणजे आपल्याकडे पाण्याचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी होतो. आपल्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी शेतीचं उत्पन्न वाढायला हवंय, आणि आपण शेतमालाची निर्यातही करतो. म्हणजे शेतीची पाण्याची मागणी वाढत राहणार. एक किलो भात पिकवायला सुमारे ३५०० लिटर पाणी लागते. एक क्विंटल तांदळाची निर्यात म्हणजे तो एक क्विंटल पिकवण्यासाठी वापरलेल्या ३५०० * १०० लिटर पाण्याचीही निर्यात आहे! असं आपणं शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनतून पाणी “निर्यात” आणि “आयात”ही करतो. याला “व्हर्च्युअल वॉटर ट्रेड” म्हणतात. आपल्या देशाचं ही आयात आणि निर्यात यांचं गुणोत्तर कसं आहे? भयावह!!!

 आधीच जास्त उपसा झालेला आहे आणि ती तूट भरून निघण्याऐवजी आपण पाणी निर्यात करतो आहोत!

मोसमी पाऊस किती पडणार आणि कधी पडणार याचे आपले अंदाज अजूनही पुरेसे विश्वासार्ह आणि उपयुक्त
(actionable) नाहीत. वरचं सगळं पाण्याचं गणित बाजूला ठेवलं तरी आधीच आपल्या शेतकर्‍याची अवस्था बिकट आहे. एकरी उत्पन्नामध्ये आपण जगाच्या मागे आहोत. जमिनीचा कस टिकवणं / सुधारणं हे मोठं आव्हान आहे. नवी जमीन लागवडीखाली आणण्यासाठी उपलब्ध नाही, आहे ती जमीन नागरीकरणामध्ये जाण्यापासून वाचवणं अवघड झालंय. काय करायला हवं अशा वेळी?

एका तज्ञांचं असं मत वाचलं, की आपल्याकडे मान्सून चांगला झाला तर सरासरीच्या ११०% पर्यंत पाऊस पडतो, वाईट झाला तरी ७५% तरी पडतोच. अजिबात पाऊस पडलाच नाही असं होत नाही. आहे ते पाणी नीट वापरलं तर आपल्याला पुरू शकतं. राजस्थानातील राजेंद्रसिंह यांचे “जोहड” चे यशस्वी प्रयोग, पाणी पंचायत अश्या कित्येक चळवळी मिळेल ते पाणी वाचवण्यात, त्याचा सुयोग्य वापर करण्यात यशस्वी झालेल्या दिसतात. पण या प्रश्नाची व्याप्ती बघितली तर हे लोकल प्रयत्न अपुरे वाटतात. आणि प्रत्येकाने फक्त दुष्काळाची थेट झळ लागल्यावरच प्रयत्न करायचे का?

मी हवामानशास्त्र, शाश्वत विकास, शेती यापैकी कुठल्याही क्षेत्रातली तज्ञ नाही. उत्सुकतेतून जे काही वाचलं, त्यातून मला समजलंय ते हे. तुम्ही यातले तज्ञ असाल / यावर प्रकाश टाकणारं काही सुचवू शकत असाल, तर जरूर सुचवा – आपल्याकडच्या शेतीचं अर्थशास्त्र समजून घ्यायचंय मला. परवा ट्रेनने येतांना बघितलं, या दुष्काळातही तर भीमेच्या पात्रात पंप टाकून ऊसाला पाणी फिरवत आहेत. जिथे पाणी आहे तिथे ऊस आहे, जिथे नाही तिथे प्यायलाही पाणी नाही! ऊस केल्याशिवाय आपला शेतकरी जगूच शकणार नाही का? अन्नधान्यासाठी कितीतरी जास्त महत्वाची असणारी गहू, ज्वारी, बाजरी, भात, डाळी पिकवून त्याला पैसा का मिळू शकत नाहीये?

*** 
(Water stress indicator हा नकाशा http://www.unep.org वरून तर Virtual Water Trade हा नकाशा http://temp.waterfootprint.org या संकेतस्थळावरून साभार.)

