आठवड्याच्या सुट्टीनंतर आलेल्या सोमवारची सकाळ. मनाला शनिवार – रविवारमधून बाहेर काढण्यासाठी धडपड चालू असते. शुक्रवारी रात्री निग्रहाने मिटलेल्या लॅपटॉपवरच्या न वाचलेल्या मेलची संख्या एकीकडे अस्वस्थ करत असते. आणखी तासाभरात ऑफिसमध्ये पोहोचलं, म्हणजे सरळ शुक्रवार रात्रीपर्यंत वेळ काळ काही सुचू नये एवढं काम आहे याचं कुठेतरी दडपण येत असतं. पुढच्या शनिवार रविवारचे बेत मनाच्या एका कोपर्‍यात हळूच आकार घेत असतात. खूप दिवसात न ऐकलेलं ‘म्युझिक ऑफ सीज’आठवणीने लावलेलं असतं. थोडक्यात, नेहेमीसारखाच एक सोमवार. नेहेमीच्याच सरावाने घरून ऑफिसकडे ड्रायव्हिंग. नेहेमीच्याच सुसाट वेगाने हायवेवरून पळणार्‍या गाड्या. आल इझ वेल.
    अचानक गाड्यांच्या रांगेत पुढे कुठेतरी करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज येतो. मागच्या गाड्याही ब्रेक लावतात, टायर रस्त्यावर घासत गेल्याचे आवाज, कुणी समोरच्या गाडीला धडकलेलं, कुणाला मागच्या गाडीने ठेकलेलं, एखादा नशीबवान कुठला ओरखाडा न उठता त्या गर्दीतून सहीसलामत सुटतो. गाडी शिकताना शिकवलेलं डबल ब्रेकिंगचं तंत्र तिच्याकाडून आपोआप वापरलं जातं. स्किड न होता, समोरच्या गाडीला धक्काही न लागता गाडी थांबते. मागचीही थांबणार, तेवढ्यात मागून त्या गाडीला धक्का बसतो, आणि ती गाडी मागून येऊन धडकते.
    सुदैवाने फार नुकसान नाही झालेलं गाडीचं. थोडक्यात निभावलंय. ऑफिसच्या कामाचा मात्र आज जबरी खोळंबा होणार. गाडी आधी मेकॅनिककडे न्यायची म्हणजे अर्धा दिवस तरी गेलाच … दोन मिनिटात मनात हिशोब होतो. पुढे रांगेत काय झालंय बघितल्यावर तिला कळतं … बाकी सगळ्या गाड्यांना लहानसहान पोचे आलेत, दिवे फुटलेत. पण एक गाडी सोडून पुढे टाटा सफारी पुढच्या मिनीट्रकवर जबरदस्त आदळलीय … सफारीची टाकी फुटून रस्त्यावर तेल पसरलंय, गाडीचं नाकाड ट्रकखालून काढायला क्रेन लागणार.
    पुढ्चे सगळे सोपस्कार पार पडतात, गाडी मेकॅनिककडे पोहोचवायला नवरा येतो. उरलेला दिवस ऑफिसच्या कामाचा ढीग उपसण्यात जातो. रात्री मात्र मनाची बेचैनी जाणवते. काय झालंय आपल्याला ? एक छोटा अपघात. सुदैवाने आपली त्यात काही चूक नव्हती. गाडीलाही मोठं काही झालेलं नाही. अपघाताच्या जागेपासून गॅरेजपर्यंत आपणच गाडी चालवत नेली. मग हे काय वाटतंय आता नेमकं?
    टेल लॅम्प नसणार्‍या त्या मिनीट्रकच्या मागे आपली गाडी असती तर?
    रस्ताभर स्किड झालेल्या चाकांच्या खुणा उमटवत त्या ट्रकवर आदळाणारी टाटा सफारी आपल्या मागे असती तर?
    प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डबल ब्रेकिंग झालं नसतं तर?
    कधीही ड्रायव्हिंग करताना तो सोबत असतो, तिच्या नकळत तो अपघात टाळत असतो हे खरंय. पण म्हणून मुद्दाम त्याची परीक्षा बघणं बरोबर नाही.
    कधीतरी मरायचंय हे माहित आहे, पण तो कधीतरी नेहेमीच दूरवरच्या भविष्यातला आहे असं आपण समजून चालतो. आपल्याला कसं मरायचंय हे तरी आपण कुणाला सांगितलंय का? कुठलंही क्रियाकर्म करण्यापेक्षा देहदान कर माझं … आणि एक मस्त वडाचं झाड लाव म्हणून सांगायला पाहिजे नवरोबाला.
   आताशी तर कुठे कसं जगायचं ते उमगायला लागलंय. एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आणि कुठली गोष्ट अर्धवट सोडणं तिला आवडत नाही. जास्त जागरूक रहायला हवं तिने. तिची गाडी नकळतच नेहेमी फास्ट लेनमध्ये असते. कुठे पोहोचायचंय इतक्या वेगाने? ठरवून फास्ट लेनमधून बाहेर पडायला हवंय.
    गाडी दुरुस्त झाली, पुन्हा रूटीन सुरू झालं. पण रस्त्यावर त्या जागी गाडी स्किड झालेल्या खुणा बघितल्या, म्हणजे रोज तिला जाणवतं. its just not worth being in the fast lane.