केवळ नशीब म्हणून वाचले असं कितीतरी वेळा झालंय माझ्या बाबत. अशीच ही मी चौथी पाचवीत असतानाची गोष्ट. रेल्वे कॉलनीतली. रेल्वे कॉलनी म्हणजे एकदम सुस्त परिसर. जुन्या काळात बांधलेले प्रचंड बंगले, त्यांची भली मोठी आंगणं, पुढे – मागे – बाजूला प्रचंड आकाराची (बहुधा निगा न राखलेली) बाग. एका घराचा दुसर्‍याशी संबंध नाही. रस्त्यावरून किंवा गेटमधून घराचं दार सुद्धा नीट दिसणार नाही. संध्याकाळीसुद्धा रस्त्यात फारसं कुणी दिसायचं नाही. आता तर दुपारी अडीच ते साडेतीन मधली वेळ असेल. म्हणजे सगळं शांत शांत. घरात मी एकटीच जागी होते. दोघे भाऊ शाळेत / कॉलेजात, बाबा बाहेर गेलेले. आजी बहुतेक झोपलेली. दार वाजलं. मी जाळीच्या दारातून बघितलं तर एक नऊवारी नेसलेली गावाकडून आल्यासारखी दिसणारी मध्यमवयीन बाई बाहेर उभी.

डॉक्टरांनी प्रायव्हेट पेशंट घेऊ नयेत असा नियम असला तरी कितीतरी डॉक्टर घरी पेशंट बघत, त्यामुळे आईचे पेशंटही डॉक्टरांना भेटायला म्हणून वेळीअवेळी कधीही घरी येत. कधी बरी झालेली एखादी आजीबाई शेतावरनं पिशवीभर ताजी भाजी डॉक्टरीण बाईंसाठी घेऊन येई, कधी कुणी बाळाच्या जन्माचे पेढे-बर्फी घेऊन येई. तपासायला आलेल्यांना “घरी तपासत नाहीत, दवाखान्यात भेटा” म्हणून बोळवण करावी लागे, किंवा असे कुणी भेटायला आलं तर त्यांचा निरोप घेऊन ठेवावा लागे. दारात अनोळखी कुणी उभं असण्यात विशेष काहीच नव्हतं त्यामुळे.

“डॉक्टर नाहीत घरी. आणि घरी तपासत नाहीत त्या.” मी नेहेमीप्रमाणे सांगितलं. “ताई दार उघड जरा.” ती बाई म्हणाली. मी दार उघडलं. “इकडे ये.” तिने माझा हात धरला, आणि एकदम गॅरेजच्या दिशेने मला ती ओढतच न्यायला लागली. गॅरेजचं गेट वेगळं, घराचं वेगळं. गॅरेजच्या रस्त्याला तिने मला नेलं तर घरातून कुणाला दिसणारही नाही. तितक्यात घराचं गेट वाजलं – दवाखान्यातून आई अचानक घरी आली होती. गेटमध्ये कुणीतरी पाहून ही बाई माझा हात सोडून गॅरेजच्या दिशेने पसार झाली. मी गोठल्यासारखी जागीच उभी. किती मूर्ख आणि बावळट आहोत आपण! ही बाई आपल्याला पळवून नेत होती, आणि आपल्याला ते समजलंही नाही … आपण तिला प्रतिकार केला नाही! आई आत्ता आली नसती तर! हे सगळं आईला किंवा कुणाला सांगायचीही लाज वाटली मला!    

“का ग बाहेर का उभी आहेस अशी?” आईने विचारलं.

“काही नाही … बहुतेक पेशंट होती कुणीतरी. गेली.” मी.

“बर. येईल परत.”

आजवर हा प्रसंग कधी कुणाला सांगितला नव्हता. आज लेकीच्या शाळेतल्या आयांच्या ग्रूपवर पुण्यातल्या शाळेचा किस्सा फिरतोय – एक माणूस शाळेच्या दाराजवळ उभा होता, शाळा सुटल्यावर एका मुलाला म्हणाला, “आज तुझी आई नाहीये घरी. तिने मला तुला घेऊन यायला सांगितलंय!” सुदैवाने तो मुलगा शाळेत पळून गेला परत. हाच किस्सा पुण्याच्या अजून एक दोन शाळांमध्ये घडला म्हणे. कसं जपायचं मुलांना? कितीही पढवलेलं असलं, तरी त्या क्षणी मुलाला पळून जायचं सुचेल आणि / किंवा कुणीतरी दुसरं मदतीला येईल अशी आशा करायची आपण! त्यावरून हे आठवलं. आपला मूर्खपणा तेंव्हा मी आईला सांगितला असता तर कदाचित ती बाई सापडलीही असती … कोण जाणे तिच्या बरोबर अजून कोण कोण होतं, माझ्याबाबतचा प्रयत्न फसल्यावर तिने दुसरीकडे पुन्हा प्रयत्न केला का!भटकंती कितीही आवडली, तरी आपलं गाव, आपली जागा म्हणण्यासारखं, जिथे मला कुणी उपरं म्हणू शकणार नाही असं जगाच्या एका कोपर्‍यात काहीतरी असावं ही माझी एक प्राथमिक गरज आहे. माझ्या मागच्या कित्येक पिढ्या चाकरीसाठी भटकत राहिल्यात. नवर्‍याचीही तीच गत. त्यामुळे मला “आमचं गाव, आमचं शेत, आमचं घर” याविषयी सांगणार्‍या लोकांचा जरा हेवाच वाटायचा. आपण राहतो तेच आपलं गाव. मूळ गावावर जे काय प्रेम करायचं असेल ते त्यावरच करा हे आता कुठे कळायला लागलंय. (वळत नाहीच अजूनही!) पण तरीही रोज बदलणार्‍या, नवे रुपडे घेऊन येणार्‍या महानगराला आपलं म्हणणं थोडं जडच जातं. कितीही ओळखीचं झालं तरी ते बिनचेहर्‍याचं राहतंच. त्यामुळे जिथे सगळं गाव एकमेकाला ओळखतं, आपल्या पानातलं अन्न आपल्या शेतातूनच आलेलं असतं त्या “हरवलेल्या नंदनवना”ची स्वप्नं मला अजूनही पडतात. पावसानंतरच्या दिवसात बाहेरून बघताना ही गावं कितीही रमणीय दिसली तरी पोट भरायची मारामार झाल्यावर इथल्या रहिवाश्यांना यापेक्षा शहरातली झोपडपट्टी बरी म्हणावं लागतं हे माहित असूनही हे वेडं स्वप्न काही विरत नाही. या वेडेपणाची लागण माऊलाही व्हावी अशी इच्छा आहे. मातीची ओळख होणं हा त्यातलाच एक भाग. त्यामुळे ती जेमतेम चालायला लागली तेंव्हापासूनच तिला शेतात कधी घेऊन जाता येईल याचे मनसुबे मी रचते आहे. 

या वर्षी अशी संधी मिळाल्यावर मी तिच्यावर (संधीवर बरं, माऊवर नाही !) झडप न घातली तरच नवल! माऊच्या मैत्रिणीच्या आईने कामाला येणार्‍या मावशी सुट्टी घेऊन भातलावणीला शेतात जाणार म्हटल्यावर त्यांच्या शेतावर जायचं आमंत्रण लावून घेतलं. तिथे जायला माऊ आणि मी अर्थातच एका पायावर तयार!

मधेच येणारी पावसाची सर, जरा दूरवर एकीकडे डोंगर आणि त्यातले धबधबे, वार्‍यावर डोलणारी पायर्‍या पायर्‍यांची भाताची खाचरं, शेजारून वाहणारा ओढा आणि पलिकडे धरणाचं पाणी! दोन्ही पिल्लांनी (आणि आयांनी) भातखाचरातल्या चिखलात, शेजारच्या ओढ्यात आणि सगळ्या प्रवासातच किती धमाल केली हे सांगायलाच नको! हे या छोट्याश्या भटकंतीचे काही फोटो:

आपण पाण्यात डुबुक डुबुक करू या?

भाताची रोपं उपटून झाली, बांधलेले गठ्ठे चिखलातून पळत इकडून तिकडे टाकून झाले. खेकडे बघून झाले.

शेताशेजारचा ओढा

 चहाच्या ओढ्यात खेळावंच लागलं मग!

धरणाच्या पाण्याकडे

 धरणाचं पाणी बघायला जातांना कावळ्याच्या छत्र्या दिसल्या, मासे धरणारा काका दिसला. त्याच्या पिशवीचं इन्स्पेक्शन झालं.

धरणाच्या पाण्यात गाळ आहे, मावशी जाऊ देत नाहीये!

पाणी!

 इथे एक तंबू हवा होता!

 वार्‍यावर डुलणारी भाताची रोपं, आणि झाडाला लागलेल्या कोवळ्या चिंचा!

पेरणीपूर्वी आजोबांनी नांगर धरलाय.

 भात लावणीसाठी शहराकडे पोटापाण्यासाठी गेलेल्या मुलंसुना येतात … पण नांगर धरणं अजूनही अजोबांचंच काम! दुसर्‍या कुणालाच ते जमत नाही / शक्य नाही. आजोबांचे हातपाय चालेनासे झाल्यावर काय? घरोघरी हेच चित्र दिसतंय!


शाळेत सहावी – सातवीला कधीतरी ही कविता होती.
मी तेंव्हा बहुतेक दिवसभर माझ्या घट्ट मैत्रिणीच्या घरीच पडीक असायचे. फक्त जेवायला खायला आणि झोपायला घरी! मैत्रिणीची आई मला तिची चौथी मुलगीच म्हणायची! तिची आई यूपीमधल्या छोट्याश्या गावातली. लहानपणीच लग्न झालेलं. प्रेमळ पण अतिशय परंपराप्रिय सासू, मेहनती, समजदार पण आईच्या कधीही शब्दाबाहेर न जाणारा नवरा – त्याचे वडील अकाली गेल्याने सगळ्या धाकट्या भावंडांची जबाबदारी स्वीकारून स्वतः नोकरी करत त्यांना शिकवणारा. दादा आणि वहिनीला आईवडलांसारखं मानणारे धाकटे दीर. अश्या घरातल्या त्या “आई”ला मी कधी तिच्या नात्यांच्या पलिकडे बघितलेलंच नव्हतं. लग्नाला पंचवीस – तीस वर्षं होऊनही सासूच्या धाकात राहणारी, घरातल्या कामाचा आणि रूढीपरंपरांचा बोजा न पेलवून नेहेमी आजारी आजारी राहणारी ही माझी “दुसरी आई” फार प्रेमळ होती.
एकदा नेहेमीप्रमाणे मैत्रिणीच्या घरी आमचा एकत्र ’अभ्यास’ चालला होता. दोघी मिळून ही कविता म्हणत होतो. मैत्रिणीची आई आमच्या कविता म्हणण्यात सामिल झाली! मराठी – इंग्रजी कविता, सुभाषितं माझ्या आईकडून मी भरपूर ऐकली होती, तिच्या शाळेतल्या, कॉलेजातल्या गमतीजमती ऐकल्या होत्या, तिच्या मैत्रिणींविषयी ऐकलं होतं. शाळेत काय चालतं हे तिला ऐकवलंही होतं. आपली आई ही आई असण्याव्यतिरिक्त घराबाहेर आणि घरातही बरीच काही आहे हे समजत होतं.  मैत्रिणीच्या आईला मात्र मी कधी हातात पुस्तक धरलेलं बघितलं नव्हतं. तिच्या घर-संसारापलिकडे तिला कधी काही अस्तित्व होतं, तीही कधीतरी अल्लड मुलगी होती, शाळेत जात होती, तिथे तिच्या मैत्रिणी असतील, आवडते – नावडते विषय असतील, आवडीच्या, तिला पाठ असलेल्या कविता असतील असं कधी मनातही आलं नव्हतं आमच्या! इतक्या दिवसांच्या सहवासात फक्त त्या एका कवितेपुरती दिसली ती मला. त्या कवितेविषयी, तिच्या शाळेविषयी कधी विचारायचं राहूनच गेलं तिला!

माऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही. 
 कारण तिची आई नोकरी करते. 
आई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार? त्यांचा अभ्यास कोण करून घेणार? आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच!
नोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार?
नोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच! 
तिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच!
 करियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी … पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने!) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा!

याच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी!
सद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता,  आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय! “बरं झालंस नोकरी सोडलीस … पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया!” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही! 🙂  

गेल्या पाच – सहा महिन्यांपासून जमेल तसं एका नावाजलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये थोडं काम करत होते. त्या कामावर आधारित पेपर मांडायला एका सेमिनारला गोव्याला जायची संधी मिळाली या आठवड्यात. मी गावाला जाणार म्हणजे अर्थातच माऊला घेऊन. तिला घेऊन एकटीने एवढा उद्योग करावा का नाही अश्या विचारात होते आधी. पण संस्थेतल्या सहकारी म्हणाल्या, जरूर घेऊन ये तिला. मग ठरवलं, जिवाचा गोवा करूनच यावा!

आजवर माऊला घेऊन केलेले प्रवास तिची गैरसोय होणार नाही असं बघून, शक्यतो तिच्या पेसने असे होते. यावेळी प्रथमच दुसर्‍याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, धावपळीचा प्रवास होता, आणि माऊचा बाबा सोबत नसणार होता. त्यामुळे पेपर वाचायच्या तयारीपेक्षा मला माऊच्या तयारीची जास्त काळजी होती!
प्रत्यक्ष कॉन्फरन्स माझ्यापेक्षा माऊने जास्त एन्जॉय केली! पंधरा – वीस कॉलेजवयीन दादा-ताई कौतुक करायला + खेळायला, आणि जरा चेंज हवा असेल तर मग मावशी मंडळी … दोन दिवस नुसता कल्ला केला माऊने! “दोन वर्षांच्या लेकीला घेऊन एवढा प्रवास म्हणजे धीराची आहेस तू!” पासून ते “कॉन्फरन्सला लहान मुलांना घेऊन यायला परवानगी असते का?” पर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तिथे. (यातल्या बहुसंख्य मी कानाआड केल्यात.) 

आजपर्यंत माऊ आणि काम या गोष्टी एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या ठेवायचा माझा प्रयत्न होता. त्याची काही गरज नाही असं जाणवलं मला. तिच्या सोबत असण्याने मला नक्कीच फायदा झाला – जनरली अनोळखी घोळक्यामध्ये मी फार तोंड उघडत नाही. इथे माऊची आई म्हटल्यावर तोंड बंद ठेवण्याची संधीच नव्हती. तरीही माझ्या दसपट तरी ’नेटवर्किंग’ माऊने केलं असेल कॉन्फरन्समध्ये. आणि तिलाही यातून नवं काही अनुभवण्याची संधी मिळेल असं वाटतंय. माऊचं रोजचं रूटीन पाळणं नक्कीच जमणार नव्हतं हे दोन दिवस, पण रूटीनचा बाऊ केला तर नव्या ठिकाणी, नवे अनुभव घ्यायला मिळणं आणि जुळवून घेता येणं कसं शिकणार? एखाद्या वेळी असं झोपायची वेळ आली तर फार वाईट वाटून घ्यायचं नाही असं ठरवलंय मी!
कारण त्यानंतर असा दंगा करायची संधी मिळते!

आज एक गंमत झाली. एका आजींकडे मी माऊबरोबर गेले होते. त्यांनी मला विचारलं,
“ही तुझीच?”
“हो, माझीच.”
मग जरा वेळाने बोलता बोलता परत, “ही तुझीच?”
मला काही परत आलेल्या या प्रश्नाचा रोख कळला नाही. त्यांना कदाचित “जास्तीची माहिती” ऐकायची असावी असं वाटलं.
“हो. माझीच. Adopted.”
माऊसमोर असा उल्लेख करणं त्या आजींना काही आवडलं नाही. “तिला वाईट वाटेल असं नाही बोलू तिच्यासमोर.” त्यांचा सल्ला.
मला न पटलेला. तिला किंवा मला वाईट वाटावं असं काय आहे adopted असण्यामध्ये? मी तिची जन्मदात्री नसल्याने तिला किंवा मला आज काहीही फरक पडत नाही. पुढेही पडण्याचं कारण नाही. It is just a fact. यात कमीपणा वाटावा / अभिमान वाटावा असं विशेष काहीही नाही. याला विनाकारण लेबल कशाला लावायचं? यात मुद्दाम सांगून जाहिरात करण्यासारखं काहीच नाही, पण तिच्यापासून किंवा कुणापासून लपवून ठेवण्यासारखं तर नाहीच नाही.

कुठल्याही दोन वर्षांच्या उपद्व्यापी लेकीच्या आईइतकीच मी माऊवर कावते. आणि कुठल्याही दोन वर्षांच्या उपद्व्यापी लेकीसारखेच कारभार ती दिवसभर करत असते. आपल्या कुटुंबाविषयीची ही माहिती समजून वाईट वाटून घ्यायची उसंत आहे कुणाला इथे?


दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.

आता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.
कात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच!) जास्तच कापणी केलीय का आपण? नवी पालवी येईल ना याला पुन्हा? अश्या शंका यायला लागतात.
या शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो. 
त्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो!
दिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात…
***
(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून … पळा!!! 🙂 )
एक होती बाहुली.
तिच्या बाबांची लाडकी.
बाबा शहाणे होते.
आपल्या बाहुलीने शहाणं व्हावं असं त्यांना वाटायचं.
त्यांनी बाहुलीला शिकवायला सुरुवात केली.
आपल्या बाहुलीच्या हातून असं पाप होत असलेलं कुणा घरातल्याला बघवलं नाही.
त्यानी काचेची पूड करून बाहुलीला भरवली.
संपली लहान बाहुलीची गोष्ट!

***

सद्ध्या मनीमाऊला दिवसातून एकदा तरी “लहान माझी बाहुली” ऐकायचं असतं. ते म्हणतांना रोज मला ही दीड शतकापूर्वीची बाहुली आठवतेच आठवते! डॉक्टर विश्राम रामजी घोले यांच्या लहान मुलीची ही चटका लावणारी गोष्ट. अश्या किती बाहुल्या कुणाला न कळता हरवून गेल्या असतील!

***
हे वाचल्यावर आईने मला डॉ. अरुणा ढेरे यांचं डॉ विश्राम रामजी घोलेंवरचं पुस्तक काढून दिलं परत वाचायचं असेल तर म्हणून. बाहुलीची गोष्ट पुन्हा एकदा तपासली त्या पुस्तकात. तिला काचा कुटून कुणी भरवल्या त्याचा उल्लेख नाही पुस्तकात – नातेवाईकांपैकी कुणीतरी हे केलं असं म्हटलंय. तशी दुरुस्ती केलीय वर.

मागच्या वर्षी याच सुमाराला प्रवासाला निघालो होतो आम्ही … उत्सुकता, काळजी, युफोरिया असं सगळं ओझं सोबत घेऊन. रात्रभराच्या प्रवासात झोप लागणं शक्यच नव्हतं … डोळ्यात न बघितलेल्या बाळाविषयी इतकी स्वप्नं होती, की झोपायला वेळच नव्हता.
कशी असेल ती? मनात नाही भरली तर? आपल्याला जमेल ना सगळं नीट? घरातले सगळे स्वीकारतील ना? जन्मदात्री गेली म्हणून बाळाला देऊन टाकायला तयार झालेले नातेवाईक कसे असतील? सौदा करताहेत का ते बाळाचा? काय अपेक्षा आहेत त्यांच्या?
“इतक्या लहान बाळात काही मेडिकल प्रॉब्लेम असले तरी समजणार नाहीत. फार मोठी रिस्क आहे ही.” एका अनुभवी हितचिंतकांचा प्रामाणिक सल्ला. “बाळ न बघता हो म्हणू नका, आणि इतकं लहान शक्यतो नकोच.” सगळंच इतकं अचानक झालंय, की धड विचार करायला वेळच झाला नाही. अजून काहीच नक्की नाही, त्यामुळे कुणाला सांगणं, त्यांचं मत घेणंही शक्य नाही. फक्त कायदेविषयक आणि वैद्यकीय सल्ला मात्र घेतलाय.
सगळं नीट झालं, तर आयुष्य बदलूनच जाईल एकदम. आणि फिसकटलं काही कारणाने तर? न बघितलेल्या बाळासाठी घेतलेल्या अंगड्या-टोपड्यांकडे बघायची हिंमत होईल परत? प्रवास संपता संपत नाही. तिथे पोहोचल्यावरसुद्धा पहिला दिवस फक्त पूर्वतयारीचा. उरलीसुरली खरेदी करायची आणि वाट बघत बसायची.
कसा तरी दिवस संपतो. दुसर्‍या दिवशी सकाळीच एक एवढुस्सं गाठोडं हातात येतं. नव्या स्पर्शामुळे बावरलेला चेहरा तासाभरात शांत होतो. हे इतकं गोडुलं आहे, की बघताक्षणी त्याच्या प्रेमात न पडणं अशक्य. पण अजून सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायचीय. आपल्या हातात आहे, पण अजून हे आपलं नाही. हा दिवस कालच्या दिवसापेक्षा जास्त छळणारा. समोर आहे, त्याला आपलं म्हणायचं नाही हे कसं शक्य आहे?
दुसर्‍या दिवशी दुपारी अखेर सगळे सोपस्कार पूर्ण होतात. ही लाडूबाई आता आपली! एवढी निराशा आणि अनिश्चितता अनुभवल्यावर विश्वास बसत नाही यावर. पुढचा महिनाभर तरी जमीन दिसूच नये एवढी हवेत आहे मी! या परीने अशी काही जादूची कांडी फिरवली आहे, की सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात, शंका हवेत विरूनच जातात. 
आपल्यांना मनवण्यात खर्च केलेला वेळ आणि एनर्जी, सरकारी दिरंगाई, झारीतले शुक्राचार्य आणि न संपणारं वाट बघणं … तरीही, It was worth the wait.